यावर्षीच्या सुरवातीलाच ऑटो एक्स्पो मध्ये टाटा सियारा चे जुने व नवे अशी दोन्ही मॉडेल ठेवली होती आता 25 नोव्हेंबर 2025 ला नवीन सियारा लाँच होत आहे त्याचीच जाहिरात आज मी बघितली अन् त्यात वापरलेली जी जुनी सियारा आहे ती माझी आहे ह्या गोष्टीचा मला मनोमन अभिमान वाटला. खरंतर सर रतन टाटा यांच्या इच्छे खातर टाटा मोटर्स त्यांची भारतातील पहिली एस यू व्ही सियारा पुन्हा एकदा बाजारात आणत होते त्यासाठी ते चांगल्या स्थितीत असलेल्या जुन्या टाटा सियाराच्या शोधात होते आणि फेसबुकवर त्यांनी माझ्या टाटा सियाराचे फोटो पाहिले व माझ्याशी संपर्क साधला. खरंतर ती देण्याच्या आठच महिन्या पूर्वी मी तिच्या रंगरंगोटी,फ्लोरिंग,टायर वगैरे यासाठी जवळ जवळ दीड लाख रुपये खर्च केले होते त्यामुळे ती विकावी असा काही प्रश्नच नव्हता. परंतू टाटा मोटर्स चे काही अधिकारी गाडी बघण्यासाठी कराड येथे आले अन् त्यांना पहिल्याच भेटीत माझी सियारा एकदम पसंत पडली अन् तुम्ही ही सियारा टाटा मोटर्सला द्याल का एका प्रोजेक्ट साठी आम्हाला ती हवीय अशी विचारणा केली. ते ऐकून खरंतर माझ्या मनात आनंद व अस्वस्थता अशा संमिश्र भावना निर्माण झाल्या. मी त्यांना नंतर सांगतो असे सांगितले.
त्यानंतर घरी या विषयांवर चर्चा झाली एका बाजूला पॅशन अन् दुसऱ्या बाजूला टाटा मोटर्सचा महत्वाकांक्षी प्रकल्प मग सरतेशेवटी सर रतन टाटा यांच्या विषयी असलेल्या प्रेम,आदर,सन्मान या भावना जास्त प्रभावी ठरल्या अन् मग माझी सियारा त्यांना देण्याचा निर्णय घेतला.
स्वतः सर रतन टाटा असते तर त्यांनी या गोष्टीची सहृदयतेने दखल घेतली असती याबद्दल मला विश्वासच नव्हे तर खात्री आहे कारण एखादी वस्तू असो की विचार त्यामध्ये एक भावनिक खोली किंवा ज्याला प्रेमातून निर्माण झालेला वेडेपणा (बहुतांश लोकांच्या दृष्टीने अव्यवहारिक निर्णय)असावा लागतो तो त्यांच्या ठायी होता.अशीच सियारासाठी वेडेपणा असणारी बरीच मंडळी माझ्या पाहण्यात आहेत मी सुद्धा अशा सियारा प्रेमवेड्यांच्या व्हॉट्स अप ग्रूप (पुणे सियारा, क्लब सियारा पॅन इंडिया ग्रूप)मधे होतो तेंव्हा उत्कट प्रेम आणि जिवापाड जतन करणे काय असते हे मी जवळून अनुभवलय. तेव्हां सर रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट लक्षात घेता सियारा स्वतः घेऊन टाटा मोटर्स पुणे येथील गेट वर जमा केली अन् ती पुण्याला नेण्यापूर्वी एक सुंदर आठवण म्हणून तिच्या सोबत प्रोफेशनल फोटोशूट सुद्धा केला.
असो एक स्वप्न सत्यात उतरतंय अन् आपल्या सारख्या पामरा कडून त्यासाठी खारीचा वाटा देण्याचं भाग्य लाभले हे ही नसे थोडके. खरंतर माझ्या पुरते बोलायचं झालं तर सर रतन टाटा यांना ती माझ्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली च आहे अन् दुसरं म्हणजे जिथून ती सियारा जन्माला आली तिथेच ती परत गेली अन् एक वर्तुळ पूर्ण झालं व या सर्व गोष्टींसाठी मी माध्यम झालो हेच माझं भाग्य आहे.
संदीप महामुनी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा