शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

खऱ्या दुःखाची ओरड.‌‌..!

रडण्याशी संबंधित असली तरी अतिशय हस्यास्पद अशी एक बातमी वाचण्यात आली. उत्तर अमेरिकेतील मेक्सिको या शहरात दरवर्षी १ नोव्हेंबर या दिवशी ' डे ऑफ डेड ' साजरा केला जातो. इथपर्यंत ठीक परंतू या दिवशी तीथे चक्क रडण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात यंदा कोरोना मुळे त्या प्रत्यक्षात न घेता व्हर्च्युली घेण्यात आल्या. दुःखा पेक्षाही दुःखाचे प्रदर्शन व त्याची मांडणी जास्त महत्त्वाची ही मानसिकता लोकांना जवळची वाटते यात खरंतर मनुष्याचे वैचारिक बुरसटलेपण दडलेले आहे.
आपल्या देशात देखील रुदाली सारख्या प्रथा प्रचलित आहेत तथाकथित उच्च वर्गीय लोकांना जाहीरपणे शोक व्यक्त करणे कमी पणाचे व गावंढळ वाटत असल्याकारणाने खास रूदालीच्या माध्यमातून भाड्याने शोक व्यक्त करून सोपस्कार पार पाडला जातो. वर्षोंवर्षे तेच तेच प्रकार घडत गेल्याने तशा भावना दृढ होत गेल्या व यालाच सामाजिक आधार मिळाला.
परंतू वरकरणी व्यक्त होणारं दुःख हेच अधिक प्रभावी हा निष्कर्ष दिखावीगिरीला अधिक बळ देतो अन् खरा आक्रोश मात्र दुर्लक्षित, वंचित राहतो हे वास्तव नाकारता येत नाही. आपमतलबी,धुर्त लोकं अश्या सामाजिक धारणांचा चपखल वापर करून भावनिक लाटेवर स्वार होत संधी साधताना आपण नेहमीच पाहतो पण लगेच दुखावणाऱ्या भावनांचा विचार करून आपण मात्र गप्प राहणं पसंत करतो. आजुबाजुला नुसती रडारड ऐकू येत असताना खऱ्या दुःखाच्या वाट्याला मात्र ओरडच असते.