एका छान बातमीने मन प्रसन्न झाले अन् आशादायी वातावरण देखील निर्माण केले. ती बातमी होती यंदाचा ग्लोबल टीचर पुरस्कार २०२० प्रथमच एका भारतीय अन् खासकरून महाराष्ट्रीयन व्यक्तिला जाहीर झाला. ती व्यक्ती म्हणजे सोलापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजित डिसले. जगातील १२००० स्पर्धकांतून त्यांची निवड करण्यात आली. वार्की फाऊंडेशन ( मुख्यालय लंडन) व युनेस्को यांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप १ मिलीयन अमेरिकी डॉलर भारतीय रुपयात ७ कोटी रुपये आहे.
रणजित सरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्युआर कोड माध्यमांतील पुस्तक तयार करणे तसेच परदेशातील विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन संवाद घडवणे अशाप्रकारचे अभिनव उपक्रम राबविले ते देखील कोणत्याही पुरस्काराचा, प्रसिद्धीचा उद्देश न ठेवता. केवळ शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक दृष्टिकोनाने आधुनिक बदल घडवत लोकल ते ग्लोबल हा टप्पा त्यांनी ओलांडला. विशेष म्हणजे त्यांनी जिंकलेल्या रकमेतील ( स्वतःसाठी खर्च करण्याचा कोणताही विचार न करता ) अर्धी रक्कम शेवटच्या फेरीतील ९ स्पर्धकांमधे त्या त्या देशातील शिक्षण व्यवस्थेसाठी खर्च करण्याचा तसेच उरलेली अर्धी रक्कम इनोव्हेटिव्ह लॅब साठी खर्च करण्याचा अतिशय स्तुत्य व परोपकारी निर्णय जाहीर केला. शिक्षण हे सर्व अडथळ्यांसाठी उत्तर शोधण्याचे प्रभावी माध्यम आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देखील " शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा " हा मुलमंत्र दिला होता परंतू शिका या संदेशाचा सर्वसमावेशक तसेच व्यापक अर्थ घेण्यात आपण कमी पडलो हे मान्यच करावे लागेल.
खरंतर जागतिक महासत्ता होण्याची लालसा अनेक देश किंबहुना हुकुमशाही प्रवृत्तीच्या देशप्रमुखांना आहे परंतू त्यासाठी केवळ व्यापारी किंवा युद्धखोर वृत्ती हेच धोरण अधिक प्रभावी आहे या विचाराला छेद देणारा पर्याय शिक्षण क्षेत्रातील या पुरस्काराने निर्माण केला असं मला तरी वाटतं. शिक्षणाने सर्व सीमा ओलांडून जग खऱ्या अर्थाने जोडले जाऊ शकते अन् हे विश्वची माझे घर ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल. पसायदानाने विश्वशांतीची प्रार्थना करणारे आद्य शिक्षक संत ज्ञानेश्वर यांचे विचार प्रेरणास्थानी ठेवून केलेली वाटचाल नक्कीच फलदायी ठरेल अन् विश्वशांतीचा क्युआर कोड नक्की गवसेल.
विचार करण्याची उपजत देणगी निसर्गाने थोड्याफार प्रमाणात सर्व प्राणीमात्रांना दिली आहे मात्र ते व्यक्त करण्याचे कौशल्य फक्त मानवालाच लाभले आहे त्यातल्या त्यात संवेदनशील व्यक्तींना अधिक. त्याचा सदुपयोग करण्यासाठी हा लेखनप्रपंच...
रविवार, ६ डिसेंबर, २०२०
विश्वशांतीचा क्युआर कोड...!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा