Nature always inspire us to introspect...!
विचार करण्याची उपजत देणगी निसर्गाने थोड्याफार प्रमाणात सर्व प्राणीमात्रांना दिली आहे मात्र ते व्यक्त करण्याचे कौशल्य फक्त मानवालाच लाभले आहे त्यातल्या त्यात संवेदनशील व्यक्तींना अधिक. त्याचा सदुपयोग करण्यासाठी हा लेखनप्रपंच...
आज एक जण महादेवाच्या रूपात भेटला उत्सूकता म्हणुन त्याच्याशी बोललो तेव्हा त्यानी सांगितले तो एक बहुरूपी हाय पोलीस ठाण्यात नोंद हाय, भजन-किर्तन करतु , तबला वाजवतु अन् देवाचे फोटु बी विकतु... एवढे सगळे बायको, पाच मुलं यांचा संसार चालवण्यासाठी चालू आहे पण मी लोककलाकार असून मला सरकार कडून लोककलाकारांसाठी ची पैशाची मदत मिळत नाही त्यासाठी त्यावेळच्या भारताच्या अर्थमंत्र्यांना सुशिलकुमार शिंदे यांना भेटलो पण एवढा अर्थमंत्री असुन काय बी उपयोग झाला नाही ही त्याची खंत अजूनही ताजी आहे. तसं तर बायको, पोरं काय बी नसत तुमचं नाव सुद्धा नावालाच असतयं तुम्ही एकटं येताय अन् जाताय ही त्याची 'एकटा जीव सदाशिव' फिलॉसॉफी कदाचित स्वतःच स्वतःची समजूत काढत जगण्याचं बळ आणत असेल.
त्याला विचारलं पैश्यासाठी रोज अश्याच अवतारात रंगरंगोटी करून फिरता का तर म्हणाला नाय श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी करतो पण पैश्यासाठी नाय तर यातनं जमलेल्या पैशातला स्वत:ला एक रूपया सुद्धा घेत नाही तर गावातल्यांना देवाच्या नावानं जेवायला घालतो. मी विचारलं का तर म्हणाला पोरगं आजारी असताना नवस बोल्लो होतो.
खरंतर आज पंचक्रोशीतील अनेक पालख्या पाचवडेश्वराच्या भेटीला येत होत्या माणसं देवाच्या नावानं चांगभलं करत ढोल ताशा वाजवत जात होते पण खरंतर या पालखी बाहेरच्या देवानं माझं लक्ष वेधून घेतले. देव देवळात नाही तर माणसात शोधावां असं संत गाडगेबाबा नेहमी सांगत असत खरंच देव माणसापेक्षा माणसाच्या दुःखात अधिक सामावलेला असतो . रोजच्या संघर्षासाठी देवाचे फोटो विकता विकता नवसाचं ओझं वाहत प्रत्यक्षात त्याचा अवतार करून त्याच्या अवताराचीच वाट बघत असेल.
कदाचित माणसाला माणसाच्यातल्या देवाचा साक्षात्कार होईल तेव्हा नवसाच्या ओझ्याची अन् देवाच्या अवताराची गरज भासणार नाही.
महिला सबलीकरण, महिला आरक्षण, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री सन्मान या घोषणांचा अथवा धोरणांचा नुसता उदो उदो करून कसलाही पुरोगामी विचार अन् कृती अस्तित्वात येऊ शकत नाही त्यासाठी स्त्रियांविषयी आदर रक्तातच असावा लागतो. खरंतर केवळ महाराष्ट्रानेच नव्हे तर समस्त भारतीयांना आदर्श अन् प्रेरणादायी अशा महापुरुषाने आपल्या इथे जन्म घेतला याचा अभिमान असायलाच हवा अन् ते व्यक्तिमत्व म्हणजे एकमेवाद्वितिय छत्रपती शिवाजी महाराज.
त्यांच्या कारकिर्दीतील असंख्य उदाहरणे त्यांच्या उच्च कोटीच्या नैतिकतेची साक्ष देतात. उमरखिंडीत महाराजांच्या विरोधात लढलेली मोगली फौजेची रायबाघिणीचा पराभव होऊन देखील तिच्या हुद्द्या प्रमाणे तीचा मानसन्मान करत तीला परत पाठवले. दक्षिण दिग्विजय मोहिमेत कर्नाटकातील बेळवाडीची किल्लेदार सावित्रीबाई देसाई ही महाराजांच्या सैन्या विरोधात लढत होती तिच्या किल्ल्याला तब्बल महिनाभर महाराजांचा सरदार सकुजी गायकवाड याने वेढा दिला होता अन् अखेर तीचा पराभव झाला मात्र सकुजी गायकवाडाने उन्मत्त होऊन तिच्यावर बलात्कार केला अन् जेव्हा ही गोष्ट महाराजांना समजली तेव्हा त्यांनी सकुजी गायकवाडाचे डोळे काढून आयुष्यभरासाठी कोठडीत ठेवले. तसेच सावित्रीबाई देसाई यांची क्षमा मागून त्यांचा यथोचित सन्मान राखला. यादवाडला सावित्रीबाई देसाई यांच्या लहान बाळाला मांडीवर बसवून दुध पाजताना चे महाराजांचे शिल्प त्यांच्या सह्रदयतेचीच साक्ष देत आजही उपलब्ध आहे. एवढेच नव्हे तर आपल्यातील रांझ्याच्या पाटलाने पाटीलकीचा माज करत एका गरीब शेतकरी महिलेची अब्रु लुटली तेव्हा जराही विलंब न करता महाराजांनी त्याचे हातपाय तोडले. खरंतर आजच्या सारखी पी.आर.ओ. टीम ठेवून स्वतःच स्वतःची टिमकी वाजवण्याची त्या काळी प्रथा नसुन देखील एक मोगल इतिहासकार खाफीखान लिहतो ' जसा भाऊ बहिणीशी वागतो किंवा मुलगा आईशी वागतो तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे '. स्वकियांच्या बरोबरीने राजकीय विरोधकांच्या आई, बहिण, पत्नी, मुलगी अशा कोणत्याही स्त्रीचा महाराजांनी केवळ अन् केवळ सन्मानच केला.
महाराज केवळ सन्मान करुन थांबले नाहीत तर त्यांना बरोबरीचा दर्जा देत निर्णय प्रक्रियेत देखील सहभागी करून घेतले म्हणूनच त्यांच्या सूनांनी देखील हातात तलवार घेऊन मैदानं गाजवली हा इतिहास आहे.
कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेला जेव्हा सैनिकांनी शिवाजी महाराजांच्या समोर उभे केले तेव्हा तिच्याकडे पाहुन 'अशीच आमची आई सुंदर, रुपवती असती तर आम्ही देखील सुंदर झालो असतो ' असं म्हंटल्याची बखरी मध्ये नोंद आहे. त्या स्त्रीचा मातेसमान आदर करुन त्यांची सौंदर्याकडे देखील पाहण्याची असाधारण दृष्टी अन् वृत्तीच अधोरेखित होते.
वास्तविक अशाप्रकारचा नैतिक संस्कार घडविणारा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला नाही हे आपलं खरं दुर्दैव.
जिजाऊंनी केलेले ज्वाज्वल्य संस्कार हेच या नैतिकतेचे खरे गमक आहे तेव्हा एक स्त्रीच सुशासन निर्माण करणारा पुरुष निर्माण करु शकते अन् त्या पुरुषातील उच्च कोटीची नैतिकता हाच स्त्री सन्मानाचा कणा असतो.
बिल्कीस बानो प्रकरणाविषयी माहिती असण्याची शक्यता तशी कमीच खरंतर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ह्या घटनेचा पुन्हा उल्लेख अपरिहार्य पणे करावा लागतो आहे. गोध्रा हत्याकांडाची प्रतिक्रिया म्हणून ११ जणांनी त्यावेळी १९ वर्षाची तसेच पाच महिन्यांच्या गरोदर असणाऱ्या बिल्कीस बानो वर सामुहिक बलात्कार केला. त्यासाठी या नराधमांना २००२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. १५ वर्षाची शिक्षा भोगल्या नंतर माफी साठी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली असता न्यायालयाने तो अधिकार घटना जिथं घडली तिथल्या सरकारने तो निर्णय घेण्याचे सुचवलं त्याप्रमाणे गुजरात सरकारने त्यांना तांत्रिक कायदेशीर तरतुदींचा वापर करून मुक्त केले. खरंतर तांत्रिक कायदेशीर तरतुदीं पेक्षा समाजाला कोणता संदेश दिला जातो याचा गांभीर्याने अन् संवेदनशीलपणे विचार झाला पाहिजे.
या नराधमांना स्वतःच्या कृत्याची किती उपरती झाली त्यांनाच ठाऊक पण त्यांना सोडलं इथपर्यंत ठीक पण काही महाभागांनी या लोकांचं मिठाई देऊन व हार घालून स्वागत केले. या कृतीतून सदसद्विवेकबुद्धीचा किती ऱ्हास झाला आहे हेच अधोरेखित होत आहे. बलात्कारासारख्या अतिशय गंभीर गुन्ह्याला धार्मिक अथवा बदल्याच्या भावनेतून पाहणं अन् त्याचा व्यक्तिगत तसेच सामाजिक पातळीवर सहज स्वीकार केला जातो हे पाहणे माझ्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कारित रक्ताला कदापीही सहन होणार नाही.
खरंतर नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वतंत्रता दिनी पंतप्रधानांनी भाषणात स्त्रियांचा सन्मान राखला पाहिजे असे आवाहन केले अन् त्यांच्याच गुजरातने त्याला हरताळ फासला आहे. जात, धर्म, पंथ निरपेक्ष स्त्रीचा सन्मान राखलाचं गेला पाहिजे तसं न होता केवळ बोलाची कढी आणि बोलाचा भात होताना दिसत आहे हे भारतीय संस्कृतीसाठी अत्यंत खेदाची अन् शरमेची बाब आहे.
खरंतर जगात कुठेही गेलात तर आपल्याला कशाची ना कशाची कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रतिकं आढळतातच. प्रत्येक व्यक्तीला आपापले वैचारिक वेगळेपण मांडण्यात अधिक रस असतो अन् जेव्हा अनेक लोक एकत्र येतात तेव्हा आपापल्या समविचारी मंडळींना खरंतर सध्याच्या युती-आघाडी सरकार प्रमाणे किमान समान कार्यक्रमा सारखं एकत्र करून आपापली प्रतिकं मिरवण्यात अभिमान देखील वाटतो इथपर्यंत काहीच गैर नाही अन् तसा अधिकार संविधानानेच प्रत्येकाला दिला आहे. परंतू जेव्हां आमचाच विचार अधिक योग्य अन् तोच स्विकारला पाहिजे हा अट्टाहास येतो तेव्हां आपसूकच अभिमानाची जागा अहंकाराने घेतली जाते.
सध्या ' हर घर तिरंगा ' ही संकल्पना केंद्र सरकारकडून शासकीय पातळीवर व्यापकपणे राबवली जातीय यात वरवर पाहता काही गैर नाही परंतू आपला राष्ट्रध्वज, आपला तिरंगा हे कशाचे द्योतक आहे तर जगात आपण भारतीय म्हणून एक आहोत अन् आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करणारे प्रतिक म्हणजे तिरंगा. लहानपणापासून १५ ऑगस्ट,२६ जानेवारी हे राष्ट्रीय सण साजरे करणे म्हणजे ध्वजवंदन, जिलेबी खाणं, देशभक्ती गीत लावणे आणि सार्वजनिक सुट्टी या स्वरूपात अनुभवत आलो आहोत अन् practice makes man perfect या धर्तीवर आपल्यात केवळ हे म्हणजेच राष्ट्रप्रेम हे अंगवळणी पडले आहे पण खऱ्या अर्थाने ते रुजलं गेले आहे का याचे आत्मपरीक्षण गरजेचे आहे. अन् सध्या असण्यापेक्षा दिसणं जास्त महत्त्वाचं झालं आहे. धंद्याच्या सुत्रा प्रमाणे ' जो दीखता है वो बिकता है ' मग अशा प्रकारे राष्ट्रभावना जागी (जागृत नव्हे) करण्यात रस असेल तर एक महान राष्ट्र म्हणून अन् त्यासाठी आवश्यक एक सक्षम, जागरूक नागरिक घडवण्यासाठी हर घर आरोग्य, हर घर मुल्य शिक्षण, हर घर संविधान यासाठी शासकीय पातळीवर व्यापकपणे व जोमाने काम होताना दिसत नाही.
असं म्हणतात माणूस हा भावनेने विकला अन् विकत घेतला जावू शकतो मग अशा मार्गाने राष्ट्रभावनेला साद घालून महत्त्वाच्या मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होणार असेल तर देश सुजलाम सुफलाम होणार आहे का? अन् हर जूबाॅं केसरी म्हणत जिथं तिथं थूंकून देश घाण करणाऱ्यां व्यसन बहाद्दरांना तिरंग्यातील केशरी रंगाचे महत्त्व कळणार आहे का?
सद्ध्या समाजातील प्रेरणादायी व्याख्यान अथवा उपक्रमाचं बाजारपेठीय मुल्य पाहता केवळ अशी तात्पुरती उत्साह निर्मिती मुलभूत उर्मी निर्माण करु शकते का? जेव्हां अमृत महोत्सवा निमित्तानं हे होत असताना ७५ वर्षे होऊन देखील मुलभूत गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होणार असेल तर दुरदृष्टी तरी कुठून येणार.
भावनिक हिंदोळ्यावर झुलणाऱ्यांना झुलवत ठेवले की जमिनीवरील वास्तवापासून दूर ठेवणं सोपं जातं मुळातच स्वतःला अन् समाजाला प्रश्न न विचारण्याची मुलभूत शिक्षण व्यवस्था अशा भावनिक बाजारीकरणाला प्रोत्साहनच देणार हे कटू सत्य आहे.
" झंडे की तसबीर तो जहेन ओ दिल में छपी है।
अब देश की तकदीर बदलनाही मेरी हर आरजू की फितरत है। "
नुकतेच महाराष्ट्राच्या राज्यपालांनी एका खासगी कार्यक्रमात गुजराती व राजस्थानी लोकांमुळे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे अन् ते निघून गेले तर मुंबईत काही उरणार नाही अशाप्रकारचे वक्तव्य केले आहे. कदाचित राज्यपालपदा सारखी शोभेची परंतू राजेशाही थाटाची अन् निवृत्तीसाठीची उत्तम सोय असणारी झुल अंगावर पांघरल्याच्या कृतार्थ भावनेतून (उपकाराची परतफेड) सदरची शब्द सेवा घडली असेल किंवा पुढे येणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून गुजराती व राजस्थानी मतदारांचे ध्रुवीकरण अथवा लांगुलचालन करण्याचा उद्देश ठेवून हा शब्द खेळ खेळला असेल.
खरंतर भारतीय संविधानाने कोणत्याही राज्यातील नागरिकांनी देशात कुठेही जाऊन राहण्याचा व काम करुन पैसा कमवण्याचा अधिकार बहाल केला आहे अन् तो रास्तच आहे. परंतू आपण जिथे जातो, राहतो तिथल्या संस्कृतीचा आदर करणे हे अपेक्षित अन् अंतर्भूत आहे हे प्रकर्षाने लक्षात ठेवले पाहिजे.
कोणीही व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने आपली जन्मभूमी मग तो देश असो राज्य असो की शहर ते सोडण्याचा निर्णय आनंदाने नव्हे तर तात्कालिक परस्थिती नुसार घेत असतो. मग जेंव्हा तुम्ही दूसऱ्या शहरात, राज्यात अथवा देशात जाता तेंव्हा तिथल्या लोकांनी, संस्कृतीने, व्यवस्थेने स्विकारल्या शिवाय तुम्ही तिथं रूजू शकत नाही. जसं आपला जिथे जन्म झाला ती आपली जन्मभूमी आपल्याला प्रिय असते अन् ती असली पाहिजेच तशीच ज्या भूमीने तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम अन् उन्नत केलं त्या कर्मभूमी प्रती केवळ सन्मानच नव्हे तर कृतज्ञता देखील असलीच पाहिजे. जसं महाराष्ट्रातील गुजराती, राजस्थानी किंवा कोणत्याही प्रांतातील नागरिकाने आपापल्या मातृराज्यावर प्रेम केलं पाहिजे तसेच तिथल्या अडिअडचणी वेळी त्यांच्या पाठीशी ठाम राहिले पाहिजे अन् आपण जिथे राहतो तिथे फूट पाडणाऱ्या विध्वंसक शक्ती विरूद्ध स्थानिक बांधवांच्या हातात हात घालून प्रतिकार देखील केला पाहिजे याचप्रमाणे जे मराठी बांधव गुजरात, राजस्थान किंवा अन्य कोणत्याही राज्य किंवा देशात असतील त्यांनी आपापल्या कर्मभूमी प्रती मनात सन्मान अन् कृतज्ञता ठेवली पाहिजे अन् वेळप्रसंगी तिथल्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सुखदुःखात ठामपणे उभं राहिलं पाहिजे अन् हीच ज्ञानेश्वरांची खरी वैश्विकतेची शिकवण आहे अन् त्यासाठीच त्यांनी पसायदान मागितले आहे.
या प्रसंगी एक गोष्ट ती कथा आहे दंतकथा आहे माहीत नाही पण सांगावीशी वाटते एकदा काही पारशी लोक भारतात आश्रयासाठी आले तेंव्हा तिथल्या राजाने त्यांच्या समोर दुध आणि साखर ठेवली नंतर त्या पारशी लोकांच्या नेत्याने त्यातील साखर दुधात टाकून ती विरघळवली अन् त्यातून त्याने संदेश दिला की आम्ही आपल्या संस्कृतीत असेच सामावून जाऊ अन् गोडी देखील वाढवू अन् आज आपण पाहतो आहेच होमी भाभा असो की टाटा त्यांनी केवळ महाराष्ट्रात किंवा देशातच कर्तृत्व घडवलं नव्हे तर संपूर्ण जगात भारताचं नाव उज्ज्वल केले आहे परंतू आमच्यामुळे भारताची प्रगती झाली असले अहंकारी,कृतघ्न अन् कोत्यावृत्तीचे वक्तव्य त्यांनी कधीच केले नाही म्हणूनच केवळ महाराष्ट्रीयन म्हणून नव्हे तर भारतीय म्हणून त्यांचा सार्थ अभिमान आहे.
एक गोष्ट सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे केवळ अन् केवळ सत्तास्वार्थ, शुद्र महत्वकांशेसाठी जातपात असो की धर्म, भाषा असो की राज्य अस्मिता अशा मुद्द्यांचा वापर करून नेहमीच वैचारिक दहशतवाद पोसला अन् पसरवला जातो अन् शस्त्रावीना केलेला हा दहशतवादी हल्ला माणसाच्या मेंदूचा ताबा घेत त्यालाच त्याच्या नकळत गुलाम बनवत एकमेका विरूद्ध शस्त्र घ्यायला भाग पाडतो. ह्या वैचारिक दहशतवादाला संपवायचे असेल तर जसे सीमेवर लढणारा सैनिक कोणत्याही जातीचा, धर्माचा, राज्याचा म्हणून नव्हे तर एक भारतीय म्हणून दहशतवादी असो की देशाचा शत्रू त्यांच्याशी प्राणपणाने लढतो त्याच भारतीयत्वाची जाण आपल्या विचारांत रूजवली पाहिजे अन् या वैचारिक दहशतवाद्यांशी लढलं पाहिजे.
जय हिन्द , जय महाराष्ट्र.
खरंच जमाना बदलतोय , खूप फास्ट चाललंय जग , तंत्रज्ञान एवढ्या वेगाने बदलतंय की तो वेग साधनं एव्हढाच आयुष्य जगण्याचा उद्देश राहिलाय का हा प्रश्न सतावतो आहे.
आपण नेहमीच अशाप्रकारच्या चर्चा करत असतो पण माणसाला जोडणारा सोशल मीडिया खरंच आपल्यात सोशल सेन्स निर्माण करतोय का , का तथाकथित समाजप्रिय असणारा माणूस नावाचा प्राणी दुभंगलेल्या मानसिकतेत समाजात वावरताना दिसतोय. तोंडी लावण्यापुरतं प्रबोधन सोडलं तर जो तो तथाकथित आदर्श , दिखाव्याच जगणं सतत मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतो अन् ते दिखाव्याचं आयुष्य म्हणजेच आपली प्रतिमा अन् अशा स्वप्रतिमेत स्वत:ला अडकवून खऱ्या जगण्याचा अर्थ अन् उद्देश आपण विसरत चाललो आहोत.
सध्या इंस्टाग्राम रिल्स किंवा यु ट्यूब शॉर्ट्स वर व्हिडिओजचा जो काही धुमाकूळ चालला आहे तो पाहून जग यापूरतंच मर्यादित आहे की काय अशी शंका यायला लागली आहे. अगदी पाड्यापासून वाड्यावस्त्या पर्यंत अन् गल्लीबोळातील झोपड्यांपासुन बंगल्यातील डायनिंग रूम पर्यंत सगळ्यांना एकाच व्यासपीठावर आणून ठेवणारा समानतेचा हा अनोखा उपक्रमच बनला आहे. प्रत्येकाला अभिव्यक्तीचा अभाव असणारं स्वातंत्र्य व्यक्त करण्याचं जे व्यसन लागले आहे ते दुसरं तिसरं काही नसून सर्व मर्यादा धुडकावून केवळ आपल्या मनात चाललेला थिल्लर चाळा चव्हाट्यावर मांडण्याचा निर्लज्जपणा आहे अन् अशा भंपक गोष्टींना ट्रेन्डच्या नावाखाली माकडासारखे अंधानुकरण करत व्हायरल करण्यात धन्यता मानणारे हेडलेस क्रिएटीव्ह म्हणजे सगळ्यांवर कळस आहेत. फिटनेसच्या नावाखाली स्किन टाईट कपडे घालून केलेले स्वत:च्या आकार उकाराचं प्रदर्शन असो की खाजगी सेक्स लाईफचं सार्वजनिकरण किंवा चेष्टा मस्करीचा बाजार असो यात दडलेली असते विकृती. मनोरंजनाची व्याख्या बदलल्या मुळे केवळ नवी पिढीच नव्हे तर जूनी जाणती खोडं सद्धा जेव्हा एकांतात बसुन टाईमपास च्या नावाखाली हे सर्व कुतुहला पोटी बघत असतात तेव्हा आपसूकच हे आभासी जग आपल्या मनाचा कळत नकळत ताबा घेते मग अशा विकृती कडे 'चालतंय सगळं' म्हणत या गोष्टींचा आपण सहज स्वीकार करू लागतो. मग सारासार विवेकी विचार बोथट होऊन अशा वातावरणात जगण्याची सवय होते अन् आपसूकच मेंदू अशा विकृतीला स्विकृती देतो अन् बघता बघता ती संस्कृती होते अन् कालांतराने याचं रूपांतर परंपरेत होते. आजकालची लग्न पद्धती असो की काडीमोड ( डिव्होर्स ) याचं उत्तम उदाहरण आहे.
समाधानाने जीवन जगण्यासाठी आयुष्य हे उथळपणे नव्हे तर गांभीर्याने घेतले पाहिजे. तेव्हा आपण स्वत:च यापासून दूर राहून इतरांना तसेच नवीन पीढीला मर्यादेत राहण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे कारण म्हातारी मेल्याचं दु:ख नाही तर काळ सोकावता कामा नये अन्यथा विकृती ची स्वीकृती हीच आजची संस्कृती व्हायला वेळ लागणार नाही.
सध्या भोंगा हा विषय धार्मिक का सामाजिक असा वाद चालू आहे परंतु माझं म्हणाल तर भोंगा हा शब्द सर्वात पहिल्यांदा मी माझ्या लहानपणी माझ्या आईच्या तोंडून ऐकला होता ती त्यावेळी ' भोंगा पसरू नको ' अशी म्हंटली होती. तेव्हा मला लक्षात आलं की विनाकारण मोठ्यानं रडत बसण्याला भोंगा पसरणे असे म्हणतात. अन् म्हणून माझ्यासाठी तसा तो व्यक्तिमत्वाशी संबंधित सार्वजनिक आचरणाचा विषय वाटतो.
हा लहानपणीचा भोंगा एखाद्या व्यक्तीचं लक्ष वेधण्यासाठी होता परंतू हल्लीचा हा तांत्रिक भोंगा एका विशिष्ट व्यक्ती समुहाचे किंवा रस्त्यावरच्या गर्दीचं लक्ष वेधून घेण्यासाठी वापरला जातो. बोलण्याच्या बाबतीत आपला विचार कमी अन् आवाज अधिक तर गाण्याच्या बाबतीत आशय कमी अन् आपली आवड अधिक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी अथवा लादण्यासाठी याचा वापर सर्रास केला जातो. एखादं लग्न असो की धार्मिक सण , महापुरुषांच्या जयंत्या आपापल्या उत्साहाचा बाजार अन् उन्माद मांडण्याचा थिल्लरपणा जास्त अधोरेखित होतोय ( आता भोंग्यांना देखील लाजवेल असे डीजे आलेत ). या भोंग्यांनी मशिद , मंदिर अशा प्रार्थनास्थळांवर स्थान मिळवून आपापल्या भक्तीला सार्वजनिक स्वरूप दिले आहे. वास्तविक तुमची नमाज असो की आरती असो ही व्यक्तिगत न ठेवता ती अधिकाधिक समुहाभिमुख करण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं कारण ईश्वर या संकल्पनेशी एकरूप होण्यासाठी विशिष्ट वेळेची किंवा आवाजाची अथवा समुहाची गरज नसते तर सद्विवेक विचारांच्या अनुसरन्याची आवश्यकता असते.
काही ठिकाणी भोंग्याला कर्णा देखील म्हणतात त्यावरून होणारा आवाज कर्णकर्कशचं अधिक असतो. तो केवळ अमुक एक डेसिबल किंवा तमुक एक डेसिबल असला पाहिजे एवढ्या पुरता मर्यादित न ठेवता, असला पाहिजे की नसला पाहिजे याविषयी ठाम सार्वजनिक नियम ठळकपणे स्पष्ट असले पाहिजेत.
आज मात्र सर्वच राजकारण या विषयाने ढवळून निघाले आहे परंतु केवळ सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही जात, धर्म समुहाचे लांगूलचालन न करता तसेच सार्वजनिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष न करता त्याला प्राधान्यक्रम ठेवून कठोर नियमावली तसेच तेवढ्याच कठोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. सध्या नौटंकी वाचाळवीरांच्या भोंग्याच्या गर्दीत जनता जनार्दनासाठी आत्मचिंतन करायला सायलेंट झोन ची नितांत गरज आहे.
खरंतर राजकारण हा सगळ्यांच्या आवडीचा विषय कारण अनोळखी लोकांशी देखील बोलायला सोपा अन् आतल्या गोटातल्या खास बातम्या आपल्याच कानात सांगीतल्याच्या आविर्भावात पोटतिडकीने मत मांडण्याचा विषय तसेच पाठीशी गल्ली ते जग व्हाया दिल्ली असा दांडगा अभ्यास अन् २४×७ बातम्यांचा रतीब तसेच भडीमार याउपर वॉट्स अप विद्यापीठातून सतत होणाऱ्या संदेशवहनाचा प्रवाह यामुळे ज्ञानी कमी अन् माहितगार अधिक झालेला जनसमुदाय.
खरंतर ' जसं राजकारण तसं राजकारणी का जसा राजकारणी तसं राजकारण ' हा संशोधनाचा विषय आहे कारण यासाठी लागणारा मुख्य घटक म्हणजे जनता, तीला विचारतो कोण, तीला केव्हांच गृहित धरले आहे. कारण जनतेला नेमके राजकारण कशासाठी असतं याची कल्पनाच नसते केवळ नेत्यांचा पेहराव, त्यांची छबी , त्यांच्या भोवतालची गर्दी, गाड्यांचा ताफा, त्यांचे आवेशपूर्ण बोलणं असे तथाकथित ब्रॅण्डींगमय नेते याचंच आकर्षण अधिक. सामाजिक मुद्द्यां पेक्षा नक्कल, टर, खिल्ली, शाब्दिक कोट्या किंवा शिवराळ उद्धार, व्यक्तिगत टीका यालाच टाळ्या पिटत शिट्ट्या मारत चेकाळणे यालाच हल्ली भाषण म्हणतात यातून नेमके कुणाचं अन् काय प्रबोधन होतं त्यांनाच ठाऊक ( प्रबोधनकारच घरातल्यांचे प्रबोधन करू शकले नाहीत तिथे इतरांचे काय ) अन् त्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविणारी तसेच ग्राफीक्सच्या माध्यमातून निरर्थक मुद्दे ठळकपणे अधोरेखित करणारी लोकशाहीचे चौथे स्तंभ असणारी प्रसार माध्यमे अर्थात लोकशाही म्हणजे नेमके काय अन् याला चौथा स्तंभ का म्हणतात आणि अन्य तीन स्तंभ कोणते हे बहुतांश लोकांच्या खिजगणतीतही नसेल. अशी माध्यमे जनतेच्या वास्तव प्रश्नांना न भीडता थुकरट लोकांच्या मागे माईक घेऊन धावणारे माध्यमवीर अन् स्टुडिओ तील शब्द बहाद्दर ' यांनी जोरदार प्रहार केला त्यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले , यांनी शाल जोडा मारला त्यांनी टोला लगावला, यांचा ह्यो बाणा त्यांची ती शैली, अमक्या ने इशारा दिला अन् तमक्या ने अल्टीमेटम दिला ' अशाप्रकारे आडमार्गाने लोकांच्या मनात त्यांची छबी बनवत असतात.
या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे राजकारणाचा दर्जा घसरून ते केवळ बालीश मनोरंजन अन् टिव्ही न्यूज चॅनल हे बाष्कळ मनोरंजनाचे माध्यम झाले आहे.
वास्तविक सध्याचे निर्माण झालेले सामाजिक प्रश्न, आर्थिक परिस्थिती राजकीय सत्तेच्या माध्यमातून सोडवणे यासाठी सत्ताधारी पक्ष अन् ते व्यवस्थित सोडविले जातात का हे पाहण्यासाठी तसेच सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्ष अन् या दोन्ही पक्षांकडून दुर्लक्षित, पिचलेला, हतबल, तळागाळात खितपत पडलेल्या घटकांचा आवाज बनण्याची जबाबदारी सर्व प्रसारमाध्यमांची असणे हे लोकशाहीत अपेक्षित असते.
परंतू देशाची क्रयशक्ती असणारी तरूणाई अन् जगात सर्वाधिक तरूणांची संख्या असणारा देश अन् याच्या भरवशावरच जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न दाखवणारी राजकारणी मंडळी अन् स्वप्न बघणाऱ्या तरूणांची अवस्था ही भरवशाच्या म्हशीला टोणगा ठरणारी आहे. कारण ज्या पद्धतीने मोबाईलमय झालेली तरूणांची संख्या अन् क्रीएटिव्हीटीच्या नावाने चाललेला थिल्लरपणा, तरुणींचं अंगप्रदर्शन, लोप पावत चाललेलं सामाजिक भान, शिक्षणाविषयी निर्माण झालेली अनास्था, छानछोकी राहणीमान, खाऊगल्ली तील मांदियाळी, झटपट श्रीमंत होण्यासाठीची धडपड या अन् अशा अनेक सामाजिक समस्या आवासुन उभ्या राहिल्या आहेत. अशा तरूणाईला दिशा देण्याचे काम राजकारणी मंडळींनी करण्याची आवश्यकता असताना कोणत्याही मुलभूत प्रश्नाला हात न घालता केवळ भावनिक व धार्मिक विचार मनावर ठसवण्याचा उद्योग सुरू आहे अन् यातच अधिकाधिक गुंतवून ठेवण्यासाठी व एकांगी, कट्टर विचारसरणी निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमी जल्पकांच्या टोळ्या यासाठी रसद पुरवीत आहेत. वास्तविक कोणत्याही महापुरुषांच्या विषयी तथ्याधारीत पुस्तके व धार्मिक ग्रंथ याचे अपवाद वगळता कसल्याही प्रकारच्या वाचनाची वानवा असताना चित्रपटात दाखवण्यात आलेल्या रोमांचक प्रसंग अन् जोडीला साऊंड अन् व्हीज्युल इफेक्ट्स चा प्रभावामुळे भारावलेला अन् वैचारिक ध्रुवीकरण करणाऱ्या नेत्यांच्या भडकाऊ भाषणबाजीला भूललेल्या तरूणाईला थांबविणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. कोणतेही सण असो किंवा महापुरुषांच्या जयंत्या यांचे निमित्त करून या तरुण तरुणींचे जथ्थेचे जथ्थे रस्त्यावर उतरवून मिरवणुकीच्या नावाखाली अर्वाच्य घोषणाबाजी, तथाकथित नेत्यांचा जयघोष, डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर बेधुंद होऊन थीरकणारी तरूणाईला बघितल्यावर मनात सल निर्माण करणारा विरोधाभासच अधोरेखित होतोय. महापुरुषांच्या वेशभूषेची किंवा केशभूषेची नक्कल करण्यात अभिमान अन् धन्यता मानणारा तरूण वर्ग आणि जोडीला पारंपरिक पद्धतीने साडी, फेटा व गॉगल घालून बुलेट वरून रॅली काढण्यात धर्माभिमान बाळगणाऱ्या तरूणी हे प्रकर्षाने दिसणारे दृश्य वैचारिक दृष्ट्या महापुरुषांच्या खऱ्या चरित्राच्या जवळपास देखिल पोहचतात का हा खरा कळीचा मुद्दा आहे. सद्ध्या केवळ मोहक अन् भपकेबाज सादरीकरणाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे तेव्हा तात्पुरता जोश व्यवहारिक जगात कधी गळून पडतो समजत देखील नाही.
एकाच वेळी अनेक कामे करण्याची ( मल्टीटास्कींग ) कसरत करण्यापेक्षा बहुआयामी व्यक्तिमत्व बनण्याची जबाबदारी सर्व तरूणाईने घेतली पाहिजे. त्यासाठीचा उत्तम वाचनाचा व्यासंग, स्वावलंबन, शिस्त, स्वतंत्र विचार करण्याची सवय ह्या गोष्टींची आवश्यकता आहे. मेंदू गहाण ठेवून केवळ मेंढरा सारखे कुणाच्याही मागे जाणार असू तर आपलं मत अन् पर्यायाने आपलं भविष्य त्यांच्या हातात असणार आहे हे ध्यानात ठेवावे लागेल अन् त्यासाठीच आजच्या तरूणाईने दिशाभूल व दिशाहीन राजकारणा ऐवजी आश्वासक व दिशादर्शक राजकारणाचा आग्रह धरला पाहिजे तरच तरूणांच अन् पर्यायाने देशाचं भवितव्य उज्ज्वल असेल.
लातूर जिल्ह्यातील चापोली येथिल एका विद्यार्थ्याची बातमी वाचली अन् काळजात चर्र झालं. हा विद्यार्थी दहावीत शिकत असून मंगळवारी त्याचा मराठीचा पेपर होता परंतू मंगळवारी पहाटे त्याच्या वडिलांचे निधन झाले अन् त्याच्यावर अक्षरशः दु:खाचा डोंगर कोसळला. एकीकडे वडिलांचा मृत्यू अन् दुसरीकडे दहावी सारख्या महत्त्वाच्या वर्षाची परिक्षा अशी अतिशय मन व मेंदु सुन्न करणाऱ्या द्विधा मनस्थितीत असताना नातेवाईकांच्या आधाराने आधी पेपर देण्याचा अन् पेपर झाल्यावर वडिलांचे अंत्यसंस्कार करण्याचा अतिशय खडतर आणि निर्णयक्षमतेची कसोटी पाहणारा निर्णय घेतला. डोळ्यात अश्रू अन् हातात लेखणी धरुन शिक्षणाची पर्यायाने पाठबळ गमावलेल्या आयुष्याची लढाई लढण्याचं मानसिक बळ तो दाखवू शकला हीच गोष्ट अधिक महत्त्वाची आहे.
सध्या शिक्षणाचा ऑनलाईनने झालेला खेळखंडोबा अन् सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे एकंदरीतच शिक्षण क्षेत्राविषयी निर्माण झालेली अनास्था या पार्श्वभूमीवर असे काही तरी घडते हे शिक्षणाचा जीवनावश्यक पैलू अधोरेखित करतो. नाहीतरी शिक्षणापेक्षा हिजाब महत्त्वाचा मुद्दा करणारे राजकारण अन् अशा राजकारणाला बळी पडणाऱ्यांचे सत्कार समारंभ या शिक्षणाच्या दृष्टीने निरर्थक विषयाला चपराक मारणारे काम हे या विद्यार्थ्याने त्याच्या कृतीने सिद्ध केले आहे. हीच शैक्षणिक आस्था खऱ्या अर्थाने सर्व समाजात निर्माण होवो अन् सर्व समाज सुसंस्कृत अन् प्रगल्भ होवो हीच सदिच्छा..
मी मराठी...🚩
आपण आपल्या भाषेबद्दल आग्रही नसेल तर इतर लोक आपल्याला गृहीत धरणारचं. भाषा हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक असते. जगात १० व्या क्रमांकावर बोलली जाणारी आपली माय मराठी हिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण तांत्रिक प्रयत्न करण्याची आवश्यकता निर्माण का झाली अन् केवळ तो मिळाल्यामुळे अनुदान मिळणे हे उद्दिष्ट साध्य होईल ही पण भाषा समृद्ध कशी होईल यासाठीचे चिंतन आवश्यक आहे. मला असे वाटते की आपण इतर कोणत्याही भाषेचा दु:स्वास न करता मराठी भाषा व्यवहारात वापरताना आग्रही राहिले पाहिजे. मराठी भाषा दिनानिमित्त आपणा सर्वांना मराठीचा केवळ वापरच न करता आग्रह धरण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा..!
काही व्यक्तीं विषयी लिहिताना लेखणी बोथट होते अशीच एक व्यक्ती म्हणजे लता मंगेशकर या नावाने तमाम संगीत विश्वाला खासकरून गायन क्षेत्राला जवळपास नऊ दशकं गारूड घातलयं. आज त्यांचे देहावसान झाले अन् दैवी स्वर अंतर्धान पावले परंतू अजरामर सुर प्रत्येकाच्या मनात कायमच गुंजन करीत राहतील. त्यांच्या गायना बद्दल बोलण्या इतका माझा अभ्यास नाही. त्या क्षेत्रातील दिग्गज जिथे मंत्रमुग्ध होत अबोल होतात तिथे आपण काय बोलणार परंतू मला त्यांची गाणी ऐकताना जाणवणारी गोष्ट म्हणजे इतर सर्व गायकांप्रमाणे त्यांचा चेहरा कधीही डोळ्यासमोर येत नव्हता तो त्या गाण्यात एवढा एकजिनसी होत असे, जसे की पाणी. पाण्याला आपण जीवन म्हणतो तसं ते गाणं जीवनाचा अविभाज्य घटक बनुन जाते अन् हीच त्यांची खासियत होती त्यामुळेच त्यांचे स्वर खऱ्या अर्थाने दैवी होते. हा स्वर कुणाच्या ना कुणाच्या रुपाने पुन्हा जन्माला यावा अन् सर्वांना मनस्वी समाधान मिळावे हीच भावना व्यक्त करीत त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.
आधुनिकता ते आधुनिक तंत्रज्ञान आणि त्याची साधनं यांच्या व्याख्या इतक्या सहजपणे अन् झटपट बदलतायत की मोबाईल ही केवळ गरज राहिलेली नसून तो जीवनावश्यक मुलभूत घटक बनला आहे. आजच्या तरूणाईंचच नव्हे तर सर्व वयोगटातल्या व्यक्तिंचे भावविश्व याने व्यापून टाकले आहे.
मोबाईलवर असणाऱ्या अनेक ॲप्स पैकी बहुतांश ॲप्स मन रिझवण्याचं खरंतर टाईमपास करण्याचा सोपा मार्ग या नावाखाली वापरली जातात. सुरवातीला आपण वापरत असलेली ॲप्स AI technology चा धुर्त व चाणाक्ष वापर करून कधी आपल्या मनाचा अन् अपरिहार्यपणे मेंदूचा ताबा मिळवतात ते आपल्या गावीही नसते.
सध्याच्या इंस्टाग्राम रील्स, युट्युब शॉर्ट्स च्या व्हिडिओं वर नजर टाकली तर लक्षात येते की थिल्लरपणाचा एवढा सुळसुळाट (sorry सध्या आजारासाठी वापरणाऱ्या viral शब्दाला वेगळीच प्रतिष्ठा आहे) झालाय की ते सामान्य गोष्ट झाली आहे आताच्या भाषेत trending असते मग कोणीही उठतो वाकडी मान करून मैं झुकेगा नहीं सालाss म्हणत वाकडा-तिकडा चालत creativity ची खाज भागवतो. योगा, जीम, नृत्य याचा आधार घेत काही तरूणी ते वय वाढलेल्या तरूणी यांनी तर ताळतंत्रच सोडले आहे शरीर केवळ अन् केवळ प्रदर्शनासाठीच असते अन् तोच एकमेव लक्ष वेधून घेण्याचा व प्रसिद्धी मिळवण्याचा सोपा मार्ग आहे याबद्दल त्या इतक्या ठाम असतात की त्यांच्या आत्मविश्वासाचं रूपांतर boldness मधे परावर्तित होतं. मोकळेपणा आणि नग्नता यातील मुलभूत फरक न समजल्यामुळे मोकळा ढाकळा स्वभाव असण्यापेक्षा मोकळ्या ढाकळ्या अंगाचा स्वत:हून बाजार मांडत स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे या पुरुषी मनोवृत्तीला दुजोरा देतात भविष्यात स्ट्रिपिंग क्लब राजरोसपणे सुरू होतील अन् तिथे महिला प्रेक्षकांची संख्या लक्षणीय असेल. मग नंतर victim card खेळून काय उपयोग.
गोबेल्स निती नुसार एखादी गोष्ट वारंवार अन् वेगवेगळ्या लोकांकडून अनुकरणच नव्हे तर अंधानुकरण केली गेली की त्याला सहज मान्यता मिळते अन् बघता बघता त्याचं रूपांतर प्रथे मधे होते. मग अश्या कुप्रथा विकृतीला खतपाणी घालत सामाजिक ओळख मिळवून देतात.
खरंतर जास्त चिंताजनक बाब कोणती असेल तर ती म्हणजे वरील मंडळीच तिरंगा फडकवत जयहिंदच्या घोषणा देत देशप्रेमाचे दर्शन घडवतात तर कधी गणेश जयंतीच्या, ईदच्या भक्तीभावाने शुभेच्छा देतात तर कधी गड किल्ल्यांचा इतिहास जागवत शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचं मिरवतात. अश्या तुकड्या तुकड्या विचारात जगणारे कोणतीही विचारधारा अखंड अवलंबू शकत नाहीत केवळ वैचारिक गोंधळ घालून स्वत:ला खोटं समाधान देतात. असे तुकडे जोडून कोणतीही कोलाज कलाकृती निर्माण होऊ शकत नाही केवळ विरोधाभास अधोरेखित होतो. बहुआयामी असणे अन् बहु प्रतिमेत अडकणे यात मुलभूत फरक असतो, असे तुकड्या तुकड्यातील विचार व्यक्तीला छिन्न मानसिकतेचे म्हणजे स्किझोफ्रेनियाचे रुग्ण बनवू शकतो. तेव्हा आभासी जगातून निर्माण झालेली विरोधाभासी मानसिकता तुमच्या निरोगी आयुष्याला ग्रासून टाकण्या आधीच viral व trending पासून सावध राहा आणि सुरक्षित रहा.
म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये अशी एके काळच्या मराठी भाषेत म्हण होती परंतू हल्ली त्याचा मतितार्थ जास्त महत्त्वाचा आहे. कारण वर्तमानात घडणाऱ्या बातम्या बघितल्यावर नेमके हेच प्रतीबिंबीत होतंय अन् याचा प्रत्यय प्रकर्षाने येतोय.
एका आईने स्वतःच्या १३ वर्षाच्या मुलीला मोबाईलच्या अती वापरावरून सातत्याने होणाऱ्या वादातून स्वतःच्याच ११ वर्षाच्या मुला समोर कायमचं संपवलं आणि या प्रकाराने चिडलेल्या मुलाने आपल्या आईला भोसकून ठार केले.
