साताऱ्यातील सरकारी दवाखान्यात एका महिलेचा परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे गर्भपात झाला असा आरोप राजकीय महिला कार्यकर्तीने केला अन् परिचारिकेने राजकीय महिला कार्यकर्तीच्या अहंकारामुळे घडले असे सांगितले यावर त्या महिलेच्या आईला प्रतिक्रिया विचारली असता आपण कुणालाही जबाबदार धरत नसुन स्वतःच्या नशिबाला दोष देतो असे हताश विधान केले.या घटनेतून शासकीय यंत्रणा अन् राजकीय व्यवस्था सामान्य माणसाच्या दृष्टीने कसे राम भरोसे आहेत अन् तो स्वतः नशिबाला बोल लावत कसा हतबल झाला आहे हेच प्रकर्षाने जाणवते.
अशाच प्रकारची भावना कमी अधिक प्रमाणात सर्व देशात बघायला मिळते मग ते काश्मीरी जनता व सुरक्षा सैनिक असू की फेरीवाले,निरूपम व मनसे सैनिक अथवा धोरण व अंमलबजावणी सगळीकडे एक अनामिक अस्वस्थता भासते जी मानसिक अशांततेच्या मुळाशी आहे मग जोपर्यंत काहीतरी स्वयंप्रेरित कारण आहे तोपर्यंत उर्जा खर्च करायची अन् ती संपली की मानसिक द्वंद्व करीत गळून पडायचे.एखाद्याने अजेंडा बनवत आत्मसुखाच्या पायऱ्या चढायच्या अन् इतरांनी स्वार्थबुद्धीच्या कुवतींनुसार तो राबवायचा.मात्र सरळमार्गाने जाऊ इच्छीणाऱ्या सामान्याना काय कमवायचे अन् काय गमवायचे हेच कळत नाही मग जीवंत आहे म्हणून जगायचं का जगण्यासाठी जीवंत राहयचं हा अनुत्तरित प्रश्न घेऊन फक्त श्वास घेत राहायचं.सरते शेवटी त्या जगद् निर्मात्याला दोष देणे सोयीस्कर असते कारण त्याने लिहलेल्या नशिबाने एकदा थट्टा केली की राजाचा रंक होतो अन् आपला विश्वास असो अगर नसो आपल्या वाट्याला वाटाण्याचा अक्षताच येतात.का कुणास ठाऊक हे लिहीत असताना एक गाण आठवतय खेळ कुणाला दैवाचा कळला, तु असो, मी असो, कुणी असो....