शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

बिन पैशाचा तमाशा......!

          
                          बिन पैशाचा तमाशा......!
             अर्थ निश्चलीकरणाच्या निर्णयाने देश चांगलाच ढवळून निघाला अन् आठवड्याभरात जुने ५००/१००० रूपयाचे चलन जमा करण्यासाठीची मुदत देखिल संपेल तेव्हा निणर्याला ५० दिवस पुर्ण झाल्या प्रित्यर्थ त्याचा नेमक्या रद्द झालेल्या अन् जमा झालेल्या चलनाच्या आकडेवारीचा तसेच काळ्या पैशाचा सरकारी हिशोबासहित सरकारी निर्णयाचा लेखाजोखा यथावकाश सुवर्णक्षणी यथार्थपणे मांडला जाईल आपण त्याचे नेहमीप्रमाणे मुक साक्षीदार होऊचं.
             या निर्णयानंतर तब्बल १२५ वेळा नियम बदलले त्यामुळे सामान्य जनते बरोबरच सरकार सुद्धा संभ्रमित होते तेव्हा अर्थशास्त्र हा विषय बहुतांशी पर्यायी असल्याने त्याच्या दुर्बोधते बद्दल वावडे असणे क्रमप्राप्तच आले तेव्हा डोक्याला जास्त ताण न देता आलिया भोगासी असावे सादर हा संस्कार गिरवणे उत्तम म्हणत देशभक्तीच्या वीररसाने स्वतःची करमणूक करावी एवढाच पर्याय आपल्या कडे उरतो.या निर्णयाने सोशल मीडिया वरील दोन्ही कडच्या प्रतिभाशाली वर्गाला संधी मिळाली अन् त्यांनी त्याचे सोने केले (आनंदाची बाब म्हणजे या सोन्यावर मात्र कोणताही कर अथवा कोणाची नजर नाही असो) काहींनी हे सोने मनमोहनी पद्धतीने येथेच्छ लुटले मग व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला म्हणून काही फरक पडत नाही.तसही व्यवस्थेने लोकांना गृहित धरलेले असते अन् सरकारने व्यवस्थेला.
            या सगळ्या घडामोडीमधे अनेक मनोरंजक अन् आपल्या सारख्या पामरांना अचंभित करणाऱ्या घटना घडल्या.एकिकडे स्वतःच्या २०००रूपयांसाठी ३-४ तास रांगेत उभारून देशप्रेम व्यक्त करणारे तसेच स्वत:चे पांढरे केस काळे करायला सुद्धा वैतागणारे आपण अन् दुसरीकडे बिनदिक्कत १००/२०० कोटी काळ्याचे चुटकीसरशी पांढरे करणारे,१०-१० कोटी नविन चलनात लॉकर मधे ठेवणारे तसेच तिजोरीच्या चाव्या कनवटीला बांधून जमादारकीचा सौदा करणारे आधुनिक मनसबदार पाहिले की काही लोकं जास्तच समान असतात हे उमगते.एका बहाद्दराने वर्तमानपत्रात जुन्या नोटा बदलून देण्याची रीतसर जहिरातच दिली अन् ती वर्तमानपत्राने बिनदिक्कत छापली देखील ! त्याला वाटलं छोटी जहिरात असल्यामुळे नेहमीप्रमाणे जो गरजवंत असेल तोच बघेल नाहीतरी मसाज, लैगिंक समस्या निवारण,ज्योतिष सल्ला अश्या जहिरातींशी थोडाच संपादकाचा अथवा सरकारी खात्याचा दुरान्वये संबध असतो या त्याच्या प्रामाणिक भाबड्या आशावादाला सलामच ठोकला पाहिजे.
            ८ नोहेंबरनंतर बँके व्यतिरिक्त रद्दी झालेल्या नोटा राजकीय पक्षात देणगीरूपी गुंतवणूक करण्याची मुभा मिळाल्यामुळे किमानपक्षी काही ठेकेदाराचं तरी कोटकल्याण झाले तसेच २०००० रूपयापर्यंतचा व्यवहार गुप्त ठेवण्याचा व त्या पटीतच व्यवहार करण्याची मुभा असल्याने शिवाय जनता जर्नाधनाच्या सेवेचे पवित्र कार्य करण्याचे व्रत घेतले असल्याकारणाने अन्य कशाही प्रकारचे देशप्रेम व्यक्त करण्याची आवश्यकता नसल्याने त्यांना करमुक्त केलेले आहेच तेव्हा असा महत्वपूर्ण निर्णय सर्व पक्षांच्या पथ्यावर पडला त्यामुळे सर्वांनी आळी मिळी गुपचिळीचे धोरण कोणताच आक्रोश न करता स्विकारलेले आहे.
            काळा पैसा संपवणे,नकली नोटांचे उच्चाटन,आतंकवादाची आर्थिक रसद तोडणे हा व्यापक उद्देश ठेवून घेतलेला निर्णय किती सफल ठरला ते येणारा काळ ठरवेलच परंतू कँशलेसच्या चकचकीत रँपरमधे तो सादर करून जर भूल पाडली जात असेल तर घडलेेला या बिन पैशाचा तमाशामुळे झालेले तथाकथित मनोरंजन नसून अंगावर येणारे बोचरे वास्तव असेल.कुठलाही भुकंप न होता काहीतरी चांगले घडो या आशावादावर वाट पाहत आहोतच.

संदिप महामुनी
९६३७१३०२०६

सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

NOSTALGIC MIND

My son knocked my inner child to enter into #thedreamworld....

केल्याने देशप्रेम...!

सुप्रीमकोर्टाने थिएटर्सना राष्ट्रगीत सक्तीचे केले एकून वाईट वाटलं हो  खरच वाईटच वाटलं
.
.
.
.
.
.
कारण जी गोष्ट उस्फुर्त असायला हवी त्याची सक्ती करावी लागणे हे आपल्या देशप्रेमाचे बोचरे वास्तव असून आपल्याला आपल्या जडणघडणा विषयी आत्मपरीक्षण करावेच लागेल अन्यथा प्रेरणादायक भावनेपेक्षा शिस्तीच्या नियमातील तांत्रिकतेतच समाधान शोधत राहू..!
#जयहिन्द!
Nationalism is infantile disease.It is measles of mankind-Albert Einstein

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६

अर्थ निश्चलाच्या मनी....!

                        अर्थ निश्चलाच्या मनी....!

             अचानक निघालेल्या सत्ताधारी फतव्याने मानवीय व्यवहार स्वातंत्र्य किती क्षणभंगुर अन् तकलादू असू शकते तसेच क्षणात होत्या चे नव्हते अन् अर्थाचा कसा अनर्थ ओढावतो ते नुकत्याच सरकारने घेतलेल्या ५००/१००० च्या नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनांना अनुभवावा लागत आहे.
            गैरव्यवहार,काळा पैशावर अंकुश,सुरक्षितता किंवा तत्सम अपरीहार्यता, धाडसी अथवा आतबट्ट्याचा निर्णय या चुक की बरोबर वादाला माझ्या मते काहीही मोल नाही कारण बहुतांश मानसिकतेनुसार जबाबदारीच घोंगडं दुसऱ्याच्या गळ्यात टाकून स्वैर जगण्याला प्राधान्य देणाऱ्यांना त्याच घोंगडयांवर बसणाऱ्याचे किर्तन ऐकावे लागणार मग सोयीस्कर हितासाठी लोकशाहीच्या नावाने गळे काढून काय उपयोग? एखाद्या कागदाला असलेले मोल दुसऱ्या क्षणी मातीमोल होत असेल तर या जास्तीत जास्त संग्रह करून स्वतःचे मोल वाढवण्यासाठी धडपडणाऱ्या वृत्तीला ती एक चपराकच आहे. प्रत्येक श्वासानंतर येणाऱ्या श्वासाची जिथे अनिश्चितता असते तिथे भ्रमात वावरणारे व त्यातच रमणारे आपण सत्यापासून फारकत घेत सत्यमेव जयते चा आदर्श नारा देत जगत असतो.या आपल्या दुटप्पी वागण्यामुळे आपण तथाकथित निश्चिंतीसाठी अविरत धावपळ करीत सोयीस्कर व्यवस्थेचा स्विकार करतो अन् ही व्यवस्था कितीही बेकायदेशीर असली तरी एकदा का ती अंगवळणी पडली की ती बदलण्याची भाषा देखिल सहन होत नाही अन् त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.
             भारतीय साहित्यात नैतिकता व त्यातून निर्माण होणारी नितीमत्ता याचे उदात्तीकरण हे व्यक्तिकेंद्रित केले गेले आहे त्याचेच प्रतिबिंब चित्रपटात पडलेले आढळते.म्हणूनच चित्रपट अधिक तर नायकप्रधान फार फार तर बलात्कार पिडितेचा बदला घेणाऱ्या नायिकाप्रधान असतात अन् हे सर्व पडद्यावरील आदर्श हिरो-हिरोइन पदोपदी नाडणाऱ्या जुलमी,भ्रष्ट व्यवस्थेशी तोंडी लावण्या करिता रोमान्स करीत संघर्ष करून सर्वमान्य व्हिलनला खल्लास करीत शेवट गोड करतात मग प्रेक्षक ही समाधानानी घरी जातात अन् हिरो-हिरोइन प्रसिध्दी मिळवित आपापली घरे भरतात.इथे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला संपवत व्यक्तिगत न्यायनिवाडा करते परंतू व्यवस्थेचं काय तीचे उत्तरदायित्व कुणाचे का केवळ हिरो-हिरोइन,व्हिलन बदलत राहणारे चित्रपट पाहत बोचेऱ्या वास्तवापासून पळ काढत समाधान मानायचे.
              व्यक्ती पेक्षा व्यवस्था श्रेष्ठ असेल तरच खऱ्या अर्थाने स्थिरता व समानता लाभू शकते.सर्व संकल्पना आपापल्या सोयीनुसार गृहित धरत जगताना आयुष्यात अनेक तरंग उमटले तर निभावून नेता येते परंतू जर का लाटा निर्माण झाल्यास नुकसानीची शक्यताच अधिक तेव्हा संकल्पना तपासून त्या तटस्थपणे आत्मसात करता आल्या तर अचानक उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीत अगदी अर्थिक आणिबाणीत देखिल अर्थ निश्चल झाले तरी मनाने निश्चल राहता येईल.
                 अर्थ मुलोही धर्मा ।

संदिप महामुनी
9637130206

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

शोधिसी नारायणा...!


कुलुपबंद देव्हाऱ्यात, देवा तुला शोधू कुठं....

Filter your needs


Traditional imprisonment....सांस्कृतिक बंदिवास....!

 
        स्त्रियां आजदेखिल रुढी परंपरेच्या जोखडात अडकून पडलेल्या आहेत अन् त्यातच ते समाधान शोधताहेत ही त्यांची बौद्धिक गुलामगिरीच अधोरेखित करते. मुक्त वातावरणात जगतानाही मानसिक दृष्ट्या बंदिवासच भोगताहेत...

रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

मोर्चात्सवाचे बळी.....!

                     मोर्चात्सवाचे बळी.....!

                 कोपर्डीच्या निमित्ताने निघणारे मराठा समाजाचे व्यापक मोर्चे मराठा समाजातील खदखद बाहेर पडत आहे याचेच द्योतक ठरते आहे.
                 पण अत्याचाराला जातीय चौकटीत बसवून आरक्षण व अँट्रॉसिटी मुद्यावर वातावरण निर्मिती केल्यामुळे तसेच आरक्षण हा न्यायप्रविष्ठ तर अँट्रॉसिटी हा केन्द्रीय व घटनात्मक विषय असल्यामुळे नेमके त्याचे फलित काय हा सद्य स्थितीला तरी अनुत्तरित प्रश्न आहे.मुक मोर्चातील शिस्त व स्वच्छता याचे नियोजन जरी कौतुकास्पद असले तरी ही वादळा पुर्वीची शांतता आहे यातून दुर्दैवी असा संख्याबळाचे दबाव तंत्र हाच घटक ठळकपणे अधोरेखित होतो आहे अन् माणूस अनुकरण प्रिय असल्यामुळे याची लागण सर्व समाजाला झाल्याशिवाय राहणार नाही.प्रत्येकजण कोणत्याही समस्येचे मुळ जमवा गर्दी अन् खेचा वर्दी अशाप्रकारच्या मार्गानेच जाईल.त्यातून प्रत्येक घटक असुरक्षित भावनेतून एकत्र येईल अन् त्यातून जातीय तेढ व एकमेका विषयी द्वेषच निर्माण होण्यास मदत मिळेल सरतेशेवटी जिसकी लाठी उसकी भैंस हाच फॉर्म्युला उपयुक्त ठरेल तो वापरताना मात्र एक मराठा=एक लाख या गणितानुसार एक माळी,एक महार, एक मुस्लिम,एक...,अनेक जाती जमाती बद्दल अनिभिज्ञ असल्यामुळे असंख्य एक म्हणजे किती हे ठरायचे आहे तसेच ते कोणी व कसे ठरवणार हे देखिल माहित नसल्यामुळे नेमके संख्याबळ समजू शकत नाही तेव्हा एकंदरीतच भारतीय लोकसंख्या नेमकी किती पटीने वाढणार आहे हे देखिल कळणार नाही तेव्हा या फॉर्म्युल्याने नेमके कोणाचे गणित सुटणार हे काळच ठरवेल मात्र ते लोकशाहीला व पर्यायाने भारत देशाच्या एकसंधतेला धोकादायक आहे एवढे नक्की.
                 वेडात दौडले सात हा इतिहासात शिवाजी महाराजांना पडलेला प्रश्न सद्यस्थितीला वेडात दौडणाऱ्यांची संख्या लाखाच्या घरात गेली तरी जैसे थे असेल तर आपण शिक्षित झालो तरी शैक्षणिक दृष्ट्या प्रगल्भ झालो नाही हेच खरे.देशात इतरत्रही जाट, पटेल आरक्षणासाठी आंदोलन होत आहेत हे ही त्याचेच द्योतक आहे.परंतू देश रक्षणासाठी कार्यरत असलेले आपले सैन्य या विभागणीतून जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे तिथे केवळ भारतीय अन् तमाम भारतीयांचे रक्षण करण्याची दुर्दम्य ईच्छाशक्ती असणारेच जाऊ शकतात.ते लढताना महाराष्ट्रीयन, बिहारी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय... वैगरे अथवा हिंदू, मुस्लिम, शिख... मराठा, महार, ब्राह्मण...म्हणून लढत नाहीत.तेव्हा एकजुट असावी पण केवळ उत्साह व उत्सवी मानसिकतेने नव्हे तर समतोल विचाराने अन् राष्ट्रीय एकात्मतेसाठी व सर्वसमावेशक विकासासाठी एवढीच माफक अपेक्षा एक मुक साक्षीदार नागरिक म्हणून वाटते.
                             जय हिंद ।

व्यथाचित्र...!

         
                    व्यंगचित्राची ताकद काय असते हे सर्व जगाला माहिती आहे. हे माध्यम इतके प्रभावी अस्त्र आहे की जागतिक पातळीवर फ्रान्स मधे चार्ली हेब्दो या मासिकाने देखिल व्यंगचित्राचा प्रभाव अधोरेखित केला आहे.बाळासाहेब ठाकरें सारख्या उमद्या व्यंगचित्रकारानी त्यातून शिवसेने सारखा पक्ष उभा केला परंतू त्याच पक्षाच्या मुखपत्र असलेला सामना या वर्तमानपत्रातून परिस्थितीला विपरीत तसेच काळ विसंगत व्यंगचित्र छापले गेले त्यामुळे निर्माण झालेला जनक्षोभ व राजकीय पक्ष म्हणून असलेली अपरिहार्यता यामुळे संपादक व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जातीने जाहिर माफी मागावी लागली.इतपर्यंत ठिक परंतू त्या व्यंगचित्रकाराचे 'हसोबा प्रसन्न' हे सदरच गायब होणे वैयक्तिक रित्या मला अपेक्षाभंगाचे वाटते कारण व्यंगचित्र हे प्रभावी अस्त्रा बरोबरच दुधारी शस्त्र आहे याची जाणीव ठेवून कुंचल्याच्या फटकाऱ्या प्रमाणे जनक्षोभाचे वार सुद्धा झेलण्याची उर्मी व्यंगचित्रकाराच्या अंगी असली पाहिजे असे मला वाटते.असो लोकशाही आहे.

जाँबाज़.....

                   जाँबाज़.....

Giving a befitting reply by surgical strike for Uri attack at the place & time of it's own choice.Paying back Pakistan in the same coin with high morale.Without caring abt threat of being caught in Pakistan army's crosshairs our brave para commandos from Ghatak platoon 6 Bihar & 10 Dogra droped by Dhruv in POK,well equipped with Tavor,MP4,grenades, UBGL,night vision instrument with camera helmet cross 3km distance by crawling thru mud,rocks even landmines destroyed 7 terror launch pads with 50 terrorists & 2 Pak soldiers.
Images send by ISRO's Cartosat 2c satellite was useful for the operation.
Hat's off INDIAN ARMY...!

रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

भावना प्रधान अन् बुद्धि सेवक....!

                                     
                                                   भावना प्रधान अन् बुद्धि सेवक....!
       
                             आपल्या देशातील कोणतीही ज्वलंत बातमी घ्या मग ती काश्मीर प्रश्न असो की कावेरी पाणी तंटा अथवा गुजरात मधील पटेल आरक्षण;उना दलित अत्याचार ते पुर्वांचल मधील मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना; उल्फा, बोडोलैंड चा नक्षलवाद, उभा-आडवा भारत समस्याग्रस्तच दिसेल.
                             या समस्यांच्या मुळाशी गेल्यास भुप्रदेशीय अतिरेकी अस्मिता अथवा व्यवहारिक दृष्टिकोना एवजी भावनिक चिकटलेपण हेच कटू सत्य निदर्शनास येईल.परंतू एखाद्या समस्येच्या मुळाशी जाण्यापेक्षा वर वर घुटमळत उथळ प्रतिक्रिया देत,ऐकायला अन् बोलायला सोप्या उत्तराशी सलगी करण्यातच आपण धन्यता मानतो कारण सर्वसाधारणपणे आपल्याला बुद्धिपेक्षा भावना जवळची वाटते.नेमक्या याच कळपातील मेंढऱ्या वृत्तीचा आधार घेत वेगवेगळ्या राजकारणाची चुल मांडली जाते अन् धुर्त राजकारणी याचा फायदा उचलत त्यावर आपली भाकरी भाजतात.
                            स्त्री विषयी बहुतांश दांभिक आदर दाखवित तिच्या वरील अत्याचाराला जातीय रंग देत सत्ते साठीच्या अथवा आपले उपद्रव मुल्य सिद्ध करण्यासाठीच्या कुरघोड्या पुर्वंपार चालत आल्या आहेत.खैरलांजीचे दलित कार्ड ते कोपर्डीचे मराठा कार्ड एवढेच काय तो बदल.परंतू त्याच्या मुळाशी असलेला नराधमपणा,पुरषी माज जिथल्या तिथे ठेचणारी व्यवस्था शासन पातळीवर रूजलीय का?आरक्षण असो की स्व-रक्षण केवळ शिरगिणतीचे संख्याबळ व तीचे रस्त्यावरील शक्ती प्रदर्शन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आपले राजकीय उपद्रव मुल्य सिद्ध केले की हवे ते पदरात पाडून घेण्याची कसब दाखवणारा हा खरा लोकनेता ठरतो त्याने केवळ भावनिक मुद्याला फुंकर घातली की तुमच्या साठी कायपण म्हणणारे हवशे,नवशे,गवशे उरलेले भडकवण्याचे काम अनेक माध्यमांचा चपखलपणे वापर करीत बोभाटपणे करतात.एकंदर मुद्दा कितीही व्यवहार्य नसो मतांचा गठ्ठा हातून सुटू नये म्हणून सत्ताधारी व सत्ताभिलाषी दोघेही साम,दाम,दंड,भेदाचे शस्त्र वापरत आखाड्यात उतरतात.निवडणूक आली की अशा मुद्द्यांवर भर देत विकासाच्या नावाखाली गोंडस घोषणा करीत भावनिक लाट निर्माण केली जाते व त्या लाटेवर स्वार होत सत्तेचा सोपान मिळवतात अन् लाट ओसरल्यावर पुन्हा जैसे थे.वर्षोंवर्षे बेरजेचे राजकारण करीत राजकीय घराणी निर्माण केली जातात मग स्वतः,भाऊ,मुलगा, मुलगी,सुन,पुतण्या,मेव्हणा,नातवंडं....वैगरे यांच्या भोवतीच अख्ख्या राज्याचं राजकारण फिरवत ठेवायच बाकी कार्यकर्ते भावनिकपणे गळ्यात पक्षचिन्ह असलेला उपरण्याचा फास लावत व स्वतःलाच टोप्या घालत हाय कमांड, साहेब,नेताजी,लालूजी,अम्माजी चरणी लीन होतात.नंतर फरपट झाली की विठ्ठलाचा झेंडा हातात घेण्या एवजी त्यालाच कोणता झेंडा घेऊ हाती म्हणून विचारतात.
                            केवळ राजकारण क्षेत्रातच नव्हे तर धर्म, अध्यात्म,चित्रपट,खेळ या क्षेत्रात देखिल भावनिकतेला उधान येते.अपंगानां दिव्यांग म्हटलं की आपला त्यांच्याप्रती आदर व्यक्त होतो भले १९ जणांच्या पथकात विश्वविक्रम सहित २सुवर्णपदक,१ रौप्यपदक,१ कांस्यपदक मिळवित पँरालंपिक स्पर्धेत यश मिळविणाऱ्यांची योग्य दखल न का घेईना. वास्तविक सुदृढ व्यक्तीपेक्षा दिव्यांग व्यक्तीचे यश विशेष उल्लेखनीय असते.असो.
                           एखादे लहान मुल कुपनलिकेत पडले,एखादा माणूस बायकोचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालला की मोठ्या प्रमाणात याची दखल घेत भावनिक उमाळ्याने लाखोची आर्थिक मदत करीत इति कर्तव्य पार पडल्याचे पुण्य पदरी पाडतात पण अशा घटना घडण्या पाठीमागे असणारी सडकी व्यवस्था बदलण्यासाठी आपण आग्रही असतो का? का केवळ देवस्थानाला श्रीमंत बनवत स्वतःचे पापक्षालन करण्यात धन्यता मानतो वास्तवात लेखापालांच्या अहवालानुसार देवस्थानच्या व्यवहार भोंगळ व अपहारिणी आहे अन् हेच भक्तांच्या अंध भावनांचेच फळ आहे.
                           खरे हिंदुस्तानी,----असाल तर लाईक कराल असल्या पोस्ट टाकून फुकाच्या राष्ट्रवादाचे प्रदर्शन मांडणाऱ्या व इतरांना राष्ट्रप्रेमीपणाचे प्रशस्तिपत्र देण्याचा ठेका घेणाऱ्या पिढीला नागरिकांसाठीची मुलभूत कर्तव्य ठावूक असणे व तीचे पालन करणे दिवास्वप्नच आहे दुसरीकडे या विरुद्ध भावनांना खतपाणी घालत अतिरेकी संघटना फोफावतात मग ईद दिवशी अमेरिकन कैद्यांना बकऱ्यांप्रमाणे उलटे लटकवत द मेकिंग अॉफ इल्यूशन्स म्हणत त्यांच्ये गळे चिरताना ईसिसच्या अतिरेक्यांना आनंद वाटतो कारण त्यांच्या भावनांशी ते निगडित असते.तिथे भावना प्रधान असते व बुद्धि केवळ सेवकाची भुमिका बजावते.
                           जिथे भावना जास्त प्रभावी असते तिथे कट्टरता आपसूक वाढीस लागते अन् ती धोकादायक असते पण जर भावनेला बुद्धिप्रामण्याची जोड असेल तर तिथे सहिष्णुता अंगिकारली जाते अन् त्यातच सकलजनांचे हित सामावलेले असते.म्हणून काय प्रधान असावे व कोण सेवक असावा हे प्रत्येकाने आपापल्या वैचारिक पातळीनुसार ठरवावे..!

संदिप महामुनी
9637130206

शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

खेळाडूंची व्यथा अन् व्यवस्थेचा खेळ....!

                                   खेळाडूंची व्यथा अन् व्यवस्थेचा खेळ....!
                   
                   रिओ २०१६ ओलिंपिकचे सुप वाजले.चार वर्षांची मेहनत सिद्ध करण्यासाठी प्रत्येक खेळाडू अन् देश उत्सुक असतो तसेच जीवाचे रान देखिल करतो किंबहुना करायलाच पाहिजे.तस पाहिलं गेल्यास ते एक प्रकारचे शस्त्र व हिंसे शिवाय खेळले गेलेले युद्धच असते.तिथे गुणवत्ता सिद्ध करण्याची धडपड, जिंकण्याची चढाओढ,जास्तीत जास्त पदके मिळवत वर्चस्व गाजवण्याची संधी सर्व काही नैतिक असते.वैयक्तिक पातळीवर खेळाडूंना स्वतःच्या चांगल्या वाईट भावनांचा निचरा करण्याचे व आपली राष्ट्रीय अस्मिता व्यक्त करण्याचे व्यासपीठ असते.
                 आज निश्चितच दोन पदकं त्यातील पहिलं महिला कुस्तीतील साक्षी मलिक हीने ब्राँझपदकाने खातं खोलत इतरांना जिंकण्याची इर्षा दिली तर दुसरे पदक पी.व्ही.सिंधूने एकेरी बँडमिंटन मधिल पहिले-वहिले वैयक्तिक महिला रौप्यपदक मिळवून आनंद दिला परंतू समाधान मात्र मिळाले असं म्हणता येणार नाही.जगातील लोकसंख्येनुसार दुसऱ्या स्थानावर असलेल्या अन सर्वात तरूण व जागतिक महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या देशाची कामगिरी पाहता आपण मुर्खांच्या नंदनवनात राहतो आहोत असे वाटते आहे.मग यात खेळाडू कमी पडतायत का तर बहुतांशी याच उत्तर नाही असचं म्हणायला हवं.कारण खेळ विश्वातील वैयक्तिक पातळीवरील त्यांची कामगिरी ते ज्या आर्थिक परीस्थितीत जगतात अन् खेळांसाठीच्या ज्या सोयी सुविधें अभावी ते खेळतात ते अतुलनीय आहे.क्रिडा प्रशासन व त्या विभागाचे मंत्री यांचे योगदान अन् मुख्य म्हणजे त्यांची तळमळ इतकी सुमार आहे की शोभा डे नी खेळाडूं एवजी क्रिडा प्रशासन,व्यवस्थेवर भाष्य केले असते तर सोशल मिडीयाने त्यांना डोक्यावर घेतले असते.कपडे सुद्धा दुसऱ्याचे वापरणारी दिपा कर्माकर सारखी खेळाडू प्रोडूनोव्हा या भारताला अपरिचित खेळात चौथ्या स्थानी राहते तसेच कविता बाबर सारखी धावपट्टू बुट घेण्याची ऐपत नसतानाही चमकदार खेळते किंवा नौकायन मधील दत्तू भोकनाळ ही सर्व नावें व्यवस्थेपेक्षा वैयक्तिक मेहनतीच्या जोरावर तिथपर्यंत पोहचू शकलेत याचीच साक्ष देतात.
                   नरसिंग यादवच्या उत्तेजक चाचणीमुळे नाडा अन् वाडा च्या वादात त्याच्या सहभागावर ओढवलेली नामुष्की अन् दुसरीकडे ४२कि.मी. मँरेथॉन मधील ओ. पी. जैशा हीने स्पर्धे दरम्यान भारतीय एनर्जी ड्रिंकचा एकही स्टॉल नव्हता तसेच व्यवस्थापनातील कोणीही उपस्थित नव्हते आणि आपण मरता मरता वाचलो असा गंभीर आरोप केला आहे.परंतू व्यवस्थापनाने तिला सुविधा देऊ करून सुद्धा तीने त्या स्वतःच नाकारल्या होत्या असा प्रतिवाद केला आहे सत्य नंतर बाहेर येईलच पण समन्वयाच्या अभावी व्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह अधिकच गडद झालं त्याचे काय.
                   एवढी मेहनत करून,यश मिळवून देखिल प्रत्येक खेळाडूला त्याचा योग्य मोबदला मिळेलच याची शाश्वती नाही तेव्हां अनेक ऐशियन,पँराओलिंपिक स्पर्धेत जागतिक स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करून देखिल खेळाडूंची आर्थिक स्थिती खालावलेली असेल तर प्रतिभा असूनसुद्धा नविन पिढी त्याकडे पाठच फिरवेल.मिल्खा सिंगला हरवून चमकदार खेळ करणारा माखन सिंगला अपघातात पाय गमावल्यावर सर्व मेडल भंगारात घालावे लागले,पहिले वैयक्तिक ओलिंपिक ब्राँझ मिळवणाऱ्या खाशाबा जाधव यांना स्वतःच्या खर्चाने जावे लागले होते,१९५०ला फुटबॉल मधे सुवर्णपदक मिळवणारा युसूफ खान,एशियन स्पर्धेत चमकदार खेळ करणारी अश्विनी नच्चप्पा,११० मि अडथळ्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवणारा टॅक्सी ड्रायव्हर सर्वण सिंग,५० मि फ्री स्टाइल मधे वर्ल्ड रेकॉर्ड करणारे मुरलीकांत पेटकर, भालाफेकमधे सुवर्णपदक मिळवणारा देवेंद्र झाझेरियी,हॉकीत ओलिंपिकमधे २ सुवर्णपदक १ रौप्यपदक तसेच एशियनमधे २ सुवर्णपदक १ रौप्यपदक मिळवणारा गोली असलेला पहिला आंतरराष्ट्रीय कप्तान शंकर लक्ष्मण(Rock of Gibraltar),कुस्तीत पहिले वैयक्तिक महिला ओलिंपिक ब्राँझ मिळवणारी करनम मल्लेश्वरी,बिलियर्डसमधे २ वेळा जागतीक विजेता व १२ वेळा राष्ट्रीय विजेता ठरलेला विल्सन जोन्स, ट्रॅक वरील वेगवान भारतीय महिला आशा रॉय,६ एशियन पदके मिळवणारा जलतरणपट्टू शरत गायकवाड, बँडमिंटनपट्टू गिरीश शर्मा असे अनेक ज्ञात अज्ञात प्रतिभाशाली परंतू झाकाळलेले आयुष्य असणाऱ्या खेळाडूंचा आपल्याकडे भरणा आहे.पण शारापोवा तेंदुलकरला ओळखत नसेल तर आपल्याला कोण राग येतो मात्र या प्रतिभावान खेळाडूंची माहिती नाही याची आपल्याला लाज वाटत नाही ही शोकांतिका.२०११ च्या स्पेशल ओलिंपिक स्पर्धेत २ ब्राँझपदक मिळवणारी सीता साहू ही खेळाडू रस्त्यावर पाणीपुरी विकत असेल आणि २०११ मधे महिला कबड्डी विश्वविजेता संघाला रेड कार्पेट सोडा पण डुगडुग रिक्षामधे बसून घरी जावे लागत असेल तर खेळ व खेळाडूं विषयीची मानसिकता तसेच व्यवस्थेची डागडुजी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे हेच खरं.२९ ऑगस्ट आपण ज्यांच्या नावाने क्रिडा दिन साजरा करतो ते हॉकीचे जादूगार ज्यांचा खेळ बघून स्वतः हिटलरनी जर्मनीचे नागरिकत्त्व स्विकारण्याचा त्यांना प्रस्ताव ठेवला होता अन् तितक्याच देशाभिमानाने तो ज्यांनी नाकारला ते ध्यानचंद आजदेखिल मरणोत्तर भारतरत्नाच्या प्रतिक्षेत आहेत.
                अर्धा-एक गुणांनी,अर्धा-एक सेकंदांनी मागे राहणाऱ्यांना आपण दुर्लक्षीत करणार असू तर त्यानां उभारी कशी मिळणार कारण यशाचे अनेक बाप असतात अपयश मात्र नेहमीच पोरकं असते.एकूणच खेळाकडे बघण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन त्यात केवळ पैसा,प्रसिद्धीला प्राधान्यक्रम असेल अन् खेळाविषयी ओढ,तळमळ नसेल तर त्या खेळाचे योग्य पोषण होणार नाही.दुसरीकडे सरकार, प्रशासन यांचे क्रिडा धोरण अत्यंत उथळ व केवळ प्रसिद्धीन्मुख असेल तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेला पोषक सोयी सुविधांची वानवाच राहणार.ह्या खेळाडूंच्या व्यथा अन् व्यवस्थेचा खेळ जागतीक स्पर्धेत भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेच्या मुळाशी येणार हे मात्र नक्की..!

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

दे (न्याय)दान सुटे गिरान....!

                           दे (न्याय)दान सुटे गिरान....!
             
                        आपण आज आपला ७०वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत.सत्तरीत पोहचले की मनुष्य म्हातारा होतो पण देश व त्याचे स्वातंत्र्य हे चिरतरूण असते जसजसे वाढेल तसतसे ते अधिक अधिक प्रगल्भ होते मात्र आज आपला देश तारूण्यांनी भारण्या ऐवजी केवळ तरूणांनी भरलेला आहे.त्यांचा वापर हा वातावरण निर्मितीतून सत्ता हस्तगत करण्यासाठी होत असेल तर ते उज्वल भविष्यासाठी दुर्दैवी ठरेल.सत्ता ही साधन संपत्तीची वाटणी तसेच व्यक्तींचे मुल्यमापन  करणारी असते अन् त्यावरच लोकांचे राहणीमान अवलंबून असते.तेव्हा सरकारचे ध्येय धोरणं त्यांच्या कृतीतून परावर्तित होतात.वर्षोंवर्षे आपण त्याच त्याच समस्या अन् त्यांची तीच तीच अवस्था यातच गुरफटलेलो आहोत किंबहुना त्या आणखीनच साचत चालल्यात.
                       काही महिन्यापूर्वी भारताचे सरन्यायाधिश टी.सी.ठाकूर यांनी भर कार्यक्रमात पंतप्रधानांच्या समोर पाणवलेल्या डोळ्यांनी न्यायाधीशांच्या रिक्त जागा भरण्याबाबत कळकळीचे अवाहन केले पंतप्रधानांनी सुद्धा समयसुचकता दाखवित आश्वासन दिले परंतू ते आज देखिल पुढे सरकले नाही.अखेर टी. सी. ठाकूर यांनी नुकतेच भरती प्रक्रिया लवकर झाली नाही तर न्यायव्यवस्था व सरकार मधे संघर्ष होईल अन् परिस्थितीचा उद्रेक होऊन न्यायव्यवस्था कोलमडू शकते अशाप्रकारचा संताप व्यक्त केला.नुकत्याच वाचलेल्या माहिती नुसार बंगलोर येथील 'दक्ष'या सामाजिक संस्थेने १९ लाख निकाल व ९५ लाख सुनावणी च्या आधारे केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक तथ्य समोर आली आहेत.ज्यांच्याकडे वेळ आहे अशा न्यायाधीशांना खटल्यासाठी १५-१६ मिनिटे,ज्यांच्याकडे वेळ नाही अशा न्यायाधीशांना खटल्यासाठी २-३ मिनिटे म्हणजे सरासरी एका खटल्यासाठी ५-६ मिनिटे लागतात.दररोज १६३ खटले येतात त्यापैकी निम्म्याच्या वर लोकांना तारीख पे तारीख मिळते तर बाकीच्यांचा निपटारा ५-६ मिनिटातच होतो.१२५ कोटीच्या लोकसंख्येत सर्वोच्च व उच्च न्यायालयात मिळून फक्त ६२५ न्यायाधीश आहेत तर जिल्हा व कनिष्ठ न्यायाधीशांचा हिशोब न केलेलाच बरा अशा परिस्थितीत नुसत्या उच्च न्यायालयात ४० लाख व कनिष्ठ न्यायालयात २.५ कोटी खटले तुंबले तर त्यात नवल काय.
                      न्यायालय व सरकार मधील संघर्षाची सुरवात सरकारने नियुक्त्यांची कोलोजेनियम पद्धत ( न्यायाधीशांची नियुक्ती न्यायाधीशांच्या ५ सदस्यां मार्फत ) रद्द करून राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा बनवत सरकारकडे ठेवली तेव्हापासून आधीच असलेली न्यायव्यवस्थेतीची दुरावस्था अधिकच भयावह झाली.परंतू सहा महिन्यातच सर्वोच्च न्यायालयाने ते विधेयक घटनाबाह्य ठरवले मग सरकारने मध्यममार्ग म्हणून नियुक्ती प्रक्रिया संहिता (memorandum of procedure)चा प्रस्ताव ठेवला.परंतू त्यात अनेक फेरबदल केले पण सरकारचा नकराधिकारावर(veto power) प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत तोही नाकारला यामुळे गेल्या दोन वर्षात ४८७ नियुक्त्या रखडल्या आहेत.ही न्यायव्यवस्थेतीची गंभीर परिस्थिती असूनही सरकारने मात्र शहामृगी पावित्रा स्विकारला आहे.यात भरडले जातात ते म्हणजे न्यायाची वाट बघणारे अन् गन्हा सिद्ध होण्यापूर्वीच तरतूदीपेक्षा अधिक शिक्षा भोगणारे कच्चे कैदी.
                     हे झाले न्यायालयीन न्याय यासबंधी पण सामाजिक न्यायाचे मानसशास्त्रच अजब असते.तिकडे अफ्सा(armed force special power act) विरुद्ध लढणारी मणिपूरची Iron lady उर्फ mengoubi(the fair face) असणारी मानव हक्क कार्यकर्ती ईरोम चानू शर्मिला यांनी आपले प्रदिर्घ उपोषण तब्बल १६ वर्षांनी (!!! आपल्याला अनेक पदार्थांची रेलचेल असतानाही एकादशीचा उपवास जड जातो) सोडले ते करीत असताना मनाचा सयंम सुटू नये म्हणून त्या दरम्यान स्वतःच्या आईला देखिल भेटल्या नाहीत.परंतू एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून उपोषण सोडून राजकीय मार्गाने मुख्यमंत्री होत हा कायदा रद्द करण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखविला तसेच लग्न करण्याची खाजगी ईच्छा व्यक्त केली.परंतू तिच्या घरातील,घरा शेजारील,गावातील लोकांना कोण गहजब वाटला अन् त्यांनी तिला स्विकारण्यासच नकार दिला.ज्यांच्यासाठी १६ वर्षांचा त्याग, संयम ठेवत रूग्णालयरूपी तुरूंगातील खडतर प्रवास भोगला तो पुन्हा रूग्णालयातच येऊन ठेपला.अशाप्रकारची सामाजिक समज असणाऱ्यांच्या मते आमच्या साठी लढणारे व आमचा आपोआप उद्धार करणारे जन्माला यावेत पण दुसऱ्यांच्या घरात अन् काय असेल तो संघर्ष, हाल अपेष्टा अन् नैतिकतेचे उत्तरदायित्व त्यानींच स्विकारावे आम्ही मात्र त्यांचा उदोउदो करीत त्यांना डोक्यावर तरी घेणार अन्यथा तथाकथित आदर्श तत्वाच्या चौकटीत न बसल्यास आपल्या आकलन क्षमतेची फुटपट्टी लावत त्यांना पायदळी तरी तुडवणार.अशाप्रकारच्या सामाजिक न्यायाचे काय करावे हा अनुत्तरित प्रश्न हतबल करतो.
                     न्यायबुद्धीने वागणाऱ्या व कृती करणाऱ्या व्यक्तींची संख्या जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत व्यवस्थेला अन् समाजाला लागलेले ग्रहण सुटणार नाही जसे ग्रहांना लागलेले ग्रहण सुटताना काही लोक दे दान सुटे गिरान म्हणत काहीतरी मिळावे या अपेक्षेने मागत फिरतात तीच मागतकराची वेळ आता न्यायव्यवस्थेतील न्याय असो की सामाजिक न्याय तो मिळवण्यासाठी आली आहे ही खरी शोकांतिका आहे.

संदिप महामुनी
९६३७१३०२०६

शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

अभासी जगण्याची ओढ....!

                                  अभासी जगण्याची ओढ....!

               रोजच्या जगण्यात अवाढव्य लोकसंख्ये प्रमाणे भरमसाठ घटनाही रोज घडतात अन् त्यातील काही बातम्या आपल्याला धडकतायेत.त्या ताज़्या म्हणत म्हणत केव्हा शिळ्या होतात ते सुद्धा समजत नाही इंस्टंट चा जमाना आहे.अलीकडील कोपर्डी बलात्कार, महाड पुल दुर्घटना त्यापैकीच.या वरवर लक्षवेधक बातम्या हो लक्षवेधकच कारण नेहमी पेक्षा काहीतरी वेगळे बघायला किंवा ऐकायला मिळाले की आपली उत्सुकतावश मनस्थिति सुखावते.वरवर अरेरेरे..!, अबब..! करत चुकचुकतो पण खरचं आपण तेवढे संवेदनशील राहिले आहोत का? मग भ्रष्टाचाराचे मोठे आकडे असो की अपघातात अथवा दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या माणसांचे आकडे, ते ऐकून आपले डोळे आता फिरत नाहीत डोळेझाक मात्र आपण आवर्जून करतो.
                कोपर्डी बलात्कारावरून आठवलं नुकतेच उत्तरप्रदेशात बलात्काराच्या व्हिडीओ सीडीज् विकताना सापडल्या अन् त्याचे दर सुद्धा आतील घटकानुसार वेगवेगळा होता.मग यात बलात्कार करणारा,त्याचे व्हिडिओ शुटिंग करणारा,ते विकणारा व विकत घेणारा असं कितीही कायदेशीर वर्गीकरण केले तरी मुळ प्रवत्ती एकच आहे.बलात्कार सवर्णावर झाला की दलित महिलेवर किंवा श्रीमंत की गरीब अथवा घराबाहेरील की घरातील,बलात्कार हा तेवढाच भयंकर असतो.अन् तो शरीरापेक्षा मानसिक आघात अधिक असतो.आपल्या कडे मात्र राजकारण असो की समाजकारण विषयाच्या गंभीरते पेक्षा जाती-पाती किंवा मताच्या अनुषंगानेच ते चालत राहतं त्यावरच त्यांची चुल पेटते.महाड सारख्या दुर्घटनेत शंभर वर्ष जुन्या पुलाचे अभियंते थातूरमातूर स्ट्रक्चरल अॉडीटचे सोपस्कार पाडतात कारण माणसांच्या जीवाची काहीही किमंत उरलेली नाही.याउपर गुटख्याचा तोबरा भरून पत्रकाराला कँमेरासमोरच उद्धट बोलत धमकावण्याचा मुजोरपणा पालकमंत्री करतात तसेच मुख्यमंत्री पत्रकारांना संबोधत असताना पाठिमागे उभारून खुशाल सेल्फी काढतात असले 'आपत्ती पर्यटन'करणारे तथाकथित लोकप्रतिनिधी असतील तर अच्छे दीन च येणार.या नेत्यांची तथाकथित राजकीय ताकद कार्ल मार्क्स च्या भाषेत सांगायची झाल्यास 'लुपेन वर्ग' आहे ज्याला सरकार कोणतं आहे, विचारधारा काय तसेच समाजाची संस्कार मुल्य कोणती या सर्वाशीं काही देणेघेणे नाही केवळ आपल्याला खायला प्यायला व पैसे मिळाले की झाले.
                नविन प्रथेप्रमाणे एखादी घटना कितीही छोटी असो वा मोठी त्यावर दोन ओळीची टिव्-टिव् केली की आपली आधुनिकते बरोबर कार्यतत्परताही दिसून येते व जबाबदारीचे ओझे देखिल हलके होते. आपल्या सारख्यांच्या लोकभावना आपल्या स्मृती इतक्याच तकलादू व क्षणभंगूर असतात तेव्हां एका पाठोपाठ एक घटना घडत राहतात आपण मात्र अंर्तमुख होण्या ऐवजी मूक साक्षीदार होतो.
                आजुबाजूला असलेले whats up,facebook,internet सारखी सोशल माध्यमांचा विळखा त्यातून निर्माण झालेले अभासी जगच आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनलाय.शेअर, लाईक पुरते मर्यादित सुविचार आपल्या खऱ्या जगण्याची मुल्ये असू शकत नाही ही खरी शोकांतिका आहे.पोकेमोन गो सारखे व्हर्च्युअल गेम्स जगात लोकप्रियतेचे उच्चांक मोडतायेत हे त्याचेच द्योतक आहे. या खेळाच्या अभासी जगात हरवल्यामुळे वास्तवात अपघात, लुटमार,बलात्कार यासारख्या दुर्घटना घडतायत असे हळुहळु समोर येऊ लागलय.आपण वास्तवात जगण्या ऐवजी अभासी जगालाच प्राधान्य क्रम देत वेगवेगळ्या मानसिक, शारीरिक व्याधींना आमंत्रण देतोय.अभासी जगण्याची ओढ इतकी बळावलीय की कळतय पण वळत नाही अश्या अवस्थेला पोचलो की काय अशी भीती वाटते आहे ही भीती भासच ठरो ही प्रार्थना...!

संदिप महामुनी
९६३७१३०२०६
http://www.sandeepmahamuni.blogspot.in 

गुरुवार, १६ जून, २०१६

आधुनिक रॉबिन हुड....!

                     
                      आधुनिक रॉबिन हुड....!

            मागच्या आठवड्यात शिरवळ(पुणे) येथे एका घरफोड्या करणाऱ्या इसमाला पोलीसांनी रंगेहाथ पकडले.अधिक तपास करता त्याच्या बद्दल अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला.घरफोड्या करणारा इसम दिवसाढवळ्या एक प्रतिष्ठित समाजसेवक म्हणून उजळमाथ्याने वावरत होता.कुठे स्वखर्चाने स्वागत कमानी बांध, स्वतःच्या मुलाच्या नावाने वातानुकूलित अत्याधुनिक संगणक कक्ष भेट दे अश्या कामगिरी त्याच्या नावावर आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार आत्तापर्यंत दहा-बारा घरफोडीत ६०/७० तोळे सोने व इतर रोख रक्कम असा ऐवज त्याने लुटला असावा.
               हे ऐकूनच माणूस किती अनपेक्षित वागू शकतो याची प्रचिती येते.सर्वसाधारण नितीमुल्यात न बसणाऱ्या या घटनेमुळे समाजात समाजसेवक या पदाची व्याख्या नेमकी काय झाली आहे तसेच लोकांना देखिल समाजसेवा म्हणजे नेमके काय अभिप्रेत आहे हा प्रश्न चिंतन करण्याऐवजी चिंता करायला भाग पडण्या इतपत गंभीर झाला आहे. अशाप्रकारच्या सामाजिक कृती करीत कुठे गल्लोगल्ली टपरीवजा कार्यालय थाटून,अनाथाश्रमात-वृद्धाश्रमात फळवाटप,रक्तदान शिबीर तसेच अरूंद गल्लीच्या तोंडावर अडथळा निर्माण करीत लावलेले बोर्डाचे थाटात उद्घाटन करीत सटरफटर बातमीदाराला चिरमिरी देऊन अथवा वर्तमानपत्रात शुभेच्छा जहिरात देत बातमी छापून आणायची.तसेच पोरंटोरांची फोटो टाकून वाढदिवसाच्या शुभेच्छा फलक चौकाचौकात लावायचे.काहीजण फलकाद्वारे मॉडेलिंग ची सुप्त ईच्छा पुर्ण केल्याची हौस देखिल भागवतात. पैशे ओतल्यावर वाढदिवस विशेषांकाची रंगीत पुरवणीसुद्धा मिळते.तेव्हा आजकाल असली चमकोगिरी करीत स्वस्त प्रसिद्धी सहज मिळते.चार टपोरी पोरं तथाकथित कार्यकर्ते हाताशी धरत मटका, वाळू ठेकेदार, जागा खरेदी-विक्रीचे दलाल,बिल्डिंग काँट्रॅक्टर असे समांतर धंदे करीत माया जमवतात व तथाकथित प्रतिष्ठेसाठी तथाकथित समाजसेवा करतात.यात भर म्हणून रात्री घरफोड्या अन् दिवसा समाजसेवा करणाऱ्यांची वर्णी लागलीये इतकचं.
         असे आपल्या नेता किंवा समाजसेवकाचे प्रारूप (मॉडेल) असेल तर समाजाची आदर्श बिल्डिंग कोणत्या पायावर उभी राहणार हे सांगण्याची आवश्यकता नाही.लालूप्रसाद यादवांचा चारा घोटाळा असो की छगन भुजबळांचा शिक्षणसंस्थेचा कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार ही उदाहरणं प्रातिनिधिक आहेत,तांत्रिकदृष्ट्या सापडत नाही तोपर्यंत साव असणारी असंख्य प्रकरणं गुलदस्त्यातच राहतात.यातूनच प्रेरणा घेणारे युवा कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते यांचा भडीमार चालूच असतो.यांच्या जोडीला परदेशी अनुदान कायदेशीर मार्गाने लाटणाऱ्या समाजसेवी संस्था (NGO) काढणाऱ्या पांढरपेशी समाजसेवकांची गर्दी आहेच.आपण देखिल चलता है म्हणत आपल्या कृतीला समपर्क कारणं शोधत सर्व धृतराष्ट्राप्रमाणे आंधळा कारभार चालवत  असतो शिवाय वर्षोंवर्षाच्या अंधश्रध्देमुळे डोळ्यावर पट्टी बांधणाऱ्या गांधारी जोडीला आहेतच.शेवटी यथा प्रजा तथा राजा अन् यथा राजा तथा प्रजा.
         रॉबिन हुडच्या कथेप्रमाणे जुलमी श्रीमंताना लूटून गरजू गरीबांना मदत करणारे चित्र स्वत:च्या मनात निर्माण करीत चुकीच्या विचारांचे समर्थन करीत आपल्या महत्वाकांक्षा पुर्ण करण्याचा अट्टहास आजकालचे आधुनिक रॉबिन हुड करीत आहेत.लोकतांत्रिक संविधानाची येथेच्छ तांत्रिक मोडतोड करीत पैसा फेको अन् तमाशा देखो म्हणत समाजात प्रतिष्ठितपणाची झूल पांघरतायत. समाजदेखिल  वरकरणी आकर्षक वेष्टनाला भुलणारा अन् प्रतिकात्मकतेत गुरफटलेला आहे तेव्हा असले आधुनिक रॉबिन हुडच आजचे हिरो भासतात ही खरी शोकांतिका आहे.

गुरुवार, ५ मे, २०१६

सैराट व्हाया झिंगाट.....

                                           सैराट व्हाया झिंगाट.....

                       नुकताच 'सैराट' नावाचा मराठी चित्रपट पाहिला. प्रेमाचा प्रवास अन् त्याचा शेवट यातून जाणावणाऱ्या समाजव्यवस्थेत आपण भौतिक दृष्ट्या २१व्या शतकात आहोत मात्र समाजमन मध्ययुगीन विचारधारेला फेविकोल का जोड है टुटेगा नहीं याप्रमाणे चिकटलेले आहे हेच अधोरेखित करते.
                       समाजातील तथाकथित आहेरे वर्गातील सरंजामांनी पिढ्या न पिढ्याची मान मरातबाची पांघरलेली झूल त्यातून निर्माण झालेली सत्ता-संपत्ती व यातूनच आलेला दुराभिमान केवळ नाहीरे वर्गालाच नव्हे तर स्वजातीयांना देखिल कस्पटासमान लेखण्याची प्रवृत्तीला खतपाणी घालतो आहे. त्यांच्या घराण्याचा तथाकथित परंपरेला छेद देण्याची कल्पना त्यानां अस्वस्थ करणारी व त्यासाठी टोकाचे पाऊल उचलणारी असते.दुसरीकडे तोच प्रकार जात पंचायतीच्या नावाखाली अख्ख्या कुटूंबाची आर्थिक मानसिक वाताहत करीत हतबल करणारा देखिल असतो.
                      सध्याच्या युगात बाहेर दाखवण्यापुरती असणारी विकसित पुरोगामी मानसिकता घरात मात्र टोकाची संकुचित असते हा जगण्यातला विरोधाभास केवळ ठराविक वर्गातच नव्हे तर सर्व समाजात आहे.स्वतःच्या अहंकारापुढे दुसऱ्याचे मन,ईच्छा याला काडीचीही किंमत नसते.पुस्तकी अभ्यासक्रमातून घेतलेल्या शिक्षणापेक्षा घरातून, समाजातून मिळणाऱ्या बाळकडूचा परिणाम खोलवर रुजतो.
                     चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे,त्याचा समाजमनावर होणारा परिणाम याविषयी कमालीचे संवेदनशील असणारे सोशलमिडियीस्टमुळे चित्रपटाच्या केवळ टिजरवरून मत,प्रतिक्रिया,आमचा-तुमचा वादविवाद यांचा नुसता महापूर आला होता मात्र तो चित्रपट पाहिल्यानंतर खरचं ते नेमकं काय बोध घेतात हा माझ्यासाठी तरी औत्सुक्याचा विषय आहे. कारण दिग्दर्शकाने व्यावसायिकपणे आकर्षण,ओढ,प्रेम, जबाबदारीचं भान आणि वास्तव हा प्रवास आपल्या पुढे ठेवला आहे त्यातून नेमका संदेश घेतला जाऊन स्वत:च्या विचारात जाणिवपूर्वक परीवर्तन केले जाते का? का फक्त आपल्याला रूचणारे,पचणारे तेवढे सोयिस्कर घेत बेभान होत केवळ झिंग-झिंग, झिंग-झिंग झिंगाट करत येरे माझ्या मागल्या होणार असेल तर कसले प्रबोधन अन् कसला विचार नुसतेच मनोरंजनरूपी टाईमपास.
                    वैचारिक सहिष्णुता ( आपल्या विरुध्द अथवा विरोधी विचार सद्सद्विवेक व बुद्धीप्रामाण्याने स्विकारणे ) हा महत्वाचा गुण अंगिकारणे गरजेचे आहे नाहीतर प्रत्येक टप्प्यावर आपल्या सारखे विचार करणारे व न करणारे अशी उभी फुट निर्माण करणार असू तर येणाऱ्या पुढच्या पिढीचे पाय रक्ताने माखलेले असतील तसेच वैचारिक पोरकेपणाने ती ग्रासली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.पहिल्यांदा विषमता निर्माण करणाऱ्या व्यवस्थेवर भिरकावलेल्या दगडानी झालेला शेवट नंतर पुढच्या टप्प्यावर निशब्द क्रुरतेवर थांबेल एवढाच काय तो बदल बाकी सर्व प्रवासी आपापल्या जीवजगतासाठी स्वतःच जबाबदार असतात !

बुधवार, २० एप्रिल, २०१६

देव देव्हाऱ्यात नाही....!

                                           देव देव्हाऱ्यात नाही....!

                    महिलांचा म्हणजे तथाकथित आदिशक्तिचा शनिच्या चौथऱ्यावरील प्रवेश असो की त्र्यंबकेश्वर मंदिर गाभाऱ्यात तसेच स्त्री देवता महालक्ष्मी हिच्या मंदिर गाभाऱ्यातील प्रवेश अथवा हाजी अली दर्ग्यातील प्रवेश असो स्त्री-पुरूष समानतेचा प्रतिकात्मक लढा देणे योग्यच.परंतू न्यायालयाने मानवीय हक्क अधोरेखित करून सुद्धा मुजोर पुरषी मानसिकतेशी तसेच व्यवस्थेशी पदोपदी लढण्यातच स्त्री तसेच अन्य दुर्बल घटकांची उर्जा नष्ट होते आहे.
                   मुळात स्त्री असो वा पुरूष ,'देव'ही संकल्पना सर्व प्राणीमात्रांच्या मानसिक, शाररिक मर्यादांच्या पलिकडे तसेच त्यांच्यावर नियंत्रण तसेच अंकुश ठेवणारी सर्वव्यापी आदर्श तत्वावर आधारित आहे. मनुष्याच्या मनाचा आभ्यास केल्यास प्रत्येक क्षणी अनुभवणाऱ्या घडामोडीतून मनात येणाऱ्या असंख्य सततच्या विचारांचे रूपांतर वेगवेगळ्या भावविश्वात होते त्यातूनच तो नेहमीच दोलायमान स्थितित राहतो शिवाय लहानपणापासून बिंबवलेले आपल्या मनावर  म्हणजे पर्यायाने आपल्यावर देव नावाच्या बाह्य शक्तीचे नियंत्रण आहे तोच आपल्या चांगल्या-वाईट, चुक-बरोबर, पुण्य-पाप याचा हिशोब ठेवतो हा विचार व यातून येणाऱ्या हतबलते मधे देव या संकल्पनेचा तो दास बनतो.
                 नुकतीच केरळ मधील पुत्तिंगल देवी मंदिरातील भीषण आगीची दुर्घटना असो की नेपाळमधील भुकंपात नष्ट झालेली मंदिरे, केदारनाथ येथील दुर्घटना तसेच हज यात्रेत घडणारी चेंगराचेंगरी अशाप्रकारच्या विविध दुर्घटनेत आत्तापर्यंत लाखों लोक देवा समक्ष मरण पावलेत परंतू त्या दुर्घटना तो थांबवू शकला नाही. याचे साधेसोपे उत्तर म्हणजे या दुर्घटना मानवनिर्मित आहेत आणि यात तो हस्तक्षेप करीत नाही.तो सुद्धा संकटकाळी मनोबल वाढवणारा आशावादी ठेवणारा मानव र्निमित काल्पनिक आरसा असून ती एकप्रकारे मानसोपचार पद्धती आहे.तेव्हा नियमाला अपवाद असला तरी मानवी हितासाठी नियम पाळण्याला अपवाद राहिल्यास ते धोकादायकच असते व तशाप्रकारचेच प्रतिबिंब आरशात उमटणारचं.
               परंतू देवाचे तथाकथित मालक,धर्ममार्तंड शनि हा पापग्रह आहे त्याच्या दर्शनाने स्त्रियां वर अत्याचार वाढतील ,साईबाबा देवाचा अवतार नसून त्याच्या पुजेनेच दुष्काळ पडला आहे असले बाष्कळ उपदेश करीत असतील तर उघडे डोळा बघा नीट करत एक पाऊल पुढे टाकण्याची वेळ आली आहे.
               कुणी कोणावर कशी श्रद्धा ठेवावी ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब असली तरी तिचा इतर व्यक्तिला उपद्रव होता कामा नये या संस्काराला प्राधान्यक्रम देणे ही खरी भारतीय संस्कृती असली पाहिजे पण जिथे दगडाला शेंदूर फासून तसेच महापुरुषांची सोयीस्कर विभागणी करीत त्यांचाच देव बनवत आमचे ते श्रेष्ठ बाकी सगळे दुय्यम ही भुमिका अखेर द्वेषच र्निमाण करते अन् संधीसाधू त्याचे आपमतलबी राजकारणच करीत असतात.
               आपली विचारधारा निसर्गाशी अनुरूप असणे तसेच त्याच्याशी नैसर्गिकपणे एकरूप होणे त्यातच देव सामावलेला आहे ही श्रद्धा डोळसपणे अवलंबली पाहिजे. केवळ भिती, असुरक्षितता यातून तात्काळ मुक्त होण्यासाठी तसेच आयतेपणाचे समाधान पदरात पाडण्यासाठी धर्मस्थळी गर्दी करीत षोडशोपचार करण्यात काय हशील कारण देव देव्हाऱ्यात नाही तो आपल्या विचारधारेत आहे तिचेच आत्मपरीक्षण,चिंतन व मनन आवश्यक आहे.

संदिप महामूनी
९६३७१३०२०६

गुरुवार, १७ मार्च, २०१६

सावधान ! काळ सोकावतोय ....

                                              सावधान ! काळ सोकावतोय......

            नुकत्याच चर्चेत असलेल्या बातम्या पाहता देशात नेमकं चाललंय काय हा प्रश्न पडतो. विजय मल्या नावाचा रंगेल उद्योगपती तथा माननीय खासदार देशातील १७ बँकांचे नऊ हजार कोटी कर्ज (ऐकूनच डोकं बोजड होतंय) न चुकवता यंत्रणांच्या नाकावर टिच्चून १३ सुटकेस घेऊन निघून जातो.अन् आपले CBI खाते कोर्टात डिटेंशन एवजी लुक आउट नोटिस काढल्याच्या चुकीची कबुली देत मल्या पळून गेला हे निलाजरेपणे सांगते. तो मात्र लंडन मधून मी पळालो नाही मी काही चुकीचे केले नाही ( कारण माझ्यासारख्या बलाढ्य माणसाने कर्ज घेऊन बँकावर उपकार केले आहेत अन् बँकादेखिल असा असामी कर्जदार लाभल्यामुळे उपकृत झाल्या होत्या असाच त्याचा अविर्भाव आहे ) तसेच मीडियाने मला लक्ष्य न करता मी त्यांच्यावर केलेल्या खैरातीची जाण ठेवा असा उपरोक्त सल्ला देणारी टिव टिव केली.
        रघुराम राजन सारख्या कर्तव्यदक्ष गवर्नरनी कोणत्याही दबावाची तमा न बाळगता सततची कर्जाची फेररचना न करता सर्व खाती व्यवस्थित करण्यासाठी बँकावर लादलेल्या आदेशामुळेच बँकांनी विजय मल्याच्या पाठी तगादा लावला व त्याचेच पर्यवसन त्याच्या पळून जाण्यात झाले.
           दुसरीकडे सरकारी संत श्री श्री ( सामान्यांसारखे एका श्री ने यांची स्तुती पुर्ण होत नाही ) रविशंकर जगाला आर्ट अॉफ लिविंग चे धडे देण्यासाठी एका भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यासाठी यमुनेच्या पूरप्रवण क्षेत्रात सपाटीकरण करीत झाडे झुडुपे तोडून तसेच काही ठिकाणी पात्राची दिशा बदलून नैसर्गिक जैवविविधतेचे नुकसान करण्यास कारणीभूत झाले असताना त्या विरोधातील याचिकेची हरित लवादाकडून दखल घेत त्यांना ५ कोटींचा दंड ठोठावला परंतू या आधुनिक संतानी एक छदाम देणार नाही हवे तर अटक करा असा उद्दामपणा दाखवत नविनच कला भक्तगणांना शिकवली परंतू लगेच जमिनीवर येत २५ लाख रू भरत उर्वरित रक्कम हफ्त्याने भरू असे सांगितले. वास्तविक कोणत्याही दंडाने पर्यावरणाचे नुकसान भरून येऊ शकत नाही.शिवाय हरीत लवादाने २५ लाख रू जमा करत उर्वरित रक्कम माफ केल्याचे ऐकिवात आहे तसे असेल तर हरीत लवाद दबावापुढे झुकून काम करीत आहे या शंकेस वाव आहे.तेव्हा 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे सांगणाऱ्या आपल्या पुर्वश्रमीच्या संतांची शिकवण आपण केव्हाच मातीमोल केली असून आधुनिक संतांसारखे भव्य दिव्य ईवेंट साजरे करीत समाजाचे आध्यात्मिक भले करण्याच्या नावाखाली सत्ताधारी मुजोरपणाच बाळगण्याचे जगण्याचे तंत्र मिळवले आहे व त्याचाच उदो उदो करण्याचे काम भक्तगण भक्तिभावाने करतीलच.
        महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी नुकतेच सर्वच अनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची घोषणा करीत दंडरूपी महसूल गोळा करण्याचा फंडा तसेच आगामी महापालिका निवडणूक असा दुहेरी उद्येश  साधला आहे. तेव्हा ज्या गोष्टीला चाप बसला पाहिजे त्याचे शुद्धीकरण करण्याचे राजकारणी तंत्र जनतेला मिळत आहे.
            एकिकडे झटपट फुकटात प्रसिद्धि मिळणाऱ्या विद्यार्थी नेत्याकडे देशाचे लक्ष वेधले जात असताना ९३ च्या बॉम्बस्फोटातील एक महत्वपूर्ण आरोपी तब्बल१५ वर्षांनी २००४मधे  मिळालेल्या त्याच्या थोड्याश्या माहिती वरून मुंबई पोलीस युनीट ६ ने त्याला शिताफीने अटक केली परंतू प्रामाणिक पोलिसांना प्रसिद्धी तर सोडाच त्या आरोपीवर CBIने ठेवण्यात आलेले बक्षिस आजअखेर जवळ जवळ १२वर्ष मिळाले नाही शिवाय बक्षिसाच्या रकमेसाठी कायदेशीर पाठपुरावा करण्याची वेळ त्यांच्यावर येत असेल तर एक तपास यंत्रणा दुसऱ्या तपास यंत्रणेच्या कार्यतत्परते बद्दल असंवेदनशील आहे याचेच प्रदर्शन मांडत आहे.
             मग विजय मल्या, आधुनिक संत रविशंकर, राज्याचे सर्वेसर्वा, तपास यंत्रणा सर्वच जण आपापल्या भातावर डाळ ओढण्यात मश्गूल आहेत ' गरज सरो अन् वैद्य मरो ' असेच सुविचार त्यांना अभिप्रेत आहेत.व्यवस्थेत शिरलेली सुस्त व भ्रष्टाचारी मानसिकता व त्याचा पुरेपूर फायदा उचलणारा विजय मल्या वर्ग हे कशाचे द्योतक आहे त्यातून जगातील सर्वाधिक युवा तसेच सोशल मीडियावर एखाद्या घटनेबाबत मनोरंजनापुरते मर्यादित राहणाऱ्या पिढीला कोणता आदर्श मिळतो आहे. "भपकेबाज पणा करून पैसा मिळवा अन् देशाला बुडवून अय्याश जीवन जगा किंवा पर्यावरणाचे, सरकारी नियमांचे हवे तसे उल्लंघन करा नंतर सटर फटर दंड भरून त्या गोष्टी नियमित करून घेत समाजात प्रतिष्ठित पणे मिरवा ."मात्र रघुराम राजन यासारखे केवळ महत्वाकांक्षी व सतशिल न राहता ठाम, न डगमगाता, दबावाला अथवा हितसंबध या गोंडस आमिषाला न बळी पडता कर्त्तव्यतत्पर राहणाऱ्या तसेच १५ वर्ष जुना तपास सुद्धा तेवढ्याच हिरीरीने करणारे उमदे व प्रामाणिक पोलिस कर्मचारी हे आदर्श जरी मोजके असले तरी 'कर्त्तव्यदक्ष राहून देशसेवे साह्य करू अवघे धरू सुपंथ' हा सुविचार आपल्या देशाला जगात उज्वल भविष्य निर्माण करू शकेल.
            परंतू अति प्रमाणात घडणारे भ्रष्ट आचरण व कुठेही कठोर शासन होत नाही असा संदेश समाजात पसरतोय व तो समज दृढ़ होत आहे तेव्हा आपल्या सत्ताधाऱ्यांनी तसेच प्रशासनानी शिवाजी महाराजांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप ही काळाची गरज आहे कारण आप्त स्वकियांकडून स्त्रीच्या शिलावर झालेला अत्याचार कदापीही न सहन करता व कोणतीही भिडभाड न ठेवता अशा नराधमाचे हातपाय तोडण्याचे असो की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याचे महसूल कर्मचाऱ्यांना दिलेले आदेश असो त्यातून नैतिक तसेच कर्त्तव्याबाबत योग्य तो संदेश महाराजांनी त्यांच्या कृतीतून समाजाला दिला होता. त्याचीच नितांत गरज सद्यस्थितीला जाणवते आहे अन् त्याचीच वाणवा आहे.
         तेव्हा चुकीच्या गोष्टी घडण्याबद्दल दु:ख नाही तर त्यानां समर्थनीय प्रशासन व राज्यकर्ते हा संदेश घातक आहे. म्हणूनच म्हातारी मेल्याचे दु:ख नसते तर काळ सोकावता कामा नये हे महत्वाचे अन्यथा अराजकता दूर नाही.
तेव्हा सावधान ! काळ सोकावतोय ....
संदिप महामुनी
९६३७१३०२०६
http://www.sandeepmahamuni.blogspot.in

   

बुधवार, २ मार्च, २०१६

स्थितप्रज्ञस्तदोच्यते ...........!

                                 
                                                   स्थितप्रज्ञस्तदोच्यते ...........! 

                 थोड्या दिवसापुर्वी बेंगलोर येथे एक २३वर्षीय 'हरीश निंजप्पा' नावाचा युवक निवडणूक मतदान करून देवदर्शनाला चालला असताना त्याच्या दुचाकीस ट्रकची धडक बसून त्यात त्याचे अक्षरशः दोन तुकडे झाले. परंतू पुढील ३० मिनिटे तो जिवंत होता अन् मदती साठी लोकांना अवाहन करीत होता. काहींनी याचा व्हिडिओ देखिल बनवला परंतू तात्काळ मदतीच्या बाबतीत त्याची निराशा होत होती.शेवटी काही लोकांनी रूग्णवाहिका बोलवून त्यातून त्याला दवाखान्यात पोहचवण्याची व्यवस्था केली.ह्या दरम्यान रूग्णवाहिकेतील नर्सशी हरीश जे बोलला ते मन सुन्न करणारे व संपूर्ण सामाजिक व्यवस्थेवर विचार करायला भाग पाडणारे होते.तो म्हणाला
             " मी आता जगू शकणार नाही हे मला माहित आहे पण मी मेल्यानंतर माझा समाजातील काही गरजू लोकांना उपयोग झाला पाहिजे त्यासाठी माझे अवयव दान करा."
                स्वतःला इतका भयंकर अपघात झाल्यावर जिथे शुद्धीत राहणे हेच आश्चर्यकारक असताना तुमचा विवेक जागृत ठेवणे ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. यातुनच त्याची वैचारिक स्पष्टता तसेच स्थितप्रज्ञता कमालीची प्रगल्भ असल्याचे ते द्योतक आहे. अखेर तो गेला व त्याच्या ईच्छेनुसार अवयवदान सुद्धा झाले. त्याच्या मावशीने 'हरीशचा आम्हाला अभिमान आहे' अशी मोजकीच पण बरेच काही सांगून जाणारी प्रतिक्रिया दिली.
               स्वतः मृत्यूच्या दाढेत असताना दुसऱ्यांच्या हितांचा विचार करण्याची दातृत्व वृत्ती ह्यातून त्याची जडणघडण किती सुस्पष्ट विचारधारा व प्रगल्भ सामाजिक जाणीवांच्या सुसंस्कारात झाली असेल याची कल्पना येते.
              एकिकडे समाजात र्निमाण होणारी तेढ,फुट पाडणारे गट, तोंडदेखली सोशल मिडिया पुरती सामाजिक जाणीव ,अस्थिर करणारी विचारधारा व त्याचा प्रसार अशा अनेक गोष्टींची बजबजपुरी झाली आहे. त्यात हरीश निंजप्पा सारखे तरूण म्हणजे मिणमिणता का होइना आशेचा किरण अजून शिल्लक आहे याचीच प्रचिती देत आहेत.
आपण नेहमी एकतो माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही त्याला समुहाची आवश्यकता भासते. परंतू ह्या बरोबरच मानवाला निसर्गाने इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक विचार करणारा मेंदू दिला आहे. तसं प्राण्यांना दिलेला नैसर्गिक क्रियेसाठी आवश्यक मेंदू अन् मानवाला मिळालेला अधिक कार्यक्षम मेंदू यात नक्की कोण योग्य आहे हा प्रश्न मला तरी अनुत्तरित आहे. कारण अधिक वैचारिक क्षमते बरोबर अधिकची सामाजिक, निसर्ग याविषयीची जबाबदारी देखिल आपलीच आहे याची जाणीव खरच रूजली आहे का ? ती रूजवण्यात काय कमतरता आहेत याचा धुंडोळा संवेदनशीलपणे घेतला गेला पाहिजे. वैयक्तिक पातळीवर तो आवश्यक आहेच पण सामाजिक पातळीवर या विषयाशी निगडित शिक्षण जे वेगवेगळ्या सरकारी खात्यांतर्गत देणे जसे शिक्षण, आरोग्य, रस्ते सुरक्षा वैगेरे हे केवळ कागदोपत्री सोपस्कार न राहता लोकांच्या वर्तणूकीतून ते परावर्तित झाले पाहिजे.
            नुकत्याच महिला वाहक, पोलिस तसेच अन्य धर्मिय पोलिस अधिकारी यांच्यावर उनमत्त चवऱ्या बहाद्दरांकडून घडलेले हल्ले  व इतर सुज्ञांचा तटस्थपणा ( भ्याडपणा ) हे सामाजिक भानाची घसरलेली पातळी अधोरेखित करते आहे. तेंव्हा सुसमाजाची र्निर्मितीसाठी व्यक्तिगत पातळीवर तसेच शासन पातळीवर गांर्भियाने विचार झाला पाहिजे व त्याची तत्परतेने अंमलबजावणी केली गेली पाहिजे. तरच एक नागरिक म्हणून समाजात वावरताना आपली कर्तव्ये कोणती आहेत व तशा प्रकारचे योगदान देण्याची सहजप्रवृत्ती अंगिकारली गेली पाहिजे. नागरिकशास्त्राच्या पुस्तकातील मुलभूत कर्तव्ये केवळ परिक्षेपुरती पाठ करून प्रत्यक्षात वागताना मात्र त्याची वाणवा असेल तर कर्मभोग अटळ आहेत. शैक्षणिक कार्यभागातील पुस्तकी ज्ञानाने मनुष्य प्रगल्भ होतोच असे नाही. ते केवळ त्याच्या अंर्तमनाने त्या गोष्टी किती जाणीवपूर्वक स्विकारल्या आहेत यावर ते अवलंबून असते.
           हरीश निंजप्पा याच्या नावातच हरीचा ईश असला तरी त्याच्या कृतीतून असामान्य अशी उच्चतम स्थितप्रज्ञता तसेच दातृत्व गुण त्याला खऱ्या अर्थाने देवत्व प्राप्त करून देतात व आपल्या सारख्या मानवाला ते प्रेरणादायी आहेत.
हरीश चा प्राण गेला पण त्याचा विचार अमर रहे हीच त्याला प्रार्थनारूपी श्रद्धांजली !

मंगळवार, १२ जानेवारी, २०१६

मनाचा शोक...!


                              मनाचा शोक....!

            नविन वर्षाच्या सुरवातीलाच पठाणकोटच्या हवाईतळावर दहशतवादी हल्ला झाला अन् नेहमीप्रमाणे सर्व यंत्रणा सर्तक झाल्या. बैल गेला अन् झोपा केल्याचा प्रकार आणखी किती दिवस चालू राहणार ह्या प्रश्नानी मन व्यथित होत आहे. केवळ सहा दहशतवादी सीमे पलीकडून येतात व भारतातील सर्वात मोठ्या हवाईतळावर हल्ला चढवत सैन्याला ४-५ दिवस झुलवत ठेवतात, एवढा शस्त्रसाठा तसेच त्याप्रकारचे प्रशिक्षण त्यांच्याकडे असते.अन् खेदाची बाब म्हणजे एक कर्नल व सहा निवृत्त जवानांचा ( त्यात एक NSG कमांडो होता) बळी जातो, हो बळीचं ! सरकार कितीही त्यांनी हौतात्म्य पत्करलं म्हणत व्टिट करित असले तरी हा आपल्या ढिसाळ व अपरिपक्व धोरणांचे फलितच आहे.
           २००० साली IC814 या विमानाचे अपहरण करून ते कंदहारला नेण्यात आले होते तेव्हा तीन महत्वाच्या अतिरेक्यांच्या बदल्यात प्रवाशांच्या सुटका केल्या होत्या.त्यानंतर २०१६ मधे पठाणकोटवर म्हणजे संरक्षण दलाच्या महत्वाच्या ठिकाणावर हल्ला केला. विशेष म्हणजे त्यावेळच्या हल्ल्याचा  व आताच्या घटनेचा सुत्रधार हा जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा प्रमुख मसुद अजहर हाच आहे. या दरम्यान संसदेवरील हल्ला, मुंबईवरील हल्ला अशा घटना घडतच होत्या. पावसाळा आला की घर बांधायची आठवण होणाऱ्या गोष्टीतल्या त्या माकडासारखे आपण आरंभशूरपणे कृती करत पुन्हा सुस्त होतो.
            गेल्या २६ वर्षात देशात १३६ हल्ले झाले त्यातील १२१ निरपराध लोकांवर तर १४ महत्वाच्या व्यक्तींवर झाले असुन त्यात २००० लोकं मारली गेली तर ६००० लोकं जख्मी झालेत.सीमेवर आपले जवान जीवाची पर्वा न करता लढतात परंतू देशांतर्गत लढाई मधे प्राथमिक जबाबदारी ही पोलिस यंत्रणांची असते मात्र पोलिसांची शारीरिक स्थिती,मानसिक स्थिती,उपकरणं, शस्त्र व यासर्वांचे प्रशिक्षण याची किती बोंबाबोंब आहे ते सामान्य माणूस देखिल सांगू शकतो. अतिरेकी AK47 घेऊन येतात तर आपले पोलिस कर्मचारी म्हशीला हुसकावयला गेल्यासारखे काठ्या-लाठ्या घेऊन फिरतात.तुकाराम ओंबाळेंनी कसाबला कसे निशस्त्रपणे पकडले यावर आपल्या यंत्रणांचे पोट भरते. पण अशा साहसी व प्रामाणिकपणे लढणाऱ्यांची आयुष्यं का म्हणून धोक्यात घालायची.
           Anti terrorist squad प्रत्येक राज्यात निर्माण करण्याचे आदेश असताना, Anti terrorist force one या महाराष्ट्राच्या पर्यायाने मुंबईच्या पथका व्यतिरिक्त एकाही राज्यात उपकरणं, शस्त्र व प्रशिक्षणा अभावी ते अस्तित्वात नाही.२००० पर्यंत NSG चे एकमेव ट्रेनिंग सेंटर होते आता ५ केंद्रे झाली असताना २०१२ पर्यंत हेलिकॉप्टर उपलब्ध नाही या सबबी खाली आपल्या black cat कमांडोना त्याचे प्रशिक्षण दिले नव्हते.या गोष्टी आपल्या राज्यकर्त्यांना बोचत नाहीत. जिथे विदेशनिती, सुरक्षानिति म्हणून सत्ताधारी व विरोधी नेते एकत्र येत नाहीत त्या देशाचे दुसरे काय होणार.
          पठाणकोट हल्ला झाला तेव्हा गृह सचिव,गुप्तचर यंत्रणा, रॉ, मल्टी एजेन्सी सेंटर यांच्यात समन्वयाचा अभाव होता अस म्हंटले जातेय. सहा दहशतवादी मेल्यानंतर पत्रकारांना संबोधताना आपले संरक्षण मंत्री म्हणाले सात जवानांपैकी एकच समोरासमोरील लढाईत शहिद झाला बाकीचे तांत्रिक चुकीमुळे गेले. असले हस्यास्पद विधान करून तुम्ही तुमचे नैतिक अपयश झाकू पाहताय इतकेच. जे अतिरेकी मरायलाच आले होते त्यांना कंठस्नान वैगरे घातले असल्या अलंकारी शब्दखेळात तुम्ही तुमच्या धोरणात्मक चुकांकडे साफ दुर्लक्ष करीत आहात.
         अशा दहशतवादी हल्ल्यानंतर नेहमीच त्याच्या कारणमीमांसांची चर्चा रंगते.पंतप्रधानांनी पाकिस्तानला दिलेल्या अचानक भेटी नंतर लगेचच हा हल्ला झाला. मोदींच्या त्या नीतीला त्यांचे समर्थक 'out of box diplomacy' म्हणत होते तर हल्ला झाल्यानंतर त्यांचे विरोधक याला 'mindless diplomacy' म्हणत आहेत.भारत-पाकिस्तान यांच्या निर्मिती प्रक्रियेमुळे हा प्रश्न जटिल आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलणी चालू ठेवणे हा आपल्या मुत्सद्दीगिरीचा भाग पाहिजे परंतू सुरक्षेसाठीची धोरणं व चोख व्यवस्था याची प्राथमिकता आपण कधीच विसरता कामा नये.
         जगातील सर्वात मोठा नववर्ग असणाऱ्या आपल्या देशात या सर्व बाबींची पोटतिडकीने किती पर्वा आहे याबद्दल माझ्या मनात साशंकताच आहे.याचे मुळ सुद्धा आपल्या संस्कारातच आहे कारण आयत्या मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी सैनिकांचा त्याग जबाबदार आहे या गोष्टीची खरी जाणीव नाही म्हणूनच देशातील प्रत्येक नागरिकांनी आयुष्यातील किमान एक वर्ष तसेच वर्षातील एक महिना देशाच्या सैन्यासाठी सक्ती ने दिला पाहिजे तरच सैनिकांच्या खडतर आयुष्याची व आपल्याला मिळणाऱ्या स्वातंत्र्याची खरी किंमत कळेल व त्यातूनच निर्माण होणारे नेते सुरक्षा धोरण राबिवताना खरोखर जागरूक असतील अन् तेव्हांच हल्ल्यानंतर सर्तक होण्या एवजी हल्ल्या आधीच सर्तक होऊन मनुष्य, वित्त तसेच मानहानी टाळू शकू.
         सुजाण नागरिक होण्यासाठीचे सुसंस्कारित मन असण्यासाठी 'मनाचे श्लोक' आहेतच परंतू शिकण्याचे वावडे असणाऱ्यांनी किमान 'मनाचा शोक' तरी समजून घ्यावा.

"eternal vigilance is the cost for the liberty ".

संदिप महामुनी
०९६३७१३०२०६