रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

सुप्त अन् सुस्त... महाराष्ट्र...!


महाराष्ट्र हा थंड गोळा का व कशामुळे झाला या मूलभूत प्रश्नाला जोपर्यंत आपण धोरणात्मक दृष्ट्या हात घालत नाही तोपर्यंत असे प्रासंगिक उफाळून येण्याला काहीही ठोस भविष्य नाही मराठी अस्मिता ही केवळ बोलाची कढी आणि बोलाचा भात असणार आहे.

ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा अन् त्यात हुतात्मा झालेल्या १०७ जणांचा केवळ उल्लेख करून काय उपयोग आजच्या पिढीलाच नव्हे तर आधीच्या पिढीलाही किंबहुना मराठी च्या नावाने गळा काढणाऱ्या व स्वतःच एकमेव कैवारी असल्याचा गर्व बाळगणाऱ्या राजकीय पक्षांना देखील त्या १०७ जणा पैकी एकाचेही नाव सांगता येणार नाही हे कटू सत्य आहे अन् ही खरी शोकांतिका आहे कारण आपल्याला आपलाच गौरवशाली इतिहास, भुगोल त्या आत्मियतेने अन् तन्मयतेने शिकवला नाही मग आत्ता पर्यंत झालेल्या शिक्षणमंत्र्यानी शालेय अभ्यासक्रमा पासून शैक्षणिक धोरणा पर्यंत कोणता मराठी अस्मितेचा आग्रह दाखवला त्या उलट शिक्षकांना शिकवणं सोडून सरकारी कामासाठी बिन पगारी हक्काचे वेठबिगारी कामगार करण्यात धन्यता मानली. शाळेतला पट सोडा शाळेच्याच पटांचे तीन तेरा वाजवणारे शासकीय धोरण. मग कोणती तरी दारू ची कंपनी शाळा दत्तक घेण्याचे सोशल वर्क करणार अन् तिथले पुढारी त्याच शाळेच्या पटांगणावर थिल्लर गाण्यावर उडत्या बायका नाचवणार मग कसा घडणार मराठी माणूस अन् कसा बाळगणार मराठीचा अभिमान.

दुकानाच्या पाट्या मराठीत असण्यासाठी सक्ती करावी लागते हीच खरी शरमेची बाब ते देखील संयुक्त महाराष्ट्र होऊन तब्बल ६३ वर्षे उलटून गेलीत. खरंतर मराठी पाट्या असल्याचं पाहिजेत याबाबत दूमतच नाही पण ज्या दुकानांवर मराठी पाटी असण्याचा आग्रह धरतो ती दुकाने , उद्योग मराठी माणसाचीच असावी यासाठी सरकारी धोरणं किती राबवली. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत असताना मराठीचे ढाणे वाघ करोडोंच्या मिल स्वतःच्या घशात घालत शैली, खळssखट्याक पुरते मर्यादित होते मराठी माणूस उद्यमशिल होण्यासाठी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन कोणत्या अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना राबवल्या. मुंबई जर देशाची आर्थिक राजधानी असेल तर सगळ्या गोष्टी तिथल्या अर्थकारणावरच अवलंबून असणार जर मराठी माणसाला घरांचे दर परवडले नाही तर तो बाहेरच फेकला जाणार मग त्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवलं तरच मुंबई मराठी माणसाची राहिल हे वास्तव नाकारता येणार नाही. मुंबई राजधानीचे शहर नसताना देखील १८५३ मधे बोरीबंदर ते ठाणे भारतातील पहिली रेल्वेगाडी ज्यांच्या प्रभावाने व पुढाकाराने धावली ते जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे उर्फ नाना शंकरशेठ होते त्यांनीच त्यांचे मित्र जमशेटजी जिजीभाय यांच्या सोबत इंडियन रेल्वे असोशिअनची स्थापना केली. त्या काळात जीआयपी रेल्वे या संस्थेच्या सदस्यांमध्ये हे दोघेच भारतीय (मराठी) होते. नाना शंकरशेठ यांनी केवळ या क्षेत्रातच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रात पश्चिम भारतातील पहिली शिक्षण संस्था बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून योगदान दिले तसेच बॉम्बे म्युनिसिपल ऍक्ट बनविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली अन् त्या कायद्यान्वये मुंबई महापालिकेची स्थापना झाली. याबरोबरच जे जे स्कुल ऑफ आर्ट , जे जे हॉस्पिटल यांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. अशा या आधुनिक मुंबईचे महारथी असणाऱ्या नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला देण्याचा प्रस्ताव २०२० साली मांडला अन् तो अजून प्रलंबितच आहे ही आपली मराठी अस्मिता. नाना शंकरशेठ हे पैशाने मोठे होतेच पण काहीतरी भव्यदिव्य करण्याची दुरदृष्टी अन् उर्मी त्यांच्या कडे होती. नाना शंकरशेठ असो की भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके असो छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक गुणसूत्र (डीएनए) त्यांच्यात होते आत्ताच्या उठता बसता शिवाजी महाराजांचा कृती शुन्य जयघोषाने झाकोळलेला समाज अन् आधुनिक सरंजामदार नव्हते.

मुंबईत घर देता का घर चा सुर आळवताना आपल्या नाका खालून मुंबईतील अनेक संस्था , प्रकल्प गुजरात मध्ये नेले अन् आपल्या पेक्षा गुजरातला फायदेशीर बुलेट ट्रेनचा खर्च महाराष्ट्राच्या बोकांडी मारला तेव्हा सर्व पक्षीय मराठी नेत्यांनी एकत्र येऊन कसला खमकेपणा दाखवला.

खरंतर दोन चार जणांना कानफटात देऊन काय साध्य होणार फार फार तर त्यांनी तोंडदेखली माफी मागितल्याचे खोटं समाधान मिळेल पण खरा पगडा अन् ओळख मिळण्यासाठी कर्तृत्ववानच असले पाहिजे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने अखंड प्रेरणास्रोत आपल्याला सुदैवाने लाभले आहेच गरज आहे ती मराठीबाना खऱ्या अर्थाने दाखवण्याची अन् सुप्त अन् सुस्त पडलेल्या थंड गोळ्याला विचारांची व कृतीची धग देण्याची.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा