सध्या भोंगा हा विषय धार्मिक का सामाजिक असा वाद चालू आहे परंतु माझं म्हणाल तर भोंगा हा शब्द सर्वात पहिल्यांदा मी माझ्या लहानपणी माझ्या आईच्या तोंडून ऐकला होता ती त्यावेळी ' भोंगा पसरू नको ' अशी म्हंटली होती. तेव्हा मला लक्षात आलं की विनाकारण मोठ्यानं रडत बसण्याला भोंगा पसरणे असे म्हणतात. अन् म्हणून माझ्यासाठी तसा तो व्यक्तिमत्वाशी संबंधित सार्वजनिक आचरणाचा विषय वाटतो.
हा लहानपणीचा भोंगा एखाद्या व्यक्तीचं लक्ष वेधण्यासाठी होता परंतू हल्लीचा हा तांत्रिक भोंगा एका विशिष्ट व्यक्ती समुहाचे किंवा रस्त्यावरच्या गर्दीचं लक्ष वेधून घेण्यासाठी वापरला जातो. बोलण्याच्या बाबतीत आपला विचार कमी अन् आवाज अधिक तर गाण्याच्या बाबतीत आशय कमी अन् आपली आवड अधिक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी अथवा लादण्यासाठी याचा वापर सर्रास केला जातो. एखादं लग्न असो की धार्मिक सण , महापुरुषांच्या जयंत्या आपापल्या उत्साहाचा बाजार अन् उन्माद मांडण्याचा थिल्लरपणा जास्त अधोरेखित होतोय ( आता भोंग्यांना देखील लाजवेल असे डीजे आलेत ). या भोंग्यांनी मशिद , मंदिर अशा प्रार्थनास्थळांवर स्थान मिळवून आपापल्या भक्तीला सार्वजनिक स्वरूप दिले आहे. वास्तविक तुमची नमाज असो की आरती असो ही व्यक्तिगत न ठेवता ती अधिकाधिक समुहाभिमुख करण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं कारण ईश्वर या संकल्पनेशी एकरूप होण्यासाठी विशिष्ट वेळेची किंवा आवाजाची अथवा समुहाची गरज नसते तर सद्विवेक विचारांच्या अनुसरन्याची आवश्यकता असते.
काही ठिकाणी भोंग्याला कर्णा देखील म्हणतात त्यावरून होणारा आवाज कर्णकर्कशचं अधिक असतो. तो केवळ अमुक एक डेसिबल किंवा तमुक एक डेसिबल असला पाहिजे एवढ्या पुरता मर्यादित न ठेवता, असला पाहिजे की नसला पाहिजे याविषयी ठाम सार्वजनिक नियम ठळकपणे स्पष्ट असले पाहिजेत.
आज मात्र सर्वच राजकारण या विषयाने ढवळून निघाले आहे परंतु केवळ सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही जात, धर्म समुहाचे लांगूलचालन न करता तसेच सार्वजनिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष न करता त्याला प्राधान्यक्रम ठेवून कठोर नियमावली तसेच तेवढ्याच कठोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. सध्या नौटंकी वाचाळवीरांच्या भोंग्याच्या गर्दीत जनता जनार्दनासाठी आत्मचिंतन करायला सायलेंट झोन ची नितांत गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा