शनिवार, १४ जानेवारी, २०१७

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

               
                   सुर्याचा मकर राशीत प्रवेश(संक्रमण) होत त्याचे उत्तरायण सुरू होते अन् यालाच आपण मकरसंक्रांत म्हणत ती साजरी करतो.थोडक्यात काय एका टप्प्याकडून दुसऱ्या टप्प्याकडे प्रवास करताना आधी काय वाईट घडलं असेल तर ते सोडून या निमित्ताने चांगली सुरवात करायला स्वतःला व दुसऱ्याला संधी देणे इतकचं अन् ती गोड असेल तर तिळात गुळ...
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

रविवार, १ जानेवारी, २०१७

मनमौजी जगायचे....!

                     
                        मनमौजी जगायचे....!

                     आज नेहमीप्रमाणे चहा पित बसलो होतो, सौ जेवण बनवण्यात व्यस्त होत्या अन् आमचे लाडके चिरंजीव राजवर्धन टिव्ही पाहण्यात गुंग होते अर्थात कार्टूनच चालू होते माझ्या मते आकार उच्चार बदलले तरी कार्टून्स गैर नाहीत कारण आपल्या लहानपणी सुद्धा ते आपल्याला खुणावत होतेच पण मोठेपण येता येता वास्तवात त्या प्रतिमा धुसर होत गेल्या इतकचं.या वास्तवाचे अचुक भान असणाऱ्या तमाम आयांचे प्रतिनिधित्व करत आमच्या अर्धांगिनी स्वयंपाकघरातूनच गरजल्या "अरे काय करतोयस गा** स्कॉलरशिपला बसलायस लक्षात आहे का विसरलास..." मग नेहमीची ठरलेली उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक वाटणारी काय करावे काय करू नये या सदरात मोडणारी सु भाषीतील घोकंपट्टी करून माझ्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी कटाक्ष टाकत अहो बघतायना काही तरी सांगा त्याला अशी सुचना वजा आदेश दिला मी पण वडिलकीचे कर्तव्यरूपी सोपस्कार पार पाडणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत अरे काय करायचय,अवघड आहे पुढे म्हणत काही आदर्श तथाकथित यशस्वी लोकांची ऐकून ऐकून गुळगूळीत झालेली उदाहरण देत छातीत भरलेली हवा मोकळी केली.तुला नेमके काय करायचेय ह्या उत्तराची अपेक्षा न ठेवता विचारलेल्या प्रश्नाने ठरलेला शेवट करावा हा प्रघात पाळत चहाचा घुटका घेतला अन् चिरंजीवाच्या आकस्मिक उत्तराने एकदम ठसकाच लागला.उत्तरच तसे होते " मनमौजी जगायचे".१२ वर्षीय मुलाचे उद्गार ऐकून मी अन् सौ दोघेही स्तब्ध होऊन त्याचाकडे पाहत राहिलो.थोड्याश्या अंतरालाने मला त्याच्या उस्फूर्त व मनस्वी उत्तराने समाधान वाटले कारण आपल्यातील प्रत्येकालाच असे जगायची सुप्त महत्वाकांक्षा असते अन् ती कधीतरी नक्कीच पुर्ण होईल या आशेवर आपण आपल्या आयुष्याचा सारीपाट मांडत असतो.
                   खरतर मनमौजी जगणे म्हणजे मनाला वाटेल तसे बंधन नसलेले स्वैर असे आपणास वाटते पण प्रत्यक्षात कुठल्याही कामात मन रमणे नाहीतर रमवणे म्हणजे मनमौजी कारण स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचे भान अन् मनाला शिस्त असेल तसेच कल्पना व वास्तव यातील तफावत ओळखून ती स्विकारण्याची मानसिकता असेल तरच आपण कोणतेही काम आनंदाने करू शकू व तीच त्यातील मौज आहे.मनमौजीपन हे काय साध्य नव्हे तर तो आयुष्याकडे पाहण्याचा व जगण्याचा दृष्टिकोन होय.आपण एक स्वतंत्र व्यक्ती असलो तरी या निसर्गाचा व समाजाचा घटक आहोत तसेच त्याचे नियंत्रण एकतर्फी नाही हे विसरून चालणार नाही.असो राजवर्धनच्या उत्तराने पुन्हा एकदा उजळणी झाली अन् हो आजपासून नव्या वर्षात २०१७ मधे पदार्पण करीत आहोतच तेव्हा त्याला तो मनमौजी दृष्टिकोन लाभो ही सदिच्छा व्यक्त करीत आपणही मनमौजीपणे जगुया त्यासाठी तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा...!

संदिप महामुनी
९६३७१३०२०६

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

बिन पैशाचा तमाशा......!

          
                          बिन पैशाचा तमाशा......!
             अर्थ निश्चलीकरणाच्या निर्णयाने देश चांगलाच ढवळून निघाला अन् आठवड्याभरात जुने ५००/१००० रूपयाचे चलन जमा करण्यासाठीची मुदत देखिल संपेल तेव्हा निणर्याला ५० दिवस पुर्ण झाल्या प्रित्यर्थ त्याचा नेमक्या रद्द झालेल्या अन् जमा झालेल्या चलनाच्या आकडेवारीचा तसेच काळ्या पैशाचा सरकारी हिशोबासहित सरकारी निर्णयाचा लेखाजोखा यथावकाश सुवर्णक्षणी यथार्थपणे मांडला जाईल आपण त्याचे नेहमीप्रमाणे मुक साक्षीदार होऊचं.
             या निर्णयानंतर तब्बल १२५ वेळा नियम बदलले त्यामुळे सामान्य जनते बरोबरच सरकार सुद्धा संभ्रमित होते तेव्हा अर्थशास्त्र हा विषय बहुतांशी पर्यायी असल्याने त्याच्या दुर्बोधते बद्दल वावडे असणे क्रमप्राप्तच आले तेव्हा डोक्याला जास्त ताण न देता आलिया भोगासी असावे सादर हा संस्कार गिरवणे उत्तम म्हणत देशभक्तीच्या वीररसाने स्वतःची करमणूक करावी एवढाच पर्याय आपल्या कडे उरतो.या निर्णयाने सोशल मीडिया वरील दोन्ही कडच्या प्रतिभाशाली वर्गाला संधी मिळाली अन् त्यांनी त्याचे सोने केले (आनंदाची बाब म्हणजे या सोन्यावर मात्र कोणताही कर अथवा कोणाची नजर नाही असो) काहींनी हे सोने मनमोहनी पद्धतीने येथेच्छ लुटले मग व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला म्हणून काही फरक पडत नाही.तसही व्यवस्थेने लोकांना गृहित धरलेले असते अन् सरकारने व्यवस्थेला.
            या सगळ्या घडामोडीमधे अनेक मनोरंजक अन् आपल्या सारख्या पामरांना अचंभित करणाऱ्या घटना घडल्या.एकिकडे स्वतःच्या २०००रूपयांसाठी ३-४ तास रांगेत उभारून देशप्रेम व्यक्त करणारे तसेच स्वत:चे पांढरे केस काळे करायला सुद्धा वैतागणारे आपण अन् दुसरीकडे बिनदिक्कत १००/२०० कोटी काळ्याचे चुटकीसरशी पांढरे करणारे,१०-१० कोटी नविन चलनात लॉकर मधे ठेवणारे तसेच तिजोरीच्या चाव्या कनवटीला बांधून जमादारकीचा सौदा करणारे आधुनिक मनसबदार पाहिले की काही लोकं जास्तच समान असतात हे उमगते.एका बहाद्दराने वर्तमानपत्रात जुन्या नोटा बदलून देण्याची रीतसर जहिरातच दिली अन् ती वर्तमानपत्राने बिनदिक्कत छापली देखील ! त्याला वाटलं छोटी जहिरात असल्यामुळे नेहमीप्रमाणे जो गरजवंत असेल तोच बघेल नाहीतरी मसाज, लैगिंक समस्या निवारण,ज्योतिष सल्ला अश्या जहिरातींशी थोडाच संपादकाचा अथवा सरकारी खात्याचा दुरान्वये संबध असतो या त्याच्या प्रामाणिक भाबड्या आशावादाला सलामच ठोकला पाहिजे.
            ८ नोहेंबरनंतर बँके व्यतिरिक्त रद्दी झालेल्या नोटा राजकीय पक्षात देणगीरूपी गुंतवणूक करण्याची मुभा मिळाल्यामुळे किमानपक्षी काही ठेकेदाराचं तरी कोटकल्याण झाले तसेच २०००० रूपयापर्यंतचा व्यवहार गुप्त ठेवण्याचा व त्या पटीतच व्यवहार करण्याची मुभा असल्याने शिवाय जनता जर्नाधनाच्या सेवेचे पवित्र कार्य करण्याचे व्रत घेतले असल्याकारणाने अन्य कशाही प्रकारचे देशप्रेम व्यक्त करण्याची आवश्यकता नसल्याने त्यांना करमुक्त केलेले आहेच तेव्हा असा महत्वपूर्ण निर्णय सर्व पक्षांच्या पथ्यावर पडला त्यामुळे सर्वांनी आळी मिळी गुपचिळीचे धोरण कोणताच आक्रोश न करता स्विकारलेले आहे.
            काळा पैसा संपवणे,नकली नोटांचे उच्चाटन,आतंकवादाची आर्थिक रसद तोडणे हा व्यापक उद्देश ठेवून घेतलेला निर्णय किती सफल ठरला ते येणारा काळ ठरवेलच परंतू कँशलेसच्या चकचकीत रँपरमधे तो सादर करून जर भूल पाडली जात असेल तर घडलेेला या बिन पैशाचा तमाशामुळे झालेले तथाकथित मनोरंजन नसून अंगावर येणारे बोचरे वास्तव असेल.कुठलाही भुकंप न होता काहीतरी चांगले घडो या आशावादावर वाट पाहत आहोतच.

संदिप महामुनी
९६३७१३०२०६

सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

NOSTALGIC MIND

My son knocked my inner child to enter into #thedreamworld....

केल्याने देशप्रेम...!

सुप्रीमकोर्टाने थिएटर्सना राष्ट्रगीत सक्तीचे केले एकून वाईट वाटलं हो  खरच वाईटच वाटलं
.
.
.
.
.
.
कारण जी गोष्ट उस्फुर्त असायला हवी त्याची सक्ती करावी लागणे हे आपल्या देशप्रेमाचे बोचरे वास्तव असून आपल्याला आपल्या जडणघडणा विषयी आत्मपरीक्षण करावेच लागेल अन्यथा प्रेरणादायक भावनेपेक्षा शिस्तीच्या नियमातील तांत्रिकतेतच समाधान शोधत राहू..!
#जयहिन्द!
Nationalism is infantile disease.It is measles of mankind-Albert Einstein

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६

अर्थ निश्चलाच्या मनी....!

                        अर्थ निश्चलाच्या मनी....!

             अचानक निघालेल्या सत्ताधारी फतव्याने मानवीय व्यवहार स्वातंत्र्य किती क्षणभंगुर अन् तकलादू असू शकते तसेच क्षणात होत्या चे नव्हते अन् अर्थाचा कसा अनर्थ ओढावतो ते नुकत्याच सरकारने घेतलेल्या ५००/१००० च्या नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनांना अनुभवावा लागत आहे.
            गैरव्यवहार,काळा पैशावर अंकुश,सुरक्षितता किंवा तत्सम अपरीहार्यता, धाडसी अथवा आतबट्ट्याचा निर्णय या चुक की बरोबर वादाला माझ्या मते काहीही मोल नाही कारण बहुतांश मानसिकतेनुसार जबाबदारीच घोंगडं दुसऱ्याच्या गळ्यात टाकून स्वैर जगण्याला प्राधान्य देणाऱ्यांना त्याच घोंगडयांवर बसणाऱ्याचे किर्तन ऐकावे लागणार मग सोयीस्कर हितासाठी लोकशाहीच्या नावाने गळे काढून काय उपयोग? एखाद्या कागदाला असलेले मोल दुसऱ्या क्षणी मातीमोल होत असेल तर या जास्तीत जास्त संग्रह करून स्वतःचे मोल वाढवण्यासाठी धडपडणाऱ्या वृत्तीला ती एक चपराकच आहे. प्रत्येक श्वासानंतर येणाऱ्या श्वासाची जिथे अनिश्चितता असते तिथे भ्रमात वावरणारे व त्यातच रमणारे आपण सत्यापासून फारकत घेत सत्यमेव जयते चा आदर्श नारा देत जगत असतो.या आपल्या दुटप्पी वागण्यामुळे आपण तथाकथित निश्चिंतीसाठी अविरत धावपळ करीत सोयीस्कर व्यवस्थेचा स्विकार करतो अन् ही व्यवस्था कितीही बेकायदेशीर असली तरी एकदा का ती अंगवळणी पडली की ती बदलण्याची भाषा देखिल सहन होत नाही अन् त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.
             भारतीय साहित्यात नैतिकता व त्यातून निर्माण होणारी नितीमत्ता याचे उदात्तीकरण हे व्यक्तिकेंद्रित केले गेले आहे त्याचेच प्रतिबिंब चित्रपटात पडलेले आढळते.म्हणूनच चित्रपट अधिक तर नायकप्रधान फार फार तर बलात्कार पिडितेचा बदला घेणाऱ्या नायिकाप्रधान असतात अन् हे सर्व पडद्यावरील आदर्श हिरो-हिरोइन पदोपदी नाडणाऱ्या जुलमी,भ्रष्ट व्यवस्थेशी तोंडी लावण्या करिता रोमान्स करीत संघर्ष करून सर्वमान्य व्हिलनला खल्लास करीत शेवट गोड करतात मग प्रेक्षक ही समाधानानी घरी जातात अन् हिरो-हिरोइन प्रसिध्दी मिळवित आपापली घरे भरतात.इथे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला संपवत व्यक्तिगत न्यायनिवाडा करते परंतू व्यवस्थेचं काय तीचे उत्तरदायित्व कुणाचे का केवळ हिरो-हिरोइन,व्हिलन बदलत राहणारे चित्रपट पाहत बोचेऱ्या वास्तवापासून पळ काढत समाधान मानायचे.
              व्यक्ती पेक्षा व्यवस्था श्रेष्ठ असेल तरच खऱ्या अर्थाने स्थिरता व समानता लाभू शकते.सर्व संकल्पना आपापल्या सोयीनुसार गृहित धरत जगताना आयुष्यात अनेक तरंग उमटले तर निभावून नेता येते परंतू जर का लाटा निर्माण झाल्यास नुकसानीची शक्यताच अधिक तेव्हा संकल्पना तपासून त्या तटस्थपणे आत्मसात करता आल्या तर अचानक उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीत अगदी अर्थिक आणिबाणीत देखिल अर्थ निश्चल झाले तरी मनाने निश्चल राहता येईल.
                 अर्थ मुलोही धर्मा ।

संदिप महामुनी
9637130206

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

शोधिसी नारायणा...!


कुलुपबंद देव्हाऱ्यात, देवा तुला शोधू कुठं....

Filter your needs


Traditional imprisonment....सांस्कृतिक बंदिवास....!

 
        स्त्रियां आजदेखिल रुढी परंपरेच्या जोखडात अडकून पडलेल्या आहेत अन् त्यातच ते समाधान शोधताहेत ही त्यांची बौद्धिक गुलामगिरीच अधोरेखित करते. मुक्त वातावरणात जगतानाही मानसिक दृष्ट्या बंदिवासच भोगताहेत...

रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

मोर्चात्सवाचे बळी.....!

                     मोर्चात्सवाचे बळी.....!

                 कोपर्डीच्या निमित्ताने निघणारे मराठा समाजाचे व्यापक मोर्चे मराठा समाजातील खदखद बाहेर पडत आहे याचेच द्योतक ठरते आहे.
                 पण अत्याचाराला जातीय चौकटीत बसवून आरक्षण व अँट्रॉसिटी मुद्यावर वातावरण निर्मिती केल्यामुळे तसेच आरक्षण हा न्यायप्रविष्ठ तर अँट्रॉसिटी हा केन्द्रीय व घटनात्मक विषय असल्यामुळे नेमके त्याचे फलित काय हा सद्य स्थितीला तरी अनुत्तरित प्रश्न आहे.मुक मोर्चातील शिस्त व स्वच्छता याचे नियोजन जरी कौतुकास्पद असले तरी ही वादळा पुर्वीची शांतता आहे यातून दुर्दैवी असा संख्याबळाचे दबाव तंत्र हाच घटक ठळकपणे अधोरेखित होतो आहे अन् माणूस अनुकरण प्रिय असल्यामुळे याची लागण सर्व समाजाला झाल्याशिवाय राहणार नाही.प्रत्येकजण कोणत्याही समस्येचे मुळ जमवा गर्दी अन् खेचा वर्दी अशाप्रकारच्या मार्गानेच जाईल.त्यातून प्रत्येक घटक असुरक्षित भावनेतून एकत्र येईल अन् त्यातून जातीय तेढ व एकमेका विषयी द्वेषच निर्माण होण्यास मदत मिळेल सरतेशेवटी जिसकी लाठी उसकी भैंस हाच फॉर्म्युला उपयुक्त ठरेल तो वापरताना मात्र एक मराठा=एक लाख या गणितानुसार एक माळी,एक महार, एक मुस्लिम,एक...,अनेक जाती जमाती बद्दल अनिभिज्ञ असल्यामुळे असंख्य एक म्हणजे किती हे ठरायचे आहे तसेच ते कोणी व कसे ठरवणार हे देखिल माहित नसल्यामुळे नेमके संख्याबळ समजू शकत नाही तेव्हा एकंदरीतच भारतीय लोकसंख्या नेमकी किती पटीने वाढणार आहे हे देखिल कळणार नाही तेव्हा या फॉर्म्युल्याने नेमके कोणाचे गणित सुटणार हे काळच ठरवेल मात्र ते लोकशाहीला व पर्यायाने भारत देशाच्या एकसंधतेला धोकादायक आहे एवढे नक्की.
                 वेडात दौडले सात हा इतिहासात शिवाजी महाराजांना पडलेला प्रश्न सद्यस्थितीला वेडात दौडणाऱ्यांची संख्या लाखाच्या घरात गेली तरी जैसे थे असेल तर आपण शिक्षित झालो तरी शैक्षणिक दृष्ट्या प्रगल्भ झालो नाही हेच खरे.देशात इतरत्रही जाट, पटेल आरक्षणासाठी आंदोलन होत आहेत हे ही त्याचेच द्योतक आहे.परंतू देश रक्षणासाठी कार्यरत असलेले आपले सैन्य या विभागणीतून जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे तिथे केवळ भारतीय अन् तमाम भारतीयांचे रक्षण करण्याची दुर्दम्य ईच्छाशक्ती असणारेच जाऊ शकतात.ते लढताना महाराष्ट्रीयन, बिहारी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय... वैगरे अथवा हिंदू, मुस्लिम, शिख... मराठा, महार, ब्राह्मण...म्हणून लढत नाहीत.तेव्हा एकजुट असावी पण केवळ उत्साह व उत्सवी मानसिकतेने नव्हे तर समतोल विचाराने अन् राष्ट्रीय एकात्मतेसाठी व सर्वसमावेशक विकासासाठी एवढीच माफक अपेक्षा एक मुक साक्षीदार नागरिक म्हणून वाटते.
                             जय हिंद ।

व्यथाचित्र...!

         
                    व्यंगचित्राची ताकद काय असते हे सर्व जगाला माहिती आहे. हे माध्यम इतके प्रभावी अस्त्र आहे की जागतिक पातळीवर फ्रान्स मधे चार्ली हेब्दो या मासिकाने देखिल व्यंगचित्राचा प्रभाव अधोरेखित केला आहे.बाळासाहेब ठाकरें सारख्या उमद्या व्यंगचित्रकारानी त्यातून शिवसेने सारखा पक्ष उभा केला परंतू त्याच पक्षाच्या मुखपत्र असलेला सामना या वर्तमानपत्रातून परिस्थितीला विपरीत तसेच काळ विसंगत व्यंगचित्र छापले गेले त्यामुळे निर्माण झालेला जनक्षोभ व राजकीय पक्ष म्हणून असलेली अपरिहार्यता यामुळे संपादक व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जातीने जाहिर माफी मागावी लागली.इतपर्यंत ठिक परंतू त्या व्यंगचित्रकाराचे 'हसोबा प्रसन्न' हे सदरच गायब होणे वैयक्तिक रित्या मला अपेक्षाभंगाचे वाटते कारण व्यंगचित्र हे प्रभावी अस्त्रा बरोबरच दुधारी शस्त्र आहे याची जाणीव ठेवून कुंचल्याच्या फटकाऱ्या प्रमाणे जनक्षोभाचे वार सुद्धा झेलण्याची उर्मी व्यंगचित्रकाराच्या अंगी असली पाहिजे असे मला वाटते.असो लोकशाही आहे.

जाँबाज़.....

                   जाँबाज़.....

Giving a befitting reply by surgical strike for Uri attack at the place & time of it's own choice.Paying back Pakistan in the same coin with high morale.Without caring abt threat of being caught in Pakistan army's crosshairs our brave para commandos from Ghatak platoon 6 Bihar & 10 Dogra droped by Dhruv in POK,well equipped with Tavor,MP4,grenades, UBGL,night vision instrument with camera helmet cross 3km distance by crawling thru mud,rocks even landmines destroyed 7 terror launch pads with 50 terrorists & 2 Pak soldiers.
Images send by ISRO's Cartosat 2c satellite was useful for the operation.
Hat's off INDIAN ARMY...!

रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

भावना प्रधान अन् बुद्धि सेवक....!

                                     
                                                   भावना प्रधान अन् बुद्धि सेवक....!
       
                             आपल्या देशातील कोणतीही ज्वलंत बातमी घ्या मग ती काश्मीर प्रश्न असो की कावेरी पाणी तंटा अथवा गुजरात मधील पटेल आरक्षण;उना दलित अत्याचार ते पुर्वांचल मधील मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना; उल्फा, बोडोलैंड चा नक्षलवाद, उभा-आडवा भारत समस्याग्रस्तच दिसेल.
                             या समस्यांच्या मुळाशी गेल्यास भुप्रदेशीय अतिरेकी अस्मिता अथवा व्यवहारिक दृष्टिकोना एवजी भावनिक चिकटलेपण हेच कटू सत्य निदर्शनास येईल.परंतू एखाद्या समस्येच्या मुळाशी जाण्यापेक्षा वर वर घुटमळत उथळ प्रतिक्रिया देत,ऐकायला अन् बोलायला सोप्या उत्तराशी सलगी करण्यातच आपण धन्यता मानतो कारण सर्वसाधारणपणे आपल्याला बुद्धिपेक्षा भावना जवळची वाटते.नेमक्या याच कळपातील मेंढऱ्या वृत्तीचा आधार घेत वेगवेगळ्या राजकारणाची चुल मांडली जाते अन् धुर्त राजकारणी याचा फायदा उचलत त्यावर आपली भाकरी भाजतात.
                            स्त्री विषयी बहुतांश दांभिक आदर दाखवित तिच्या वरील अत्याचाराला जातीय रंग देत सत्ते साठीच्या अथवा आपले उपद्रव मुल्य सिद्ध करण्यासाठीच्या कुरघोड्या पुर्वंपार चालत आल्या आहेत.खैरलांजीचे दलित कार्ड ते कोपर्डीचे मराठा कार्ड एवढेच काय तो बदल.परंतू त्याच्या मुळाशी असलेला नराधमपणा,पुरषी माज जिथल्या तिथे ठेचणारी व्यवस्था शासन पातळीवर रूजलीय का?आरक्षण असो की स्व-रक्षण केवळ शिरगिणतीचे संख्याबळ व तीचे रस्त्यावरील शक्ती प्रदर्शन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आपले राजकीय उपद्रव मुल्य सिद्ध केले की हवे ते पदरात पाडून घेण्याची कसब दाखवणारा हा खरा लोकनेता ठरतो त्याने केवळ भावनिक मुद्याला फुंकर घातली की तुमच्या साठी कायपण म्हणणारे हवशे,नवशे,गवशे उरलेले भडकवण्याचे काम अनेक माध्यमांचा चपखलपणे वापर करीत बोभाटपणे करतात.एकंदर मुद्दा कितीही व्यवहार्य नसो मतांचा गठ्ठा हातून सुटू नये म्हणून सत्ताधारी व सत्ताभिलाषी दोघेही साम,दाम,दंड,भेदाचे शस्त्र वापरत आखाड्यात उतरतात.निवडणूक आली की अशा मुद्द्यांवर भर देत विकासाच्या नावाखाली गोंडस घोषणा करीत भावनिक लाट निर्माण केली जाते व त्या लाटेवर स्वार होत सत्तेचा सोपान मिळवतात अन् लाट ओसरल्यावर पुन्हा जैसे थे.वर्षोंवर्षे बेरजेचे राजकारण करीत राजकीय घराणी निर्माण केली जातात मग स्वतः,भाऊ,मुलगा, मुलगी,सुन,पुतण्या,मेव्हणा,नातवंडं....वैगरे यांच्या भोवतीच अख्ख्या राज्याचं राजकारण फिरवत ठेवायच बाकी कार्यकर्ते भावनिकपणे गळ्यात पक्षचिन्ह असलेला उपरण्याचा फास लावत व स्वतःलाच टोप्या घालत हाय कमांड, साहेब,नेताजी,लालूजी,अम्माजी चरणी लीन होतात.नंतर फरपट झाली की विठ्ठलाचा झेंडा हातात घेण्या एवजी त्यालाच कोणता झेंडा घेऊ हाती म्हणून विचारतात.
                            केवळ राजकारण क्षेत्रातच नव्हे तर धर्म, अध्यात्म,चित्रपट,खेळ या क्षेत्रात देखिल भावनिकतेला उधान येते.अपंगानां दिव्यांग म्हटलं की आपला त्यांच्याप्रती आदर व्यक्त होतो भले १९ जणांच्या पथकात विश्वविक्रम सहित २सुवर्णपदक,१ रौप्यपदक,१ कांस्यपदक मिळवित पँरालंपिक स्पर्धेत यश मिळविणाऱ्यांची योग्य दखल न का घेईना. वास्तविक सुदृढ व्यक्तीपेक्षा दिव्यांग व्यक्तीचे यश विशेष उल्लेखनीय असते.असो.
                           एखादे लहान मुल कुपनलिकेत पडले,एखादा माणूस बायकोचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालला की मोठ्या प्रमाणात याची दखल घेत भावनिक उमाळ्याने लाखोची आर्थिक मदत करीत इति कर्तव्य पार पडल्याचे पुण्य पदरी पाडतात पण अशा घटना घडण्या पाठीमागे असणारी सडकी व्यवस्था बदलण्यासाठी आपण आग्रही असतो का? का केवळ देवस्थानाला श्रीमंत बनवत स्वतःचे पापक्षालन करण्यात धन्यता मानतो वास्तवात लेखापालांच्या अहवालानुसार देवस्थानच्या व्यवहार भोंगळ व अपहारिणी आहे अन् हेच भक्तांच्या अंध भावनांचेच फळ आहे.
                           खरे हिंदुस्तानी,----असाल तर लाईक कराल असल्या पोस्ट टाकून फुकाच्या राष्ट्रवादाचे प्रदर्शन मांडणाऱ्या व इतरांना राष्ट्रप्रेमीपणाचे प्रशस्तिपत्र देण्याचा ठेका घेणाऱ्या पिढीला नागरिकांसाठीची मुलभूत कर्तव्य ठावूक असणे व तीचे पालन करणे दिवास्वप्नच आहे दुसरीकडे या विरुद्ध भावनांना खतपाणी घालत अतिरेकी संघटना फोफावतात मग ईद दिवशी अमेरिकन कैद्यांना बकऱ्यांप्रमाणे उलटे लटकवत द मेकिंग अॉफ इल्यूशन्स म्हणत त्यांच्ये गळे चिरताना ईसिसच्या अतिरेक्यांना आनंद वाटतो कारण त्यांच्या भावनांशी ते निगडित असते.तिथे भावना प्रधान असते व बुद्धि केवळ सेवकाची भुमिका बजावते.
                           जिथे भावना जास्त प्रभावी असते तिथे कट्टरता आपसूक वाढीस लागते अन् ती धोकादायक असते पण जर भावनेला बुद्धिप्रामण्याची जोड असेल तर तिथे सहिष्णुता अंगिकारली जाते अन् त्यातच सकलजनांचे हित सामावलेले असते.म्हणून काय प्रधान असावे व कोण सेवक असावा हे प्रत्येकाने आपापल्या वैचारिक पातळीनुसार ठरवावे..!

संदिप महामुनी
9637130206

शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

खेळाडूंची व्यथा अन् व्यवस्थेचा खेळ....!

                                   खेळाडूंची व्यथा अन् व्यवस्थेचा खेळ....!
                   
                   रिओ २०१६ ओलिंपिकचे सुप वाजले.चार वर्षांची मेहनत सिद्ध करण्यासाठी प्रत्येक खेळाडू अन् देश उत्सुक असतो तसेच जीवाचे रान देखिल करतो किंबहुना करायलाच पाहिजे.तस पाहिलं गेल्यास ते एक प्रकारचे शस्त्र व हिंसे शिवाय खेळले गेलेले युद्धच असते.तिथे गुणवत्ता सिद्ध करण्याची धडपड, जिंकण्याची चढाओढ,जास्तीत जास्त पदके मिळवत वर्चस्व गाजवण्याची संधी सर्व काही नैतिक असते.वैयक्तिक पातळीवर खेळाडूंना स्वतःच्या चांगल्या वाईट भावनांचा निचरा करण्याचे व आपली राष्ट्रीय अस्मिता व्यक्त करण्याचे व्यासपीठ असते.
                 आज निश्चितच दोन पदकं त्यातील पहिलं महिला कुस्तीतील साक्षी मलिक हीने ब्राँझपदकाने खातं खोलत इतरांना जिंकण्याची इर्षा दिली तर दुसरे पदक पी.व्ही.सिंधूने एकेरी बँडमिंटन मधिल पहिले-वहिले वैयक्तिक महिला रौप्यपदक मिळवून आनंद दिला परंतू समाधान मात्र मिळाले असं म्हणता येणार नाही.जगातील लोकसंख्येनुसार दुसऱ्या स्थानावर असलेल्या अन सर्वात तरूण व जागतिक महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या देशाची कामगिरी पाहता आपण मुर्खांच्या नंदनवनात राहतो आहोत असे वाटते आहे.मग यात खेळाडू कमी पडतायत का तर बहुतांशी याच उत्तर नाही असचं म्हणायला हवं.कारण खेळ विश्वातील वैयक्तिक पातळीवरील त्यांची कामगिरी ते ज्या आर्थिक परीस्थितीत जगतात अन् खेळांसाठीच्या ज्या सोयी सुविधें अभावी ते खेळतात ते अतुलनीय आहे.क्रिडा प्रशासन व त्या विभागाचे मंत्री यांचे योगदान अन् मुख्य म्हणजे त्यांची तळमळ इतकी सुमार आहे की शोभा डे नी खेळाडूं एवजी क्रिडा प्रशासन,व्यवस्थेवर भाष्य केले असते तर सोशल मिडीयाने त्यांना डोक्यावर घेतले असते.कपडे सुद्धा दुसऱ्याचे वापरणारी दिपा कर्माकर सारखी खेळाडू प्रोडूनोव्हा या भारताला अपरिचित खेळात चौथ्या स्थानी राहते तसेच कविता बाबर सारखी धावपट्टू बुट घेण्याची ऐपत नसतानाही चमकदार खेळते किंवा नौकायन मधील दत्तू भोकनाळ ही सर्व नावें व्यवस्थेपेक्षा वैयक्तिक मेहनतीच्या जोरावर तिथपर्यंत पोहचू शकलेत याचीच साक्ष देतात.
                   नरसिंग यादवच्या उत्तेजक चाचणीमुळे नाडा अन् वाडा च्या वादात त्याच्या सहभागावर ओढवलेली नामुष्की अन् दुसरीकडे ४२कि.मी. मँरेथॉन मधील ओ. पी. जैशा हीने स्पर्धे दरम्यान भारतीय एनर्जी ड्रिंकचा एकही स्टॉल नव्हता तसेच व्यवस्थापनातील कोणीही उपस्थित नव्हते आणि आपण मरता मरता वाचलो असा गंभीर आरोप केला आहे.परंतू व्यवस्थापनाने तिला सुविधा देऊ करून सुद्धा तीने त्या स्वतःच नाकारल्या होत्या असा प्रतिवाद केला आहे सत्य नंतर बाहेर येईलच पण समन्वयाच्या अभावी व्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह अधिकच गडद झालं त्याचे काय.
                   एवढी मेहनत करून,यश मिळवून देखिल प्रत्येक खेळाडूला त्याचा योग्य मोबदला मिळेलच याची शाश्वती नाही तेव्हां अनेक ऐशियन,पँराओलिंपिक स्पर्धेत जागतिक स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करून देखिल खेळाडूंची आर्थिक स्थिती खालावलेली असेल तर प्रतिभा असूनसुद्धा नविन पिढी त्याकडे पाठच फिरवेल.मिल्खा सिंगला हरवून चमकदार खेळ करणारा माखन सिंगला अपघातात पाय गमावल्यावर सर्व मेडल भंगारात घालावे लागले,पहिले वैयक्तिक ओलिंपिक ब्राँझ मिळवणाऱ्या खाशाबा जाधव यांना स्वतःच्या खर्चाने जावे लागले होते,१९५०ला फुटबॉल मधे सुवर्णपदक मिळवणारा युसूफ खान,एशियन स्पर्धेत चमकदार खेळ करणारी अश्विनी नच्चप्पा,११० मि अडथळ्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवणारा टॅक्सी ड्रायव्हर सर्वण सिंग,५० मि फ्री स्टाइल मधे वर्ल्ड रेकॉर्ड करणारे मुरलीकांत पेटकर, भालाफेकमधे सुवर्णपदक मिळवणारा देवेंद्र झाझेरियी,हॉकीत ओलिंपिकमधे २ सुवर्णपदक १ रौप्यपदक तसेच एशियनमधे २ सुवर्णपदक १ रौप्यपदक मिळवणारा गोली असलेला पहिला आंतरराष्ट्रीय कप्तान शंकर लक्ष्मण(Rock of Gibraltar),कुस्तीत पहिले वैयक्तिक महिला ओलिंपिक ब्राँझ मिळवणारी करनम मल्लेश्वरी,बिलियर्डसमधे २ वेळा जागतीक विजेता व १२ वेळा राष्ट्रीय विजेता ठरलेला विल्सन जोन्स, ट्रॅक वरील वेगवान भारतीय महिला आशा रॉय,६ एशियन पदके मिळवणारा जलतरणपट्टू शरत गायकवाड, बँडमिंटनपट्टू गिरीश शर्मा असे अनेक ज्ञात अज्ञात प्रतिभाशाली परंतू झाकाळलेले आयुष्य असणाऱ्या खेळाडूंचा आपल्याकडे भरणा आहे.पण शारापोवा तेंदुलकरला ओळखत नसेल तर आपल्याला कोण राग येतो मात्र या प्रतिभावान खेळाडूंची माहिती नाही याची आपल्याला लाज वाटत नाही ही शोकांतिका.२०११ च्या स्पेशल ओलिंपिक स्पर्धेत २ ब्राँझपदक मिळवणारी सीता साहू ही खेळाडू रस्त्यावर पाणीपुरी विकत असेल आणि २०११ मधे महिला कबड्डी विश्वविजेता संघाला रेड कार्पेट सोडा पण डुगडुग रिक्षामधे बसून घरी जावे लागत असेल तर खेळ व खेळाडूं विषयीची मानसिकता तसेच व्यवस्थेची डागडुजी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे हेच खरं.२९ ऑगस्ट आपण ज्यांच्या नावाने क्रिडा दिन साजरा करतो ते हॉकीचे जादूगार ज्यांचा खेळ बघून स्वतः हिटलरनी जर्मनीचे नागरिकत्त्व स्विकारण्याचा त्यांना प्रस्ताव ठेवला होता अन् तितक्याच देशाभिमानाने तो ज्यांनी नाकारला ते ध्यानचंद आजदेखिल मरणोत्तर भारतरत्नाच्या प्रतिक्षेत आहेत.
                अर्धा-एक गुणांनी,अर्धा-एक सेकंदांनी मागे राहणाऱ्यांना आपण दुर्लक्षीत करणार असू तर त्यानां उभारी कशी मिळणार कारण यशाचे अनेक बाप असतात अपयश मात्र नेहमीच पोरकं असते.एकूणच खेळाकडे बघण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन त्यात केवळ पैसा,प्रसिद्धीला प्राधान्यक्रम असेल अन् खेळाविषयी ओढ,तळमळ नसेल तर त्या खेळाचे योग्य पोषण होणार नाही.दुसरीकडे सरकार, प्रशासन यांचे क्रिडा धोरण अत्यंत उथळ व केवळ प्रसिद्धीन्मुख असेल तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेला पोषक सोयी सुविधांची वानवाच राहणार.ह्या खेळाडूंच्या व्यथा अन् व्यवस्थेचा खेळ जागतीक स्पर्धेत भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेच्या मुळाशी येणार हे मात्र नक्की..!