गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

जातीवंत इतिहास...!

               जातीवंत इतिहास...!
           मृतदेह कधी खोटं बोलत नाही अस म्हणतात खरतर मृतदेह बोलणंच नाही तर काहीच करू शकत नाही अगदी खरं-खोटं सुद्धा परंतु इतिहासातील गाडलेले मुडदे (नैतिक आदर ठेवून) मात्र बोलतच नाही तर इतरांना बोलतं करतात त्या पाठीमागे असणारे त्यानां बाहेर काढून जीवंत ठेवणारे बोलवते धनी हे संशोधकांपासून ते लेखकांपर्यंत अन् पुजकांपासून ते राज्यकर्त्यांपर्यंत थोड्या-जास्त प्रमाणात सगळेच असतात असं मला वाटतं.
भौगोलिक इतिहासाला त्या त्या काळातील प्रभावी व्यक्तिमत्व नेहमीच व्यापून टाकतात मग काहींच्या दृष्टीने त्यांना नायकत्व बहाल केले जाते तर विरोधी मत असणारे त्याला खलनायक ठरवून मोकळे होतात.एकाला वाटणारा नायक दुसऱ्याला खलनायक तर उलट दुसऱ्याला वाटणारा खलनायक पहिल्याला नायक भासतो अन् हा विरोधी मतप्रवाह समांतरपणे वर्तमानापर्यंत प्रवास करतो अन् प्रत्येकजण आपापल्या परिप्रेक्षातून पाहत तो कालातीत राहतो हेच खरं.
हे सगळे घडत असताना प्रत्येक घटना अथवा प्रसंग स्थल-काल वाचक असतो अन् हेच तारतम्य हरवून भावनेच्या भरात वाहवत जात प्रतिक्षिप्त क्रिया केली जाते.याच्या मुळाशी असते माणसाची माणसांनी केलेली विभागणी अन् त्या त्या समुहाची धर्म-जात वर्गवारी व त्यातूनच बनलेली पुर्वग्रहदुषित वर्षोंवर्षांची विचारसरणी.आपणच खरे सच्चे अन् लायक हा दुराग्रह दुराचार करण्यासाठी कारणीभूत ठरतो अन् मग जाता जात नाही तो जातीचाच माज.
स्वतःला लेबल लावून मिरवण्यामधे सुरक्षितता शोधणारे स्वतःच्या अंतरंगामधे डोकावण्याचे धाडस दाखवू शकत नाहीत कारण त्यासाठी लागणारा तटस्थपणा, सद्सद् विवेक बुद्धी न झेपणारी असते.
आहे रे व नाही रे दोन्ही वर्गातील आपापल्या एकारलेपण व नाकारलेपण यातूनच निर्माण झालेल्या अपेक्षाभंगाचे दु:ख कवटाळत प्रक्षुब्ध होणे सोपे असते अन् त्याचा राग अशाच सम दु:खी टोळक्याचा भाग बनत असंबधपणे व्यक्त करणे त्याहूनही सोपे असते परंतू असंतोषी भिरकावलेला दगड कुणाला जात धर्म विचारत नाही तो फक्त त्याचं काम चोख करतो.
ज्या देशात अस्थिरतेत स्थिरता शोधणारे नेतृत्व असते तिथे सर्वसमावेशक विचाराला दुय्यम स्थान देत अशांततेचेच राजकारण केले जाते हा जातीवंत इतिहास आहे अन् तो नागरिकशास्त्रावर नेहमीच भारी पडतो.

मुडदे कभी झुठ नही बोलते .... मगर उनको इस्तेमाल करने वाले अपना अपना सच बोलते है।

संदिप महामुनी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा