स्थितप्रज्ञस्तदोच्यते ...........!
थोड्या दिवसापुर्वी बेंगलोर येथे एक २३वर्षीय 'हरीश निंजप्पा' नावाचा युवक निवडणूक मतदान करून देवदर्शनाला चालला असताना त्याच्या दुचाकीस ट्रकची धडक बसून त्यात त्याचे अक्षरशः दोन तुकडे झाले. परंतू पुढील ३० मिनिटे तो जिवंत होता अन् मदती साठी लोकांना अवाहन करीत होता. काहींनी याचा व्हिडिओ देखिल बनवला परंतू तात्काळ मदतीच्या बाबतीत त्याची निराशा होत होती.शेवटी काही लोकांनी रूग्णवाहिका बोलवून त्यातून त्याला दवाखान्यात पोहचवण्याची व्यवस्था केली.ह्या दरम्यान रूग्णवाहिकेतील नर्सशी हरीश जे बोलला ते मन सुन्न करणारे व संपूर्ण सामाजिक व्यवस्थेवर विचार करायला भाग पाडणारे होते.तो म्हणाला
" मी आता जगू शकणार नाही हे मला माहित आहे पण मी मेल्यानंतर माझा समाजातील काही गरजू लोकांना उपयोग झाला पाहिजे त्यासाठी माझे अवयव दान करा."
स्वतःला इतका भयंकर अपघात झाल्यावर जिथे शुद्धीत राहणे हेच आश्चर्यकारक असताना तुमचा विवेक जागृत ठेवणे ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. यातुनच त्याची वैचारिक स्पष्टता तसेच स्थितप्रज्ञता कमालीची प्रगल्भ असल्याचे ते द्योतक आहे. अखेर तो गेला व त्याच्या ईच्छेनुसार अवयवदान सुद्धा झाले. त्याच्या मावशीने 'हरीशचा आम्हाला अभिमान आहे' अशी मोजकीच पण बरेच काही सांगून जाणारी प्रतिक्रिया दिली.
स्वतः मृत्यूच्या दाढेत असताना दुसऱ्यांच्या हितांचा विचार करण्याची दातृत्व वृत्ती ह्यातून त्याची जडणघडण किती सुस्पष्ट विचारधारा व प्रगल्भ सामाजिक जाणीवांच्या सुसंस्कारात झाली असेल याची कल्पना येते.
एकिकडे समाजात र्निमाण होणारी तेढ,फुट पाडणारे गट, तोंडदेखली सोशल मिडिया पुरती सामाजिक जाणीव ,अस्थिर करणारी विचारधारा व त्याचा प्रसार अशा अनेक गोष्टींची बजबजपुरी झाली आहे. त्यात हरीश निंजप्पा सारखे तरूण म्हणजे मिणमिणता का होइना आशेचा किरण अजून शिल्लक आहे याचीच प्रचिती देत आहेत.
आपण नेहमी एकतो माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही त्याला समुहाची आवश्यकता भासते. परंतू ह्या बरोबरच मानवाला निसर्गाने इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक विचार करणारा मेंदू दिला आहे. तसं प्राण्यांना दिलेला नैसर्गिक क्रियेसाठी आवश्यक मेंदू अन् मानवाला मिळालेला अधिक कार्यक्षम मेंदू यात नक्की कोण योग्य आहे हा प्रश्न मला तरी अनुत्तरित आहे. कारण अधिक वैचारिक क्षमते बरोबर अधिकची सामाजिक, निसर्ग याविषयीची जबाबदारी देखिल आपलीच आहे याची जाणीव खरच रूजली आहे का ? ती रूजवण्यात काय कमतरता आहेत याचा धुंडोळा संवेदनशीलपणे घेतला गेला पाहिजे. वैयक्तिक पातळीवर तो आवश्यक आहेच पण सामाजिक पातळीवर या विषयाशी निगडित शिक्षण जे वेगवेगळ्या सरकारी खात्यांतर्गत देणे जसे शिक्षण, आरोग्य, रस्ते सुरक्षा वैगेरे हे केवळ कागदोपत्री सोपस्कार न राहता लोकांच्या वर्तणूकीतून ते परावर्तित झाले पाहिजे.
नुकत्याच महिला वाहक, पोलिस तसेच अन्य धर्मिय पोलिस अधिकारी यांच्यावर उनमत्त चवऱ्या बहाद्दरांकडून घडलेले हल्ले व इतर सुज्ञांचा तटस्थपणा ( भ्याडपणा ) हे सामाजिक भानाची घसरलेली पातळी अधोरेखित करते आहे. तेंव्हा सुसमाजाची र्निर्मितीसाठी व्यक्तिगत पातळीवर तसेच शासन पातळीवर गांर्भियाने विचार झाला पाहिजे व त्याची तत्परतेने अंमलबजावणी केली गेली पाहिजे. तरच एक नागरिक म्हणून समाजात वावरताना आपली कर्तव्ये कोणती आहेत व तशा प्रकारचे योगदान देण्याची सहजप्रवृत्ती अंगिकारली गेली पाहिजे. नागरिकशास्त्राच्या पुस्तकातील मुलभूत कर्तव्ये केवळ परिक्षेपुरती पाठ करून प्रत्यक्षात वागताना मात्र त्याची वाणवा असेल तर कर्मभोग अटळ आहेत. शैक्षणिक कार्यभागातील पुस्तकी ज्ञानाने मनुष्य प्रगल्भ होतोच असे नाही. ते केवळ त्याच्या अंर्तमनाने त्या गोष्टी किती जाणीवपूर्वक स्विकारल्या आहेत यावर ते अवलंबून असते.
हरीश निंजप्पा याच्या नावातच हरीचा ईश असला तरी त्याच्या कृतीतून असामान्य अशी उच्चतम स्थितप्रज्ञता तसेच दातृत्व गुण त्याला खऱ्या अर्थाने देवत्व प्राप्त करून देतात व आपल्या सारख्या मानवाला ते प्रेरणादायी आहेत.
हरीश चा प्राण गेला पण त्याचा विचार अमर रहे हीच त्याला प्रार्थनारूपी श्रद्धांजली !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा