गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

स्विकृतीच्या हिंदोळ्यावर अस्तित्त्वाची लढाई...!

 


कराड येथील शिवाजी हौसिंग सोसायटीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या ९ व्या वर्धापनदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात आज शिवाणी गजबर या तृतीय पंथीय व्यक्तीची मुलाखत ऐकली अन् खरंच एका दुर्लक्षित घटक म्हणण्या पेक्षा समाजाकडून हेटाळणीचा असणाऱ्या विषयावर मनोगत ऐकण्याचा योग आला.
खरंतर सामान्य माणसाला अन्न, वस्त्र, आणि निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी लागणाऱ्या कष्टाची आपण नेहमी चर्चा करतो परंतु तृतियपंथींना याच गोष्टींसाठी करावा लागणारा संघर्ष खुपचं वेदनादायी आहे कारण तृतीयपंथी आहे हे स्वतः तसेच घरच्यांनी स्वीकारणे जेवढं कठीण आहे त्यापेक्षा कैक पटीने समाजानं त्यांना व्यक्ती म्हणून स्वीकारणे अवघड आहे. अन् जिथे समाज तुम्हाला स्वीकारत नाही तिथे उपजिविकेची साधनं उपलब्ध होणे दुरापास्त आहे मग भाळी समाजाने लादलेली टाळी अन् पायी भीकेची वणवण अपरिहार्य आहे. जिथे स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पोषक वातावरण नसते तिथे भिकेचे दुरित अटळ असते मग अशा दुरितांचे तिमिर जावो असे पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांनी प्रबोधन करून देखील समाज आर्थिक अन् पर्यायाने मानसिक कुचंबणाच अधिक देणार असेल तर असा समाज किती पुढारलेला आहे हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे.
संविधानाचा आधार असून देखील शिक्षण असो की व्यक्ती म्हणून न्याय्य हक्क सगळ्या गोष्टी सहजपणे उपलब्ध करून घेणं एक खडतर प्रवास आहे त्यातील प्रत्येक टप्प्यावर एका संघर्षाचा शेवट अन् नवीन संघर्षाची सुरुवात असते एकंदरीतच मुलाखती चा केंद्रबिंदू हा सामाजिक अस्विकार हाच आहे. हा सामाजिक अस्विकार केवळ संवेदनशीलता आणि वैचारिक प्रबोधन यातूनच दूर होऊ शकतो अन् या दिशेने वाटचाल करताना अशा तृतीयपंथी व्यक्तींना समाजासमोर व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणे आवश्यक आहे अन् त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या कार्यकारिणी ने ती संधी उपलब्ध करून देत स्तुत्य उपक्रम राबवत आशेचा एक दीप प्रज्वलित केला त्याचा प्रकाश अस्विकृतीचा अंधार नक्कीच कमी करेल अन् स्विकृतीच्या हिंदोळ्यावर अवलंबून तृतीयपंथींची चाललेली अस्तित्त्वाची लढाई लवकरच संपेल ही सदिच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा