पुन्हा येरे माझ्या मागल्या... खरंच आपल्या लोकप्रतिनिधींकडून किमान लोककल्याणासाठी आवश्यक समाजकारणाची अपेक्षा ठेवायची का हा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय.
छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचे का स्वराज्यरक्षक म्हणायचे , छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राम्हण प्रतिपालक म्हणायचे का कुळवाडी भूषण म्हणायचे या प्रश्नावर जो अखिल राजकीय काथ्याकूट चालू केला आहे हे नेमके काय आहे एका बाजूला भाजपचे धार्मिक ध्रुवीकरण अन् दुसरीकडे धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे धार्मिक उदारीकरण दोन्हीही केवळ पक्षीय फायद्यासाठीचे राजकारणच. खरंतर या आधी सामान्य जनतेने याचा अर्थपुर्ण विचार केला असेल का अन् त्यानुसार त्यांची महापुरुषांकडे बघण्याचा दृष्टीकोन निर्माण झालेला असेल का या बाबत माझ्या मनात तरी शंका आहे. कोणती बिरुदावली वापरली म्हणजे कर्तृत्व संकुचित अथवा व्यापक होते यावर जो काही बौद्धिक वर्ग चालू झालेला आहे व त्यासाठी जे काय तर्कवितर्क लढवले जात आहेत ते दोन्ही बाजूंच्या समर्थकांना योग्य वाटत असणार यात शंका नाही परंतु भाषेचा अन् भाषेत वापरण्यात येणाऱ्या बिरुदावल्या यांचा अभ्यास मुळांत किती व्यापक आहे यासाठी जर संशोधन केले व मराठी भाषेची अवस्था काय आहे अन् ती सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी आवश्यक मराठी शाळांची व त्यातील मास्तरांच्या गुणवत्तेची वस्तुस्थिती काय आहे याचा धांडोळा घेतला तर आपला पोकळ अभिमानच अधोरेखित होईल अन् हे सर्व हिंग्लिश मराठी बोलणाऱ्या अन् वागणाऱ्या तरूणांच्या डोक्यावरून जाण्याचीच शक्यता अधिक.
बिरुदावली व तिचा संकुचित अथवा व्यापकपणा समजण्यासाठी मुळात आवश्यक प्रगल्भता वाढविण्यासाठी हे सभागृहांचे सन्माननीय सदस्य कोणत्या ध्येयधोरणांसाठी आग्रही आहेत. एकीकडे यावर्षी आपण चीनच्या लोकसंख्येचा विक्रम मोडत १४० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचा देश होणार आहोत अन् चीन लोकसंख्येच्या दृष्टीने आक्रसत जाणार आहे असं असूनदेखील लष्करी बजेट आपल्यापेक्षा तिप्पट असणाऱ्या चीनची अतिक्रमणाची भुक वाढत चालली आहे हे आपण गलवान, तवांगच्या निमित्ताने अनुभवतो आहोतच. तसेच पाकिस्तान सारखा टंचाई, महागाई व कर्जबाजारी असणारा देश असे आपली डोकेदुखी वाढवणारे शेजारी शत्रुराष्ट्रे असताना अशा परिस्थीतीत आपल्या देशातील बेरोजगार तरुणांसाठी , हवामान बदलामुळे शेती अन् पर्यायाने शेतकऱ्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांचा दुरदृष्टीने विचार करत ठोस उपाययोजना करणार आहोत का तसेच ह्या खऱ्या आव्हानांसाठी सन्माननीय सदस्य किती सभागृह डोक्यावर घेतात.
खरंतर कुणाला कोणती व किती बिरुदावल्या लावायच्या हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा तसेच बौद्धिक आकलनशक्तीचा भाग आहे एक बिरुदावली वापरा अथवा एकावेळी अनेक बिरुदावल्या वापरा कोणत्याही महापुरुषांचे कर्तृत्व हे केवळ बोलण्याने नव्हे तर कृतीने सिद्ध झाले आहे अन् ते कधीही कोणत्याही संज्ञेने संकुचित अथवा व्यापक ठरणार नाही. मग या महापुरुषांच्या कर्तृत्वाचा कित्ता आपले भाषांतज्ञ लोकप्रतिनिधी गिरवणार आहेत का हा खरा प्रश्न आहे. बिरुदावलीमुळे कर्तृत्वाच्या मर्यादा ठरत नाही तर कर्तृत्वामुळे बिरुदावलीच्या मर्यादा व्यापक होतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा