नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्यात १२ श्रीसेवक उष्माघाताने मृत्यू पावले अन् या कार्यक्रमाला गालबोट लागले अशी बातमी पसरली खरंतर गालबोट लागलं असं म्हणणें साफ चुकीचे असुन कार्यक्रमाची भरदुपारची वेळ,४२° तापमान, सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत एवढा ६ ते ७ तासांचा उन्हाचा तडाखा तसेच २० ते २५ लाख लोकांसाठी लागणारी वैद्यकीय, आपत्कालीन व मंडप व्यवस्था या कशाचाही संवेदनशीलपणे विचार न करता सरकारी तिजोरीतून १४ कोटी रुपये खर्च करून केलेलं ढिसाळ नियोजन, सत्कारमुर्ती व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,मंत्री यांनी आपल्या सोयीनुसार अन् उपस्थित लोकांना गृहित धरत असंवेदनशीलपणे निवडलेली वेळ अन् सगळ्यात महत्वाचे तारतम्याचा अभाव असणारे अंधभक्त या सर्वांनी घेतलेले ते बळी आहेत. हा उष्माघाताचा नव्हे तर आत्मघाताला प्रवृत्त करण्याचा गुन्हा आहे.
राजकीय व्यवस्थेला अनुयायांच्या संख्येत दिसणारा मतांचा आकडा ( दुर्दैवाने याला कुणीही अपवाद नाही ) अन् त्यासाठी सरकारी तिजोरीतून खर्च करत परस्पर फायदा करून घेण्यासाठीची हाव सामान्य माणसाच्या जीवावर बेतू शकते याची पर्वा आहे का?
तसेच स्वत:ला प्रबोधनकार, निरुपणकार, समाजसेवक समजणाऱ्या व्यक्तींना ज्या माणसांमुळे समाज घडतो त्या शेवटच्या एका घटकाला देखील माझ्यामुळे कसलाही त्रास होता कामा नये याची खरंच पर्वा आहे. का केवळ फॉलोअर, सबस्क्राईब,लाईक अन् शेअर करत घंटा बडवणाऱ्या संस्कृतीचे पाईक होण्यातच समाधान आहे.
सरतेशेवटी परिस्थितीमुळे रंजलेल्या, गांजलेल्या तसेच हतबल झालेल्या सामान्य माणसाला आधाराची तसेच एका आशेच्या किरणाची गरज असते पण गरजवंताला अक्कल नसल्याने योग्य तो बोध अन् प्रेरणा न घेता पायावर लोटांगण घालत एखाद्या व्यक्तीला देवाऱ्ह्यात बसवून श्रीसेवक भक्तगण होण्यातच धन्यता अन् दर्शनाची ओढच अधिक असेल तर मग अशांना स्वत:ची तरी पर्वा असते का?
महाराष्ट्राला थोर संत, प्रबोधनकार, महापुरुषांची परंपरा लाभली आहे संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांपासून संत गाडगेबाबां पर्यंत तसेच शिवाजी महाराजांपासून बाबासाहेब आंबेडकरां पर्यंत अनेक भुषणावह व्यक्तींची मांदियाळी महाराष्ट्राने अनुभवलेली आहे परंतु ती कितपत रूजलेली आहे हा दुर्दैवी प्रश्न आहे.
२५ लाखांची पुरस्कार रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचं औदार्य औट घटकेचं ठरावं अन् त्याच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृत श्रीसेवकांसाठी ६० लाख रुपये द्यावे लागावे हे बेपर्वाई चेच लक्षण आहे.
अंधभक्तांच्या शक्तिप्रदर्शनाने मनोमन सुखावणारे , पुरस्कारचे सोपस्कार करत दिल्लीच्या हुजुरांना राजकीय वातावरण कसं आपल्या बाजूने आहे हे दाखवण्यासाठीची चमचेगिरी करणारे कुठल्याही घटनेच्या मुळाशी न जाता त्यात असलेल्या फायद्याची पर्वा अधिक करतात अशी आपमतलबी सोपस्कार अन् बेफिकीर वृत्ती असणारेच खऱ्या अर्थाने बेपर्वा भुषण आहेत ही महाराष्ट्राची सांस्कृतिक शोकांतिका आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा