प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंधीला औरंगाबाद येथे नुकतीच एक घटना घडली ती म्हणजे स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या त्रिसदस्यीय समितीतील तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.कारण त्यांनी पालिका आयुक्तांकडे औरंगाबादचे अव्वल शहरांच्या यादीत नाव टाकण्यासाठी पाच लाखांची लाच मागीतली.विशेष म्हणजे या पाहणी पथकातील सदस्यांनी या कामानिमित्ताच्या मुक्कामात २५/३०हजाराची दारू ढोसली असे देखिल निदर्शनास आले आहे.सार्वजनिक स्वच्छतेबाबत कागदोपत्री जागरूक असणारे असले (दारू)अमलदार म्हणजे माकडाच्या हातात कोलीतच.नंतर फार फार तर चौकशी समितीचा फार्स करीत वेळकाढूपणा होईल मग ते प्रकरण प्रोसिडिंगच्या फेऱ्यात अन् कारवाई गुलदस्त्यात.
भारतीय राज्यघटना जगात अनेक बाबतीत उत्कृष्ट राज्यघटना तसेच जगातील सर्वोत्कृष्ट मुल्यांचा परिपाक असणारी मुलभूत मुल्ये असून देखिल सध्या सर्व स्तरांवर एखाद्या मुलभूत विकासापेक्षा त्याच्या दृश्य स्वरूपातील प्रतिकात्मक सोपस्कारावर अधिक लक्ष केंद्रित करून त्याचाच प्रचार व प्रसार करण्यावर भर दिला जातो मग ती सरकारी धोरणे असो की जगण्याची रीतभात.त्यासाठी मग माध्यमं छापील ते ईलेक्ट्रानिक कोणतेही असो.
सरकारी दवाखान्यात एखादा अनोळखी गंभीर रूग्ण असो की मृतदेह त्यांचा वेळवर व योग्य उपचार असो की अंतिम सोपस्कार ज्या बेफिकिरपणे केला जातो ते पाहता मानवी संवेदना कितीही बोथट असल्या तरी मोबाईल ची रिंगटोन मात्र भक्तिमय ठेवलेली असते.भिंतीवर 'रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' असे छान प्रभावी वाक्य लिहून ठेवायचे सरकारी नियमानुसार कर्मचाऱ्यांचा सर्व कोटा भरला अन् सोशल वर्कर नावाने पदं भरली की झाले भले त्याने नेमून दिलेली सेवा मन लावून न का करो पगार व अन्य सोयीसुविधांचा मेवा नेमाने घेण्याबाबत मात्र ते आग्रही असतात रुग्ण मात्र अनास्थेचे बळीच ठरतात.दुसरीकडे सुरक्षा सप्ताहाचे निमित्त साधून हप्ता गोळा करण्यात मग्न असणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना वाहतूक शिस्तीपेक्षा नियमांच्या अज्ञान व उल्लंघनातच फायदा दिसतो.एकिकडे अशी वेगवेगळ्या सरकारी खात्यातील वेगवेगळ्या तऱ्हा अन् दुसरीकडे निवडुन आलेले लोकप्रतिनिधी त्या त्या सभागृहात लोकांच्या हितासाठी चर्चा करायची सोडून अर्धे अधिवेशन आरडाओरडा करण्यातच घालवतात अन् स्वतःचे पगार,भत्ते न चर्चा करता बहुमताने वाढवतात.एकिकडे संसदेला लोकशाहीचे मंदिर म्हणत पायरीवर डोके ठेवणारे स्वतःच्या निर्णयाचे उत्तरदायित्व स्विकारत संविधानात्मक मत मांडून चर्चा करण्यापेक्षा व्टिटरला प्राधान्य देतात.चरख्यावर सुत काततानाचा फोटो टाकून एखाद्याची अहिंसावादी प्रतिमा पुसताही येत नाही अन् अंगिकारताही येत नाही.तसेच केवळ 'हलवा सेरेमनी' करून देशाची आर्थिक घडी व्यवस्थित करणारा अर्थसंकल्प गोड होऊ शकत नाही तर त्यासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय निरपेक्ष अन् कठोरपणे तसेच दुरदृष्टि ठेवून घेतले पाहिजेत.
अशा सगळ्या वरवरचा आदर्शवाद मिरवण्यातच समाधान मानणाऱ्या व शोधणाऱ्या मानसिकतेचे आपण सर्व बळी ठरतो आहोत अन् केवळ आदर्शवाद मुल्यांचा प्रतिकात्मक स्विकार करून मुलभूत बदलाचा आभास निर्माण करतो आहोत आता ही आभासाची प्रतिकेच आपले जगणं व्यापून टाकतायेत तेव्हा जगणं प्रतिकात्मक होण्या आधी सावध होऊया..!
संदिप महामुनी
९६३७१३०२०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा