रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

सुsss शांतता...कोर्ट चालू आहे !


सद्ध्या आपल्या देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे कोरोना ही नक्की महामारी आहे का नाही तसेच त्यावर उपाय हुडकण्यात अर्थकारणाचा बोजवारा किती उडालेला आहे(अर्थात हा दैवी प्रकोप आहे असं दस्तुरखुद्द मंत्री बाईसाहेबांनी सांगितल्यामुळे बाकीच्यांनी कोणताही युक्तिवाद करण्यात अर्थ नाही असो) हे नसून सुशांतची हत्या झाली की आत्महत्या हे आहे. खरंतर सुशांतच्या खोलीचा दरवाजा उघडत नव्हता म्हंटल्यावर चावीवाल्याला बोलवल्यामुळे घोळ झाला त्याच वेळी सीआयडी ला एक फोन केला असता तर हे प्रकरण चिघळले नसते अन् मुंबई पोलीस ते सीबीआय व्हाया बिहार पोलीस असा त्याचा खेळ खंडोबा झाला नसता. आपल्या दयाभाऊने कोणतेही एक्सट्रा पैसे न घेता दरवाजा उघडला ( कदाचित तोडला ) असता अन् काही तासांच्या आतच सर्व प्रकरण निकाली निघाले असते पर्यायानं देशाचा व टिव्ही समोर तासनतास डोकं खाजवत खरंतर गांजवत बसणाऱ्यांचा वेळ सत्कारणी लागला असता. परंतू  दररोज हजारो घडणारे गुन्हे व त्यासाठी लागणारी सक्षम तपास यंत्रणा आणि त्या पुढेही जावून सक्षम न्यायव्यवस्था ही सुशांतसिंग या व्यक्तीला मिळणाऱ्या न्याया इतकीच देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणाऱ्या न्यायासाठी जास्त महत्त्वाची आहे. घटनेला अपेक्षित व्यापक देशहीत पाहणारे व दूरदृष्टी असणारे राजकारणी, प्रामाणिक शासकीय कर्मचारी तसेच जागरूक पत्रकारिता अन् या सर्वांसाठी आग्रही नागरिक याची नितांत गरज आहे परंतू हे जग मनोरंजन, मनोरंजन अन् मनोरंजन या तीनच गोष्टींवर चालते हे डर्टी असले तरी स्वच्छ वास्तव विद्या बालनने सांगून ठेवलेले आहे. तेव्हा कल्पनेतच रमणाऱ्या व सुखावणाऱ्यांना अफुची गोळी देण्यातच तथाकथित सर्व क्षेत्रातील सत्ताधाऱ्यांचे हीत आहे. आपण मात्र दैवी कृपा केव्हां होते याची वाट पाहू तोपर्यंत सुsss शांतता.....


मंगळवार, २ जून, २०२०

इथे ओशाळला मृत्यू....


इथे ओशाळला मृत्यू....
मृत्यू हा शब्द जरी उच्चारला तरी एक अनामिक भीती मनात निर्माण होते. मृत्यू जरी अंतिम सत्य असले तरी ते स्वीकारणे तेवढेच अप्रिय अन क्लेशदायक असते. सध्या निर्माण झालेल्या कोरोना नावाच्या महामारीत मृत्यू नावाची वेगळीच दहशत अन् नातेसंबंधातील संशय व भीतीने ग्रासलेली असंवेदनशीलता पाहायला मिळते आहे.
कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जवळचे नातेवाईक हात लावायलाच काय पण अंत्यसंस्कार करण्यासाठी देखिल टाळाटाळ करीत आहेत.अशा परिस्थितीत ही जबाबदारी एक तर नेमून दिलेल्या चतुर्थ शासकीय कर्मचाऱ्यांवर अन्यथा स्वयंस्फुर्तीने करणाऱ्या सामाजसेवकावर येऊन पडते.अशीच जबाबदारी गेली २५ वर्ष पार पाडणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी नागेश वाघमारे हे देखील सध्याचे कोरोना वाॅरीयर परंतू आजच्या परिस्थितीत केवळ भीतीपेक्षा स्वतःच्या मृत्यूचा धोका अधिक असताना कर्तव्याचे काटेकोर पालन करणारे नागेश वाघमारे हे अधिक कर्तव्यदक्ष.त्यांना याबाबत विचारले असता त्यांचे उत्तर असे होते की एक दिवस सगळ्यांनाच मरायच आहे मग एवढं घाबरून जगायचं कशाला.विशेष म्हणजे त्यासाठी 'मृत्यु' हा शब्दच त्यांनी स्वतःच्या मानेवर गोंदवला आहे.हल्ली टॅटू काढण्याची फॅशन असताना मृत्यू सारखा नकोसा वाटणारा शब्द गोंदणे हे त्यांनी मृत्यू नावाच्या भीतीवर विजय मिळवत त्या सत्याला धीरोदात्तपणे सामोरे गेल्याचे अधोरेखित करते. नागेश वाघमारे नावाच्या अशा मृत्युंजयास माझा त्रिवार सलाम.‌..!


शुक्रवार, ८ मे, २०२०

उषःकाल होता होता काळरात्र झाली....


            कोरोनाच्या भीतीच्या छायेखाली एक एक दिवस पुढे सरकत असताना एकीकडे विशाखापट्टणम येथिल वायुगळतीची दुर्घटना ताजी असताना औरंगाबाद येथे १६ मजूर रेल्वेच्या मालगाडी खाली चिरडले गेल्याची बातमी आली अन् मन सुन्न झाले.
अदृश्य शत्रुशी सामना करत असताना लॉकडाऊन नावाच्या आधुनिक शस्त्रानीशी लढताना ते शस्त्र हाताळताना प्रत्येक जण आपापल्या परिस्थीनुसार तसेच गरजेनुसार बुद्धी वापरणार हे सत्य आपण नाकारू शकत नाही.गरजवंताला अक्कल नसते असे म्हणतात कदाचित महसुली उत्पन्नाच्या गरजेनुसार सरकारला व तथाकथित अर्थव्यवस्थेच्या योद्ध्यांसाठी देखिल ती नसेल परंतू गरीबीतील भुकेचा शाप भोगणाऱ्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःचं घर,गाव सोडून वाट मिळेल तिकडे जाणे ही तेव्हा देखील केवळ गरज नसून अपरिहार्यता होती अन् आजदेखील अंधकारमय भविष्याच्या सावटाखाली एक एक दिवस ढकलताना गड्या आपुला गाव बरा अन् आपल्या माणसाची ऊब अधिक सुरक्षित वाटणे देखिल स्वाभाविक अन् सहाजिकच व त्यासाठी पाय फुटले तिकडे जाणे क्रमप्राप्त आहे. कदाचित भरल्यापोटी अन् आपापल्या कुटूंबकबिल्या सोबत आपापल्या घरी सुरक्षित असणाऱ्या आपल्याला किती बोचणार हा संवेदनशीलतेचा प्रश्र्न आहे.
रेल्वे रूळाचा आधार घेत मार्ग शोधणाऱ्या जीवांसाठी त्याच रेल्वे रूळाची मृत्यूशैय्या व्हावी यापेक्षा दुर्दैव ते काय तेव्हा चालून चालून दमलेल्या शरिराला अन् थकलेल्या मेंदूला रेल्वे बंद आहेत तरी रेल्वे रुळावर झोपावे का असले प्रश्र्न पडत नाहीत कळते ते फक्त इच्छित स्थळी लवकरात लवकर पोचणे.
बातम्या मधे रेल्वे रुळावर विखुरलेल्या भाकऱ्यांमध्ये त्या मजूरांचे मांसाचे तुकडे गोळा करतानाचे दृश्य पाहणे स्तब्ध करणारे होते मग त्यांच्या उरलेल्या सहकाऱ्यांनी ते डोळ्यासमोर पाहणे कीती काळजाचा थरकाप उडवणारा असेल हे तेच जाणोत.
साखरझोपेतील स्वप्नांचा उषःकाल होता होता काळरात्र झाली.
पण पुन्हा आयुष्याच्या मशाली पेटवण्या शिवाय गत्यंतर नाही. मजूर ही त्यांच्या कामाची तसेच परप्रांतीय ही त्यांच्या जन्म ठिकाणांची ओळख असू शकेल पण माझ्या दृष्टीने ते भारतीय आहेत अन् एक भारतीय म्हणून मी त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहतो.

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

भरारी...!

Take off your dreams high above the Cycles.....

जय जिजाऊ जय शिवराय...!


  
   कर्तृत्व असाधारण असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर पुतळ्यांचे देखील महत्व वाढते पण असामान्यपण समजायला जीवंतपणीचा संघर्ष महत्वाचा असतो. जन्म सार्थकी लागला म्हणजे काय हे महारांजाचे चरित्र अन् चारित्र्य अधोरेखित करते. ज्यांच्या एकाच आयुष्यातील दैदिप्यमान कामगिरीचा नुसता विचार जरी केला तरी दमल्या सारख होतं पण त्यांनी ते प्रत्यक्षात केलंय ही गोष्टच अचंबित अन् तेव्हढीच प्रेरीत करते. दुरदृष्टी,लढवय्या अन् निस्वार्थी शासक अश्या वृत्तीचे प्रेरणास्रोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक प्रतिभेला मानाचा मुजरा...!
जय जिजाऊ जय शिवराय...!






गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

महाराष्ट्र केसरी पैलवानाचे किर्तन.....!


महाराष्ट्र केसरी पैलवानाचे किर्तन.....! 

           संस्काराची परिभाषा नेमकी काय असते हे तुमच्याकडे असणाऱ्या शिदोरीवर अवलंबून असते. जर का ती शिदोरी सुसंस्काराची असेल तरच तो संस्कार झळाळून निघतो अन्यथा तो झोकाळून जातो.
दोन वेगवेगळ्या बातम्या वाचताना त्याचा आज प्रत्यय आला एक म्हणजे वारकरी संप्रदायातील एका मठाधिपतीने मारूतीबुवा कऱ्हाडकर मठाचा अध्यक्ष मीच या स्वार्थ बुद्धीने व अहंकाराने त्यानी विश्वस्तांनी ठराव करून मठाधिपती म्हणून निवडलेल्या व्यक्तीचा ठरवून चाकूने हल्ला करीत पंढरीनगरीतच खून केला विशेष म्हणजे सहकाऱ्याच्या डोक्यात विणा घातल्याच्या गुन्ह्यासाठी त्याने तीन महिन्याची तुरुंगाची हवा देखिल खाल्ली होती तसेच दोघांचे गुरु एकच असलेले बंड्यातात्या कऱ्हाडकर यांना देखील मारण्याचे त्याने ठरवले होते पण सुदैवाने ते बचावले अन् दुसरी म्हणजे महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेत विजेत्या कुस्तीपटूने ( हर्षवर्धन सदगीर ) उपविजेत्या ठरलेल्या व आपला मित्र असलेल्या कुस्तीपटूला ( शैलेश शेळके ) खांद्यावर घेऊन मैदानाला फेरी मारली तसेच दोघेही एकाच गुरुचे चेले असल्याने शेवटी विजय गुरुचाच झाला ही प्रामाणिक भावना दोघांचीही होती.
तस पाहिल तर महाराष्ट्रीय संस्कृती मधे वारकरी अन् कुस्ती दोन्हीही अस्मितेचे प्रतिक आहेत. वारकरी संप्रदाय म्हटलं की अध्यात्मिक मार्गाने व संत परंपरेच्या मार्गदर्शक तत्वाचे काटेकोर पालन करीत सामान्य जनांना उपदेश करीत समाज सुसंस्कृत घडवण्यासाठी आग्रही असणे होय तर कुस्ती म्हणजे शारीरिक ताकदी बरोबर चपळता असणारा रांगड्या गड्याचे मैदानी कौशल्य दाखवण्याची क्रिडा स्पर्धा होय.
इथे मात्र ज्याने समाजाला दिशा दाखवायची त्यानेच दिशाहीन होत अध्यात्मिक तत्वज्ञानाशी फारकत घेत वारकरी संप्रदायाची 'वरुन किर्तन अन् आतुन तमाशा' अशी नकारात्मक प्रतिमा निर्माण केली. तर जिथे इर्षा, अहंकार, आक्रमकता निर्माण होण्याची संभावना अधिक तिथे संयम व नम्रता याचे प्रदर्शन दिसले. याचाच अर्थ तुमचे कार्यक्षेत्र कोणतेही असो त्यापेक्षा तुमची जडणघडण कोणत्या संस्कारातून झाली आहे हेच समाजाला अधिक प्रबोधनात्मक असते.