सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५

अवघड जागेचं दुखणं ......


           अवघड जागेचं दुखणं ........

           काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेश या राज्यात सचिवालयातील शिपाई या पदासाठी,३६८ जागां करिता अर्ज मागवले होते त्यासाठी तब्बल २३लाख अर्ज दाखल झाले. आश्चर्याची बाब म्हणजे २५५ अर्ज पिएचडी धारकांचे होते अन् जवळजवळ २लाख अर्ज इंजीनियर, एमएससी,एमकॉम अशा पदवीधरांचे होते. पद निवडीसाठी थेट मुलाखत पर्याय ठेवल्यामुळे या भरती प्रक्रियेला किमान ४वर्ष लागतील असा अंदाज व्यक्त करत राज्यशासनाने ती प्रक्रियाच रद्द करून टाकली. राजकीय नेतृत्वाने सोपा मार्ग स्विकारत हात झटकले परंतु यातून निदर्शनास आलेली  बेरोजगारीची भिषणता ही कोणत्याही जागरूक शासनकर्त्याची झोप उडवण्यास पुरेशी आहे. जगातील सर्वात तरूण, तसेच महासत्ता बनण्यासाठी आशावादी असणाऱ्या भारत देशाची भिस्त अशाप्रकारच्या बेरोजगार तरूणांवर असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला मुखभंगच होणार याबाबत माझ्या मनात तरी कोणतीही शंका नाही.
         आपल्या लोकशाही व्यवस्थेत प्रशासन(?) व लोकनियुक्त (?) सरकार या दोघांनीही समन्वयाने राज्यकारभार चालवायचा असतो. मात्र एकिकडे प्रशासनातील अर्निबंध खाबुगिरी व त्यामुळेच र्निमाण झालेली शिथिलता अन् त्यातूनच आलेला धोरणं राबवण्याबाबतचा सुस्तपणा तर दुसरीकडे लोकशाही पद्धतीनेच लोकतंत्राची येथेच्छ मोडतोड करीत साम दाम दंड भेद नितीशास्रानुसार लोकांचा वापर करीत केवळ सत्ताकेंद्रें हस्तगत करून प्रस्थापित बनणारा स्वतंत्र भारतातील नवा मांडलिक असणारा राजकीय वर्ग,तसेच या दोन्हीच्या सापटीत अडकलेली जनता असे निराशाजनक चित्र आदर्श शासन प्रक्रियेला छेद देत आहे.
         बेरोजगारीच्या मुळाशी जायचं झाल्यास साधनसंपत्तीची उपलब्धता व त्या तुलनेत असणारी व अनियंत्रित वाढणारी बेसुमार लोकसंख्या. तसेच त्यांचा केवळ भौतिक विकास होण्या करिता असणारी अभ्यासक्रमापासून सोयीसुविधेपर्यंत ची बकाल शिक्षण व्यवस्था म्हणजे भरमसाठ शिक्षित तरूण बाहेर पडणारे कारखाने असुन त्यातून केवळ शिक्षणसम्राटांचेच भले होते. असो. तसेच ज्याप्रमाणात विद्यार्थी बाहेर पडतात त्याप्रमाणात त्यांना सामावून घेण्यासाठी उपलब्ध नसणारी रोजगार संधी, त्यासाठी दुरदृष्टीचा अभाव असणारे नेतृत्व तसेच रोजगार, व्यवसाय निर्मितीस प्रतिकूल असलेले वातावरण या बाबी प्रामुख्याने कारणीभूत आहेत. ही झाली बेरोजगारपणाची कारणमीमांसा परंतु या बेरोजगारपणामुळे होतकरू तरूणांवर होणारे मानसिक, शारीरिक परिणाम अजूनच भयावह आहेत. आजुबाजूची आधुनिकता व त्यातून दिसणारे भौतिकदृष्ट्या उच्च राहणीमान,या सर्वांचे भुरळ पडणारे वय परंतु बेरोजगारीमुळे ह्या सुखसुविधेपासून वंचित राहणे त्यांना नैराश्यावस्थेस नेते.यामुळे उमद्या वयात लग्नाच्या बाजारात मिळणारी नकारघंटा पर्यायाने शरिरसुखाच्या गरजेपासून देखिल त्यांना वंचित ठेवते. अशा अभावात्मक जगण्यामुळे आपसुकच मनोरूग्णतेकडे झुकलेले अथवा गुन्हेगारीकडे वळलेल्या तरूणांची संख्या देखिल झपाट्याने वाढत आहे.
          केवळ वयाने तरूण असलेला परंतु उमेद हरवून दिशाहीन भरकटलेला नवा वर्ग,स्वप्नरंजन करणाऱ्या माध्यमात रममाण होत वास्तवात अराजक अवस्थेचा पाया बनत आहे. सळसळतं रक्त हे दुधारी शस्त्र असुन जर त्याचे योग्य उपाययोजन केले नाही तर त्याचे रूपांतर विध्वंसक लाव्हारसात होईल व त्यातून उठणारे काळ्याकुट्ट धुराचे लोट सुव्यवस्थे बरोबर भारताचे महासत्तेचे स्वप्न देखिल बेचिराख करेल.
          उत्तरप्रदेशातील वरील घटना ही अगामी काळा करिता धोक्याचा इशारा आहे त्याकडे दुर्लक्ष करणे सुशासन व सुव्यवस्थेसाठी महागात पडेल. सद्य स्थितीला भेडसावणारे आतंकवाद, नक्षलवाद,तसेच पुन्हा एकदा शिक्षित व अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करीत जात, वर्ग,धर्म यामधे उफाळलेला द्वेष व श्रेष्ठत्वाचा वाद ही सर्व वेळीच समस्यांचे न केलेले वस्तुतः आकलन व पुरक उपाययोजनांचा अभाव यांचेच फलित आहे.तेव्हां वरवर अन् प्राथमिक अवस्थेत असलेला आजार योग्य व निग्रहपुर्वक उपाययोजना करीत नियंत्रित करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा केवळ जागतिक स्तरावर प्रतिमा उंचावण्यात मग्न असणाऱ्यांसाठी भविष्यात ते अवघड जागेचं दुखणे होऊन धड जगाला सांगता येईना, ना त्यांच्या पंक्तीत बसता येइना अशी अवस्था करेल.


                                                                                                                                संदिप महामुनी
                                                                                                                                ९६३७१३०२०६

बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

निर्वासित कर्तव्याचा बळी.....!



Innocent lifeless body is symbol of less life remains in humanity which indicates speech of introspection by silence of death !

                                     निर्वासित कर्तव्याचा बळी.....!
युरोपियन फोटोग्राफर निलुफेर देमिर यांनी दक्षिण तुर्कीतील बोर्डम् समुद्र किनाऱ्यावर एका ३वर्ष वयाच्या ' अयलान कुर्दी ' याचा वाहून आलेल्या मृतदेहाचे छायाचित्र काढले आणि ते पाहून सर्व संवेदनशील जग सुन्न झाले." अन् माणुसकी वाहून गेली..! " हीच प्रतिक्रिया स्वाभाविकपणे उमटली. ते छायाचित्र म्हणजे सिरीयातील किंबहुना जगातील प्रत्येक निर्वासितांची जीवन जगण्यासाठीची धडपड आणि त्यासाठीची जीवाची जोखिम यांना अधोरेखित करणारी निस्तब्ध, निपचित हतबलता होय.
सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकजण धडपडताना दिसतो. छान चौकोनी कुटूंबात रममाण होण्यासाठी आतूर झालेले आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यावर इतर घटक देखिल परिणामकारक असतात हेच विसरून जगत असतो. अगदी कुटूंबातील इतर सदस्य, घराजवळचे शेजारी, गावं, राज्यं, देश, विश्व सर्वकाही आपल्या जगण्याला अर्थ देत परिणाम साधत असतात.आपण मात्र मी ,माझं यातच गुरफटून स्वत: चा उत्कर्ष व स्थिरता यावरच भर देत व्हाइट कॉलर झापडं लावून जीवनाचा प्रवास करीत राहतो.कोणत्यातरी युद्ध सदृश्य परिस्थितीत होरपळणाऱ्या अराजकता माजलेल्या देशातील अतिरेकी संघटना जेव्हा अस्ताव्यस्त अविचाराने फोफावत अचानक एक दिवस आपल्या उंबरठ्यावर येवून ठेपतात तेव्हा मात्र प्रतिक्रिया देण्या इतपत भान देखिल आपल्याला उरत नाही अन् एक अनामिक काळजी, चिंता चेहऱ्यावर उमटते. त्यावेळी आपल्याला अराजक देशातील नागरिकांच्या अवस्थेची प्राथमिक कल्पना येते तोपर्यंत त्या नागरिकांविषयी अनभिज्ञ, असंवेदनशील असणारे आपण अपरिहार्यपणे एकाच समुहात सामील होतो. प्रत्येकजण जोपर्यंत आपल्यावर वेळ येत नाही तोपर्यंत तटस्थ राहण्याची वृत्ती सर्वच क्षेत्रात अवलंबताना दिसून येतो.
अगदी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील पाण्याचे दुर्भिक्ष, शेतीची, जनावरांची झालेली अपरिमित हानी, या सर्वाला कंटाळून स्वतःचे आयुष्य संपवणारा अन्नदाता सर्वकाही राजरोसपणे घडत असताना मेट्रोपोलिटन शहरी आयुष्य आपल्याच धुंदीत एल ई डी च्या प्रकाशात झगमगत असतं तेव्हा आपल्या शेजारी आसपास घडणारं दाहक वास्तव आपल्या दिशेने हळूहळू सरकणारे चक्रीवादळ असुन ते आपल्या घरावरील छप्पर उडवत जाईल याची कल्पनाही नसते. केवळ फावल्यावेळत ड्रॉइंगरूम मधे बसून काहितरी चघळायला विषय हवा असतो तेव्हा पाऊस नाही, दुष्काळ पडणार, शेतकऱ्यांच्याकडे पैसा तर बाजारपेठ, धंदा तेजीत याविषयीपासून शेअरबाजार ते आतंकवाद या सर्व ऐकीव गोष्टींवर आपापली मते मांडून आपल्या सामान्यज्ञानाची प्रचिती देत राहतो. अशा मोघम चर्चा होत राहतात परंतु त्या समस्यांचे मुळ समजावून घेत त्याचा थेट तसेच अप्रत्यक्ष परिणाम याविषयी सखोल ज्ञान घेण्याबाबतची अनास्था आपले भविष्य खऱ्या अर्थाने अंधकारमय करित असते. स्वतःचे भविष्य केवळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी विम्यापासून गुंतवणूकीपर्यंत अनेक मार्ग चोखळणारे आपण भौतिक व राजकीय वातावरणाची अनिश्चितता सधन व्यक्तीला देखिल रस्त्यावर आणू शकते ही शक्यताच कधी गृहित धरीत नाही. पैसा हे केवळ माध्यम आहे भवतालची परिस्थिती सुद्धा अनुकूल असणे तेवढेच जरूरीचे असते हा विचार आपण मनात देखिल आणत नाही.
जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला, प्राण्याला जगण्याचा समान अधिकार असतो अन् तो असलाच पाहिजे. प्रत्येकजण आपापल्या बौद्धिक, शारीरिक कुवतींनुसार जगण्याचा प्रयत्न करीत असतो. काही तथाकथित नशिबवान मंडळी चांगल्या साधनसामुग्रीचा उपभोग घेत असतात तर काहीजण त्या प्रक्रियेतील फक्त माध्यम असतात. अपरिहार्यता म्हणून असणारा ह्या नाही रे वर्गाला आहे रे वर्ग विकासाच्या नावाखाली इतका गृहीत धरतो की त्याला ते खेळणं समजून त्यांचा मन मानेल त्याप्रमाणे वापर करू पाहतात अन् मानवतावादी दृष्टिकोनाचे रूपांतर गुलामवादात होते. अप्पलपोटी, स्वार्थी विचारांची परिसीमा गाठत हाच उच्च वर्ग, सामान्यवर्गाला विद्रोह करण्यासाठी उद्युक्त करीत असतो.जर त्या विद्रोहाला नैतिकतेची किनार नसेल तर ती अराजकतेची नांदीच ठरते. अराजकतेच्या या वणव्यात सामान्य, उच्च वर्गा बरोबरच सर्व भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक विचार बेचिराख होतो व शांततेचे पर्यवसन अशांततेत होते.केवळ स्वतःच्या भातावर डाळ ओढण्याच्या वृत्तीने श्रीमंत अधिक श्रीमंत होत धनदांडगे बनतात तर गरीब अधिक गरीब होत शोषित पिडीत बनत जातात. ह्या दोन्हींतील दरी अधिकच रूंदावत जाते, ही दरीच सर्व अस्थिरतेचे मुळ असुन त्याचा व्यापक विचार होणे गरजेचे आहे.'सबका साथ सबका विकास' हेच त्यावर खरे उत्तर असू शकते परंतू घोषणेपुरता किंवा सरकारी योजनेपुरता मर्यादित याचा विचार न करता प्रत्येकाने संवेदनशीलतेने स्वतःच्या विचारधारेत हा संस्कार रूजवला पाहिजे.
दुसऱ्याची समस्या तटस्थपणे हाताची घडी तोंडावर बोट ठेवून निर्विकारपणे शुन्यात पाहत राहिलो तर ती समस्या उद्या आपल्याकडे पोहचू शकते याची जाणीव प्रत्येक जागरूक व्यक्तिला असलीच पाहिजे. एखाद्या देशाचा नागरिक शेवटी मानवी गरजांसाठी बांधील असतो जेव्हा जगण्यासाठी आवश्यक अन्न,पाणी, निवारा या मुलभूत गरजांपैकी कशाचीही कमतरता भासू लागली की तो स्थलांतर करण्यास प्रवृत्त होतो हा उत्पत्तीपासूनचा ईतिहास आहे तसेच हा नियम सर्व प्राणीमात्रांना लागू आहे. तेव्हा त्या व्यक्तीची हतबलतेला निर्वासित म्हणून संबोधित तुच्छ वागणूक देत नाकारणे मानवतेला धरून नाही. कारण एखाद्या अतिरिक्त जबाबदारीमुळे जरी आपल्या राहणीमान तसेच नागरी व्यवस्थेवर ताण येत असला तरी माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपल्या कुवतींनुसार त्यांना सामावून घेणे गरजेचे आहे.
एखाद्या जीवाचे मोल हे आपल्या सुखवस्तूपेक्षा अधिक असते. जगद्गुरू संत तुकारामांनी सांगितलेली 'हे विश्वची माझे घर' ही भावना उक्तीतून प्रगट होण्यासाठी 'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ' हा विचार कृतीत उतरला पाहिजे तेव्हांच 'अयलान कुर्दी' सारख्या अन्य निष्पाप भावी पिढीचा बळी जाणार नाही !

संदिप महामुनी
९६३७१३०२०६