सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५

पिरमाची माधुरी...!

 






माधुरीच्या पिरमात पडणारी मंडळी ह्यो ईषय काय नवीन नाय त्यो गजगामिनी फेम फिदा हुसेन बी सगळ्यास्नी माहीत हाईच पण आमची ही माधुरी लई येगळं प्रकरण हाय एकदम ईषय हार्ड... 

अब्जाधीश बापाच्या बेण्याचा हट्ट पुरवायच्या नादात...नाद बी केला त्योय बी कुणाचा.. आयाया... कोल्हापूरकरांचा इथं कुस्तीचं मैदान आसूदे नाय तर इथल्या मातीतला ईषय आसुदे कोण बी जाहागीरदार आडवा आला की चितपट करत आसमान दाखवणार म्हणजे दाखवणारच ईषय गोल..

ती नव्ह आमच्या काळजातली माणसं आसू दे नाय तर गाड्याघोडं एकदा का मनात बसलं की इथं त्याच्यासाठी काय पण असतय मग फायदा नुकसानीचा हिशोब नसतोय असतं ती फक्त पिरेम..

आमच्या माधुरीला नुसती हत्तिन समजून कोर्टाचा कागुद दाखवत वनताऱ्यात नेण्याचा ज्यो कपटीपणा क्येलाय त्यो डोस्क्यात ग्येलाय त्यांच्या बाजूनं पैशान ईकत घेतलेला काळा कोट आसू दे नाय तर सरकार ह्ये कोल्हापूर हायं बघितलय नवं इथं येक आवाज टाकला की पाच पाच लाख लोकं रस्त्यावर उतरायलायत. आमच्या साठी ती नुसती हत्तिन नव्हं महादेवी हाय अन् हिथं खुद्द आंबाबाई पाठीशी असतीया ह्ये इसरू नका.

जरा त्या आंबानीसनी बी कळाय पाहिज्ये पैशानं सगळं ईकत घेता यत नाय ज्या पैशानं ईमेजी उभी क्येलायती त्या असल्या नको त्या उद्योगा पायी डॅमेजी होत्याली हिथं सगळच ब्रॅन्ड असतया मग पायताण असलं तरी जगात भारी कोल्हापूरी...

रां... गप गुमान माधुरीला मागं धाडा  ईषय लय इस्कटायला लावू नका नाय तर खटक्यावर बोट जाग्यावर पलटी..

संदीप महामुनी, कराड.


रविवार, ६ जुलै, २०२५

प्रभामंडळ स्वरुप वारी...!



वारी अन् वारकरी महाराष्ट्राचं अन् अर्थात मराठी माणसांचं एक अजब रसायन आहे. वारीत प्रतिबिंबीत होणारा महाराष्ट्र अन् प्रत्येक वारकऱ्यामध्ये प्रतिबिंबीत होणारा मराठी माणूस हीच खरी ओळख आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीची. वारीत जाणारे वारकरी अन् वारकऱ्यांमुळे बहरणारी वारी म्हटलं की  विठ्ठल नामाचा गजर ऐकू येतो अन् आपसूकच विठ्ठल नामाची गोडी लागू लागते.


संत विचारांची मांदियाळी जिथं जमते तिथं वारी सुरू होते.

अहंकार जिथं संपतो तिथं वारी सुरू होते. 

भेदभाव जिथं संपतो तिथं वारी सुरू होते. 

जिथं चराचरात सामावलेल्या परमेश्वरा बद्दल कृतज्ञता निर्माण होते तिथं वारी सुरू होते. 

जिथं विठ्ठल भेटीची ओढ लागते तिथं वारी सुरू होते. 

प्रत्येक माणसात जेव्हां बा विठ्ठल माऊली दिसू लागतो तेव्हां तिथं वारी सुरू होते. 

अन् पुढच्या वारीची ओढ जिथं लागते तिथं वारी पोहोचते.

हे न संपणारं रिंगण अन् प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचणारी वारी हे वारकऱ्यांच्या पुर्णत्वाचेच प्रतिक आहे अन् खऱ्या अर्थाने विठ्ठला भोवती असलेल्या प्रभामंडळाचेच स्वरुप आहे.

संदीप महामुनी.





बुधवार, ३० एप्रिल, २०२५

राष्ट्रनिष्ठा...!



लढेन मी शस्त्रानेच, पण शस्त्रविवेक न सोडता

मोडेन मी कायदा ही, न्यायाच्या प्रतिष्ठेसाठी

हिंसा घडेल, हिंस्त्रहिंसकाच्या नाशासाठी

आम्ही होऊ धर्मवेडे, धर्मवेड्यांच्या संहारासाठी

होऊ थोडे असंस्कृत, संस्कृतीच्या रक्षणासाठी

जे या मातीत राहतात, त्यांनी या मातीवर प्रेम करायला शिकायला हवं

कारण

ही मातीच तुम्हाला अन्न देते

तुमच्या श्वासांना प्राणवायू देते

आपल्या लेकरांनी चालवलेल्या नांगराच्या फाळांनी, ती आपला उर चिरुन घेते

आणि परत देते पेरलेल्या तरेख दाण्यागणिक हजार दाणे

म्हणूनच

तिने न मागता तुम्ही तीला द्यायला हवी

निष्ठा

ज्यांना राष्ट्रनिष्ठा मान्य नसेल त्यांनी हे राष्ट्र सोडायला हवं....

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४

पुतळा उभा राहिल पण विचारधारेचे काय....!

 

खरंतर एक वाईट घटना घडली सिंधुदुर्ग येथील केवळ नऊ महिन्यांपूर्वी नौदलाने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. अर्थात कारण नैसर्गिक आहे.

परंतू मला वैयक्तिक या घटनेचं वाईट वाटले पण त्या पेक्षाही समाजात ढासळलेली नैतिकता अन् वैचारिक अधःपतन अधिक क्लेशदायक आहे असे वाटते. आपण पुतळ्यांच्या नावाखाली सर्वच महापुरुषांना प्रतिकात्मक सोपस्काराच्या प्रथा परंपरेत अडकवून त्यांच्या विचारधारेचे धिंडवडे काढलेत अन् ते मुकाटपणे उभे राहून हतबल व हताशपणे पाहत राहण्याशिवाय त्या पुतळ्यांना गत्यंतर उरले नाही यापेक्षा अधिक दुःखदायक काय असू शकेल. 

वास्तविक गावोगावी अन् गल्लोगल्ली महापुरुषांचे नुसते पुतळे उभे करून आपण काय साध्य केले हा समाज म्हणून आपण स्वतःला प्रश्न विचारणार आहोत का, का केवळ उपऱ्या जयंत्या अन् पुण्यतिथ्या साजऱ्या करत धुडगूस घालत उन्मादक उत्सव साजरे करणार आहोत. इतिहासातून जी वैचारिक प्रेरणा व दूरदृष्टी आपण सर्वांनी घेतली पाहिजे ती कुठल्याही पातळीवर पाहायला व अनुभवायला मिळत नाही. असं म्हणतात जो देश आपला इतिहास विसरतो तो स्वतःचा भुगोल गमावून बसतो.

पुतळा पुन्हा उभा राहू शकतो अन् राहिल देखील पण त्यांचे वैचारिक संस्कार निर्माण करणाऱ्या व्यवस्था उभ्या करणार आहोत का हा मुलभूत प्रश्न आहे.

रविवार, २६ मे, २०२४

क्षमा विरस्य भुषणम् ...!

 



आज अचानक व्यवसायिक संबंधांतून मित्र झालेल्या इरफान चा फोन आला अन् काही विचारायच्या आधीच तो तिकडून म्हणाला उद्या मी हजला चाललोय माझं काय चुकलं असेल तर माफ कर अन् त्यांनी फोन ठेवला.

खरंतर मी काही वेळ स्तब्ध झालो नंतर मनात विचार आला की, ठरवलं तर आयुष्य किती सरळ अन् सोपं आहे. तिर्थक्षेत्री देवाला भेटण्यासाठी जाताना का असेना माफी मागण्याची पद्धत अथवा प्रथा किती शिकवणं देणारी आहे. देवाला भेटायला जाताना मन, चित्त शुद्ध असणे हेच देवाला अपेक्षित आहे. कुणाचेही कळत नकळतपणे मन दुखावण्याने त्यांच्या मनात आपल्या विषयी असणाऱ्या रागाचा किंवा आपल्याला कुणाविषयीही असणाऱ्या राग, द्वेष या भावनांचा केवळ माफी मागण्याने एका क्षणात निचरा होतो अन् मनावरचं अनामिक ओझं दूर होऊन मन हलकं होतं.

वारकरी संप्रदायात वयाचा मानाचा विचार न करता एकमेकांच्या पाया पडणं असो की दरवर्षी संवत्सरी रोजी, पर्युषण सणाच्या आठव्या आणि शेवटच्या दिवशी, जैन एकमेकांना “मिछामि दुक्कडम्” अर्थात मी तुमची मनापासून क्षमा मागतो असे म्हणणे असो की गौतम बुद्धांनी दिलेला क्षमाशील होण्याचा उपदेश आपल्याला खऱ्याअर्थाने आंतरीक शांततेकडे घेऊन जातो.

तुझ्या वाचून करमेना या मराठी चित्रपटातील "भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर..." हे गाणं सुद्धा आपल्याला क्षमा करून आपल्याच माणसांत रमायला शिकवते.

एकंदरीतच माफी मागणं व माफ करणं हेच खरं माणूस असल्याचे लक्षण आहे.

यानिमित्ताने मी देखील कळत नकळतपणे कुणाचेही मन दुखावले असेल तर मनापासून क्षमा मागतो. 



बुधवार, १० जानेवारी, २०२४

Mindful vs Mindful AI...!

 


Name Suchana Seth

MSc physics Topper of the Calcutta University.

Specialisation in Plasma and Astrophysics.

Degree in Sanskrit and topper too.

Expert in machine learning.

From 12 yrs Data Scientist in Newyork.

AI ethics expert

CEO, Mindful AI Lab listed in Top 100 AI industries.

Women of the year.

 काय मित्रांनो कसा वाटला बायो-डाटा एकदम प्रभावित करणारा ना? खरंतर एका एवढ्या उच्च शिक्षित, कर्तबगार महिले बद्दल अभिमानच वाटणार अन् तीचा करिअर ग्राफ पाहता ते साहजिकच आहे.

परंतू आज या महिलेची इथे चर्चा करण्याचे कारण म्हणजे या महिलेला नुकतेच अटक केले अन् त्याचं कारण ऐकुन तुम्हाला एकदम धक्काच बसेल ते कारण म्हणजे तीने स्वतःच्या ४ वर्षे वयाच्या मुलाला उशीने तोंड दाबून मारले अन् त्याचा मृतदेह बॅगेतून घेऊन जात असताना पोलिसांनी तीला पकडले.

समाजात शिक्षण , पद, पैसा अन् त्यातून मिळणारी प्रतिष्ठा हीच माणसाची उंची ठरवते परंतु त्याची नैतिक उंची ही त्याच्या जीवनमूल्यातच सामावलेली असते. एखाद्या कडे असणाऱ्या असामान्य बौद्धिक क्षमतेचे अप्रुप वाटू शकते पण सरतेशेवटी त्याच्याकडे असणारी मानवीय मुल्यं अधिक प्रभावी असतात.

सध्याचं जग क‌त्रिम बुद्धीमत्तेच्या चक्रव्युहाकडे  मार्गक्रमण करीत आहे अन् त्यातून येणाऱ्या ताणतणावासाठी नैसर्गिक मनःशांती आवश्यक आहे परंतु त्यासाठी सुद्धा आपण कृत्रिम बुद्धिमत्तेवरच भर देणार असू तर मानवी संस्कारांचा अभाव अश्याप्रकारची दुर्बुद्धीच देणार. खरंतर ही घटना Mindful vs Mindful AI यांच्यातील दरीतून निर्माण होऊ घातलेल्या अस्वस्थतेच्या परिपाकाची आहे.

रविवार, ३१ डिसेंबर, २०२३

अंत: अस्ति प्रारंभ:।

 


31 डिसेंबर हा खरं तर वर्षाचा शेवटचा दिवस अन् माणसाला शेवट हा नेहमीच गोड व्हावा ही इच्छा असते अन् तसा तो गोड व्हावा म्हणून प्रत्त्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतोच कुणी मिळालेल्या गोड आठवणीतून तर कुणी झालेल्या चुका लक्षात घेऊन नव्यानं शिकत पुन्हा नव्याने मांडणी करण्याचा संकल्प करत.

जीवन म्हणजे खरंतर सरणारी वर्षे अन् वाढणारं वय यांचा एक आलेख आहे कधी चढता कधी स्थिर कधी उतरता अन् पुन्हा चढता. केव्हां तरी पुर्ण झालेला हा व्यक्तिगत आलेख मात्र कुणालाही पाहणं शक्य नाही अन् तो मनासारखं आरेखनं देखील शक्य नाही. आयुष्य हे असंच आहे क्षणभंगुर जे आहे ते आत्ता याक्षणी. 

भगवत् गीतेतील "जे झाले ते भल्यासाठी , जे होत आहे ते भल्यासाठी अन् जे होणार आहे ते देखील भल्यासाठीच" हे केवळ वाक्य नसून आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे अन् तो ठेवूनच प्रत्येकाने वाटचाल करीत राहणे अपेक्षित अन् आवश्यक आहे.

कोणत्याही गोष्टीचा शेवट खरंतर शेवट नसतोच ती नविन कशाची तरी सुरुवात असते अन् ही शृंखला सातत्याने चालूच असते व राहते म्हणूनच व्यक्तिगत आयुष्य असो की जग सगळ्यांचं मुळ तत्वज्ञान आहे ते म्हणजे अंत: अस्ति प्रारंभ:।



गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

स्विकृतीच्या हिंदोळ्यावर अस्तित्त्वाची लढाई...!

 


कराड येथील शिवाजी हौसिंग सोसायटीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या ९ व्या वर्धापनदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात आज शिवाणी गजबर या तृतीय पंथीय व्यक्तीची मुलाखत ऐकली अन् खरंच एका दुर्लक्षित घटक म्हणण्या पेक्षा समाजाकडून हेटाळणीचा असणाऱ्या विषयावर मनोगत ऐकण्याचा योग आला.
खरंतर सामान्य माणसाला अन्न, वस्त्र, आणि निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी लागणाऱ्या कष्टाची आपण नेहमी चर्चा करतो परंतु तृतियपंथींना याच गोष्टींसाठी करावा लागणारा संघर्ष खुपचं वेदनादायी आहे कारण तृतीयपंथी आहे हे स्वतः तसेच घरच्यांनी स्वीकारणे जेवढं कठीण आहे त्यापेक्षा कैक पटीने समाजानं त्यांना व्यक्ती म्हणून स्वीकारणे अवघड आहे. अन् जिथे समाज तुम्हाला स्वीकारत नाही तिथे उपजिविकेची साधनं उपलब्ध होणे दुरापास्त आहे मग भाळी समाजाने लादलेली टाळी अन् पायी भीकेची वणवण अपरिहार्य आहे. जिथे स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पोषक वातावरण नसते तिथे भिकेचे दुरित अटळ असते मग अशा दुरितांचे तिमिर जावो असे पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांनी प्रबोधन करून देखील समाज आर्थिक अन् पर्यायाने मानसिक कुचंबणाच अधिक देणार असेल तर असा समाज किती पुढारलेला आहे हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे.
संविधानाचा आधार असून देखील शिक्षण असो की व्यक्ती म्हणून न्याय्य हक्क सगळ्या गोष्टी सहजपणे उपलब्ध करून घेणं एक खडतर प्रवास आहे त्यातील प्रत्येक टप्प्यावर एका संघर्षाचा शेवट अन् नवीन संघर्षाची सुरुवात असते एकंदरीतच मुलाखती चा केंद्रबिंदू हा सामाजिक अस्विकार हाच आहे. हा सामाजिक अस्विकार केवळ संवेदनशीलता आणि वैचारिक प्रबोधन यातूनच दूर होऊ शकतो अन् या दिशेने वाटचाल करताना अशा तृतीयपंथी व्यक्तींना समाजासमोर व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणे आवश्यक आहे अन् त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या कार्यकारिणी ने ती संधी उपलब्ध करून देत स्तुत्य उपक्रम राबवत आशेचा एक दीप प्रज्वलित केला त्याचा प्रकाश अस्विकृतीचा अंधार नक्कीच कमी करेल अन् स्विकृतीच्या हिंदोळ्यावर अवलंबून तृतीयपंथींची चाललेली अस्तित्त्वाची लढाई लवकरच संपेल ही सदिच्छा.

रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

सुप्त अन् सुस्त... महाराष्ट्र...!


महाराष्ट्र हा थंड गोळा का व कशामुळे झाला या मूलभूत प्रश्नाला जोपर्यंत आपण धोरणात्मक दृष्ट्या हात घालत नाही तोपर्यंत असे प्रासंगिक उफाळून येण्याला काहीही ठोस भविष्य नाही मराठी अस्मिता ही केवळ बोलाची कढी आणि बोलाचा भात असणार आहे.

ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा अन् त्यात हुतात्मा झालेल्या १०७ जणांचा केवळ उल्लेख करून काय उपयोग आजच्या पिढीलाच नव्हे तर आधीच्या पिढीलाही किंबहुना मराठी च्या नावाने गळा काढणाऱ्या व स्वतःच एकमेव कैवारी असल्याचा गर्व बाळगणाऱ्या राजकीय पक्षांना देखील त्या १०७ जणा पैकी एकाचेही नाव सांगता येणार नाही हे कटू सत्य आहे अन् ही खरी शोकांतिका आहे कारण आपल्याला आपलाच गौरवशाली इतिहास, भुगोल त्या आत्मियतेने अन् तन्मयतेने शिकवला नाही मग आत्ता पर्यंत झालेल्या शिक्षणमंत्र्यानी शालेय अभ्यासक्रमा पासून शैक्षणिक धोरणा पर्यंत कोणता मराठी अस्मितेचा आग्रह दाखवला त्या उलट शिक्षकांना शिकवणं सोडून सरकारी कामासाठी बिन पगारी हक्काचे वेठबिगारी कामगार करण्यात धन्यता मानली. शाळेतला पट सोडा शाळेच्याच पटांचे तीन तेरा वाजवणारे शासकीय धोरण. मग कोणती तरी दारू ची कंपनी शाळा दत्तक घेण्याचे सोशल वर्क करणार अन् तिथले पुढारी त्याच शाळेच्या पटांगणावर थिल्लर गाण्यावर उडत्या बायका नाचवणार मग कसा घडणार मराठी माणूस अन् कसा बाळगणार मराठीचा अभिमान.

दुकानाच्या पाट्या मराठीत असण्यासाठी सक्ती करावी लागते हीच खरी शरमेची बाब ते देखील संयुक्त महाराष्ट्र होऊन तब्बल ६३ वर्षे उलटून गेलीत. खरंतर मराठी पाट्या असल्याचं पाहिजेत याबाबत दूमतच नाही पण ज्या दुकानांवर मराठी पाटी असण्याचा आग्रह धरतो ती दुकाने , उद्योग मराठी माणसाचीच असावी यासाठी सरकारी धोरणं किती राबवली. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत असताना मराठीचे ढाणे वाघ करोडोंच्या मिल स्वतःच्या घशात घालत शैली, खळssखट्याक पुरते मर्यादित होते मराठी माणूस उद्यमशिल होण्यासाठी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन कोणत्या अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना राबवल्या. मुंबई जर देशाची आर्थिक राजधानी असेल तर सगळ्या गोष्टी तिथल्या अर्थकारणावरच अवलंबून असणार जर मराठी माणसाला घरांचे दर परवडले नाही तर तो बाहेरच फेकला जाणार मग त्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवलं तरच मुंबई मराठी माणसाची राहिल हे वास्तव नाकारता येणार नाही. मुंबई राजधानीचे शहर नसताना देखील १८५३ मधे बोरीबंदर ते ठाणे भारतातील पहिली रेल्वेगाडी ज्यांच्या प्रभावाने व पुढाकाराने धावली ते जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे उर्फ नाना शंकरशेठ होते त्यांनीच त्यांचे मित्र जमशेटजी जिजीभाय यांच्या सोबत इंडियन रेल्वे असोशिअनची स्थापना केली. त्या काळात जीआयपी रेल्वे या संस्थेच्या सदस्यांमध्ये हे दोघेच भारतीय (मराठी) होते. नाना शंकरशेठ यांनी केवळ या क्षेत्रातच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रात पश्चिम भारतातील पहिली शिक्षण संस्था बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून योगदान दिले तसेच बॉम्बे म्युनिसिपल ऍक्ट बनविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली अन् त्या कायद्यान्वये मुंबई महापालिकेची स्थापना झाली. याबरोबरच जे जे स्कुल ऑफ आर्ट , जे जे हॉस्पिटल यांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. अशा या आधुनिक मुंबईचे महारथी असणाऱ्या नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला देण्याचा प्रस्ताव २०२० साली मांडला अन् तो अजून प्रलंबितच आहे ही आपली मराठी अस्मिता. नाना शंकरशेठ हे पैशाने मोठे होतेच पण काहीतरी भव्यदिव्य करण्याची दुरदृष्टी अन् उर्मी त्यांच्या कडे होती. नाना शंकरशेठ असो की भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके असो छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक गुणसूत्र (डीएनए) त्यांच्यात होते आत्ताच्या उठता बसता शिवाजी महाराजांचा कृती शुन्य जयघोषाने झाकोळलेला समाज अन् आधुनिक सरंजामदार नव्हते.

मुंबईत घर देता का घर चा सुर आळवताना आपल्या नाका खालून मुंबईतील अनेक संस्था , प्रकल्प गुजरात मध्ये नेले अन् आपल्या पेक्षा गुजरातला फायदेशीर बुलेट ट्रेनचा खर्च महाराष्ट्राच्या बोकांडी मारला तेव्हा सर्व पक्षीय मराठी नेत्यांनी एकत्र येऊन कसला खमकेपणा दाखवला.

खरंतर दोन चार जणांना कानफटात देऊन काय साध्य होणार फार फार तर त्यांनी तोंडदेखली माफी मागितल्याचे खोटं समाधान मिळेल पण खरा पगडा अन् ओळख मिळण्यासाठी कर्तृत्ववानच असले पाहिजे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने अखंड प्रेरणास्रोत आपल्याला सुदैवाने लाभले आहेच गरज आहे ती मराठीबाना खऱ्या अर्थाने दाखवण्याची अन् सुप्त अन् सुस्त पडलेल्या थंड गोळ्याला विचारांची व कृतीची धग देण्याची.


गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

एका कलादिग्दर्शकाची अपूर्ण कलाकृती....!

 


नामवंत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचे ऐकुन धक्का बसला खरंतर कलाक्षेत्रात इतक्या अकस्मात अन् अनपेक्षित दु:खद घटना घडल्या आहेत त्यामुळे आता सहजासहजी धक्का बसत नाही परंतु कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची प्रतिभा अन् योगदान असामान्य होते. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नितीन देसाई यांनी कला क्षेत्रात एवढे उत्तुंग यश मिळवले चार वेळा नॅशनल ऍवॉर्डस्, फिल्म फेअर ऍवॉर्डस् हेच अधोरेखित करतात.
सगळ्या गोष्टी भव्य दिव्य करण्याची मानसिकता अन् हातखंडा देखील. त्यातूनच बॉलिवूडला टक्कर देणारी एन डी स्टुडिओची निर्मिती ही निश्चितच कौतुकास्पद व तितकीच अभिमानास्पद बाब. परंतू हेच भव्य स्वप्न त्यांच्या दुर्दैवी मृत्यूचे कारण व्हावे हे बोचणारे आहे.
खरंतर आर्थिक निर्णय, धाडस चुकू शकतात अन् प्रत्येक माणूस हा कायमच चुकांतूनच शिकत असतो मग आत्महत्ये सारखा एवढा टोकाचा निर्णय घेताना जास्तीत जास्त दुष्परिणाम काय होऊ शकतात याचा विचार केला गेला पाहिजे. फारफार तर स्टुडिओ जप्त झाला असता, अटक झाली असती, काही काळ तुरुंगात जावे लागले असते परंतु बदनामीच्या भीतीने सगळं संपवून टाकणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे. या देशातील उघड उघड नैतिकतेला तिलांजली देणारे निर्लज्ज राजकारणी व देशाला हजारो कोटीचा चुना लावून देशातून पळून गेलेले तथाकथित उद्योगपती यांच्या निगरगट्टपणाला देश सहन करतोयच की मग आपणच उभं केलेलं गेलं संपून अन् आलो रस्त्यावर तर फिनिक्स पक्ष्याप्रमाणे घेऊ ना राखेतून झेप...हाच विचार झाला पाहिजे. इतक्या पदाने, सत्तेने, संपत्तीने मोठ्या असणाऱ्या  लोकांशी असणारे संबंध असून उपयोग काय. बोलून मार्ग काढता आला असता नाहीतर पुन्हा शुन्यावर आलो असतो पण स्वत:च्या प्रतिमा व स्वाभिमान यात अडकून पडणे अन् स्वत:ला व्यक्त होण्यापासून रोखणे हे खऱ्याअर्थाने आत्मघातकी आहे. खरंतर समाजात योग्यवेळी अन् योग्य पद्धतीने व्यक्त होण्याचे संस्कार आपल्या शिक्षणपद्धतीचा भाग असला पाहिजे.
जिमनॅस्टिकमध्ये तुम्ही हवेत किती कोलांट्या उड्या घेतल्या यापेक्षा तुम्ही जमिनीवर उभं राहताना कसं संतुलन केलं याला सर्वात जास्त महत्त्व असते. तसेच खऱ्या आयुष्यात देखील तुमच्या उपलब्धी, कामगिरी यांच्या आलेखापेक्षा तुमचा विचार किती नैतिक अन् संतुलित आहे हेच अधोरेखित होते. तुम्ही मिळवलेले अत्युच्च यश देखील एका हतबलतेतून घेतलेला निर्णयामुळे मातीमोल होते.
नितीन देसाई यांच्या जाण्याने एक प्रतिभा व अनुभव संपन्न कलादिग्दर्शक हरपला तसेच नवी पिढी एका मार्गदर्शका पासून वंचित राहिली ही सर्वात मोठी सांस्कृतिक हानी आहे असे मला वाटते. कोणत्याही कलाकृतीचा फिनिशिंग टच त्या कलाकृतीला पूर्णत्व बहाल करतो परंतु नितीन देसाई ही कलाकृती अपुर्णच राहिली ही शोकांतिका.

बुधवार, १२ जुलै, २०२३

बाईपण भारी देवा...!

 

नुकताच 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट चक्क चित्रपटगृहात जाऊन पाहिला खरंतर पहिल्यांदाच स्त्री राज्यात असल्याचा भास झाला अन् कृष्णाला कसं वाटत असावं हे थोड्याफार प्रमाणात जाणवलं असो विनोदाचा भाग सोडला तर स्त्रीचं मन एकाच वेळी अनेक प्रकारच्या विचारांच्या हिंदोळ्यावर झुलत असतं याचा प्रत्यय आला.
खरंतर सगळ्या प्रकारच्या नात्यात कमी जास्त प्रमाणात बेबनाव असतोच त्याला पाठीला पाठ लावून आलेल्या बहिणी देखील अपवाद नाहीत. समज, गैरसमज याचं रुपांतर अढी, धुसफूस ते मत्सर अन् अगदी द्वेषापर्यंत जाऊन पोहोचते.
खरंतर मत्सराचं दुसरं नाव स्त्री आहे ( Jealousy thy name is woman ) अशी इंग्रजी मध्ये म्हण आहे पण भारतीय स्त्रियांची मानसिकता पाहता वरवर जरी तसंच वाटत असले तरी तिच्या मनाला अनेक पदर आहेत. तिच्या वर वेगवेगळ्या नात्यांची जन्मतःच आलेली अपेक्षांची ओझी अन् ती पुर्ण करुन आदर्शवत स्त्रीची प्रतिमा निर्माण करण्यासाठी व तशी ती सांभाळण्यासाठी ची तीची धडपड या सगळ्यातच तीचे कौतुक कमी अन् कुचंबणाच अधिक होते. हे सर्व करता करता कधी मासिक पाळी बंद व्हायची वेळ आली हे ध्यानातच येत नाही तरी अजून स्वतःसाठी काहीच जगलो नाही हे खरं दुखणं असतं. अशावेळी तिची स्वतंत्र व्यक्ती म्हणून होणाऱ्या घुसमटीला वाट मोकळी करून देण्यासाठी ती दुसऱ्या स्त्री कडेच अपेक्षेने पाहते. एका स्त्रीलाच दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजेल अशी तीची खात्री खरंतर भाबडी आशा असते परंतु फिरून अपेक्षाभंगाचच दुःख पदरी पडते यातूनच निर्माण झालेल्या मानसिकतेचा दुष्परिणाम हेवेदावे, टोमणे, कुचाळक्या, दिखावा, टाळणे यातून दिसू लागतो.
या चित्रपटातील बहिणी पुर्वग्रह दुषित भावनांचे ओझे घेऊन मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येतात अन् त्या प्रवासात ज्यांच्या बद्दल अनेक वर्षे गैरसमज करुन घेत अढी निर्माण झाली होती त्यांच्याच सानिध्यात नात्याच्या सुगंधाची अन् समाधानाची कस्तुरी त्यांना गवसते. सगळ्यांनाच अशी कस्तुरी गवसू शकते फक्त गरज असती ते मनमोकळे असण्याची व मनमोकळेपणाने जगण्याची.
संसारात अनेक भुमिका जगत यंत्रवत झालेलं आयुष्य झुगारूनच स्वतःच प्रजातंत्र निर्माण करता आलं पाहिजे तरच संसारात राहून देखील स्त्री स्वतःच स्वतंत्र व्यक्तीमत्व घडवू शकते.
या चित्रपटाने अजून एक गोष्ट सिद्ध केली ती म्हणजे तुमच्या कडे सामाजिक भान असणारी चांगली संहिता असेल तर कितीही मोबाईलमय जग झाले तरी लोकांना चित्रपटगृहात खेचून आणू शकतो.
स्वतःच्या मनावरचं समज-गैरसमजाचं ओझं पुढाकार घेऊन कमी केले अन् प्रत्येक स्पर्धा ही केवळ जिंकण्यासाठीच नसुन जगण्यातला खरा आनंद शोधण्यासाठी देखील असते हे समजले तर बाईपण भारीच असतं हे प्रत्येक स्त्रीला मनोमन पटेल यात शंकाच नाही.

गुरुवार, २९ जून, २०२३

भेटींत तृष्णता मोठी...!



संतांच्या पालखी संगे

वारी चाले तो वारकरी


विठ्ठल अखंड विटेवरी उभा

असे चंद्रभागेच्या किनारी


वसते समाधानाचे बिंब वरी

तरी डोळ्यात दिसे ओढीचे प्रतिबिंबे खरी


डोईची तुळस अन् मंदिराचा कळस आतुर मिलनाच्या द्वारी

विठु माऊलीचा गजर असे प्रत्येकाच्या सुरी


दंग झाले वारकरी भेटी एकमेका उराउरी

भक्तिरसात नाहली सारी अलंकापुरी.

रविवार, २५ जून, २०२३

मनाचं माकड अन् अंतरंग भाकड....!



 डिजिटल मनी, डॉक्युमेंटेशन पासून ऑनलाइन लर्नींग पर्यंतच्या सरकारी धोरणामुळे जग इतकं जवळ आलं आहे की मोबाईल हेच आपल्यासाठी जग बनलं आहे अन् सोशल मीडिया हा जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. काय पाहयचं असू दे, शोधायचं असू दे किंवा व्यक्त व्हायचं असू दे बहुतांश वेळा मोबाईलच  हातात घेतला जातो. जरा रिकामा वेळ मिळाला की माणूस मोबाईलशी खेळू लागतो खरंतर गेमर अन् युट्युबर आदर्श असणाऱ्या सध्याच्या तरुणाईचं जरा उलटं झालंय मोबाईल मधून वेळ मिळाला की थोडं बाहेरच्या जगाकडे बघितलं जाते. वॉट्सअप किंवा फेसबुक वर बघणे, व्यक्त होणे किंवा शेअर करून स्वत:ची सामाजिक प्रतिमा संवर्धन करण्यासाठी आग्रही असणारे रील्स, शॉर्टस् किंवा युट्युब व्हिडिओ पाहताना मात्र सुरवातीला वेगवेगळ्या प्रकारचे येणारे व्हिडिओ नंतर आपापल्या आकर्षण, आवड ते फॅन्टॅसी पर्यंत एकसुरी होतात. वास्तविक जगापेक्षा आभासी जगात जास्तीच मोकळीक असल्याने अन् आपली ओळख लपवून आपल्यातल्या विकृतीला मोकाट सोडण्याची मुभा असल्याने त्यातच अधिक रमतात. वारंवार तेच ते पाहून कंटाळा आला की मग थोडंसं ज्ञानामृत , नैतिकतेच्या चार वळसे चाटवायचे नंतर पुन्हा आपल्या नादात राहायचं.

म्हाताऱ्या-कोताऱ्या पर्यंत मुरलेल्या या नादामुळे कुणी कुणाला उपदेश द्यायचा हा अनुत्तरित प्रश्न निर्माण झाला आहे.

आभासी जग अन् वास्तव जग यातील फरक करण्याची क्षमता कमी कमी होत चालली आहे त्यामुळे वास्तवातील प्रत्येक कृती ही आभासी जगात व्यक्त होण्यासाठी केली जात आहे मग वाढदिवसाची पार्टी असो की लग्न समारंभ किंवा विठ्ठलाची वारी प्रोफाइल, स्टोरी अन् स्टेटस अपडेटला खाद्य मिळाले पाहिजे. वास्तविक जीवनात हेच फोटो बघून कडक भावा म्हणणारा गरज पडली की तडक निघुन जातो. 

खरंतर मोबाईल मधलं आभासी सोशल लाईफ अन् वास्तवातील सामाजिक भान यातलं अंतर समजणं समाज हितासाठी अत्यावश्यक आहे. दुरचं पाहण्याच्या नादात जवळचं पाहायचं राहिलं म्हणण्या ऐवजी मोबाईल मधलं पाहण्याच्या नादात आजुबाजुचं पाहायचं राहिलं असं म्हणण्याची वेळ येण्या आधी सावध झाले पाहिजे. हीच वेळ आहे भावनांना आवरायची अन् स्वःताला सावरायची अन्यथा मोबाईल वर येणाऱ्या सततच्या माहितीच्या भडीमारामुळे मनाचं माकड होण्यापासून अन् सतत नावीण्याच्या व तथाकथित क्रिएटिव्ह कल्पनांच्या हव्यासापोटी अंतरंग मात्र भाकड होण्यापासून आपण रोखू शकणार नाही.

बुधवार, ३ मे, २०२३

व्यवस्थेचे बैल...!

 


गौतमीला नाचताना खरंतर अश्लील अन् उत्तान हावभाव करताना पाहून तुंबलेल्या शौकीन मंडळींची अवस्था जनावरा सारखी होती असं आत्तापर्यंतच्या कार्यक्रमात घातलेल्या धुडगूसावरून तरी निदर्शनास येतेय पण नुकताच तीच्या खास कार्यक्रमात शर्यतीत सुद्धा न बुजणारा न बावरणारा बावऱ्या नावाप्रमाणेच बावरला 'बावऱ्या' म्हणजे तोच तो बैल ज्याच्यापुढे गौतमी दोन तास नाचली नशिब त्या बैलाला बांधून ठेवले होते नाहीतर बैल काय काय करू शकतो हे गौतमीला चांगलंच परिचयाचं असेल असो आपले दादा म्हंटल्याप्रमाणे कुणी कुणापुढे नाचल्यानं आपल्या पोटात दुखायचं काय काम नाय तरी पण एक सामाजिक किडा म्हणून आपला एक प्रश्न पडतो दीवास्वप्न दाखवणाऱ्या नेत्यांपुढे गुबुगुबु करणारे नंदीबैल अन् बैलापुढे नाचणारी गौतमी पाटील यांच्यात सर्वाधिक विक्री मुल्य कुणाचं. नाचणारीला बैल काय अन् माणसं नावाची जनावरं काय दोन्ही सारखेच तीला सुपारी वाजली म्हणजे झालं पण राजरोसपणे नैतिकतेची सुपारी देणाऱ्या राजकीय व्यवस्थेसमोर लोटांगण घालणारे तथाकथित सुजाण नागरिक रोज उठून चा खेळ खंडोबा उघड्या डोळ्यांनी बघतायत अन् राजकीय व्यवस्थेने व कॉर्पोरेट मिडियाने जर नागरिकांचा बैल बनवला असेल तर मग एक बाई खऱ्याखुऱ्या बैला समोर नाचली म्हणुन बिघडलं कुठे.


मंगळवार, १८ एप्रिल, २०२३

महाराष्ट्राचे 'बेपर्वा' भुषण...!

 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्यात १२ श्रीसेवक उष्माघाताने मृत्यू पावले अन् या कार्यक्रमाला गालबोट लागले अशी बातमी पसरली खरंतर गालबोट लागलं असं म्हणणें साफ चुकीचे असुन कार्यक्रमाची भरदुपारची वेळ,४२° तापमान, सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत एवढा ६ ते ७ तासांचा उन्हाचा तडाखा तसेच २० ते २५ लाख लोकांसाठी लागणारी वैद्यकीय, आपत्कालीन व मंडप व्यवस्था या कशाचाही संवेदनशीलपणे विचार न करता सरकारी तिजोरीतून १४ कोटी रुपये खर्च करून केलेलं ढिसाळ नियोजन, सत्कारमुर्ती व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,मंत्री यांनी आपल्या सोयीनुसार अन् उपस्थित लोकांना गृहित धरत असंवेदनशीलपणे  निवडलेली वेळ अन् सगळ्यात महत्वाचे तारतम्याचा अभाव असणारे अंधभक्त या सर्वांनी घेतलेले ते बळी आहेत. हा उष्माघाताचा नव्हे तर आत्मघाताला प्रवृत्त करण्याचा गुन्हा आहे.

राजकीय व्यवस्थेला अनुयायांच्या संख्येत दिसणारा मतांचा आकडा ( दुर्दैवाने याला कुणीही अपवाद नाही ) अन् त्यासाठी सरकारी तिजोरीतून खर्च करत परस्पर फायदा करून घेण्यासाठीची हाव सामान्य माणसाच्या जीवावर बेतू शकते याची पर्वा आहे का?

तसेच स्वत:ला प्रबोधनकार, निरुपणकार, समाजसेवक समजणाऱ्या व्यक्तींना ज्या माणसांमुळे समाज घडतो त्या शेवटच्या एका घटकाला देखील माझ्यामुळे कसलाही त्रास होता कामा नये याची खरंच पर्वा आहे. का केवळ फॉलोअर, सबस्क्राईब,लाईक अन् शेअर करत घंटा बडवणाऱ्या संस्कृतीचे पाईक होण्यातच समाधान आहे. 

सरतेशेवटी परिस्थितीमुळे रंजलेल्या, गांजलेल्या तसेच हतबल झालेल्या सामान्य माणसाला आधाराची तसेच एका आशेच्या किरणाची गरज असते पण गरजवंताला अक्कल नसल्याने योग्य तो बोध अन् प्रेरणा न घेता पायावर लोटांगण घालत एखाद्या व्यक्तीला देवाऱ्ह्यात बसवून श्रीसेवक भक्तगण होण्यातच धन्यता अन् दर्शनाची ओढच अधिक असेल तर मग अशांना स्वत:ची तरी पर्वा असते का?

महाराष्ट्राला थोर संत, प्रबोधनकार, महापुरुषांची परंपरा लाभली आहे संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांपासून संत गाडगेबाबां पर्यंत तसेच शिवाजी महाराजांपासून बाबासाहेब आंबेडकरां पर्यंत अनेक भुषणावह व्यक्तींची मांदियाळी महाराष्ट्राने अनुभवलेली आहे परंतु ती कितपत रूजलेली आहे हा दुर्दैवी प्रश्न आहे.

२५ लाखांची पुरस्कार रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचं औदार्य औट घटकेचं ठरावं अन् त्याच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृत श्रीसेवकांसाठी ६० लाख रुपये द्यावे लागावे हे बेपर्वाई चेच लक्षण आहे.

अंधभक्तांच्या शक्तिप्रदर्शनाने मनोमन सुखावणारे , पुरस्कारचे सोपस्कार करत दिल्लीच्या हुजुरांना राजकीय वातावरण कसं आपल्या बाजूने आहे हे दाखवण्यासाठीची चमचेगिरी करणारे कुठल्याही घटनेच्या मुळाशी न जाता त्यात असलेल्या फायद्याची पर्वा अधिक करतात अशी आपमतलबी सोपस्कार अन् बेफिकीर वृत्ती असणारेच खऱ्या अर्थाने बेपर्वा भुषण आहेत ही महाराष्ट्राची सांस्कृतिक शोकांतिका आहे.


शुक्रवार, २४ मार्च, २०२३

विष्षय हाय का.....!





 शिवराय नुसता मिरवायचा नाय तर गिरवायचा विषय हाय, 

राजे पुन्हा जन्माला यायचा नाय तर तो विचार पुन्हा जन्माला घालण्याचा विषय हाय.

शिवजयंतीला नुसत्या घोषणा अन् जयजयकार करण्याचा नाय 

तर जय भवानी म्हंटल्यावर आपसूकच जय शिवाजीन उर भरण्याचा विषय हाय

शिवाजी हा केवळ मराठी अस्मितेचाच नाय तर स्वराज्य घडवायचा विषय हाय

म्हणुनच म्हणतो मित्रानो शिवाजी फक्त बोलण्याचाच नाय तर करून दाखवायचा विषय हाय

शिवराय नुसता मिरवायचा नाय तर गिरवायचा विषय हाय

विषय एकच रयतेचा राजा राजा शिवछत्रपती....