आज एक जण महादेवाच्या रूपात भेटला उत्सूकता म्हणुन त्याच्याशी बोललो तेव्हा त्यानी सांगितले तो एक बहुरूपी हाय पोलीस ठाण्यात नोंद हाय, भजन-किर्तन करतु , तबला वाजवतु अन् देवाचे फोटु बी विकतु... एवढे सगळे बायको, पाच मुलं यांचा संसार चालवण्यासाठी चालू आहे पण मी लोककलाकार असून मला सरकार कडून लोककलाकारांसाठी ची पैशाची मदत मिळत नाही त्यासाठी त्यावेळच्या भारताच्या अर्थमंत्र्यांना सुशिलकुमार शिंदे यांना भेटलो पण एवढा अर्थमंत्री असुन काय बी उपयोग झाला नाही ही त्याची खंत अजूनही ताजी आहे. तसं तर बायको, पोरं काय बी नसत तुमचं नाव सुद्धा नावालाच असतयं तुम्ही एकटं येताय अन् जाताय ही त्याची 'एकटा जीव सदाशिव' फिलॉसॉफी कदाचित स्वतःच स्वतःची समजूत काढत जगण्याचं बळ आणत असेल.
त्याला विचारलं पैश्यासाठी रोज अश्याच अवतारात रंगरंगोटी करून फिरता का तर म्हणाला नाय श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी करतो पण पैश्यासाठी नाय तर यातनं जमलेल्या पैशातला स्वत:ला एक रूपया सुद्धा घेत नाही तर गावातल्यांना देवाच्या नावानं जेवायला घालतो. मी विचारलं का तर म्हणाला पोरगं आजारी असताना नवस बोल्लो होतो.
खरंतर आज पंचक्रोशीतील अनेक पालख्या पाचवडेश्वराच्या भेटीला येत होत्या माणसं देवाच्या नावानं चांगभलं करत ढोल ताशा वाजवत जात होते पण खरंतर या पालखी बाहेरच्या देवानं माझं लक्ष वेधून घेतले. देव देवळात नाही तर माणसात शोधावां असं संत गाडगेबाबा नेहमी सांगत असत खरंच देव माणसापेक्षा माणसाच्या दुःखात अधिक सामावलेला असतो . रोजच्या संघर्षासाठी देवाचे फोटो विकता विकता नवसाचं ओझं वाहत प्रत्यक्षात त्याचा अवतार करून त्याच्या अवताराचीच वाट बघत असेल.
कदाचित माणसाला माणसाच्यातल्या देवाचा साक्षात्कार होईल तेव्हा नवसाच्या ओझ्याची अन् देवाच्या अवताराची गरज भासणार नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा