रविवार, २६ मे, २०२४

क्षमा विरस्य भुषणम् ...!

 



आज अचानक व्यवसायिक संबंधांतून मित्र झालेल्या इरफान चा फोन आला अन् काही विचारायच्या आधीच तो तिकडून म्हणाला उद्या मी हजला चाललोय माझं काय चुकलं असेल तर माफ कर अन् त्यांनी फोन ठेवला.

खरंतर मी काही वेळ स्तब्ध झालो नंतर मनात विचार आला की, ठरवलं तर आयुष्य किती सरळ अन् सोपं आहे. तिर्थक्षेत्री देवाला भेटण्यासाठी जाताना का असेना माफी मागण्याची पद्धत अथवा प्रथा किती शिकवणं देणारी आहे. देवाला भेटायला जाताना मन, चित्त शुद्ध असणे हेच देवाला अपेक्षित आहे. कुणाचेही कळत नकळतपणे मन दुखावण्याने त्यांच्या मनात आपल्या विषयी असणाऱ्या रागाचा किंवा आपल्याला कुणाविषयीही असणाऱ्या राग, द्वेष या भावनांचा केवळ माफी मागण्याने एका क्षणात निचरा होतो अन् मनावरचं अनामिक ओझं दूर होऊन मन हलकं होतं.

वारकरी संप्रदायात वयाचा मानाचा विचार न करता एकमेकांच्या पाया पडणं असो की दरवर्षी संवत्सरी रोजी, पर्युषण सणाच्या आठव्या आणि शेवटच्या दिवशी, जैन एकमेकांना “मिछामि दुक्कडम्” अर्थात मी तुमची मनापासून क्षमा मागतो असे म्हणणे असो की गौतम बुद्धांनी दिलेला क्षमाशील होण्याचा उपदेश आपल्याला खऱ्याअर्थाने आंतरीक शांततेकडे घेऊन जातो.

तुझ्या वाचून करमेना या मराठी चित्रपटातील "भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर..." हे गाणं सुद्धा आपल्याला क्षमा करून आपल्याच माणसांत रमायला शिकवते.

एकंदरीतच माफी मागणं व माफ करणं हेच खरं माणूस असल्याचे लक्षण आहे.

यानिमित्ताने मी देखील कळत नकळतपणे कुणाचेही मन दुखावले असेल तर मनापासून क्षमा मागतो.