गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७

संख्यात्मक पटकथा ....!

             
     
                 पटसंख्या कमी आहे म्हणून महाराष्ट्रातील १ हजार ३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षणखात्याने घेतला परंतू शिकून आपल्या मुलांना आश्वासक भविष्य मिळेल या आशेने मोल मजुरी करून पोट भरणाऱ्या पालकांच्या स्वप्नांचा मार्गच बंद झाला अन् काही हजारभर नियमित शाळेत जाणाऱ्या चिमुरड्यांना शाळाबाह्य करीत सक्तीची सुट्टी मिळाली.
जो देश जागतिक महासत्ता होण्याची स्वप्ने पाहतोय त्या देशातील भावी पिढी शासकीय कर्मदारीद्र्यामुळे प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार असेल तर असल्या धोरण लकवाग्रस्त सरकारचं डोक ठिकाणावर आहे का? असं विचारण्याची वेळ पुन्हा स्वतंत्र भारतात आली आहे.मोल मजुरी करणारे पालक स्वतःची रोजंदारी बुडवून ४० किमी पार जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी धडकले अन् मुलांच्या समायोजनाचा फोलपणा दाखवला पण त्यांच्या पदरी निराशाच पडली.
शिक्षणासारख्या अत्यावशक ( अभ्यासक्रमाविषयीची अनास्था गृहित न धरता ) क्षेत्रातील व अधिकार कक्षेतील असंवेदनशील गणंगाकडून होणारे अपरिमित नुकसान येणाऱ्या पिढीला अराजकतेच्या गर्तेत ढकलतायत मग आधुनिकता, विकासाचा चेहरा भेसूर अन् विदारकच असण्याची शक्यता नाकरता येत नाही.
परदेशी संस्कृतीचे आकर्षण भारतीयांना नेहमीच खुणावते अन् त्यांच्या न पाहिलेल्या प्रगतीचे व त्याच्या मुळाशी असणाऱ्या विचारधारेशी न जाता वरपांगी कवतिक सोहळ्यात मश्गूल राहण्यात धन्यता मानणारे आपण भ्रमान्ध होण्यातच आनंद शोधणारे असतो हे खरे बोचरे वास्तव आहे.
याला सदोहरण स्पष्ट करण्यासाठी एक गोष्ट सांगावीशी वाटते अन् ती जास्त संयुक्तिक देखिल आहे.जपान मधील होकायडो प्रांतातील कामी-शिराटाकी नावाचे आडबाजूला असणारे रेल्वेस्थानक (A44) आहे ते तेथील कमी प्रवासी संख्येमुळे बंद करण्याचा आर्थिक  निर्णय तेथील रेल्वे महामंडळाने २०१५ साली घेतला परंतू काना हाराडा नावाची एक शाळकरी मुलगी त्या स्थानकातून प्रवास करते हे समजल्यावर तीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उदात्त हेतूने तिच्या एकटीसाठी सकाळ-संध्याकाळ दोनवेळा रेल्वेसेवा शैक्षणिक वर्षाकालासाठी २०१६ पर्यंत चालू ठेवण्याचा आर्थिक आतबट्ट्याचा भावनिक अन् त्याही पलीकडे शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारा निर्णय घेतला गेला.यातून केवळ भौतिक प्रगतीच्या चकचकाटा मागे असणाऱ्या शिक्षणासारख्या मुळ विषयाप्रतीच्या संवेदनशील विचारधारेचे केवळ अनुकरण न करता त्यातील धोरणात्मक उत्स्फूर्तता अंगी असणे अधिक गरजेचे आहे.केवळ संख्यात्मक पटकथा मांडून गुणात्मक जबाबदारीचे ओझे डोक्यावरून खांद्यावर नव्हे तर हाताबाहेर करण्याचा घाट घालणे अशोभनीयच नव्हे तर निंदनीय देखील आहे अन् अशा बेजबाबदारांची पटसंख्या जास्त आहे हि खरी शोकांतिका.....

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

रामभरोसे....



             साताऱ्यातील सरकारी दवाखान्यात एका महिलेचा परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे गर्भपात झाला असा आरोप राजकीय महिला कार्यकर्तीने केला अन् परिचारिकेने राजकीय महिला कार्यकर्तीच्या अहंकारामुळे घडले असे सांगितले यावर त्या महिलेच्या आईला प्रतिक्रिया विचारली असता आपण कुणालाही जबाबदार धरत नसुन स्वतःच्या नशिबाला दोष देतो असे हताश विधान केले.या घटनेतून शासकीय यंत्रणा अन् राजकीय व्यवस्था सामान्य माणसाच्या दृष्टीने कसे राम भरोसे आहेत अन् तो स्वतः नशिबाला बोल लावत कसा हतबल झाला आहे हेच प्रकर्षाने जाणवते.
             अशाच प्रकारची भावना कमी अधिक प्रमाणात सर्व देशात बघायला मिळते मग ते काश्मीरी जनता व सुरक्षा सैनिक असू की फेरीवाले,निरूपम व मनसे सैनिक अथवा धोरण व अंमलबजावणी सगळीकडे एक अनामिक अस्वस्थता भासते जी मानसिक अशांततेच्या मुळाशी आहे मग जोपर्यंत काहीतरी स्वयंप्रेरित कारण आहे तोपर्यंत उर्जा खर्च करायची अन् ती संपली की मानसिक द्वंद्व करीत गळून पडायचे.एखाद्याने अजेंडा बनवत आत्मसुखाच्या पायऱ्या चढायच्या अन् इतरांनी स्वार्थबुद्धीच्या कुवतींनुसार तो राबवायचा.मात्र सरळमार्गाने जाऊ इच्छीणाऱ्या सामान्याना काय कमवायचे अन् काय गमवायचे हेच कळत नाही मग जीवंत आहे म्हणून जगायचं का जगण्यासाठी जीवंत राहयचं हा अनुत्तरित प्रश्न घेऊन फक्त श्वास घेत राहायचं.सरते शेवटी त्या जगद् निर्मात्याला दोष देणे सोयीस्कर असते कारण त्याने लिहलेल्या नशिबाने एकदा थट्टा केली की राजाचा रंक होतो अन् आपला विश्वास असो अगर नसो आपल्या वाट्याला वाटाण्याचा अक्षताच येतात.का कुणास ठाऊक हे लिहीत असताना एक गाण आठवतय खेळ कुणाला दैवाचा कळला, तु असो, मी असो, कुणी असो....

रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

मृत्यू एक कटुसत्य...!



दडते ते पाप, घडते ते पुण्य
चढते ती धुंदी, उरते ते शुन्य
जडतो तो जीव, लागते ती आस
बुडतो तो सुर्य, उरे तो आभास
कळे तोच अर्थ, उरे तोच रंग
ढळतो तो अश्रु, सुटतो तो संग
दाटते ती माया, सरे तोच काळ
ज्याला नाही ठाव ते तर आभाळ
घन निळा डोह, कधी दृढ़ माया
आभाळमायाss  आभाळमायाss

संतोष
मृत्यूने तुझ्या जगण्याला मिळालेला पुर्णविराम जरी अस्वस्थ करणारा असला तरी आठवणींची साठवण करणे एवढेच शिल्लक राहिलय. मृत्यूनंतर (जर काही असेल तर) तुझ्या आत्म्याला मुक्ती मिळून मोक्ष प्राप्ती होवो हीच त्या अद्वैताला प्रार्थना...

शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

काळवंडलेल्या स्वातंत्र्याचा दीनपणा....!

काळवंडलेल्या स्वातंत्र्याचा दीनपणा....!

गोरखपुर,उत्तरप्रदेश येथिल बाबा राघवदास मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटल मधे कृत्रिम अॉक्सिजन वीना ६३ जणांचा मृत्यू झाला त्यामधे जवळपास ३२ लहान बालकांचा समावेश आहे.कृत्रिम अॉक्सिजन पुरवठा करणाऱ्याचे ६४लाखाचे बिल थकित असल्याने त्याने पुरवठा थांबवला अन् हा अपघात घडला असं सांगण्यात आले.खरतर हा अपघात नसून संवेदनहीन व कर्तव्यच्युत व्यवस्थेने केलेली हत्या आहे.
सगळ्यात सन्माननीय व्यवसाय म्हणून मान्यता असलेल्या तसेच मानवीय जीवन हेच प्रमुख आधार व उद्देश्य असलेल्या व्यवस्थेत एवढ्या प्रमाणावर बेफिकरपणा अन् मुळ उद्देश्यालाच हरताळ फासला जात असेल तर आपण भौतिक दृष्ट्या प्रगत होत असून माणूस म्हणून मागासलेल्या मनोवृत्तीचे द्योतक आहोत हेच खरे.
चार दिवसांनी ७०वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना केवळ गुलामीच्या जोखडातून मुक्त झालोय पण गुलामी मानसिकतेतून कर्तव्याकडे पाहण्याची वृत्ती मात्र जैसी थे आहे.व्यक्ती तसेच व्यवस्था ह्या दोन्ही एकमेकांना पुरक असतात तेव्हा दोन्हीही नैतिकदृष्ट्या भ्रष्ट असल्यास संपूर्ण समाज पर्यायाने देश विकलांग होतो.अन् असा भौतिकदृष्ट्या स्वतंत्र पण नैतिकदृष्ट्या विकलांग देश मर्यादित प्रगती करतो.इव्हेंट मँनजमेंटच्या जमान्यात अन् कानठाळ्या बसविणाऱ्या आत्ममग्न जल्लोषात करूणेची आर्त हाक ऐकण्यासाठी संवेदनशील मनाची गरज भासते मात्र एका मागून एक धडकत जाणाऱ्या ह्रदयद्रावक घटनांनी समाजमन बोथट झालय.कुणालाही कशाचच काही वाटत नाही दु:खसुद्धा एकाकी पडलय अन् पिडीतांपुरतं मर्यादित झालय.
हे दुश्चक्र थांबवायला हवे.शासन ही कुठली तांत्रिक बाब नसून लोकांनी लोकांच्या माध्यमातून लोकहितासाठी राबविलेली यंत्रणा असते ती व्यवस्थित चालण्यासाठी व्यवस्थेबरोबर संवेदनशील मनाची गरज असते.आपल्या पुर्वजांनी भोगलेल्या पारतंत्र्याचं दु:ख स्वातंत्र्यात जन्मलेल्या पिढीला समजण्यासाठी आपल्या जाणीवा प्रगल्भ पाहिजेत अन्यथा उजळमाथ्याने फडकणाऱ्या तिरंग्याभोवती काळवंडलेल्या स्वातंत्र्याची प्रभावळ तयार होईल अन् त्याचा दीनपणाच अधोरेखित होईल.
नकोत केवळ शुभेच्छांचा सोपस्कार;
नकोत नुसता जिलेबी अन् देशभक्ती गीतांचा भडीमार,
हवा त्यात कर्तव्यदक्षतेचा स्विकार

तेव्हांच बनेल सारे जहाँसे अच्छा हिंदोस्तां हमारा..!
BEWARE BEFORE BECOME GARBAGE

शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

मीबी घडलो तुमीबी घडाना....!!

       
मीबी  घडलो  तुमीबी  घडाना....!


प्रत्येकजण आपापल्या कर्म सिद्धांतानुसार त्या त्या पद्धतीने आयुष्य जगत असतो.कोण का, कसे अन् तसेच का जगतो याला ठोस असे उत्तर नसते पण प्रेरणा देणारीे अनेक कंगोरे असलेली त्याची स्वतंत्र गोष्ट मात्र नक्की असते.
मी मागेवळून पाहतानाही कळतय अन् आठवतय तसं जीवनप्रवाह ज्या ओबडधोबड,कडीकपाऱ्यातून होत गेला तो माझं मलाच कोड्यात टाकत जातो पण प्रत्येक क्षण शृंखलारूपी आयुष्यातील महत्वपूर्ण टप्पा असतो हे मात्र खरं.


गुरुवार, २० जुलै, २०१७

BANG THE BAN....!!!

BANG THE BAN....!!!

            An innocent cartoon has tremendous power to threat world's second power underlines the importance of democracy.
Irony remarks are shortest cut to the truth.

"Winnie the pooh" u prove it love u.





बुधवार, १९ जुलै, २०१७

बा विठ्ठला तुझाच ह्यो विटाळ....!

बा विठ्ठला तुझाच ह्यो विटाळ....!

कृपादृष्टी व्हावी म्हणून तसबीरीला रोज साफसुफ करून गंध फुल वाहून पुजा अर्चा केली जाते अन् काही दिवसानी अनामिक भितीपोटी तर कधी वास्तूतज्ञाचे सल्ल्यानुसार तीच तसबीर बदलत त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी नदीत फेकून सुटकेचा निश्वास टाकला जातो तेव्हा दुखावणाऱ्या धार्मिक भावना बोथट कशा होतात..?







बुधवार, १२ जुलै, २०१७

अबोल लेखणी अबोल कुंचला....!


माझे आवडते व्यंग्यकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन झाले  त्यांनी सामनाच्या उत्सव पुरवणीतून संडे मुड, बाप दाखव,भुईचक्र, रंगमंच या सदरातून विपुल लेखन केले तसेच अनेक सामाजिक अंगावर रेषांचे फटकारे मारले.त्यांच्या जाण्याने एक मार्मिक व्यंगचित्रकार, लेखक हरपला अन् आता विचारांना एक नवी दिशा देणारा दीपस्तंभ विझून गेला हे मी माझे वैयक्तिक नुकसान समजतो.त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच प्रार्थना..!
                     
                   
                भावपुर्ण श्रद्धांजली....!


सोमवार, १२ जून, २०१७

?! निजात्मभाव


              सोडा बॉटल चष्म्यातून बघावे लागणारे तारांकित वैधानिक ईशारे अथवा नियम व अटी म्हणजे र्निभेळ,निरामय जगण्यास अत्यावश्यक गोष्टींना कस्पटासमान लेखत फाट्यावर मारणे व उथळ गोष्टींचे प्रलोभन अधिक ठळक करीत कायदेशीर चौकटीत बसवल्याचे समाधान मानत राजरोसपणे ठकवणे.
"धुम्रपान व मद्यपान हानिकारक" अशा आशयाचे वैधानिक ईशाऱ्याच्या तळटीपाचे सोपस्कार करीत भडीमार करणाऱ्या दारूच्याच कंपनीचा सोडा विकणाऱ्या जाहीरातीपासून उत्तान व उन्माद आयटम साँगपर्यंत सर्वकाही जगण्यावर प्रभाव टाकते अन् नकळत हेच प्रचलित वास्तव आपले स्वभाव वैशिष्ट्ये बनते अन् वर्षोंवर्ष पिढ्यान् पिढ्या खपत तोच आपला निजात्मभाव बनतो.मग सोपस्कार फँशननुसार ईतिहासाची चाळण झालेली पानं कुरवाळत त्यातील पात्रं म्हणजेच महापुरुष जीवंत करीत त्यांची नको ती प्रेरणा घेवून शिवाजी/संभाजी नावाच्या बिड्या फुकतात.इतर वेळी दुखावणाऱ्या भावना अशावेळी मात्र निबर असतात.आधुनिक जीवनशैलीशी सोयीस्कर सांगड घालत या महापुरुषांना आपमतलबी पद्धतीने गोंजारत स्टाईल स्टेटमेंट बनवत धेडगुजरी प्रयोग सादर करीत वेगवेगळे झेंडे हातात घेत आपल्याच गोंधळलेल्या मानसिकतेत रममाण होत राहतात.
आपल्याला समस्यांच्या मुळाशी जावून त्याचे कायमस्वरूपी निराकरण करण्यात स्वारस्यही नसते अन् जबाबदारीचे भानही नसते असतो तो केवळ सोपस्कार म्हणूनच न्यायालयाचा आदर राखत ५०१ मीटरवर बार चालू राहतो,डान्सबार एवजी कलापथक फुलतात अन् गुटख्या एवजी मावा चघळतात.
प्रवास जरी तेजस एक्सप्रेस मधुन केला तरी प्रवासी मात्र जनरल मानसिकतेचे असतील तर अशा आधुनिक विकासाची कास धरून काय साध्य होणार सरतेशेवटी वरवरची रंगरंगोटीचा लेप तडकणारच अन् आतील भेसूर चेहरा उघडा पडणारच.
सध्याच्या सामाजिक, राजकीय,आर्थिक परिस्थितीत जोपर्यंत प्रतिकात्मक नैतिकता हाच आपला निजात्मभाव असेल तोपर्यंत दिखावेगिरी करणारेच आदर्श असेल अन् जगणे हा एक सोपस्कार..!

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

मंगळवार, ३१ जानेवारी, २०१७

विलेक्षण....!

सध्या राजकारण म्हणज दे टाळी जमलं नाहितर टाळाटाळी मग घसा बसोसतर एकमेकांच्या करा टवाळी अन् वाजवा टाळी एवढंच उरलय.
निवडणूक म्हणजे थापांचा पूर अन् पैशाचा धुर.
विकासाच्या नावानं पाडून भूल भावनांच्या बाजाराला मात्र मतांचा कौल.
आज ह्यों उद्या त्यों कितीही फिरवली भाकरी तरी परिस्थिती ज्यों की त्यों.
ईलेक्शन फिवरमधे टैक्स फ्री एन्टरटेनमेंटचा शो, उतरला फिवर की धक्क्याची लोकल अन् खड्याच्या रस्त्यासाठी ठेकेदारांची टक्केवारीची शक्कल.
यादीत असला की कामा पुरता राजा
एकदाका बोटाला लागली शाई मग कसलं मत अन् कसली किंमत श्रद्धा सबुरी मेरा साई.

संदिप महामुनी.

सोमवार, २३ जानेवारी, २०१७

आभासाचे प्रतिक......!

           
             
                 प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंधीला औरंगाबाद येथे नुकतीच एक घटना घडली ती म्हणजे स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या त्रिसदस्यीय समितीतील तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.कारण त्यांनी पालिका आयुक्तांकडे औरंगाबादचे अव्वल शहरांच्या यादीत नाव टाकण्यासाठी पाच लाखांची लाच मागीतली.विशेष म्हणजे या पाहणी पथकातील सदस्यांनी या कामानिमित्ताच्या मुक्कामात २५/३०हजाराची दारू ढोसली असे देखिल निदर्शनास आले आहे.सार्वजनिक स्वच्छतेबाबत कागदोपत्री जागरूक असणारे असले (दारू)अमलदार म्हणजे माकडाच्या हातात कोलीतच.नंतर फार फार तर चौकशी समितीचा फार्स करीत वेळकाढूपणा होईल मग ते प्रकरण प्रोसिडिंगच्या फेऱ्यात अन् कारवाई गुलदस्त्यात.
                भारतीय राज्यघटना जगात अनेक बाबतीत उत्कृष्ट राज्यघटना तसेच जगातील सर्वोत्कृष्ट मुल्यांचा परिपाक असणारी मुलभूत मुल्ये असून देखिल सध्या सर्व स्तरांवर एखाद्या मुलभूत विकासापेक्षा त्याच्या दृश्य स्वरूपातील प्रतिकात्मक सोपस्कारावर अधिक लक्ष केंद्रित करून त्याचाच प्रचार व प्रसार करण्यावर भर दिला जातो मग ती सरकारी धोरणे असो की जगण्याची रीतभात.त्यासाठी मग माध्यमं छापील ते ईलेक्ट्रानिक कोणतेही असो.
                  सरकारी दवाखान्यात एखादा अनोळखी गंभीर रूग्ण असो की मृतदेह त्यांचा वेळवर व योग्य उपचार असो की अंतिम सोपस्कार ज्या बेफिकिरपणे केला जातो ते पाहता मानवी संवेदना कितीही बोथट असल्या तरी मोबाईल ची रिंगटोन मात्र भक्तिमय ठेवलेली असते.भिंतीवर 'रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' असे छान प्रभावी वाक्य लिहून ठेवायचे सरकारी नियमानुसार कर्मचाऱ्यांचा सर्व कोटा भरला अन् सोशल वर्कर नावाने पदं भरली की झाले भले त्याने नेमून दिलेली सेवा मन लावून न का करो पगार व अन्य सोयीसुविधांचा मेवा नेमाने घेण्याबाबत मात्र ते आग्रही असतात रुग्ण मात्र अनास्थेचे बळीच ठरतात.दुसरीकडे सुरक्षा सप्ताहाचे निमित्त साधून हप्ता गोळा करण्यात मग्न असणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना वाहतूक शिस्तीपेक्षा नियमांच्या अज्ञान व उल्लंघनातच फायदा दिसतो.एकिकडे अशी वेगवेगळ्या सरकारी खात्यातील वेगवेगळ्या तऱ्हा अन् दुसरीकडे निवडुन आलेले लोकप्रतिनिधी त्या त्या सभागृहात लोकांच्या हितासाठी चर्चा करायची सोडून अर्धे अधिवेशन आरडाओरडा करण्यातच घालवतात अन् स्वतःचे पगार,भत्ते न चर्चा करता बहुमताने वाढवतात.एकिकडे संसदेला लोकशाहीचे मंदिर म्हणत पायरीवर डोके ठेवणारे स्वतःच्या निर्णयाचे उत्तरदायित्व स्विकारत संविधानात्मक मत मांडून चर्चा करण्यापेक्षा व्टिटरला प्राधान्य देतात.चरख्यावर सुत काततानाचा फोटो टाकून एखाद्याची अहिंसावादी प्रतिमा पुसताही येत नाही अन् अंगिकारताही येत नाही.तसेच केवळ 'हलवा सेरेमनी' करून देशाची आर्थिक घडी व्यवस्थित करणारा अर्थसंकल्प गोड होऊ शकत नाही तर त्यासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय निरपेक्ष अन् कठोरपणे तसेच दुरदृष्टि ठेवून घेतले पाहिजेत.
              अशा सगळ्या वरवरचा आदर्शवाद मिरवण्यातच समाधान मानणाऱ्या व शोधणाऱ्या मानसिकतेचे आपण सर्व बळी ठरतो आहोत अन् केवळ आदर्शवाद मुल्यांचा प्रतिकात्मक स्विकार करून मुलभूत बदलाचा आभास निर्माण करतो आहोत आता ही आभासाची प्रतिकेच आपले जगणं व्यापून टाकतायेत तेव्हा जगणं प्रतिकात्मक होण्या आधी सावध होऊया..!

संदिप महामुनी
९६३७१३०२०६

शनिवार, १४ जानेवारी, २०१७

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

               
                   सुर्याचा मकर राशीत प्रवेश(संक्रमण) होत त्याचे उत्तरायण सुरू होते अन् यालाच आपण मकरसंक्रांत म्हणत ती साजरी करतो.थोडक्यात काय एका टप्प्याकडून दुसऱ्या टप्प्याकडे प्रवास करताना आधी काय वाईट घडलं असेल तर ते सोडून या निमित्ताने चांगली सुरवात करायला स्वतःला व दुसऱ्याला संधी देणे इतकचं अन् ती गोड असेल तर तिळात गुळ...
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

रविवार, १ जानेवारी, २०१७

मनमौजी जगायचे....!

                     
                        मनमौजी जगायचे....!

                     आज नेहमीप्रमाणे चहा पित बसलो होतो, सौ जेवण बनवण्यात व्यस्त होत्या अन् आमचे लाडके चिरंजीव राजवर्धन टिव्ही पाहण्यात गुंग होते अर्थात कार्टूनच चालू होते माझ्या मते आकार उच्चार बदलले तरी कार्टून्स गैर नाहीत कारण आपल्या लहानपणी सुद्धा ते आपल्याला खुणावत होतेच पण मोठेपण येता येता वास्तवात त्या प्रतिमा धुसर होत गेल्या इतकचं.या वास्तवाचे अचुक भान असणाऱ्या तमाम आयांचे प्रतिनिधित्व करत आमच्या अर्धांगिनी स्वयंपाकघरातूनच गरजल्या "अरे काय करतोयस गा** स्कॉलरशिपला बसलायस लक्षात आहे का विसरलास..." मग नेहमीची ठरलेली उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक वाटणारी काय करावे काय करू नये या सदरात मोडणारी सु भाषीतील घोकंपट्टी करून माझ्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी कटाक्ष टाकत अहो बघतायना काही तरी सांगा त्याला अशी सुचना वजा आदेश दिला मी पण वडिलकीचे कर्तव्यरूपी सोपस्कार पार पाडणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत अरे काय करायचय,अवघड आहे पुढे म्हणत काही आदर्श तथाकथित यशस्वी लोकांची ऐकून ऐकून गुळगूळीत झालेली उदाहरण देत छातीत भरलेली हवा मोकळी केली.तुला नेमके काय करायचेय ह्या उत्तराची अपेक्षा न ठेवता विचारलेल्या प्रश्नाने ठरलेला शेवट करावा हा प्रघात पाळत चहाचा घुटका घेतला अन् चिरंजीवाच्या आकस्मिक उत्तराने एकदम ठसकाच लागला.उत्तरच तसे होते " मनमौजी जगायचे".१२ वर्षीय मुलाचे उद्गार ऐकून मी अन् सौ दोघेही स्तब्ध होऊन त्याचाकडे पाहत राहिलो.थोड्याश्या अंतरालाने मला त्याच्या उस्फूर्त व मनस्वी उत्तराने समाधान वाटले कारण आपल्यातील प्रत्येकालाच असे जगायची सुप्त महत्वाकांक्षा असते अन् ती कधीतरी नक्कीच पुर्ण होईल या आशेवर आपण आपल्या आयुष्याचा सारीपाट मांडत असतो.
                   खरतर मनमौजी जगणे म्हणजे मनाला वाटेल तसे बंधन नसलेले स्वैर असे आपणास वाटते पण प्रत्यक्षात कुठल्याही कामात मन रमणे नाहीतर रमवणे म्हणजे मनमौजी कारण स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचे भान अन् मनाला शिस्त असेल तसेच कल्पना व वास्तव यातील तफावत ओळखून ती स्विकारण्याची मानसिकता असेल तरच आपण कोणतेही काम आनंदाने करू शकू व तीच त्यातील मौज आहे.मनमौजीपन हे काय साध्य नव्हे तर तो आयुष्याकडे पाहण्याचा व जगण्याचा दृष्टिकोन होय.आपण एक स्वतंत्र व्यक्ती असलो तरी या निसर्गाचा व समाजाचा घटक आहोत तसेच त्याचे नियंत्रण एकतर्फी नाही हे विसरून चालणार नाही.असो राजवर्धनच्या उत्तराने पुन्हा एकदा उजळणी झाली अन् हो आजपासून नव्या वर्षात २०१७ मधे पदार्पण करीत आहोतच तेव्हा त्याला तो मनमौजी दृष्टिकोन लाभो ही सदिच्छा व्यक्त करीत आपणही मनमौजीपणे जगुया त्यासाठी तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा...!

संदिप महामुनी
९६३७१३०२०६

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

बिन पैशाचा तमाशा......!

          
                          बिन पैशाचा तमाशा......!
             अर्थ निश्चलीकरणाच्या निर्णयाने देश चांगलाच ढवळून निघाला अन् आठवड्याभरात जुने ५००/१००० रूपयाचे चलन जमा करण्यासाठीची मुदत देखिल संपेल तेव्हा निणर्याला ५० दिवस पुर्ण झाल्या प्रित्यर्थ त्याचा नेमक्या रद्द झालेल्या अन् जमा झालेल्या चलनाच्या आकडेवारीचा तसेच काळ्या पैशाचा सरकारी हिशोबासहित सरकारी निर्णयाचा लेखाजोखा यथावकाश सुवर्णक्षणी यथार्थपणे मांडला जाईल आपण त्याचे नेहमीप्रमाणे मुक साक्षीदार होऊचं.
             या निर्णयानंतर तब्बल १२५ वेळा नियम बदलले त्यामुळे सामान्य जनते बरोबरच सरकार सुद्धा संभ्रमित होते तेव्हा अर्थशास्त्र हा विषय बहुतांशी पर्यायी असल्याने त्याच्या दुर्बोधते बद्दल वावडे असणे क्रमप्राप्तच आले तेव्हा डोक्याला जास्त ताण न देता आलिया भोगासी असावे सादर हा संस्कार गिरवणे उत्तम म्हणत देशभक्तीच्या वीररसाने स्वतःची करमणूक करावी एवढाच पर्याय आपल्या कडे उरतो.या निर्णयाने सोशल मीडिया वरील दोन्ही कडच्या प्रतिभाशाली वर्गाला संधी मिळाली अन् त्यांनी त्याचे सोने केले (आनंदाची बाब म्हणजे या सोन्यावर मात्र कोणताही कर अथवा कोणाची नजर नाही असो) काहींनी हे सोने मनमोहनी पद्धतीने येथेच्छ लुटले मग व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला म्हणून काही फरक पडत नाही.तसही व्यवस्थेने लोकांना गृहित धरलेले असते अन् सरकारने व्यवस्थेला.
            या सगळ्या घडामोडीमधे अनेक मनोरंजक अन् आपल्या सारख्या पामरांना अचंभित करणाऱ्या घटना घडल्या.एकिकडे स्वतःच्या २०००रूपयांसाठी ३-४ तास रांगेत उभारून देशप्रेम व्यक्त करणारे तसेच स्वत:चे पांढरे केस काळे करायला सुद्धा वैतागणारे आपण अन् दुसरीकडे बिनदिक्कत १००/२०० कोटी काळ्याचे चुटकीसरशी पांढरे करणारे,१०-१० कोटी नविन चलनात लॉकर मधे ठेवणारे तसेच तिजोरीच्या चाव्या कनवटीला बांधून जमादारकीचा सौदा करणारे आधुनिक मनसबदार पाहिले की काही लोकं जास्तच समान असतात हे उमगते.एका बहाद्दराने वर्तमानपत्रात जुन्या नोटा बदलून देण्याची रीतसर जहिरातच दिली अन् ती वर्तमानपत्राने बिनदिक्कत छापली देखील ! त्याला वाटलं छोटी जहिरात असल्यामुळे नेहमीप्रमाणे जो गरजवंत असेल तोच बघेल नाहीतरी मसाज, लैगिंक समस्या निवारण,ज्योतिष सल्ला अश्या जहिरातींशी थोडाच संपादकाचा अथवा सरकारी खात्याचा दुरान्वये संबध असतो या त्याच्या प्रामाणिक भाबड्या आशावादाला सलामच ठोकला पाहिजे.
            ८ नोहेंबरनंतर बँके व्यतिरिक्त रद्दी झालेल्या नोटा राजकीय पक्षात देणगीरूपी गुंतवणूक करण्याची मुभा मिळाल्यामुळे किमानपक्षी काही ठेकेदाराचं तरी कोटकल्याण झाले तसेच २०००० रूपयापर्यंतचा व्यवहार गुप्त ठेवण्याचा व त्या पटीतच व्यवहार करण्याची मुभा असल्याने शिवाय जनता जर्नाधनाच्या सेवेचे पवित्र कार्य करण्याचे व्रत घेतले असल्याकारणाने अन्य कशाही प्रकारचे देशप्रेम व्यक्त करण्याची आवश्यकता नसल्याने त्यांना करमुक्त केलेले आहेच तेव्हा असा महत्वपूर्ण निर्णय सर्व पक्षांच्या पथ्यावर पडला त्यामुळे सर्वांनी आळी मिळी गुपचिळीचे धोरण कोणताच आक्रोश न करता स्विकारलेले आहे.
            काळा पैसा संपवणे,नकली नोटांचे उच्चाटन,आतंकवादाची आर्थिक रसद तोडणे हा व्यापक उद्देश ठेवून घेतलेला निर्णय किती सफल ठरला ते येणारा काळ ठरवेलच परंतू कँशलेसच्या चकचकीत रँपरमधे तो सादर करून जर भूल पाडली जात असेल तर घडलेेला या बिन पैशाचा तमाशामुळे झालेले तथाकथित मनोरंजन नसून अंगावर येणारे बोचरे वास्तव असेल.कुठलाही भुकंप न होता काहीतरी चांगले घडो या आशावादावर वाट पाहत आहोतच.

संदिप महामुनी
९६३७१३०२०६