खरंतर राजकारण हा सगळ्यांच्या आवडीचा विषय कारण अनोळखी लोकांशी देखील बोलायला सोपा अन् आतल्या गोटातल्या खास बातम्या आपल्याच कानात सांगीतल्याच्या आविर्भावात पोटतिडकीने मत मांडण्याचा विषय तसेच पाठीशी गल्ली ते जग व्हाया दिल्ली असा दांडगा अभ्यास अन् २४×७ बातम्यांचा रतीब तसेच भडीमार याउपर वॉट्स अप विद्यापीठातून सतत होणाऱ्या संदेशवहनाचा प्रवाह यामुळे ज्ञानी कमी अन् माहितगार अधिक झालेला जनसमुदाय.
खरंतर ' जसं राजकारण तसं राजकारणी का जसा राजकारणी तसं राजकारण ' हा संशोधनाचा विषय आहे कारण यासाठी लागणारा मुख्य घटक म्हणजे जनता, तीला विचारतो कोण, तीला केव्हांच गृहित धरले आहे. कारण जनतेला नेमके राजकारण कशासाठी असतं याची कल्पनाच नसते केवळ नेत्यांचा पेहराव, त्यांची छबी , त्यांच्या भोवतालची गर्दी, गाड्यांचा ताफा, त्यांचे आवेशपूर्ण बोलणं असे तथाकथित ब्रॅण्डींगमय नेते याचंच आकर्षण अधिक. सामाजिक मुद्द्यां पेक्षा नक्कल, टर, खिल्ली, शाब्दिक कोट्या किंवा शिवराळ उद्धार, व्यक्तिगत टीका यालाच टाळ्या पिटत शिट्ट्या मारत चेकाळणे यालाच हल्ली भाषण म्हणतात यातून नेमके कुणाचं अन् काय प्रबोधन होतं त्यांनाच ठाऊक ( प्रबोधनकारच घरातल्यांचे प्रबोधन करू शकले नाहीत तिथे इतरांचे काय ) अन् त्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविणारी तसेच ग्राफीक्सच्या माध्यमातून निरर्थक मुद्दे ठळकपणे अधोरेखित करणारी लोकशाहीचे चौथे स्तंभ असणारी प्रसार माध्यमे अर्थात लोकशाही म्हणजे नेमके काय अन् याला चौथा स्तंभ का म्हणतात आणि अन्य तीन स्तंभ कोणते हे बहुतांश लोकांच्या खिजगणतीतही नसेल. अशी माध्यमे जनतेच्या वास्तव प्रश्नांना न भीडता थुकरट लोकांच्या मागे माईक घेऊन धावणारे माध्यमवीर अन् स्टुडिओ तील शब्द बहाद्दर ' यांनी जोरदार प्रहार केला त्यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले , यांनी शाल जोडा मारला त्यांनी टोला लगावला, यांचा ह्यो बाणा त्यांची ती शैली, अमक्या ने इशारा दिला अन् तमक्या ने अल्टीमेटम दिला ' अशाप्रकारे आडमार्गाने लोकांच्या मनात त्यांची छबी बनवत असतात.
या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे राजकारणाचा दर्जा घसरून ते केवळ बालीश मनोरंजन अन् टिव्ही न्यूज चॅनल हे बाष्कळ मनोरंजनाचे माध्यम झाले आहे.
वास्तविक सध्याचे निर्माण झालेले सामाजिक प्रश्न, आर्थिक परिस्थिती राजकीय सत्तेच्या माध्यमातून सोडवणे यासाठी सत्ताधारी पक्ष अन् ते व्यवस्थित सोडविले जातात का हे पाहण्यासाठी तसेच सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्ष अन् या दोन्ही पक्षांकडून दुर्लक्षित, पिचलेला, हतबल, तळागाळात खितपत पडलेल्या घटकांचा आवाज बनण्याची जबाबदारी सर्व प्रसारमाध्यमांची असणे हे लोकशाहीत अपेक्षित असते.
परंतू देशाची क्रयशक्ती असणारी तरूणाई अन् जगात सर्वाधिक तरूणांची संख्या असणारा देश अन् याच्या भरवशावरच जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न दाखवणारी राजकारणी मंडळी अन् स्वप्न बघणाऱ्या तरूणांची अवस्था ही भरवशाच्या म्हशीला टोणगा ठरणारी आहे. कारण ज्या पद्धतीने मोबाईलमय झालेली तरूणांची संख्या अन् क्रीएटिव्हीटीच्या नावाने चाललेला थिल्लरपणा, तरुणींचं अंगप्रदर्शन, लोप पावत चाललेलं सामाजिक भान, शिक्षणाविषयी निर्माण झालेली अनास्था, छानछोकी राहणीमान, खाऊगल्ली तील मांदियाळी, झटपट श्रीमंत होण्यासाठीची धडपड या अन् अशा अनेक सामाजिक समस्या आवासुन उभ्या राहिल्या आहेत. अशा तरूणाईला दिशा देण्याचे काम राजकारणी मंडळींनी करण्याची आवश्यकता असताना कोणत्याही मुलभूत प्रश्नाला हात न घालता केवळ भावनिक व धार्मिक विचार मनावर ठसवण्याचा उद्योग सुरू आहे अन् यातच अधिकाधिक गुंतवून ठेवण्यासाठी व एकांगी, कट्टर विचारसरणी निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमी जल्पकांच्या टोळ्या यासाठी रसद पुरवीत आहेत. वास्तविक कोणत्याही महापुरुषांच्या विषयी तथ्याधारीत पुस्तके व धार्मिक ग्रंथ याचे अपवाद वगळता कसल्याही प्रकारच्या वाचनाची वानवा असताना चित्रपटात दाखवण्यात आलेल्या रोमांचक प्रसंग अन् जोडीला साऊंड अन् व्हीज्युल इफेक्ट्स चा प्रभावामुळे भारावलेला अन् वैचारिक ध्रुवीकरण करणाऱ्या नेत्यांच्या भडकाऊ भाषणबाजीला भूललेल्या तरूणाईला थांबविणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. कोणतेही सण असो किंवा महापुरुषांच्या जयंत्या यांचे निमित्त करून या तरुण तरुणींचे जथ्थेचे जथ्थे रस्त्यावर उतरवून मिरवणुकीच्या नावाखाली अर्वाच्य घोषणाबाजी, तथाकथित नेत्यांचा जयघोष, डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर बेधुंद होऊन थीरकणारी तरूणाईला बघितल्यावर मनात सल निर्माण करणारा विरोधाभासच अधोरेखित होतोय. महापुरुषांच्या वेशभूषेची किंवा केशभूषेची नक्कल करण्यात अभिमान अन् धन्यता मानणारा तरूण वर्ग आणि जोडीला पारंपरिक पद्धतीने साडी, फेटा व गॉगल घालून बुलेट वरून रॅली काढण्यात धर्माभिमान बाळगणाऱ्या तरूणी हे प्रकर्षाने दिसणारे दृश्य वैचारिक दृष्ट्या महापुरुषांच्या खऱ्या चरित्राच्या जवळपास देखिल पोहचतात का हा खरा कळीचा मुद्दा आहे. सद्ध्या केवळ मोहक अन् भपकेबाज सादरीकरणाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे तेव्हा तात्पुरता जोश व्यवहारिक जगात कधी गळून पडतो समजत देखील नाही.
एकाच वेळी अनेक कामे करण्याची ( मल्टीटास्कींग ) कसरत करण्यापेक्षा बहुआयामी व्यक्तिमत्व बनण्याची जबाबदारी सर्व तरूणाईने घेतली पाहिजे. त्यासाठीचा उत्तम वाचनाचा व्यासंग, स्वावलंबन, शिस्त, स्वतंत्र विचार करण्याची सवय ह्या गोष्टींची आवश्यकता आहे. मेंदू गहाण ठेवून केवळ मेंढरा सारखे कुणाच्याही मागे जाणार असू तर आपलं मत अन् पर्यायाने आपलं भविष्य त्यांच्या हातात असणार आहे हे ध्यानात ठेवावे लागेल अन् त्यासाठीच आजच्या तरूणाईने दिशाभूल व दिशाहीन राजकारणा ऐवजी आश्वासक व दिशादर्शक राजकारणाचा आग्रह धरला पाहिजे तरच तरूणांच अन् पर्यायाने देशाचं भवितव्य उज्ज्वल असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा