अती स्वार्थी, महत्त्वाकांक्षी अन् लालची लोक सोयिस्कर बोलतात सोयिस्कर भुमिका घेतात अन् आपल्याच बदलत्या भुमिकेसाठी तर्कवितर्क लावत या बोटावरची थुंकी त्या बोटावर करतात. अशी लोकं आपल्या तल्लख बुद्धीचा तसेच वक्तृत्व कलेचा वापर भ्रम निर्माण करण्यासाठी करतात अन् केवळ आशाळभूत तसेच मनोरंजन मानसिकतेचा तसेच अल्पमतीधारक वर्ग अशांच्या भुलथापांना बळी पडतो व यांना डोक्यावर घेऊन मिरवतो. सध्याचा काळ हा अशा सर्वपक्षीय गणंगांचा आहे. ज्या शिक्षण व्यवस्थेत प्रश्न पडत नाहीत अन् जीला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत किंबहुना मान्य नसतात तसेच जिथे वस्तूनिष्ठ तर्कसंगत वादविवाद होत नाहीत अशा व्यवस्थेतुन स्वतंत्र व प्रगल्भ विचारधारा निर्माण होणं दुरापास्त आहे. बाबासाहेबांनी शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दलीत वर्गाला दिला असे आपण समजत असलो तरी तो लोकशाहीच्या व्यापक हितासाठी समस्त जनांना लागू आहे. खरंतर बाल बुद्धिला नेमके समजण्यासाठी जरा जास्तच फोड करून सांगावे लागते हे कदाचित बाबासाहेबांकडुन राहुन गेलं असेल कारण शिका म्हणजे नेमकं काय शिकलं पाहिजे अन् त्यासाठी शैक्षणिक धोरण किती पारदर्शक अन् जबाबदार नागरिक घडवणारे असलं पाहिजे हे इथल्या शिक्षणसम्राट धुरिणांना व केवळ सत्तापदाचा टेंभा मिरवणाऱ्या शिक्षणमंत्र्यांना तसेच लांगुलचालना करिता खोगीरभरती केलेल्या एकांगी शिक्षणतज्ञांना कळणं अन् कळलं तरी वळणं हा खरंतर खोटा आशावाद ठरेल अशी वस्तुस्थिती आहे. मग अशा शिक्षण व्यवस्थेतूनच निर्माण झालेले लोकशाहीचे तथाकथित चार स्तंभ हे समानतेच्या तत्त्वाला हरताळ फासणारे असण्याचा धोका संभवतो मग अश्या असमान स्तंभावर अच्छादीत छत कोणाला आसरा देणार. मग वैचारिक गोंधळ उडालेल्यांना कशासाठी संघटित व्हायचं अन् कुणासाठी संघर्ष करायचा कसं समजणार.
ज्याप्रकारचा राजकीय व सामाजिक थिल्लरपणा राजरोसपणे सुरू आहे तो पाहता इथल्या लोकांच्या सहनशीलतेची विश्वविक्रमा साठी नोंद झाली पाहिजे कदाचित स्वमग्नेतेचा अतिरेकच यासाठी कारणीभूत असावा.
बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला हे राजकारणात असणाऱ्यांना अन् उठता बसता नाव घेणाऱ्यांना माहीत असणं स्वाभाविक हवे असो पण त्यांच्या बद्दल तांत्रिक माहिती असण्यापेक्षा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची व विचारधारेची दिशा माहिती असणे अधिक आवश्यक आहे किंबहुना सर्वच संत, महापुरुषांच्या बद्दल जो वाचाळपणा चालू आहे तो याच वरवरच्या उपऱ्या मानसिकतेतून निर्माण होतो आहे अन् यासाठीच तांत्रिक शिक्षणा ऐवजी नैतिक शिक्षण अधिक आवश्यक आहे. केवळ चांगले शैक्षणिक धोरण असणे पुरेसे नाही तर ते सर्वदूर पोहचणे आवश्यक आहे तरच सभ्य, सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाज निर्माण होईल अन् खऱ्या अर्थाने अंधारा कडून प्रकाशाकडे वाटचाल करू अन्यथा उलट प्रवास गोतास काळ ठरेल.