मनाचा शोक....!
नविन वर्षाच्या सुरवातीलाच पठाणकोटच्या हवाईतळावर दहशतवादी हल्ला झाला अन् नेहमीप्रमाणे सर्व यंत्रणा सर्तक झाल्या. बैल गेला अन् झोपा केल्याचा प्रकार आणखी किती दिवस चालू राहणार ह्या प्रश्नानी मन व्यथित होत आहे. केवळ सहा दहशतवादी सीमे पलीकडून येतात व भारतातील सर्वात मोठ्या हवाईतळावर हल्ला चढवत सैन्याला ४-५ दिवस झुलवत ठेवतात, एवढा शस्त्रसाठा तसेच त्याप्रकारचे प्रशिक्षण त्यांच्याकडे असते.अन् खेदाची बाब म्हणजे एक कर्नल व सहा निवृत्त जवानांचा ( त्यात एक NSG कमांडो होता) बळी जातो, हो बळीचं ! सरकार कितीही त्यांनी हौतात्म्य पत्करलं म्हणत व्टिट करित असले तरी हा आपल्या ढिसाळ व अपरिपक्व धोरणांचे फलितच आहे.
२००० साली IC814 या विमानाचे अपहरण करून ते कंदहारला नेण्यात आले होते तेव्हा तीन महत्वाच्या अतिरेक्यांच्या बदल्यात प्रवाशांच्या सुटका केल्या होत्या.त्यानंतर २०१६ मधे पठाणकोटवर म्हणजे संरक्षण दलाच्या महत्वाच्या ठिकाणावर हल्ला केला. विशेष म्हणजे त्यावेळच्या हल्ल्याचा व आताच्या घटनेचा सुत्रधार हा जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा प्रमुख मसुद अजहर हाच आहे. या दरम्यान संसदेवरील हल्ला, मुंबईवरील हल्ला अशा घटना घडतच होत्या. पावसाळा आला की घर बांधायची आठवण होणाऱ्या गोष्टीतल्या त्या माकडासारखे आपण आरंभशूरपणे कृती करत पुन्हा सुस्त होतो.
गेल्या २६ वर्षात देशात १३६ हल्ले झाले त्यातील १२१ निरपराध लोकांवर तर १४ महत्वाच्या व्यक्तींवर झाले असुन त्यात २००० लोकं मारली गेली तर ६००० लोकं जख्मी झालेत.सीमेवर आपले जवान जीवाची पर्वा न करता लढतात परंतू देशांतर्गत लढाई मधे प्राथमिक जबाबदारी ही पोलिस यंत्रणांची असते मात्र पोलिसांची शारीरिक स्थिती,मानसिक स्थिती,उपकरणं, शस्त्र व यासर्वांचे प्रशिक्षण याची किती बोंबाबोंब आहे ते सामान्य माणूस देखिल सांगू शकतो. अतिरेकी AK47 घेऊन येतात तर आपले पोलिस कर्मचारी म्हशीला हुसकावयला गेल्यासारखे काठ्या-लाठ्या घेऊन फिरतात.तुकाराम ओंबाळेंनी कसाबला कसे निशस्त्रपणे पकडले यावर आपल्या यंत्रणांचे पोट भरते. पण अशा साहसी व प्रामाणिकपणे लढणाऱ्यांची आयुष्यं का म्हणून धोक्यात घालायची.
Anti terrorist squad प्रत्येक राज्यात निर्माण करण्याचे आदेश असताना, Anti terrorist force one या महाराष्ट्राच्या पर्यायाने मुंबईच्या पथका व्यतिरिक्त एकाही राज्यात उपकरणं, शस्त्र व प्रशिक्षणा अभावी ते अस्तित्वात नाही.२००० पर्यंत NSG चे एकमेव ट्रेनिंग सेंटर होते आता ५ केंद्रे झाली असताना २०१२ पर्यंत हेलिकॉप्टर उपलब्ध नाही या सबबी खाली आपल्या black cat कमांडोना त्याचे प्रशिक्षण दिले नव्हते.या गोष्टी आपल्या राज्यकर्त्यांना बोचत नाहीत. जिथे विदेशनिती, सुरक्षानिति म्हणून सत्ताधारी व विरोधी नेते एकत्र येत नाहीत त्या देशाचे दुसरे काय होणार.
पठाणकोट हल्ला झाला तेव्हा गृह सचिव,गुप्तचर यंत्रणा, रॉ, मल्टी एजेन्सी सेंटर यांच्यात समन्वयाचा अभाव होता अस म्हंटले जातेय. सहा दहशतवादी मेल्यानंतर पत्रकारांना संबोधताना आपले संरक्षण मंत्री म्हणाले सात जवानांपैकी एकच समोरासमोरील लढाईत शहिद झाला बाकीचे तांत्रिक चुकीमुळे गेले. असले हस्यास्पद विधान करून तुम्ही तुमचे नैतिक अपयश झाकू पाहताय इतकेच. जे अतिरेकी मरायलाच आले होते त्यांना कंठस्नान वैगरे घातले असल्या अलंकारी शब्दखेळात तुम्ही तुमच्या धोरणात्मक चुकांकडे साफ दुर्लक्ष करीत आहात.
अशा दहशतवादी हल्ल्यानंतर नेहमीच त्याच्या कारणमीमांसांची चर्चा रंगते.पंतप्रधानांनी पाकिस्तानला दिलेल्या अचानक भेटी नंतर लगेचच हा हल्ला झाला. मोदींच्या त्या नीतीला त्यांचे समर्थक 'out of box diplomacy' म्हणत होते तर हल्ला झाल्यानंतर त्यांचे विरोधक याला 'mindless diplomacy' म्हणत आहेत.भारत-पाकिस्तान यांच्या निर्मिती प्रक्रियेमुळे हा प्रश्न जटिल आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलणी चालू ठेवणे हा आपल्या मुत्सद्दीगिरीचा भाग पाहिजे परंतू सुरक्षेसाठीची धोरणं व चोख व्यवस्था याची प्राथमिकता आपण कधीच विसरता कामा नये.
जगातील सर्वात मोठा नववर्ग असणाऱ्या आपल्या देशात या सर्व बाबींची पोटतिडकीने किती पर्वा आहे याबद्दल माझ्या मनात साशंकताच आहे.याचे मुळ सुद्धा आपल्या संस्कारातच आहे कारण आयत्या मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी सैनिकांचा त्याग जबाबदार आहे या गोष्टीची खरी जाणीव नाही म्हणूनच देशातील प्रत्येक नागरिकांनी आयुष्यातील किमान एक वर्ष तसेच वर्षातील एक महिना देशाच्या सैन्यासाठी सक्ती ने दिला पाहिजे तरच सैनिकांच्या खडतर आयुष्याची व आपल्याला मिळणाऱ्या स्वातंत्र्याची खरी किंमत कळेल व त्यातूनच निर्माण होणारे नेते सुरक्षा धोरण राबिवताना खरोखर जागरूक असतील अन् तेव्हांच हल्ल्यानंतर सर्तक होण्या एवजी हल्ल्या आधीच सर्तक होऊन मनुष्य, वित्त तसेच मानहानी टाळू शकू.
सुजाण नागरिक होण्यासाठीचे सुसंस्कारित मन असण्यासाठी 'मनाचे श्लोक' आहेतच परंतू शिकण्याचे वावडे असणाऱ्यांनी किमान 'मनाचा शोक' तरी समजून घ्यावा.
"eternal vigilance is the cost for the liberty ".
संदिप महामुनी
०९६३७१३०२०६






















