वर्तमानपत्राचा ई-पेपर झाल्यामुळे मोबाईल वरच ते जास्त वाचलं जातंय.प्रत्यक्ष वर्तमानपत्र अन् ई-पेपर मधे फरक एवढाच आहे की वर्तमानपत्रातील बातमीवर वाचकाची प्रतिक्रिया नोंदवायला पत्रव्यवहाराची वाट पाहावी लागते परंतू ई-पेपर मधे तात्काळ नोंदवता येते अन् इतरांना ती दिसते व त्यावर व्यक्त होता येते.हे किती योग्य-अयोग्य,किती चांगले-वाईट याबद्दल मी साशंक अन् थोडा निराश आहे कारण देखील तसंच घडलय मोबाईल वर मारूती चितमपल्ली यांची 'एका अरण्यॠषीचे वेदनादायी स्थलांतर' या मथळ्याखाली बातमी वाचत वाचत शेवटाकडे गेलो असता बातमीच्या खाली असलेल्या कमेंट कडे लक्ष गेले अन् धक्काच बसला एका वाचकाची (?) त्या बातमीवर प्रतिक्रिया (?) दिसली "आता सोलापूर ला येऊन चादरी विकत बस ".
मला हे वाचून राग आला परंतू त्याऐवजी त्याची समज व एकंदरीतच समाज माध्यमांतील समाजाची दिशा याविषयी अधिक चिंता वाटली.एका ८८वर्षाच्या गृहस्थाने संपूर्ण जीवन निसर्गातील पशूपक्षी,वृक्ष,मासे यांची अभ्यासपूर्ण माहिती गोळा केली व त्याचे पुस्तक रूपी कोश निर्माण केले ते एकाकीपणा मुळे त्यांचे आवडते ठिकाण सोडून नाईलाजाने गावी सोलापूरला स्थलांतर करतायेत या बातमी वर काय प्रतिक्रिया देतात. खरंतर ती प्रतिक्रिया नसून त्याच्या आजारी मानसिकतेची प्रतिक्षिप्तक्रीया आहे.त्यावर कहर म्हणजे अशा महाभागाने स्वत:चे नाव एक हिंदुस्तानी असे ठेवलेले आहे अन् या सगळ्यांवर कडी म्हणजे त्या कमेंटला शेकडोंनी लाईक मिळतात.
एकंदरीतच सध्याचे वातावरण मग ते वास्तव असो की आभासी हे कमालीचे दुषित झाले आहे मध्यंतरी नाटकी वाह्यात प्रतिक्रियांच्या सामन्यात सगळ्यांनी ते अनुभवलं आहेच पण नुकतीच क्रिकेटची मॅच हरली म्हणून महेंद्रसिगं धोनीच्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करण्याची भाषा तथाकथित क्रिकेटचा फॅन करत असेल अन् टीआरपीचा झोल करून चॅनेल स्वतःचा अजेंडा राबवत गल्लेभरु पत्रकारिता करीत असेल तर समाजभान येणार कसे केवळ मनात येणाऱ्या भावना नोंदवण्याची घाई अन् त्यासाठी तेवढीच तत्पर ट्रोलधाड ही समाजाची दिशाभूल अन् तरूण पिढीला दिशाहीन बनवते आहे.मग असा एक आभासी हिंदुस्तानी अन् त्याच्या विचारधारेचे शेकडो आभासी समर्थक हे केवळ एक उदाहरण आहे वास्तवात असे हजारो हिंदुस्तानी अन् त्यांचे लाखो समर्थक देशात छुप्या रीतीने वावरत असतील अन् ते द्वेष व थिल्लरपणाने बरबटलेले असतील तर ते खरे समाजाच्या अन् पर्यायानं देशाच्या वैचारिक आरोग्यासाठी घातकच आहे.याचे गांर्भिय वेळीच ओळखले व यावर वेळीच उपाययोजना केल्या तरच वर्तमान काळात संयत प्रतीक्रियेचे होणारं जे वेदनादायी स्थलांतर आहे ते रोखणे शक्य होईल.














