अवघड जागेचं दुखणं ........
काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेश या राज्यात सचिवालयातील शिपाई या पदासाठी,३६८ जागां करिता अर्ज मागवले होते त्यासाठी तब्बल २३लाख अर्ज दाखल झाले. आश्चर्याची बाब म्हणजे २५५ अर्ज पिएचडी धारकांचे होते अन् जवळजवळ २लाख अर्ज इंजीनियर, एमएससी,एमकॉम अशा पदवीधरांचे होते. पद निवडीसाठी थेट मुलाखत पर्याय ठेवल्यामुळे या भरती प्रक्रियेला किमान ४वर्ष लागतील असा अंदाज व्यक्त करत राज्यशासनाने ती प्रक्रियाच रद्द करून टाकली. राजकीय नेतृत्वाने सोपा मार्ग स्विकारत हात झटकले परंतु यातून निदर्शनास आलेली बेरोजगारीची भिषणता ही कोणत्याही जागरूक शासनकर्त्याची झोप उडवण्यास पुरेशी आहे. जगातील सर्वात तरूण, तसेच महासत्ता बनण्यासाठी आशावादी असणाऱ्या भारत देशाची भिस्त अशाप्रकारच्या बेरोजगार तरूणांवर असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला मुखभंगच होणार याबाबत माझ्या मनात तरी कोणतीही शंका नाही.
आपल्या लोकशाही व्यवस्थेत प्रशासन(?) व लोकनियुक्त (?) सरकार या दोघांनीही समन्वयाने राज्यकारभार चालवायचा असतो. मात्र एकिकडे प्रशासनातील अर्निबंध खाबुगिरी व त्यामुळेच र्निमाण झालेली शिथिलता अन् त्यातूनच आलेला धोरणं राबवण्याबाबतचा सुस्तपणा तर दुसरीकडे लोकशाही पद्धतीनेच लोकतंत्राची येथेच्छ मोडतोड करीत साम दाम दंड भेद नितीशास्रानुसार लोकांचा वापर करीत केवळ सत्ताकेंद्रें हस्तगत करून प्रस्थापित बनणारा स्वतंत्र भारतातील नवा मांडलिक असणारा राजकीय वर्ग,तसेच या दोन्हीच्या सापटीत अडकलेली जनता असे निराशाजनक चित्र आदर्श शासन प्रक्रियेला छेद देत आहे.
बेरोजगारीच्या मुळाशी जायचं झाल्यास साधनसंपत्तीची उपलब्धता व त्या तुलनेत असणारी व अनियंत्रित वाढणारी बेसुमार लोकसंख्या. तसेच त्यांचा केवळ भौतिक विकास होण्या करिता असणारी अभ्यासक्रमापासून सोयीसुविधेपर्यंत ची बकाल शिक्षण व्यवस्था म्हणजे भरमसाठ शिक्षित तरूण बाहेर पडणारे कारखाने असुन त्यातून केवळ शिक्षणसम्राटांचेच भले होते. असो. तसेच ज्याप्रमाणात विद्यार्थी बाहेर पडतात त्याप्रमाणात त्यांना सामावून घेण्यासाठी उपलब्ध नसणारी रोजगार संधी, त्यासाठी दुरदृष्टीचा अभाव असणारे नेतृत्व तसेच रोजगार, व्यवसाय निर्मितीस प्रतिकूल असलेले वातावरण या बाबी प्रामुख्याने कारणीभूत आहेत. ही झाली बेरोजगारपणाची कारणमीमांसा परंतु या बेरोजगारपणामुळे होतकरू तरूणांवर होणारे मानसिक, शारीरिक परिणाम अजूनच भयावह आहेत. आजुबाजूची आधुनिकता व त्यातून दिसणारे भौतिकदृष्ट्या उच्च राहणीमान,या सर्वांचे भुरळ पडणारे वय परंतु बेरोजगारीमुळे ह्या सुखसुविधेपासून वंचित राहणे त्यांना नैराश्यावस्थेस नेते.यामुळे उमद्या वयात लग्नाच्या बाजारात मिळणारी नकारघंटा पर्यायाने शरिरसुखाच्या गरजेपासून देखिल त्यांना वंचित ठेवते. अशा अभावात्मक जगण्यामुळे आपसुकच मनोरूग्णतेकडे झुकलेले अथवा गुन्हेगारीकडे वळलेल्या तरूणांची संख्या देखिल झपाट्याने वाढत आहे.
केवळ वयाने तरूण असलेला परंतु उमेद हरवून दिशाहीन भरकटलेला नवा वर्ग,स्वप्नरंजन करणाऱ्या माध्यमात रममाण होत वास्तवात अराजक अवस्थेचा पाया बनत आहे. सळसळतं रक्त हे दुधारी शस्त्र असुन जर त्याचे योग्य उपाययोजन केले नाही तर त्याचे रूपांतर विध्वंसक लाव्हारसात होईल व त्यातून उठणारे काळ्याकुट्ट धुराचे लोट सुव्यवस्थे बरोबर भारताचे महासत्तेचे स्वप्न देखिल बेचिराख करेल.
उत्तरप्रदेशातील वरील घटना ही अगामी काळा करिता धोक्याचा इशारा आहे त्याकडे दुर्लक्ष करणे सुशासन व सुव्यवस्थेसाठी महागात पडेल. सद्य स्थितीला भेडसावणारे आतंकवाद, नक्षलवाद,तसेच पुन्हा एकदा शिक्षित व अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करीत जात, वर्ग,धर्म यामधे उफाळलेला द्वेष व श्रेष्ठत्वाचा वाद ही सर्व वेळीच समस्यांचे न केलेले वस्तुतः आकलन व पुरक उपाययोजनांचा अभाव यांचेच फलित आहे.तेव्हां वरवर अन् प्राथमिक अवस्थेत असलेला आजार योग्य व निग्रहपुर्वक उपाययोजना करीत नियंत्रित करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा केवळ जागतिक स्तरावर प्रतिमा उंचावण्यात मग्न असणाऱ्यांसाठी भविष्यात ते अवघड जागेचं दुखणे होऊन धड जगाला सांगता येईना, ना त्यांच्या पंक्तीत बसता येइना अशी अवस्था करेल.
संदिप महामुनी
९६३७१३०२०६





























%2Bkop-1.png)
%2Bkop-2.png)