एका अल्पवयीन मुलाने आपल्या अल्पवयीन बायकोला मोबाईलसाठी दुकानदाराला विकले.
एका सहा वर्षे वयाच्या मुलीला ८,१०,११ वयोगटातील तीन मुलांनी मोबाईल मधिल पॉर्न क्लिप जबरदस्तीने दाखवण्याचा प्रयत्न केला अन् तीने या गोष्टीला नकार दिला म्हणून तीला दगडाने मारून टाकले.
या सर्व घटना नेमके काय प्रतीबिंबीत करतायंत सध्याचे पालक मुलांच्या मोबाईल व्यसनाधिनतेला अक्षरशः कावलेत अन् त्यासाठी ते इतकं टोकाचं पाऊल उचलतायत की अख्खं कुटुंबं त्यात उध्वस्त होतायंत दुसरीकडे आपल्या अल्पवयीन मुलांची लग्ने लावून आपले वैचारिक बुरसटलेपण अधोरेखित करताना डिजीटलायजेशन व आधुनिकतेच्या नावाखाली त्यांचीच मुलं ' बायको नको पण मोबाईल हवा ' असं म्हणतायत. तर तिसरीकडे या ८-१० वर्षाच्या मुलांकडे पॉर्न क्लिपने भरलेले मोबाईल असतात अन् पालकांना त्याची फिकीर नाही किंबहुना स्वतःच्याच तथाकथित मनोरंजनासाठी पालकांनीच तो संग्रह जपून ठेवलेला असेल. नैसर्गिक बहर येण्या आधीच पोक्त पणाचं कोमेजलेपण लादलं गेले की नैसर्गिक खुजेपण अटळ आहे.
या बातम्या आपण केवळ अपवाद म्हणून पाहत असू शकतो परंतु ज्या पद्धतीने व वेगाने आधुनिकतेच्या नावाखाली नैतिकतेचा ऱ्हास होतो आहे ते पाहता हाच नियम होण्याचा धोका अधिक संभवतो.
मग प्रश्र्न असा पडतो की यात चुक नेमकी कशाची व कुणाची तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बेसुमार प्रगतीची का केवळ कुणाच्या तरी दुनिया मुठ्ठी मध्ये घेण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी इनकमिंग ते रोजचा दिड-दोन जीबी डाटा मोफत वाटण्याच्या धोरणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या सरकारची.
तंत्रज्ञान विकसित झाले की स्वाभाविक व सहाजिकच माध्यमं देखील बदलत जातात. परंतु कोरोना च्या पार्श्र्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगच्या नावाखाली ऑनलाईनचा जो सोपस्कार पार पडला गेला त्यात शिक्षण व्यवस्थेचे किती भल झालं अन् विद्यार्थ्यांचा कोणता शैक्षणिक विकास झाला हा संशोधनाचा विषय आहे. सरकारी नाईलाजास्तव माकडाच्या हाती मात्र मोबाईल रूपी कोलीत दिलं गेलं हे नक्की. त्यातूनच वेब सिरीजच्या नावाखाली वारंवार अन् सहज उपलब्ध होणारा व्याभिचार , हिंसा व अर्वाच्य शिव्याने बरबटलेले संवाद नैतिकतेची व्याख्या बदलतायत अन् हेच सत्वहीन पोषण अंगवळणी पडते आहे. एखाद्या सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यासोबतच त्या तंत्रज्ञानाचा गैरवापर व समाज व्यवस्थेवर होणारे दुरगामी दुष्परिणाम यावर धोरण राबवणाऱ्या जबाबदार यंत्रणांनी जास्त सजग असलं पाहिजे.
रिकामटेकड्या मनाला या तांत्रिक सुकाळाची जोड फार मोठा वैचारिक दुष्काळ निर्माण करत असताना तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र असून त्याची फिकीर सरकार नामक यंत्रणेला नसेल अन् ती उदासीन व सुस्त असेल अन् निसर्ग आपल्याला नेहमीच संकटाची चाहूल देत असतो पण आपण मात्र झापडं लावून निसर्गालाच लहरी, तऱ्हेवाईक म्हणणार असु तर आपल्या सारखे करंटे आपणच. हा मोबाईल मॅनिया आपल्या तथाकथित भविष्याला गिळंकृत करीत असताना हताशपणे बघत बसण्यापेक्षा सुजाण नागरिकांनी जागृत होऊन समाजाला जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने प्रयत्न केले पाहिजेत.
खरंतर आयुष्य म्हणजे प्रत्येक क्षण स्वतःला बदलत जाणे त्यामुळे प्रत्येक क्षणाला काही ना काही शिकतच असतो पण लक्षात किती अन् कसं ठेवतो ते महत्त्वाचे व या प्रक्रियेचे सार म्हणजे आपल्याला असणारी जाणीव.
कोरोनाच्या महामारी ने मला काय शिकवलं याचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जिवंत आहोत यापेक्षा जगात महत्त्वाचं (आपल्या दृष्टीने) असं काही नाही.आपल असणं हे देखील अनिश्चित अन् शाश्वत सत्य आहेच पण आपण सारखं विसरतो तेव्हा रिमांयडर फ्राॅम यमलोक पण विशेष म्हणजे आपण आपलं असं जे काय व्यक्तीगत स्वातंत्र्य समजतो तसं देखील काही नसतं.आपण कृती न करता केवळ प्रतिक्रियात्मक जगत असतो.जस जशे अनुभव वाढत जातात तस तशे निष्कर्ष देखील बदलतात अन् ही प्रक्रिया कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर अपुर्णच राहते.
आपल्याला सुखी राहायचं असेल तर एकतर अज्ञानी रहा किंवा निर्भीडपणे स्विकारा. आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीचा स्विकार करण्याचं ठरवतो तेव्हा आपण चिंतनशील होत त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे.ज्या षडरिपूने ( राग,लोभ,मत्सर,द्वेष,भीती व चिंता ) आपण निसर्गतः व्यापलेले आहोत तेच आपल्या सर्व समस्येचे मूळ आहे किंबहुना आपल्या सतत चालणाऱ्या विचारचक्राला हेच षडरिपू प्रेरीत करत असतात. अन् यातूनच स्वतःच निर्माण केलेल्या समस्येच्या भ्रमरूपी जाळ्यात गुरफटत जात जगण्याचं सुख, समाधान हरवून बसतो.
आपण वरवर समानतेचा पुरस्कार करतो परंतू आपले सुख, समाधान आपण असमानतेतच शोधत असतो. सातत्याने तुलनात्मक दृष्टीने जगाकडे पाहत स्वतःचीच मनःशांती आपण गमावून बसतो. निसर्गाने निर्माण केलेल्या जीवसृष्टी कडे आपण तुलनात्मक दृष्टीने न पाहता जसं वैविध्यपूर्ण माध्यमातून पाहतो तोच दृष्टीकोन मानवाने इतर मानवा संदर्भात अंगिकारला पाहिजे.
सदगुरु वामनराव पै यांनी सांगितलेल्या दोन गोष्टी मला या समस्येच्या निराकरण करण्यासाठी उत्तम पर्याय वाटतो. एक म्हणजे " तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार " आणि त्यांनी सांगितलेली विश्वप्रार्थना " हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे."
या दोन गोष्टी मनापासून आत्मसात केल्या तर आपण या षडरीपूं पासून अलिप्त राहून चांगले कर्म करण्यास प्रवृत्त होत एक चांगलं व्यक्तिमत्त्व अन् पर्यायाने चांगला समाज निर्माण करता येईल.
आज १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खरंतर हा विषय मांडायला कुठल्याही औचित्याची गरज असता कामा नये परंतू सध्या सर्वजण अन् सर्व क्षण हे उर्त्स्फुत, सहज न राहता उत्साह पुरक अन् ठरवून घडवलेले असतात (म्हणूनच ते अधिक सत्वहिन, मुल्यहिन व बनावटी असतात) अन् अशावेळीच कुठल्याही भावना ओथंबून येतात म्हणूनच पोकळ जय घोष अथवा अभिवादन न करता काहीतरी वैचारिक मंथन व्हावे या उद्देशाने आजचा हा लेखन प्रपंच.
मुळातच कुठल्याही राष्ट्रपुरुषांच्या जीवन कहाण्या बघितल्यावर एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत केलेला वैयक्तिक संघर्ष अन् त्यातून निर्माण झालेल्या वैचारिक प्रगल्भतेतून इतरांसाठी उभारलेली क्रांती मग ज्ञानेश्वरांनी भोगलेला स्वसामाजिक बहिष्कार असो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अनभुवलेले धर्माधारित पारतंत्र्यातील जुलुमशाही किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनुभवलेला वर्णव्यवस्थेने माणूस म्हणून हिरावून घेतलेला जगण्याचा अधिकार सगळ्याच बाबतीत एकच गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे एखादाच अशक्य वाटणारे जीवीत कार्य करुन ठेवतो अन् इतरांनी ते अधिक पुढे नेणे तर दुरच पण एवढा काळ लोटूनही जे निर्माण केले ते टिकवून अंतिम स्तरापर्यंत झिरपवणे सुद्धा एक स्वप्नच राहिले आहे अन् याउपर ते पुर्ण करण्यासाठी यांनीच पुन्हा जन्माला यावे अशी विसंबून राहण्याची बेजबाबदार मानसिकता.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला काही एक कायदेशीर अधिकार दिले आहेत परंतू त्याचा आपल्या सोयीनुसार वापर करून घेतला की निवांतपणे आपापल्या उद्योगात रममाण व्हायचं परंतू बाबासाहेबांनी ज्या उद्देशाने वंचितांसाठी लढा उभा केला ते प्रत्येकजण मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा असो आपापले जीवन जगताना त्या संवेदनशीलपणे ते अवलंबताना दिसतो का मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही पदावर काम करत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्याही जातीधर्माचा एखादा रंजलेला, गांजलेला अथवा गरजू व्यक्ती आल्यास तुम्ही त्यांच्याशी कशाप्रकारे वागता यावरच तुमच्या विचारधारेत त्या त्या राष्ट्रपुरुषांचे किती अन् कसे विचार रुजलेत हे अधोरेखित होते.
आपल्या जनुकातून तसेच अनुभवातून आपल्या मेंदूत द्वेषाधिरीत आपला अन् परका असे विभाजन करणारी रेषा अस्तित्वात असते अन् कोणतेही शिक्षण अथवा राष्ट्रपुरुषांचे चरित्र ती रेषा पुसण्या ऐवजी अधिक ठळक करीत असेल तर ते त्या त्या व्यक्तींचे कोतेपण. जर आपल्याला एक चांगलं कुटुंब, चांगला समाज अन् पर्यायाने चांगला देश घडवायचा असेल तर आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगात कोणत्याही जातीचा, धर्मांचा, वर्गाचा पुर्वग्रहदुषित द्वेष न करता निरपेक्षपणे सहकार्याची व उद्धाराची भुमिका घेतली पाहिजे तसेच राष्ट्रपुरुष हे कोणत्या समुहाचे नसुन प्रत्येक व्यक्तीच्या वैचारिक प्रबोधनाचे प्रेरणास्रोत असतात हा समज असेल तरच आपल्या राष्ट्रपुरुषांच्या स्वप्नातला समाज निर्माण करता येईल.
काही अति भावनिक व एकांगी विचार असणाऱ्या लोकांना माझे विचार आवडणार अथवा पटणार नाहीत परंतू एखाद्या घटनेची दुसरी बाजू मांडावी असे मला वाटते म्हणून.
तर नुकतीच वन अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली तसेच त्यांनी यासाठी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या वरीष्ठांच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य केले असल्याचे लिहिलं आहे. खरंतर हे सर्व दुर्दैवी आहे. परंतू मतभेद, वाईट किंवा मनाविरुद्ध वागणूक जगण्याच्या प्रत्येक धडपडीत सामावलेली आहे त्यासाठी एवढे टोकाचं पाऊल उचलणारी व्यक्तीचं किंबहुना तीचे सारासार विचार न करण्याची बुद्धी यासाठी अधिक जबाबदार आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षा देता समाजात ऐट, रूबाब असणारं एखादं अधिकाराच पद मिळवता अन् सगळं झालं असं तुम्हाला वाटतं परंतू निवडलेल क्षेत्र, त्याठिकाणी असणारे कामाचे स्वरूप, तिथं असणारा अनेक प्रकारचा हस्तक्षेप, ताण-तणाव तसेच सरकारी कामाच्या कार्यालयीन मर्यादा यातून आपला ठसा उमटवणारं आदर्श काम करणे या सगळ्या गोष्टींचा कितीसा विचार झालेला असतो. त्यातच महिला म्हणून दया भाव अन् विशेष कौतुक यांची शिदोरी तसेच माध्यमातून डॅशिंग, लेडी सिंघम अशा बिरूदावल्या देत दिलेली वारेमाप प्रसिद्धी अन् ती कनिष्ठ अधिकाऱ्याची असेल तर वरीष्ठ अधिकाऱ्यांना बोचणारं हा वास्तव मनुष्य स्वभाव (अर्थात माध्यमं देखिल अशा बातम्या दाखवून आम्ही कसे स्त्रीवादी आहोत हे दाखवण्यासाठी उतावळे असतात भले त्यांच्या क्षेत्रात किंवा सहकाऱ्यांची मुस्कटदाबी होत असते तेव्हा मुग गिळून गप्प राहणं पसंत करतात ) या सगळ्या गोष्टींचा परिणाम स्वतःच्या नैसर्गिक व्यक्तिमत्वापेक्षा अहंकारावर अधिक होतो अन् त्यामुळेच सारासार विचार न करता स्वतःच्या जीवनापेक्षा नोकरी जास्त प्रिय वाटते. दिपाली चव्हाण यांचे पती देखील सरकारी सेवेत आहेत म्हणजेच आर्थिक आधार असताना एकतर नोकरीच्या ठिकाणी तात्त्विक संघर्ष करावा अथवा जीवनात करण्यासाठी असंख्य पर्याय शोधावे त्या ऐवजी नोकरी सारख्या एका शुल्लक पर्यायासाठी तुम्ही तुमचं आयुष्य उधळून लावता याचाच अर्थ तो अधिकाराचा रुबाब अधिक मन व्यापतोय. माझ्या असं वाचण्यात आले की त्या गर्भवती होत्या जर ते खरं असेल तर मग जन्माला येणाऱ्या जीवाची देखील काहीही पर्वा वाटत नसेल तर तुम्ही आई व्हायचा संवेदनशील निर्णय घेताच कशाला.
खरंतर आत्महत्येला प्रवृत्त करण्याजोगे कुणी प्रयत्न केले असतील तर त्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे परंतू केवळ या गोष्टीचा बभ्रा करण्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मनाचं संतुलन न ढळू देता आपापले काम उत्तम करण्याची वृत्ती रुजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अन् असे प्रयत्न करणारेच खरे डॅशिंग व सिंघम असतात.