एका महिलेने सासू सासरे सतत टोमणे मारत असतात यासाठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणी न्यायाधीशांनी हा प्रकार दैनंदिन जीवनाचा भाग आहे तेव्हा यासाठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकत नाही असे मत मांडले.
अर्थातच हे मत बहुतेक सर्व साधारण लोकांना योग्य वाटू शकते परंतु त्याचा जाणिवपूर्वक मागोवा घेतला तर जी व्यक्ती या सततच्या अवहेलनेतून जाते तीला कोणत्या मनस्थितीतून जावे लागते याची संवेदनशीलपणे दखल न घेता केवळ त्या व्यक्तीला गृहित धरणे हे पुरोगामी विचारांच्या गप्पा मारणाऱ्या तथाकथित प्रगतीशील समाजालाही लाज आणणारे आहे. शारीरिक आरोग्य जेवढं आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे हा विचार तो देखील एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात प्रवेश केला असताना आपल्या गावीही नाही. कदाचित न्यायाधिश महाशयांचे बालपण लेक चालली सासरला , माहेरची साडी अश्या चित्रपटांच्या संस्कारात गेले असावे.
खरंतर याप्रकारच्या मानसिक त्रासाला महिलांना अधिक प्रमाणात सामोरे जावे लागत असले तरी लहान मुले, पुरुष यांना देखील याचा सामना करावा लागतो. सततचे टोमणे,अवहेलना यामुळे त्या व्यक्तीचे खच्चीकरण होऊन त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो अथवा त्यातून निर्माण झालेल्या व दबुन राहिलेल्या रागाचे रूपांतर एकतर मानसिक रोगांत किंवा हिंसक गुन्हेगारीत होऊ शकते. नुकतेच राजस्थान मधे एका एकवीस वर्षाच्या तरुणाने त्याच्या दहा वर्षांच्या चुलत भावाचा भर रस्त्यात ब्लेडने गळा कापला विशेष म्हणजे आजुबाजुचे लोक त्या घटनेचा व्हिडिओ बनवण्यात मग्न होते. जेव्हा त्या तरूणाला ताब्यात घेतले तेव्हां त्या कृत्याचा त्याला कोणताही पश्चात्ताप नव्हता. मृत मुलाचे वडिल त्या तरूणाला तुला काही कळत नाही,जमत नाही असं बोलून त्याची सतत खिल्ली उडवत असत शिवाय त्यांनी त्याला शाळेत देखील जाऊ दिले नव्हते या सर्व गोष्टींचा परिणाम त्या तरूणाच्या मनावर झाला आणि त्याचा बदला त्याने त्याच्या मुलाचा खून करून घेतला. ही घटना सततच्या टोमण्याचे पर्यवसन एखाद्या भयंकर गुन्ह्यात होऊ शकते तसेच एखाद्याचे आयुष्य मातीमोल देखील होऊ शकते हेच दर्शवते. तेव्हां सततचे टोमणे हे दैनंदिन जीवनाचा भाग नसून टोमणे मारणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावातील विकृत मानसिकतेचा तो भाग आहे तेव्हा उत्तम व्यक्तिमत्व घडण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्य तसेच राहत्या ठिकाणचं, कामाच्या ठिकाणचं वातावरण हे जेवढं मानसिक आरोग्याला पोषक, प्रेरणादायी तेवढां तो व्यक्ती तो समाज सुदृढ.