खरंतर प्रत्येकालाच झटपट अन् वीना कष्टाच्या पैशाचं आकर्षण असते अगदी महाभारत काळातील द्युत क्रीडा असो की आजचे वेगवेगळे ऑनलाईन जुगार प्रत्येक काळात तुम्हाला प्रलोभन देणारी माध्यमे उपलब्ध असतातच. काहीतरी मिळवण्याच्या आमिषाने गैर मार्गाचा वापर केल्यास आयुष्यात संघर्षरुपी महाभारत घडणारच.
सुरवातीला कुणीतरी जुगारातून मिळणाऱ्या विनासायास फायद्या विषयी सांगतो तर एखादा जवळचा मित्र त्याला कसा फायदा झाला ते रंगवून सांगतो अन् मग आपणाला पण त्याला पैसे मिळतायत मग मी पण सहज मिळवू शकतो या विचाराने अर्थात अविचाराने अशा प्लॅटफॉर्मवर नकळत जातो मग सुरवातीला चला फुकटच्या मिळालेल्या पैशात हॉटेलात जाऊन नाष्टा, जेवण करू नंतर घरच्यांकडून पैसे घेण्यापेक्षा आपला आपण पॉकेट मनी बनवू असे करत यालाच कमाईचे साधन समजू लागतात अन् आजूबाजूच्या भुरळ घालणाऱ्या लाइफ स्टाईल मुळे याकडे अधिकच ओढले जातात.
सुरवातीला फायदा मिळत असल्याने भारी वाटत असते मग जेव्हा नुकसान होते तेव्हा मात्र आपला इगो दुखावतो अन् मी असा हारु शकत नाही मग आत्ता पर्यंत मिळाले किती व गमावले किती याचा हिशोब करत तो एकतर प्लस पाहिजे किंवा झीरो तरी पाहिजे तरच आपल्याला बरं वाटेल असं आपणच आपल्या मनाला समजावतो अन् एका दुष्टचक्रात अडकत जातो. त्यातून सुटायचे तर असते पण आपली प्रतिमा मात्र सुसंस्कृत राहिली पाहिजे मग कुणालाही आपले उद्योग न कळू देत परस्पर निस्तरताना एक खड्डा भरण्यासाठी दुसरा खड्डा मग तो भरण्यासाठी तिसरा असले नसते उद्योग वाढवून बसतात अन् त्यासाठी ऑनलाईन विनासायास लोन देणारे अश्या बकऱ्यांच्या शोधात असतातच कधी कधी तर चोरी करण्याचा मार्ग देखील निवडतात.
यातूनच पुढे अती विचार, नैराश्य, स्वतःच्या आयुष्याकडे अक्ष्यम दुर्लक्ष, उदासीनता अन् शेवटी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला जातो.
हे सर्व काही टाळू शकतो परंतू आईवडील काय म्हणतील, रागावतील आपल्यावर जुगारी असा शिक्का बसेल या भीतीने आहे त्या परिस्थितीला सामोरे न जाता अजूनच कोषात जात विमनस्क अवस्थेत राहतात.
खरंतर माणूस हा चुकातूनचं शिकणारा प्राणी आहे जेव्हा थोडे नुकसान झाले तेव्हाच कोणताही कमीपणा न वाटून घेता ती चूक मनापासून, प्रामाणिकपणे तसेच खुलेपणाने स्वीकारणं. महत्वाचे म्हणजे आई वडीलांच्या राग, चिडचिड ह्या स्वाभाविक प्रतिक्रिया ध्यानात घेऊन त्यांच्या समोर ती चूक कबूल करणे. कारण कितीही मोठी चूक झाली तरी ती निस्तरण्यासाठी अन् पुन्हा सुधारणा होण्यासाठीची संधी हे केवळ आईवडीलच देऊ शकतात.
अन् तसे केले तरच ऑनलाईन जुगारामुळे जो मोहजालाचा फास आवळला जातोय त्यातून सुटका होईल.













