पटसंख्या कमी आहे म्हणून महाराष्ट्रातील १ हजार ३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षणखात्याने घेतला परंतू शिकून आपल्या मुलांना आश्वासक भविष्य मिळेल या आशेने मोल मजुरी करून पोट भरणाऱ्या पालकांच्या स्वप्नांचा मार्गच बंद झाला अन् काही हजारभर नियमित शाळेत जाणाऱ्या चिमुरड्यांना शाळाबाह्य करीत सक्तीची सुट्टी मिळाली.
जो देश जागतिक महासत्ता होण्याची स्वप्ने पाहतोय त्या देशातील भावी पिढी शासकीय कर्मदारीद्र्यामुळे प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार असेल तर असल्या धोरण लकवाग्रस्त सरकारचं डोक ठिकाणावर आहे का? असं विचारण्याची वेळ पुन्हा स्वतंत्र भारतात आली आहे.मोल मजुरी करणारे पालक स्वतःची रोजंदारी बुडवून ४० किमी पार जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी धडकले अन् मुलांच्या समायोजनाचा फोलपणा दाखवला पण त्यांच्या पदरी निराशाच पडली.
शिक्षणासारख्या अत्यावशक ( अभ्यासक्रमाविषयीची अनास्था गृहित न धरता ) क्षेत्रातील व अधिकार कक्षेतील असंवेदनशील गणंगाकडून होणारे अपरिमित नुकसान येणाऱ्या पिढीला अराजकतेच्या गर्तेत ढकलतायत मग आधुनिकता, विकासाचा चेहरा भेसूर अन् विदारकच असण्याची शक्यता नाकरता येत नाही.
परदेशी संस्कृतीचे आकर्षण भारतीयांना नेहमीच खुणावते अन् त्यांच्या न पाहिलेल्या प्रगतीचे व त्याच्या मुळाशी असणाऱ्या विचारधारेशी न जाता वरपांगी कवतिक सोहळ्यात मश्गूल राहण्यात धन्यता मानणारे आपण भ्रमान्ध होण्यातच आनंद शोधणारे असतो हे खरे बोचरे वास्तव आहे.
याला सदोहरण स्पष्ट करण्यासाठी एक गोष्ट सांगावीशी वाटते अन् ती जास्त संयुक्तिक देखिल आहे.जपान मधील होकायडो प्रांतातील कामी-शिराटाकी नावाचे आडबाजूला असणारे रेल्वेस्थानक (A44) आहे ते तेथील कमी प्रवासी संख्येमुळे बंद करण्याचा आर्थिक निर्णय तेथील रेल्वे महामंडळाने २०१५ साली घेतला परंतू काना हाराडा नावाची एक शाळकरी मुलगी त्या स्थानकातून प्रवास करते हे समजल्यावर तीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उदात्त हेतूने तिच्या एकटीसाठी सकाळ-संध्याकाळ दोनवेळा रेल्वेसेवा शैक्षणिक वर्षाकालासाठी २०१६ पर्यंत चालू ठेवण्याचा आर्थिक आतबट्ट्याचा भावनिक अन् त्याही पलीकडे शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारा निर्णय घेतला गेला.यातून केवळ भौतिक प्रगतीच्या चकचकाटा मागे असणाऱ्या शिक्षणासारख्या मुळ विषयाप्रतीच्या संवेदनशील विचारधारेचे केवळ अनुकरण न करता त्यातील धोरणात्मक उत्स्फूर्तता अंगी असणे अधिक गरजेचे आहे.केवळ संख्यात्मक पटकथा मांडून गुणात्मक जबाबदारीचे ओझे डोक्यावरून खांद्यावर नव्हे तर हाताबाहेर करण्याचा घाट घालणे अशोभनीयच नव्हे तर निंदनीय देखील आहे अन् अशा बेजबाबदारांची पटसंख्या जास्त आहे हि खरी शोकांतिका.....