शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

ना पा रजनीकांता...!

 


              नेहमी स्टाईल सुपरस्टार म्हंटल्यावर समोर येणारा चेहरा म्हणजे शिवाजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत.

हमाल ते बस कंडक्टर अशी कामे करणारा एक तरुण त्याच्या अनोख्या वागण्या बोलण्याच्या पद्धतीमुळे एका चित्रपट दिग्दर्शकाचे लक्ष वेधून घेतो अन् तमिळ चित्रपटात प्रवेश करीत प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत होतो काय, सगळंच स्वप्नवत वाटणारी गोष्ट परंतू स्वप्न विकणाऱ्या या ‌क्षेत्राने रजनीकांत यांच्या रूपाने बनलेल्या दंतकथेने अनेकांना प्रेरणा दिली आहे हे मात्र मनाला भुरळ पाडणारं वास्तव.

त्यांनी केवळ प्रभाव पाडण्यासाठी स्टाईल केली नाही तर सामान्य असो की सुपरस्टार परिस्थिती कोणतीही व कशीही असली तरी ती मनापासून स्वीकारत जगली खरंतर तीचा आस्वाद घेण्याचा स्वभाव हीच त्यांच्या स्टाईलचे रहस्य आहे.

अभिनयामुळे थलायवा असणारे खऱ्या आयुष्यात त्यांच्या सद्वृत्तीमुळे रजनीसर आहेत. एकदा देवदर्शनाला वेशांतर करून जाताना एका महिलेने भिकारी समजून दहा रुपयांची नोट दिली त्यांनी मात्र तो देवाचा आशीर्वाद समजून सांभाळून ठेवली. तसेच एका आंदोलनावेळी संतप्त नागरिकांना शांत करण्यासाठी गेले असता एक युवक रागाच्या आवेशात तुम्ही कोण असं म्हणाला तेव्हा ते म्हणाले *"ना पा रजनीकांता" अर्थात "मी रजनीकांत"* यातुनच दिसणारा नम्र स्वभाव त्यांच्या प्रेमात पाडतो अन् रजनीकांत नावाचं गारूड मनाचा ताबा घेते. अशावेळी मराठी मातीतला शिवाजीराव गायकवाड म्हंटल्यावर एक महाराष्ट्रीयन म्हणून छाती काही इंच आपसूकच फुगते.

७० व्या वाढदिवसानिमित्त रजनीकांत यांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा...!

रविवार, ६ डिसेंबर, २०२०

विश्वशांतीचा क्युआर कोड...!

एका छान बातमीने मन प्रसन्न झाले अन् आशादायी वातावरण देखील निर्माण केले. ती बातमी होती यंदाचा ग्लोबल टीचर पुरस्कार २०२० प्रथमच एका भारतीय अन् खासकरून महाराष्ट्रीयन व्यक्तिला जाहीर झाला. ती व्यक्ती म्हणजे सोलापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजित डिसले. जगातील १२००० स्पर्धकांतून त्यांची निवड करण्यात आली. वार्की फाऊंडेशन ( मुख्यालय लंडन) व युनेस्को यांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप १ मिलीयन अमेरिकी डॉलर भारतीय रुपयात ७ कोटी रुपये आहे.
रणजित सरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्युआर कोड माध्यमांतील पुस्तक तयार करणे तसेच परदेशातील विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन संवाद घडवणे अशाप्रकारचे अभिनव उपक्रम राबविले ते देखील कोणत्याही पुरस्काराचा, प्रसिद्धीचा उद्देश न ठेवता. केवळ शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक दृष्टिकोनाने आधुनिक बदल घडवत लोकल ते ग्लोबल हा टप्पा त्यांनी ओलांडला. विशेष म्हणजे त्यांनी जिंकलेल्या रकमेतील ( स्वतःसाठी खर्च करण्याचा कोणताही विचार न करता ) अर्धी रक्कम शेवटच्या फेरीतील ९ स्पर्धकांमधे त्या त्या देशातील शिक्षण व्यवस्थेसाठी खर्च करण्याच तसेच उरलेली अर्धी रक्कम इनोव्हेटिव्ह लॅब साठी खर्च करण्याचा अतिशय स्तुत्य व परोपकारी निर्णय जाहीर केला. शिक्षण हे सर्व अडथळ्यांसाठी उत्तर शोधण्याचे प्रभावी माध्यम आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देखील  " शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा " हा मुलमंत्र दिला होता परंतू शिका या संदेशाचा सर्वसमावेशक तसेच व्यापक अर्थ घेण्यात आपण कमी पडलो हे मान्यच करावे लागेल.
खरंतर जागतिक महासत्ता होण्याची लालसा अनेक देश किंबहुना हुकुमशाही प्रवृत्तीच्या देशप्रमुखांना आहे परंतू त्यासाठी केवळ व्यापारी किंवा युद्धखोर वृत्ती हेच धोरण अधिक प्रभावी आहे या विचाराला छेद देणारा पर्याय शिक्षण क्षेत्रातील या पुरस्काराने निर्माण केला असं मला तरी वाटतं. शिक्षणाने सर्व सीमा ओलांडून जग खऱ्या अर्थाने जोडले जाऊ शकते अन् हे विश्वची माझे घर ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल. पसायदानाने विश्वशांतीची प्रार्थना करणारे आद्य शिक्षक संत ज्ञानेश्वर यांचे विचार प्रेरणास्थानी ठेवून केलेली वाटचाल नक्कीच फलदायी ठरेल अन् विश्वशांतीचा क्युआर कोड नक्की गवसेल.