मालेगाव शहरात २००५ मधे उभारण्यात आलेलं शहीद स्मारक राजकीय मतभेदांमुळे उद्घाटनापासुन वंचित होते तसेच अनेक वर्षे झाकलेल्या स्थितीत होते.
काल अचानक एका मनोरुग्णाने चबुतऱ्यावर चढत स्वत:च्या शर्टाने ते साफ करत कागदाच्या पूडीतून आणलेला फुलांचा हार त्याला घातला अन् एक अनोख्या प्रकारे त्याचे उद्घाटन झाले. पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे अन् यामागे काही दुसरा प्रकार आहे का याची चौकशी केली जातेय.
असो एकंदरीतच या घटनेतील लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे तथाकथित सुशिक्षित अन् सुसंस्कृत समाजामध्ये तथाकथित आदर्शवाद दाखवण्याचा जो प्रयत्न म्हणून मग तो पुतळा असो की स्मारक असो त्याच्या उभारणीचा नेहमीच घाट घातला जातो पण त्यामध्ये वैचारिक प्रगल्भते पेक्षा सोपस्काराचा हेतू अधिक ठळक असतो. त्या पूतळ्यातील व्यक्तिच्या विचारांकडे अथवा स्मारकांतून मिळणाऱ्या कृतज्ञता तसेच प्रेरणादायी भावने कडे आपण किती संवेदनशीलपणे पाहतो किंवा किती संवेदनशील असतो हा खरा कळीचा प्रश्न आहे. निरोगी समाज म्हणून गृहित असलेली संवेदनशीलता जर दिसत नसेल जाणवत नसेल अन् दुसरीकडे मात्र समाजाच्या दृष्टीने मानसिक संतुलन हरवलेला एखादा मनोरुग्ण ती संवेदनशीलता जोपासत असेल अन् आपल्या कृतीने ती दाखवत असेल तर नेमकं कुणाचं संतुलन बिघडलयं .
खरंतर सगळ्यांनीच अंतर्मुख होऊन व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून, समाज म्हणून आपण कसे आहोत याचा विचार केला पाहिजे अन् आपापल्या भूमिका योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे तरच अपेक्षित दर्जेदार लोकशाहीसाठी आवश्यक लोकशाहीचा दर्जा उंचावेल अन् ही लोकशाही टिकावी अन् वृद्धिंगत व्हावी यासाठी बलीदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात शहिदांना खऱ्या अर्थाने मानवंदना ठरेल अन्यथा प्रतिकात्मकतेच्या मनोव्यापारासाठी प्रतीकांचा जो खेळ मांडला जातो त्याची अखेर मनोरुग्णाच्या संवेदनशिलतेनेच होईल.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा