शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

झुठ बोलेss कौआ काटे......

झुठ बोलेss कौआ काटे......

"झुठ बोलेss कौआ काटे काले कौवेसे डरियो", असं  एक जुनं गाण आहे परंतू खोट बोल पण रेटून बोल असं ब्रीदवाक्य असणाऱ्या सराईत डोम कावळ्यांना कसली आलीये भिती तेव्हा भिती वैगरे पापभिरू सामान्यांना.
खर लक्षात ठेवायला लागत नाही पण खोट लक्षात ठेवावे लागते अस म्हणतात पण आपल्याकडे एखादी खोटी गोष्ट वारंवार व अनेकांकडून बोलली गेली की ती आपोआप खरी होते कारण एरवी सत्यनारायण घालणारे देखिल तीच्या मुळापर्यंत जाऊन सत्यता तपासण्यासाठी अनुत्सुक असतात तसेच बोलणाऱ्यांचे गहू विकले जातात पण न बोलणाऱ्यांचे सोने देखिल विकले जात नाही ही म्हण पक्की ठाऊक असणारे बोल घेवडे हेच लोकप्रिय नेते म्हणून उदयास येतात नंतर भुकेला कोंडा अन् निजेला ला धोंडा असणाऱ्या वर्गाला बोलाची कढी अन् बोलाचाच भात खावा लागतो मग मुडदूस झाल्याप्रमाणे पोट फुगतं मात्र हातापायांच्या काड्या होतात.
जाऊ दे मला काय माझं व्यवस्थित चालयं ना मग कशाला लय डोक्याला ताण द्यायचा अन् काय फरक पडणारे अस म्हणणाऱ्या 'आहे रे' वर्गाला मात्र सेल्फीचं आकर्षण असतं परंतू या स्वमग्नतेकडे झुकलेल्या आत्मकेंद्री वृत्ती भोवताली जे वास्तवाच वलय असते त्याच जेंव्हा वावटळीत रुपांतर होत तेंव्हा मात्र तो खऱ्या अर्थाने एकाकी होतो. माणुस समाजप्रिय प्राणी आहे तेव्हा समाजात चाललेल्या चांगल्या वाईट घटनांचा कळत नकळत त्याच्यावर परिणाम होत असतोच अफवांचे बळी हे त्याचे ताजे उदाहरण एव्हाना संपूर्ण जगावरच याचा दुष्परिणाम जाणवू लागलाय म्हणुनच पहिल्या विश्व युद्धाच्या शताब्दी निमित्त कार्यक्रमात फ्रान्सच्या अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राॅन यांनी केलेले "राष्ट्रवाद हा राष्ट्रप्रेमाच्या अगदी विरोधी अन् विश्वशांतीस प्रतिकूल असतो" हे वक्तव्य फार महत्वाचे आहे.
सौ सुनार की एक लोहार की प्रमाणे शंभर खोट्यांना एक खरं पुरून उरू शकते गरज असते फक्त सद्सद्विवेकबुद्धी जागृत असण्याची. कोर्टात सूद्धा साक्षीदारांच्या वक्तव्याला महत्व असतं चित्रपटात पाहिल्याप्रमाणे धार्मिक पुस्तकावर हात ठेवून शपथ घेणाऱ्याची नैतिकता कोर्टाने गृहीत धरलेली असते मात्र जिथे धर्माचाच राजकीय आखाडा झालाय तिथे नैतिकतेचा बाजार व्हायला कितीसा वेळ लागतो.काळा कोट घालून खऱ्याच खोटं अन् खोट्याच खरं करण्यातच व्यस्त असणारे त्याचेच द्योतक आहे.
 दहा तोंडी रावण सुद्धा कधीही खोटं बोलल्याचा उल्लेख ऐकिवात नाही परंतू एकच खोटं दहा प्रकारे बोलणारे मात्र दिवसाढवळ्या ताठ मानेने फिरतात हे कलयुग आहे इथे सत्यवचनी पुरुषोत्तमाचे रामराज्य अवतरणे दुरापास्तच. परंतू खऱ्या ची दुनिया नाही असा हताश डॉयलॉग मारण्यापेक्षा "सत्य मेव जयते" हाच विश्वास अन् हीच अपेक्षा ठेवत संत तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे "सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिलीये नाही बहुमत" एवढे तरी आपण नक्कीच करु शकतो.

संदिप महामुनी.



गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१८

पुलोत्सव....!

पुलोत्सव...! 



          वस्तू,व्यक्ती,समाज,भूभाग वैगरे याचे विविधांगी निरीक्षण अन् त्याचं खुमासदार नर्म विनोदी परिक्षण करणाऱ्या अलौकिक दृष्टीने भारावून टाकणारे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. वृत्ती.
खटकणाऱ्या गुणधर्मा सहित वेगळेपण विनोदबुद्धीने स्विकारण्याची कला म्हणजे पु ल  प्रवृती.
नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात निराशेच्या ,असमाधानाच्या क्षणांनी वैतागलेल्या  भावनांना हमखास सुसह्य करणारी गुरुकिल्ली असणे म्हणजे पु ल संस्कृती.
अश्या वल्ली व्यक्ति चे स्मरण म्हणजे हास्याची कारंजी,विनोदाची फुलबाजी अन् आनंदाची दिवाळी गरज असते फक्त आपण आनंदयात्री होण्याची.... 

शुभ दीपावली...!

शुभ दीपावली...!