असहिष्णुतेची बोंबाबोंब......!
पुरस्कार परत करण्याची साथ आली असून तीचे जे लोण पसरते आहे ते पाहता समाजातील समाजमान्य चौकटीद्वारे सिद्ध झालेले बुद्धिमान व केवळ शासकीय गौरव किंवा पुरस्कार प्राप्त अथवा मिळवलेले मान्यवर कारण पुरस्कार प्राप्तचं पुरस्कार वापसीने निषेध नोंदवू शकतात. अगदी लेखक ते कलाकार, निवृत सैन्याधिकारी ते शास्त्रज्ञ सर्व क्षेत्रातील व्यक्ती कोणीही त्यास अपवाद नाही. या सर्वांच्या मतानुसार सध्याच्या भारत देशामध्ये अतिशय असुरक्षित वातावरण आहे. सरकार देखिल असहिष्णुपणे वागत सर्वांची मुस्कटदाबी करीत आहे तेव्हा समाजात कमालीची अराजकता माजली असुन सरकारचा अनागोंदी कारभार चालू आहे असे चित्र प्रसार माध्यमातून दाखविले जाते आहे.
सहिष्णुता हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. इथेच हिंदू, जैन, बौद्ध धर्माची स्थापना व प्रसार झाला. ज्याचा पाया हाच मुळात सहिष्णुतेवर अवलंबून आहे. इंग्रजांच्या जुलमी राजवटी नंतर मिळालेल्या स्वातंत्र्यात आपण धर्मनिरपेक्ष, सार्वभौम लोकशाहीचा स्वीकार केला तेंव्हापासून आजपर्यंत अनेक दुर्दैवी घटना घडल्या अगदी फाळणीच्या दंगलीपासून ते बाबरी मस्जिद पाडण्यापर्यंत,काश्मीर पंडितांवरील अन्यायांपासून लादलेल्या आणीबाणीपर्यंत,खलिस्तान ते इंदिरा गांधीच्या हत्येनंतर झालेल्या शिखांच्या शिरकाणापर्यंत,अगदी दलितांवर झालेले अनेक हल्ले महाराष्ट्रातील खैरलांजी ते बिहार मधील घटनेपर्यंत.दाभोळकर,पानसरे यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांपासून कलबुर्गींसारख्या लेखकांपर्यंत अनेकांच्या झालेल्या हत्या तसेच ज्या घटनेमुळे पुरस्कार वापसी सुरू झाली ते गोमांस बंदी ते दादरी अशा सर्वच घटना या निषेधार्यच आहेत त्याबद्दल विवेकवादी विचार करणाऱ्यांच्या मनात कोणतीही शंका नाही.
एवढ्या अफाट लोकसंख्येमधे वेगवेगळ्या जाती-धर्माची,विचारधारेची लोकं इथे राहत असताना आपापल्या जाती-धर्माचे, विचारधारेचे समुह तयार होत आहेत. ते करीत असताना आधुनिक सोशल मीडिया आपल्या हाताशी आहेच. तेव्हा असे गट तट तयार होणे स्वाभाविकच आहे अन् त्याचे उपद्रव मुल्य देखिल लक्षवेधी असते. पन्नास, शंभर जणांनी नुसता रस्त्यावर गोंधळ घातला तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.गुजरातेतील पटेल अंदोलनावेळी असा प्रत्यय आला आहेच. तेव्हा घडणाऱ्या घटनांचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या अत्यल्प असले तरी २४ तास बातम्यांचे रतिब घालणाऱ्या वाहिन्या तसेच अनिर्बंध सोशल मीडियामुळे याची व्याप्ती अनेक पटीने वाढते आहे. वारंवार केलेल्या अधोरेखितपणा मुळे ती बातमी ठळकपणे सर्वसामान्यांच्या मनावर बिंबली जाते व सामान्य विचार तशाप्रकारेच व्यापला जातो.
विद्यमान सरकार मधील सत्ताधारी पक्ष हा मुख्यतः विशिष्ट धर्माच्या विचाराने प्रभावित आहे परंतू ते ज्या परिस्थितीत म्हणजे जनता घोटाळे, भ्रष्टाचार, महागाई ने त्रस्त असताना ज्या विकास या मुद्यावर निवडून आले परंतू नेमके तेच विकासाचे चित्र विद्यमान सरकारच्या कार्यशैलीतून परावर्तित होत नसून त्यांच्या मुळ विचारधारेविषयी आक्रामक व राजरोसपणे सरकार मधील लोकप्रतिनिधीच बेताल वक्तव्य करीत असतील व सरकारचे प्रमुखच सोयिस्कर मौन बाळगत असतील तर संपूर्ण सरकारची प्रतिमा मलीन होणार हे देखिल स्वाभाविक आहे. त्यातून राजकारणाला कोणत्याही मुद्याचे वावडे नसल्याने त्याचा सत्ताप्राप्तीसाठी घेतला जाणारा फायदा अनिवार्य आहे. तसेच विद्यमान सरकारनेच सत्ता मिळविताना एखाद्या घटनेचा वा विषयाचा भडिमार करून बेजार करण्याची योजलेली युक्ती व तिची नेटकी प्रसिद्धी यंत्रणा सध्याचे विरोधी पक्ष अवलंबित आहेत. तेव्हा एखादे खोटे शंभरवेळा छातीठोकपणे उगाळले तर ते लोकांना खरे वाटू शकते कारण सध्याच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक जगात दुसऱ्याचा विचार करायला व शहानिशा करायला कुणाला वेळच नाहिये, जो तो आपापल्या भौतिक विकासात गुरफटलेला आहे.तस पाहिलं तर त्यामुळेच प्रत्येकजण एक दुसऱ्याशी असहिष्णुपणे वागतो आहे अन् असहिष्णुतेची भाषा करणारे कलाकार स्वतःच्या अहंकाराने नियम पाळताना एखाद्या सुरक्षा रक्षकाशी किती सहिष्णूपणे वागतात तसेच घरापुढे अनाधिकृत रँप बांधून रहदारीला कसा अडथळा करतात हे आपण पाहिले आहेच.व्यापक देशहितासाठी कोणत्या मुद्या भोवती राजकारण केले पाहिजे याचे नैतिक भान सत्ताधारी व विरोधी या दोन्ही पक्षांना असले पाहिजे केवळ आपल्याकडील नेतृत्व गुण व वकिली बुद्धी आपापल्या राजकीय फायद्यासाठी खर्च करीत असतील तर देश दिवाळखोरीत निघायला वेळ लागणार नाही.
जगाचा ईतिहास आपण पाहिला तरी आपापला समुह करणे अन् त्याला विशिष्ट चौकटीत बसवणे, तसेच इतर समुहांवर आक्रमण करणे किंवा आक्रमणला प्रत्युत्तर देणे हे सर्व मानवी जनुकीय वृत्तित आहे.परंतु वैचारिक संस्कारामुळेच आपल्या पेक्षा वेगवेगळ्या आचार, विचारधारांशी सामावून घेणे शक्य आहे. त्यातूनच सहिष्णुता निर्माण होऊ शकते. परंतू ते करीत असताना आजुबाजूचे वातावरण त्याला पोषक पाहिजे जर गोष्टीतील सश्याप्रमाणे पान पडलं म्हणून आभाळ कोसळलं अस समजून बोंबाबोंब केली व त्यातून भिती अन् संशयाचे वातावरण निर्माण झाले तर आधीच अस्थिर समाज जास्तच बिथरेल व त्यातील समाजकंटक टोकाची पाऊले उचलतील त्यातून केवळ अराजकताच माजेल. तसेच माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी आपली प्रतिमा हा तर अजूनच गंभीर प्रश्न आहे.
देशातील प्रत्येकाला अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे तेव्हा देशातील प्रतिभावान, बुद्धिजीवी मंडळींनी संयम दाखवत आपल्या लिखाण, कला, प्रबोधन अशा अनेक माध्यमातून समाजातील व सत्ताधाऱ्यांच्या धोरणातील वैचारिक त्रुटी दाखवल्या पाहिजेत अन् देशाच्या सांस्कृतिक विचारधारेला योग्य दिशेला नेले पाहिजे. केवळ प्रतिकात्मक कृती करून प्रसिद्धी मिळवत राहिली तर जनता रोजचं मडं त्याला कोण रडं याप्रकारे घेतील व त्यातील महत्वाचा गाभा दूर राहिल.केवळ असहिष्णुता असहिष्णुता अशी बोंबाबोंब न करता सहिष्णुपणे त्यातून मार्ग काढला पाहिजे.
चला नैतिक विचारांच्या प्रकाशाने दिपावली उजळून टाकूया !
संदिप महामुनी
९६३७१३०२०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा