बुधवार, ४ डिसेंबर, २०१९

Live बलात्कार ...


              आजकाल पुन्हा एकदा सामुहिक बलात्कार अन् निर्घृण हत्या याने देश ढवळून निघाला आहे.तसं तर रोजच कुठे ना कुठे अत्याचार घडतच असतात पण एखाद्या घटनेची बातमी सर्व माध्यमे व्यापून टाकतात मग वृत्तवाहिन्यांवर सविस्तर घटनाक्रम दाखवत ढासळलेल्या कायदा व्यवस्थेची चर्चा, निदर्शने, मेणबत्त्या फेऱ्या पुन्हा नविन घटना घडेपर्यंत काही दिवस चालू राहतात.
मला आठवतय साधारण वीस वर्षांपूर्वी गणेश उत्सव साजरा करताना जीवंत देखावा सादर करण्याची प्रथा होती त्यात एका मंडळाने live बलात्कार अशा नावाने देखावा सादर केला होता नेहमी प्रमाणे आकर्षण व उत्सुकता ताणली गेल्याने ते बघायला स्त्री-पुरूषांनी तोबा गर्दी केली होती.पोरकट वयात असल्याने मी पण रीतसर रांगेतून आत गेल्यावर पाहतोय तर मोठ्या काचेच्या बलात कार ठेवली होती अन् सगळे आशाळभूत नजरेने एकमेकांकडे पाहात स्वतःच्या मुर्खपणाला हसत बाहेर पडत होते.त्या प्रसंगाचा तेव्हा काही विचार केला नाही परंतू आज अस वाटतं दाखवणारे व बघणारे अशा दोन्ही घटकांतून बनलेला समाज त्यावेळी अन् आत्ताही बलात्कार या विषयी गांभीर्याने विचार करण्यापेक्षा उत्सुकता अथवा विनोदबुद्धीने घेतो यातच आपली सामाजिक मानसिकता अधोरेखित होते.
अगदी हैद्राबादच्या घटनेनंतरही त्याहून भयंकर घटना घडलीय त्यात चार मद्यधुंद माणसांनी रस्त्यावरच्या भटक्या कुत्रीला पकडून तीचे पाय अन् तोंड बांधून सामुहिक बलात्कार केला व नंतर काठीने बेदम मारहाण केली हा सर्व प्रकार एका रिक्षाचालकाने पाहिला अन् अती झाल्याने आरडाओरडा केला त्यामुळे ते चौघे फरार झाले.अक्षरशः अंगावर काटा आणणाऱ्या या प्रसंगाने मन सुन्न झाले मग या विकृतीला काय म्हणणार कोणती मोजपट्टी घेऊन फरक शोधणार.महाराष्ट्र स्वतः जातीभेदाच्या सामुहिक अत्याचाराचे खैरलांजी ते मराठी आरक्षणाची ठिणगी पेटलेल्या कोपर्डी पर्यंत अनेक प्रसंगाचा साक्षीदार आहे.मात्र बलात्कार प्रवृत्ती थांबलेल्या नाहीत अन् दुर्दैवाने थांबणार देखिल नाहीत.कारण ज्या भौतिक परिस्थितीत मनुष्य वाढतो त्यात पुरषी अहंकार अन् बळाचा वापर करणे तसेच स्त्रीला शोभेची बाहुली व वासना शमवण्यासाठीचे साधन समजणे हेच संस्कार लादले जातात मग चित्रपट असो की जाहिरात आपण मात्र बाई वाड्यावर या अशा थुकरट विनोदावर यथेच्छ हासतो अन् अंगविक्षेप करत नाचतो देखील.
मुलींनी खासकरून शहरातील स्वातंत्र्याचा गैर अर्थ काढत अती आत्मविश्वासाने वावरणे योग्य नाही.अवेळी अन् अनोळखी अथवा जोखमीच्या ठिकाणी योग्यती काळजी घ्यावी.मला नागपूर येथे घडलेला एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो तो म्हणजे एक महिला जी स्वतः कर्नल होती अन् स्वतःच्या नवरा व मूलासोबत प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांची गाडी अडवत नवऱ्याला व मुलाला मारहाण करून तीच्यावर अत्याचार केले नंतर तीने न केलेल्या चुकीसाठी केवळ न्यायालयातच नव्हे तर आप्तस्वकीयांशी देखील लढा द्यायला लागला.यातून समाज मानसिक दृष्ट्या परिपक्व व व्यवस्था आग्रही नाही हेच स्पष्ट होते.
जोपर्यंत बलात्कार होण्याला कारणीभूत घटकांचा तसेच सार्वजनिक मानसिकतेचा सर्वसमावेशक व गांभीर्यपूर्वक विचार केला जात नाही तोपर्यंत बलात्कार live (जीवंत)... च राहणार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा