रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

मी मराठी...🚩

मी मराठी...🚩


आपण आपल्या भाषेबद्दल आग्रही नसेल तर इतर लोक आपल्याला गृहीत धरणारचं. भाषा हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक असते. जगात १० व्या क्रमांकावर बोलली जाणारी आपली माय मराठी हिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण तांत्रिक प्रयत्न करण्याची आवश्यकता निर्माण का झाली अन् केवळ तो मिळाल्यामुळे अनुदान मिळणे हे उद्दिष्ट साध्य होईल ही पण भाषा समृद्ध कशी होईल यासाठीचे चिंतन आवश्यक आहे. मला असे वाटते की आपण इतर कोणत्याही भाषेचा दु:स्वास न करता मराठी भाषा व्यवहारात वापरताना आग्रही राहिले पाहिजे. मराठी भाषा दिनानिमित्त आपणा सर्वांना मराठीचा केवळ वापरच न करता आग्रह धरण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा..!

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

स्वरलता हरपल्या...

 


काही व्यक्तीं विषयी लिहिताना लेखणी बोथट होते अशीच एक व्यक्ती म्हणजे लता मंगेशकर या नावाने तमाम संगीत विश्वाला खासकरून गायन क्षेत्राला जवळपास नऊ दशकं गारूड घातलयं. आज त्यांचे देहावसान झाले अन् दैवी स्वर अंतर्धान पावले परंतू अजरामर सुर प्रत्येकाच्या मनात कायमच गुंजन करीत राहतील. त्यांच्या गायना बद्दल बोलण्या इतका माझा अभ्यास नाही. त्या क्षेत्रातील दिग्गज जिथे मंत्रमुग्ध होत अबोल होतात तिथे आपण काय बोलणार परंतू मला त्यांची गाणी ऐकताना जाणवणारी गोष्ट म्हणजे इतर सर्व गायकांप्रमाणे त्यांचा चेहरा कधीही डोळ्यासमोर येत नव्हता तो त्या गाण्यात एवढा एकजिनसी होत असे, जसे की पाणी. पाण्याला आपण जीवन म्हणतो तसं ते गाणं जीवनाचा अविभाज्य घटक बनुन जाते अन् हीच त्यांची खासियत होती त्यामुळेच त्यांचे स्वर खऱ्या अर्थाने दैवी होते. हा स्वर कुणाच्या ना कुणाच्या रुपाने पुन्हा जन्माला यावा अन् सर्वांना मनस्वी समाधान मिळावे हीच भावना व्यक्त करीत त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.

रविवार, ३० जानेवारी, २०२२

आभासी ते विरोधाभासी...!

 आधुनिकता ते आधुनिक तंत्रज्ञान आणि त्याची साधनं यांच्या व्याख्या इतक्या सहजपणे अन् झटपट बदलतायत की मोबाईल ही केवळ गरज राहिलेली नसून तो जीवनावश्यक मुलभूत घटक बनला आहे. आजच्या तरूणाईंचच नव्हे तर सर्व वयोगटातल्या व्यक्तिंचे भावविश्व याने व्यापून टाकले आहे.

मोबाईलवर असणाऱ्या अनेक ॲप्स पैकी बहुतांश ॲप्स मन रिझवण्याचं खरंतर टाईमपास करण्याचा सोपा मार्ग या नावाखाली वापरली जातात. सुरवातीला आपण वापरत असलेली ॲप्स AI technology चा धुर्त व चाणाक्ष वापर करून कधी आपल्या मनाचा अन् अपरिहार्यपणे मेंदूचा  ताबा मिळवतात ते आपल्या गावीही नसते.

सध्याच्या इंस्टाग्राम रील्स, युट्युब शॉर्ट्स च्या व्हिडिओं वर नजर टाकली तर लक्षात येते की थिल्लरपणाचा एवढा सुळसुळाट (sorry सध्या आजारासाठी वापरणाऱ्या viral शब्दाला वेगळीच प्रतिष्ठा आहे) झालाय की ते सामान्य गोष्ट झाली आहे आताच्या भाषेत trending असते मग कोणीही उठतो वाकडी मान करून मैं झुकेगा नहीं सालाss म्हणत वाकडा-तिकडा चालत creativity ची खाज भागवतो. योगा, जीम, नृत्य याचा आधार घेत काही तरूणी ते वय वाढलेल्या तरूणी यांनी तर ताळतंत्रच सोडले आहे शरीर केवळ अन् केवळ प्रदर्शनासाठीच असते अन् तोच एकमेव लक्ष वेधून घेण्याचा व प्रसिद्धी मिळवण्याचा सोपा मार्ग आहे याबद्दल त्या इतक्या ठाम असतात की त्यांच्या आत्मविश्वासाचं रूपांतर  boldness मधे परावर्तित होतं. मोकळेपणा आणि नग्नता यातील मुलभूत फरक न समजल्यामुळे मोकळा ढाकळा स्वभाव असण्यापेक्षा मोकळ्या ढाकळ्या अंगाचा स्वत:हून बाजार मांडत स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे या पुरुषी मनोवृत्तीला दुजोरा देतात भविष्यात स्ट्रिपिंग क्लब राजरोसपणे सुरू होतील अन् तिथे महिला प्रेक्षकांची संख्या लक्षणीय असेल. मग नंतर victim card खेळून काय उपयोग. 

गोबेल्स निती नुसार एखादी गोष्ट वारंवार अन् वेगवेगळ्या लोकांकडून अनुकरणच नव्हे तर अंधानुकरण केली गेली की त्याला सहज मान्यता मिळते अन् बघता बघता त्याचं रूपांतर प्रथे मधे होते. मग अश्या कुप्रथा विकृतीला खतपाणी घालत सामाजिक ओळख मिळवून देतात.

खरंतर जास्त चिंताजनक बाब कोणती असेल तर ती म्हणजे वरील मंडळीच तिरंगा फडकवत जयहिंदच्या घोषणा देत देशप्रेमाचे दर्शन घडवतात तर कधी गणेश जयंतीच्या, ईदच्या भक्तीभावाने शुभेच्छा देतात तर कधी गड किल्ल्यांचा इतिहास जागवत शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचं मिरवतात. अश्या तुकड्या तुकड्या विचारात जगणारे कोणतीही विचारधारा अखंड अवलंबू शकत नाहीत केवळ वैचारिक गोंधळ घालून स्वत:ला खोटं समाधान देतात. असे तुकडे जोडून कोणतीही कोलाज कलाकृती निर्माण होऊ शकत नाही केवळ विरोधाभास अधोरेखित होतो. बहुआयामी असणे अन्  बहु प्रतिमेत अडकणे यात मुलभूत फरक असतो, असे तुकड्या तुकड्यातील विचार व्यक्तीला छिन्न मानसिकतेचे म्हणजे स्किझोफ्रेनियाचे रुग्ण बनवू शकतो. तेव्हा आभासी जगातून निर्माण झालेली विरोधाभासी मानसिकता तुमच्या निरोगी आयुष्याला ग्रासून टाकण्या आधीच viral व trending पासून सावध राहा आणि सुरक्षित रहा.


रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

मोबाईल मॅनिया....

 

म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये अशी एके काळच्या मराठी भाषेत म्हण होती परंतू हल्ली त्याचा मतितार्थ जास्त महत्त्वाचा आहे. कारण वर्तमानात घडणाऱ्या बातम्या बघितल्यावर नेमके हेच प्रतीबिंबीत होतंय अन् याचा प्रत्यय प्रकर्षाने येतोय.
एका आईने स्वतःच्या १३ वर्षाच्या मुलीला मोबाईलच्या अती वापरावरून सातत्याने होणाऱ्या वादातून स्वतःच्याच ११ वर्षाच्या मुला समोर कायमचं संपवलं आणि या प्रकाराने चिडलेल्या मुलाने आपल्या आईला भोसकून ठार केले.
एका अल्पवयीन मुलाने आपल्या अल्पवयीन बायकोला मोबाईलसाठी दुकानदाराला विकले.
एका सहा वर्षे वयाच्या मुलीला ८,१०,११ वयोगटातील तीन मुलांनी मोबाईल मधिल पॉर्न क्लिप‌ जबरदस्तीने दाखवण्याचा प्रयत्न केला अन् तीने या गोष्टीला नकार दिला म्हणून तीला दगडाने मारून टाकले.
या सर्व घटना नेमके काय प्रतीबिंबीत करतायंत सध्याचे पालक मुलांच्या मोबाईल व्यसनाधिनतेला अक्षरशः कावलेत अन् त्यासाठी ते इतकं टोकाचं पाऊल उचलतायत की अख्खं कुटुंबं त्यात उध्वस्त होतायंत दुसरीकडे आपल्या अल्पवयीन मुलांची लग्ने लावून आपले वैचारिक बुरसटलेपण अधोरेखित करताना डिजीटलायजेशन व आधुनिकतेच्या नावाखाली त्यांचीच मुलं ' बायको नको पण मोबाईल हवा ' असं म्हणतायत. तर तिसरीकडे या ८-१० वर्षाच्या मुलांकडे पॉर्न क्लिप‌ने भरलेले मोबाईल असतात अन् पालकांना त्याची फिकीर नाही किंबहुना स्वतःच्याच तथाकथित मनोरंजनासाठी पालकांनीच तो संग्रह जपून ठेवलेला असेल. नैसर्गिक बहर येण्या आधीच पोक्त पणाचं कोमेजलेपण लादलं गेले की नैसर्गिक खुजेपण अटळ आहे.
या बातम्या आपण केवळ अपवाद म्हणून पाहत असू शकतो परंतु ज्या पद्धतीने व वेगाने आधुनिकतेच्या नावाखाली नैतिकतेचा ऱ्हास होतो आहे ते पाहता हाच नियम होण्याचा धोका अधिक संभवतो.
मग प्रश्र्न असा पडतो की यात चुक नेमकी कशाची व कुणाची तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बेसुमार प्रगतीची का केवळ कुणाच्या तरी दुनिया मुठ्ठी मध्ये घेण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी इनकमिंग ते रोजचा दिड-दोन जीबी डाटा मोफत वाटण्याच्या धोरणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या सरकारची.
तंत्रज्ञान विकसित झाले की स्वाभाविक व सहाजिकच माध्यमं देखील बदलत जातात. परंतु कोरोना च्या पार्श्र्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगच्या नावाखाली ऑनलाईनचा जो सोपस्कार पार पडला गेला त्यात शिक्षण व्यवस्थेचे किती भल झालं अन् विद्यार्थ्यांचा कोणता शैक्षणिक विकास झाला हा संशोधनाचा विषय आहे. सरकारी नाईलाजास्तव माकडाच्या हाती मात्र मोबाईल रूपी कोलीत दिलं गेलं हे नक्की. त्यातूनच वेब सिरीजच्या नावाखाली वारंवार अन् सहज उपलब्ध होणारा व्याभिचार , हिंसा व अर्वाच्य शिव्याने बरबटलेले संवाद नैतिकतेची व्याख्या बदलतायत अन् हेच सत्वहीन पोषण अंगवळणी पडते आहे. एखाद्या सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यासोबतच त्या तंत्रज्ञानाचा गैरवापर व समाज व्यवस्थेवर होणारे दुरगामी दुष्परिणाम यावर धोरण राबवणाऱ्या जबाबदार यंत्रणांनी जास्त सजग असलं पाहिजे.
रिकामटेकड्या मनाला या तांत्रिक सुकाळाची जोड फार मोठा वैचारिक दुष्काळ निर्माण करत असताना तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र असून त्याची फिकीर सरकार नामक यंत्रणेला नसेल अन् ती उदासीन व सुस्त असेल अन् निसर्ग आपल्याला नेहमीच संकटाची चाहूल देत असतो पण आपण मात्र झापडं लावून निसर्गालाच लहरी, तऱ्हेवाईक म्हणणार असु तर आपल्या सारखे करंटे आपणच. हा मोबाईल मॅनिया आपल्या तथाकथित भविष्याला गिळंकृत करीत असताना हताशपणे बघत बसण्यापेक्षा सुजाण नागरिकांनी जागृत होऊन समाजाला जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने प्रयत्न केले पाहिजेत.

शनिवार, २९ मे, २०२१

शाश्वत सत्य...!

 

खरंतर आयुष्य म्हणजे प्रत्येक क्षण स्वतःला बदलत जाणे त्यामुळे प्रत्येक क्षणाला काही ना काही शिकतच असतो पण लक्षात किती अन् कसं ठेवतो ते महत्त्वाचे व या प्रक्रियेचे सार म्हणजे आपल्याला असणारी जाणीव.
कोरोनाच्या महामारी ने मला काय शिकवलं याचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जिवंत आहोत यापेक्षा जगात महत्त्वाचं (आपल्या दृष्टीने) असं काही नाही.आपल असणं हे देखील अनिश्चित अन् शाश्वत सत्य आहेच पण आपण सारखं विसरतो तेव्हा रिमांयडर फ्राॅम यमलोक पण विशेष म्हणजे आपण आपलं असं जे काय व्यक्तीगत स्वातंत्र्य समजतो तसं देखील काही नसतं.आपण कृती न करता केवळ प्रतिक्रियात्मक जगत असतो.जस जशे अनुभव वाढत जातात तस तशे निष्कर्ष देखील बदलतात अन् ही प्रक्रिया कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर अपुर्णच राहते.

आपल्याला सुखी राहायचं असेल तर एकतर अज्ञानी रहा किंवा निर्भीडपणे स्विकारा. आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीचा स्विकार करण्याचं ठरवतो तेव्हा आपण चिंतनशील होत त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे.ज्या षडरिपूने ( राग,लोभ,मत्सर,द्वेष,भीती व चिंता ) आपण निसर्गतः व्यापलेले आहोत तेच आपल्या सर्व समस्येचे मूळ आहे किंबहुना आपल्या सतत चालणाऱ्या विचारचक्राला हेच षडरिपू प्रेरीत करत असतात. अन् यातूनच स्वतःच निर्माण केलेल्या समस्येच्या भ्रमरूपी जाळ्यात गुरफटत जात जगण्याचं सुख, समाधान हरवून बसतो.

आपण वरवर समानतेचा पुरस्कार करतो परंतू आपले सुख, समाधान आपण असमानतेतच शोधत असतो. सातत्याने तुलनात्मक दृष्टीने जगाकडे पाहत स्वतःचीच मनःशांती आपण गमावून बसतो. निसर्गाने निर्माण केलेल्या जीवसृष्टी कडे आपण तुलनात्मक दृष्टीने न पाहता जसं वैविध्यपूर्ण माध्यमातून पाहतो तोच दृष्टीकोन मानवाने इतर मानवा संदर्भात अंगिकारला पाहिजे.

सदगुरु वामनराव पै यांनी सांगितलेल्या दोन गोष्टी मला या समस्येच्या निराकरण करण्यासाठी उत्तम पर्याय वाटतो. एक म्हणजे " तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार " आणि त्यांनी सांगितलेली विश्वप्रार्थना " हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे." 

या दोन गोष्टी मनापासून आत्मसात केल्या तर आपण या षडरीपूं पासून अलिप्त राहून चांगले कर्म करण्यास प्रवृत्त होत एक चांगलं व्यक्तिमत्त्व अन् पर्यायाने चांगला समाज निर्माण करता येईल.

रविवार, ९ मे, २०२१

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

राष्ट्रपुरुषांच्या स्वप्नातला समाज...!



आज १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खरंतर हा विषय मांडायला कुठल्याही औचित्याची गरज असता कामा नये परंतू सध्या सर्वजण अन् सर्व क्षण हे उर्त्स्फुत, सहज न राहता उत्साह पुरक अन् ठरवून घडवलेले असतात (म्हणूनच ते अधिक सत्वहिन, मुल्यहिन व बनावटी असतात) अन् अशावेळीच कुठल्याही भावना ओथंबून येतात म्हणूनच पोकळ जय घोष अथवा अभिवादन न करता काहीतरी वैचारिक मंथन व्हावे या उद्देशाने आजचा हा लेखन प्रपंच.

मुळातच कुठल्याही राष्ट्रपुरुषांच्या जीवन कहाण्या बघितल्यावर एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत केलेला वैयक्तिक संघर्ष अन् त्यातून निर्माण झालेल्या वैचारिक प्रगल्भतेतून इतरांसाठी उभारलेली क्रांती मग ज्ञानेश्वरांनी भोगलेला स्वसामाजिक बहिष्कार असो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अनभुवलेले धर्माधारित पारतंत्र्यातील जुलुमशाही किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनुभवलेला वर्णव्यवस्थेने माणूस म्हणून हिरावून घेतलेला जगण्याचा अधिकार सगळ्याच बाबतीत एकच गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे एखादाच अशक्य वाटणारे जीवीत कार्य करुन ठेवतो अन् इतरांनी ते अधिक पुढे नेणे तर दुरच पण एवढा काळ लोटूनही जे निर्माण केले ते टिकवून अंतिम स्तरापर्यंत झिरपवणे सुद्धा एक स्वप्नच राहिले आहे अन् याउपर ते पुर्ण करण्यासाठी यांनीच पुन्हा जन्माला यावे अशी विसंबून राहण्याची बेजबाबदार मानसिकता.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला काही एक कायदेशीर अधिकार दिले आहेत परंतू त्याचा आपल्या सोयीनुसार वापर करून घेतला की निवांतपणे आपापल्या उद्योगात रममाण व्हायचं परंतू बाबासाहेबांनी ज्या उद्देशाने‌ वंचितांसाठी लढा उभा केला ते प्रत्येकजण मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा असो आपापले जीवन जगताना त्या संवेदनशीलपणे ते अवलंबताना दिसतो का मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही पदावर काम करत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्याही जातीधर्माचा एखादा रंजलेला, गांजलेला अथवा गरजू व्यक्ती आल्यास तुम्ही त्यांच्याशी कशाप्रकारे वागता यावरच तुमच्या विचारधारेत त्या त्या राष्ट्रपुरुषांचे किती अन् कसे विचार रुजलेत हे अधोरेखित होते.

आपल्या जनुकातून तसेच अनुभवातून आपल्या मेंदूत द्वेषाधिरीत‌ आपला अन् परका असे   विभाजन करणारी रेषा अस्तित्वात असते अन् कोणतेही शिक्षण अथवा राष्ट्रपुरुषांचे चरित्र ती रेषा पुसण्या ऐवजी अधिक ठळक करीत असेल तर ते त्या त्या व्यक्तींचे कोतेपण. जर आपल्याला एक चांगलं कुटुंब, चांगला समाज अन् पर्यायाने चांगला देश घडवायचा असेल तर आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगात कोणत्याही जातीचा, धर्मांचा, वर्गाचा पुर्वग्रहदुषित द्वेष न करता निरपेक्षपणे सहकार्याची व उद्धाराची भुमिका घेतली पाहिजे तसेच राष्ट्रपुरुष हे कोणत्या समुहाचे नसुन प्रत्येक व्यक्तीच्या वैचारिक प्रबोधनाचे प्रेरणास्रोत असतात हा समज असेल तरच आपल्या राष्ट्रपुरुषांच्या स्वप्नातला समाज निर्माण करता येईल.

रविवार, २८ मार्च, २०२१

खरे डॅशिंग अन् खरे सिंघम...!

 काही अति भावनिक व एकांगी विचार असणाऱ्या लोकांना माझे विचार आवडणार अथवा पटणार नाहीत परंतू एखाद्या घटनेची दुसरी बाजू मांडावी असे मला वाटते म्हणून.

तर नुकतीच वन अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली तसेच त्यांनी यासाठी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या वरीष्ठांच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य केले असल्याचे लिहिलं आहे. खरंतर हे सर्व दुर्दैवी आहे. परंतू मतभेद, वाईट किंवा मनाविरुद्ध वागणूक जगण्याच्या प्रत्येक धडपडीत सामावलेली आहे त्यासाठी एवढे टोकाचं पाऊल उचलणारी व्यक्तीचं किंबहुना तीचे सारासार विचार न करण्याची बुद्धी यासाठी अधिक जबाबदार आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षा देता समाजात ऐट, रूबाब असणारं एखादं अधिकाराच पद मिळवता अन् सगळं झालं असं तुम्हाला वाटतं परंतू निवडलेल क्षेत्र, त्याठिकाणी असणारे कामाचे स्वरूप, तिथं असणारा अनेक प्रकारचा हस्तक्षेप, ताण-तणाव तसेच सरकारी कामाच्या कार्यालयीन मर्यादा यातून आपला ठसा उमटवणारं आदर्श काम करणे या सगळ्या गोष्टींचा कितीसा विचार झालेला असतो. त्यातच महिला म्हणून दया भाव अन् विशेष कौतुक यांची शिदोरी तसेच माध्यमातून डॅशिंग, लेडी सिंघम अशा बिरूदावल्या देत दिलेली वारेमाप प्रसिद्धी अन् ती कनिष्ठ अधिकाऱ्याची असेल तर वरीष्ठ अधिकाऱ्यांना बोचणारं हा वास्तव मनुष्य स्वभाव (अर्थात माध्यमं देखिल अशा बातम्या दाखवून आम्ही कसे स्त्रीवादी आहोत हे दाखवण्यासाठी उतावळे असतात भले त्यांच्या क्षेत्रात किंवा सहकाऱ्यांची मुस्कटदाबी होत असते तेव्हा मुग गिळून गप्प राहणं पसंत करतात ) या सगळ्या गोष्टींचा परिणाम स्वतःच्या नैसर्गिक व्यक्तिमत्वापेक्षा अहंकारावर अधिक होतो अन् त्यामुळेच सारासार विचार न करता स्वतःच्या जीवनापेक्षा नोकरी जास्त प्रिय वाटते. दिपाली चव्हाण यांचे पती देखील सरकारी सेवेत आहेत म्हणजेच आर्थिक आधार असताना एकतर नोकरीच्या ठिकाणी तात्त्विक संघर्ष करावा अथवा जीवनात करण्यासाठी असंख्य पर्याय शोधावे त्या ऐवजी नोकरी सारख्या एका शुल्लक पर्यायासाठी तुम्ही तुमचं आयुष्य उधळून लावता याचाच अर्थ तो अधिकाराचा रुबाब अधिक मन व्यापतोय. माझ्या असं वाचण्यात आले की त्या गर्भवती होत्या जर ते खरं असेल तर मग जन्माला येणाऱ्या जीवाची देखील काहीही पर्वा वाटत नसेल तर तुम्ही आई व्हायचा संवेदनशील निर्णय घेताच कशाला.

खरंतर आत्महत्येला प्रवृत्त करण्याजोगे कुणी प्रयत्न केले असतील तर त्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे परंतू केवळ या गोष्टीचा बभ्रा करण्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मनाचं संतुलन न ढळू देता आपापले काम उत्तम करण्याची वृत्ती रुजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अन् असे प्रयत्न करणारेच खरे डॅशिंग व सिंघम असतात.



सोमवार, ११ जानेवारी, २०२१

टोमणे- विकृत मानसिकतेचा भाग

 

      एका महिलेने सासू सासरे सतत टोमणे मारत असतात यासाठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणी न्यायाधीशांनी हा प्रकार दैनंदिन जीवनाचा भाग आहे तेव्हा यासाठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकत नाही असे मत मांडले.
अर्थातच हे मत बहुतेक सर्व साधारण लोकांना योग्य वाटू शकते परंतु त्याचा जाणिवपूर्वक मागोवा घेतला तर जी व्यक्ती या सततच्या अवहेलनेतून जाते तीला कोणत्या मनस्थितीतून जावे लागते याची संवेदनशीलपणे दखल न घेता केवळ त्या व्यक्तीला गृहित धरणे हे पुरोगामी विचारांच्या गप्पा मारणाऱ्या तथाकथित प्रगतीशील समाजालाही लाज आणणारे आहे. शारीरिक आरोग्य जेवढं आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे हा विचार तो देखील एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात प्रवेश केला असताना आपल्या गावीही नाही. कदाचित न्यायाधिश महाशयांचे बालपण लेक चालली सासरला , माहेरची साडी अश्या चित्रपटांच्या संस्कारात गेले असावे.
खरंतर याप्रकारच्या मानसिक त्रासाला महिलांना अधिक प्रमाणात सामोरे जावे लागत असले तरी लहान मुले, पुरुष यांना देखील याचा सामना करावा लागतो. सततचे टोमणे,अवहेलना यामुळे त्या व्यक्तीचे खच्चीकरण होऊन त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो अथवा त्यातून निर्माण झालेल्या व दबुन राहिलेल्या रागाचे रूपांतर एकतर मानसिक रोगांत किंवा हिंसक गुन्हेगारीत होऊ शकते. नुकतेच राजस्थान मधे एका एकवीस वर्षाच्या तरुणाने त्याच्या दहा वर्षांच्या चुलत भावाचा भर रस्त्यात ब्लेडने गळा कापला विशेष म्हणजे आजुबाजुचे लोक त्या घटनेचा व्हिडिओ बनवण्यात मग्न होते. जेव्हा त्या तरूणाला ताब्यात घेतले तेव्हां त्या कृत्याचा त्याला कोणताही पश्चात्ताप नव्हता. मृत मुलाचे वडिल त्या तरूणाला तुला काही कळत नाही,जमत नाही असं बोलून त्याची सतत खिल्ली उडवत असत शिवाय त्यांनी त्याला शाळेत देखील जाऊ दिले नव्हते या सर्व गोष्टींचा परिणाम त्या तरूणाच्यमनावर झाला आणि त्याचा बदला त्याने त्याच्या मुलाचा खून करून घेतला. ही घटना सततच्या टोमण्याचे पर्यवसन एखाद्या भयंकर गुन्ह्यात होऊ शकते तसेच एखाद्याचे आयुष्य मातीमोल देखील होऊ शकते हेच दर्शवते. तेव्हां सततचे टोमणे हे दैनंदिन जीवनाचा भाग नसून टोमणे मारणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावातील विकृत मानसिकतेचा तो भाग आहे तेव्हा उत्तम व्यक्तिमत्व घडण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्य तसेच राहत्या ठिकाणचं, कामाच्या ठिकाणचं वातावरण हे जेवढं मानसिक आरोग्याला पोषक, प्रेरणादायी तेवढां तो व्यक्ती तो समाज सुदृढ.

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

ना पा रजनीकांता...!

 


              नेहमी स्टाईल सुपरस्टार म्हंटल्यावर समोर येणारा चेहरा म्हणजे शिवाजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत.

हमाल ते बस कंडक्टर अशी कामे करणारा एक तरुण त्याच्या अनोख्या वागण्या बोलण्याच्या पद्धतीमुळे एका चित्रपट दिग्दर्शकाचे लक्ष वेधून घेतो अन् तमिळ चित्रपटात प्रवेश करीत प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत होतो काय, सगळंच स्वप्नवत वाटणारी गोष्ट परंतू स्वप्न विकणाऱ्या या ‌क्षेत्राने रजनीकांत यांच्या रूपाने बनलेल्या दंतकथेने अनेकांना प्रेरणा दिली आहे हे मात्र मनाला भुरळ पाडणारं वास्तव.

त्यांनी केवळ प्रभाव पाडण्यासाठी स्टाईल केली नाही तर सामान्य असो की सुपरस्टार परिस्थिती कोणतीही व कशीही असली तरी ती मनापासून स्वीकारत जगली खरंतर तीचा आस्वाद घेण्याचा स्वभाव हीच त्यांच्या स्टाईलचे रहस्य आहे.

अभिनयामुळे थलायवा असणारे खऱ्या आयुष्यात त्यांच्या सद्वृत्तीमुळे रजनीसर आहेत. एकदा देवदर्शनाला वेशांतर करून जाताना एका महिलेने भिकारी समजून दहा रुपयांची नोट दिली त्यांनी मात्र तो देवाचा आशीर्वाद समजून सांभाळून ठेवली. तसेच एका आंदोलनावेळी संतप्त नागरिकांना शांत करण्यासाठी गेले असता एक युवक रागाच्या आवेशात तुम्ही कोण असं म्हणाला तेव्हा ते म्हणाले *"ना पा रजनीकांता" अर्थात "मी रजनीकांत"* यातुनच दिसणारा नम्र स्वभाव त्यांच्या प्रेमात पाडतो अन् रजनीकांत नावाचं गारूड मनाचा ताबा घेते. अशावेळी मराठी मातीतला शिवाजीराव गायकवाड म्हंटल्यावर एक महाराष्ट्रीयन म्हणून छाती काही इंच आपसूकच फुगते.

७० व्या वाढदिवसानिमित्त रजनीकांत यांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा...!

रविवार, ६ डिसेंबर, २०२०

विश्वशांतीचा क्युआर कोड...!

एका छान बातमीने मन प्रसन्न झाले अन् आशादायी वातावरण देखील निर्माण केले. ती बातमी होती यंदाचा ग्लोबल टीचर पुरस्कार २०२० प्रथमच एका भारतीय अन् खासकरून महाराष्ट्रीयन व्यक्तिला जाहीर झाला. ती व्यक्ती म्हणजे सोलापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजित डिसले. जगातील १२००० स्पर्धकांतून त्यांची निवड करण्यात आली. वार्की फाऊंडेशन ( मुख्यालय लंडन) व युनेस्को यांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप १ मिलीयन अमेरिकी डॉलर भारतीय रुपयात ७ कोटी रुपये आहे.
रणजित सरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्युआर कोड माध्यमांतील पुस्तक तयार करणे तसेच परदेशातील विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन संवाद घडवणे अशाप्रकारचे अभिनव उपक्रम राबविले ते देखील कोणत्याही पुरस्काराचा, प्रसिद्धीचा उद्देश न ठेवता. केवळ शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक दृष्टिकोनाने आधुनिक बदल घडवत लोकल ते ग्लोबल हा टप्पा त्यांनी ओलांडला. विशेष म्हणजे त्यांनी जिंकलेल्या रकमेतील ( स्वतःसाठी खर्च करण्याचा कोणताही विचार न करता ) अर्धी रक्कम शेवटच्या फेरीतील ९ स्पर्धकांमधे त्या त्या देशातील शिक्षण व्यवस्थेसाठी खर्च करण्याच तसेच उरलेली अर्धी रक्कम इनोव्हेटिव्ह लॅब साठी खर्च करण्याचा अतिशय स्तुत्य व परोपकारी निर्णय जाहीर केला. शिक्षण हे सर्व अडथळ्यांसाठी उत्तर शोधण्याचे प्रभावी माध्यम आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देखील  " शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा " हा मुलमंत्र दिला होता परंतू शिका या संदेशाचा सर्वसमावेशक तसेच व्यापक अर्थ घेण्यात आपण कमी पडलो हे मान्यच करावे लागेल.
खरंतर जागतिक महासत्ता होण्याची लालसा अनेक देश किंबहुना हुकुमशाही प्रवृत्तीच्या देशप्रमुखांना आहे परंतू त्यासाठी केवळ व्यापारी किंवा युद्धखोर वृत्ती हेच धोरण अधिक प्रभावी आहे या विचाराला छेद देणारा पर्याय शिक्षण क्षेत्रातील या पुरस्काराने निर्माण केला असं मला तरी वाटतं. शिक्षणाने सर्व सीमा ओलांडून जग खऱ्या अर्थाने जोडले जाऊ शकते अन् हे विश्वची माझे घर ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल. पसायदानाने विश्वशांतीची प्रार्थना करणारे आद्य शिक्षक संत ज्ञानेश्वर यांचे विचार प्रेरणास्थानी ठेवून केलेली वाटचाल नक्कीच फलदायी ठरेल अन् विश्वशांतीचा क्युआर कोड नक्की गवसेल.


शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

खऱ्या दुःखाची ओरड.‌‌..!

रडण्याशी संबंधित असली तरी अतिशय हस्यास्पद अशी एक बातमी वाचण्यात आली. उत्तर अमेरिकेतील मेक्सिको या शहरात दरवर्षी १ नोव्हेंबर या दिवशी ' डे ऑफ डेड ' साजरा केला जातो. इथपर्यंत ठीक परंतू या दिवशी तीथे चक्क रडण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात यंदा कोरोना मुळे त्या प्रत्यक्षात न घेता व्हर्च्युली घेण्यात आल्या. दुःखा पेक्षाही दुःखाचे प्रदर्शन व त्याची मांडणी जास्त महत्त्वाची ही मानसिकता लोकांना जवळची वाटते यात खरंतर मनुष्याचे वैचारिक बुरसटलेपण दडलेले आहे.
आपल्या देशात देखील रुदाली सारख्या प्रथा प्रचलित आहेत तथाकथित उच्च वर्गीय लोकांना जाहीरपणे शोक व्यक्त करणे कमी पणाचे व गावंढळ वाटत असल्याकारणाने खास रूदालीच्या माध्यमातून भाड्याने शोक व्यक्त करून सोपस्कार पार पाडला जातो. वर्षोंवर्षे तेच तेच प्रकार घडत गेल्याने तशा भावना दृढ होत गेल्या व यालाच सामाजिक आधार मिळाला.
परंतू वरकरणी व्यक्त होणारं दुःख हेच अधिक प्रभावी हा निष्कर्ष दिखावीगिरीला अधिक बळ देतो अन् खरा आक्रोश मात्र दुर्लक्षित, वंचित राहतो हे वास्तव नाकारता येत नाही. आपमतलबी,धुर्त लोकं अश्या सामाजिक धारणांचा चपखल वापर करून भावनिक लाटेवर स्वार होत संधी साधताना आपण नेहमीच पाहतो पण लगेच दुखावणाऱ्या भावनांचा विचार करून आपण मात्र गप्प राहणं पसंत करतो. आजुबाजुला नुसती रडारड ऐकू येत असताना खऱ्या दुःखाच्या वाट्याला मात्र ओरडच असते.



सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

संयत प्रतिक्रियेचे वेदनादायी स्थलांतर...!




वर्तमानपत्राचा ई-पेपर  झाल्यामुळे मोबाईल वरच ते जास्त वाचलं जातंय.प्रत्यक्ष वर्तमानपत्र अन् ई-पेपर मधे फरक एवढाच आहे की वर्तमानपत्रातील बातमीवर वाचकाची प्रतिक्रिया नोंदवायला पत्रव्यवहाराची वाट पाहावी लागते परंतू ई-पेपर मधे तात्काळ नोंदवता येते अन् इतरांना ती दिसते व त्यावर व्यक्त होता येते.हे किती योग्य-अयोग्य,किती चांगले-वाईट याबद्दल मी साशंक अन् थोडा निराश आहे कारण देखील तसंच घडलय मोबाईल वर मारूती चितमपल्ली यांची 'एका अरण्यॠषीचे वेदनादायी स्थलांतर' या मथळ्याखाली बातमी वाचत वाचत शेवटाकडे गेलो असता बातमीच्या खाली असलेल्या कमेंट कडे लक्ष गेले अन् धक्काच बसला एका वाचकाची (?) त्या बातमीवर प्रतिक्रिया (?) दिसली "आता सोलापूर ला येऊन चादरी विकत बस ".

मला हे वाचून राग आला परंतू त्याऐवजी त्याची समज व एकंदरीतच समाज माध्यमांतील समाजाची दिशा याविषयी अधिक चिंता वाटली.एका ८८वर्षाच्या गृहस्थाने संपूर्ण जीवन निसर्गातील पशूपक्षी,वृक्ष,मासे यांची अभ्यासपूर्ण माहिती गोळा केली व त्याचे पुस्तक रूपी कोश निर्माण केले ते एकाकीपणा मुळे त्यांचे आवडते ठिकाण सोडून नाईलाजाने गावी सोलापूरला स्थलांतर करतायेत या बातमी वर काय प्रतिक्रिया देतात. खरंतर ती प्रतिक्रिया नसून त्याच्या आजारी मानसिकतेची प्रतिक्षिप्तक्रीया आहे.त्यावर कहर म्हणजे अशा महाभागाने  स्वत:चे नाव एक हिंदुस्तानी असे ठेवलेले आहे अन् या सगळ्यांवर कडी म्हणजे त्या कमेंटला शेकडोंनी लाईक मिळतात.
एकंदरीतच सध्याचे वातावरण मग ते वास्तव असो की आभासी हे कमालीचे दुषित झाले आहे मध्यंतरी नाटकी वाह्यात प्रतिक्रियांच्या सामन्यात सगळ्यांनी ते अनुभवलं आहेच पण नुकतीच क्रिकेटची मॅच हरली म्हणून महेंद्रसिगं धोनीच्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करण्याची भाषा तथाकथित क्रिकेटचा फॅन करत असेल अन् टीआरपीचा झोल करून चॅनेल स्वतःचा अजेंडा राबवत गल्लेभरु पत्रकारिता करीत असेल तर समाजभान येणार कसे केवळ मनात येणाऱ्या भावना नोंदवण्याची घाई अन्‌ त्यासाठी तेवढीच तत्पर ट्रोलधाड ही समाजाची दिशाभूल अन् तरूण पिढीला दिशाहीन बनवते आहे.मग असा एक आभासी हिंदुस्तानी अन् त्याच्या विचारधारेचे शेकडो आभासी समर्थक हे केवळ एक उदाहरण आहे वास्तवात असे हजारो हिंदुस्तानी अन् त्यांचे लाखो समर्थक देशात छुप्या रीतीने वावरत असतील अन् ते द्वेष व थिल्लरपणाने बरबटलेले असतील तर ते खरे समाजाच्या अन् पर्यायानं देशाच्या वैचारिक आरोग्यासाठी घातकच आहे.याचे गांर्भिय वेळीच ओळखले व यावर वेळीच उपाययोजना केल्या तरच वर्तमान काळात संयत प्रतीक्रियेचे होणारं जे वेदनादायी स्थलांतर आहे ते रोखणे शक्य होईल.



शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

अदृश्य शत्रू अन् कागदी खेळाडू...


         सध्या अदृश्य शत्रू मुळे घडणाऱ्या दृश्य परिणामांची दाहकता पदोपदी जाणवत असताना अनेक अदृश्य शत्रू अधोरेखित करणाऱ्या धक्कादायक बातम्या देखील समोर येत आहेत.अशीच एक बातमी वाचण्यात आली ती म्हणजे क्रिडा उपसंचालक यांनी नुकतेच १९९७ ते २००५ दरम्यान २५९ जणांनी बोगस क्रिडा प्रमाणपत्र मिळवले असून त्यातील राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार खेळाची कामगिरी केलेल्या खेळाडूंसाठी सरकारी नोकरीत असणाऱ्या ५% राखीव जागांचा गैरफायदा घेत ३२ जणांनी नोकऱ्या मिळवल्या आहेत असे स्पष्ट करीत त्यांच्यावर कारवाई केली आहे.विशेष म्हणजे सर्व ३२ जण प्रथम वर्ग अधिकारी म्हणून महाराष्ट्रात जिल्हाधिकारी,अधिक्षक, आयुक्त, शिक्षणाधिकारी अशा महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत.

        शासन व्यवस्थेत महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणारे हे महाभाग ज्या खोट्या पायावर उभे आहेत ते पाहता पायाभूत सुविधा निर्माण करणारी व्यवस्था किती तकलादू अन् दिव्यांग आहे हेच स्पष्ट होते.असे जिल्हाधिकारी कोणत्या प्रामाणिक अन् पारदर्शक व्यवहाराचा आदर्श ठेवणार तसेच असे शिक्षणाधिकारी कशाप्रकारे नैतिक शिक्षण तपासणार हा प्रश्र्नच आहे.

      एकीकडे खेळाच्या पातळीवर असणाऱ्या कफल्लकतेवर बोगस प्रमाणपत्राच्या कल्पकतेने मात करण्यासाठी तयार असणाऱ्या कागदी खेळाडूंचा भरणा भ्रष्टाचाराच्या ऑलिम्पिक साठीच जास्त लायक आहे. काही एक बौद्धिक क्षमता असलेले म्हणून त्यांच्याकडे पाहून काही एक स्वप्न बाळगणारे अनेक तरुण तसेच त्यांच्याकडे आशेने व सन्मानाने पाहणारा समाज यांच्या विश्वासाला जो तडा गेला आहे व जे अपरिमीत नुकसान झाले आहे ते दीर्घकाळासाठी न भरून येणारं असतं.

       टम्ब्लिंग व ट्रॅम्पोलीन अशा माहिती नसलेल्या खेळाच्या या चमकोगीरी करणाऱ्या खेळाडूं पेक्षा पोटाची खळगी भरण्यासाठी डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्यांना अधिक प्रोत्साहन दिले तर देशाला ऑलिम्पिक मध्ये पदक तरी मिळेल परंतू महत्त्वाचे पद पदरात पाडून घेण्यासाठी कोलांट्या उड्या मारणारे असले कागदी खेळाडू देशाच्या प्रगतीसाठी अदृश्य शत्रूच आहेत व त्याचे दृश्य परिणाम व्यवस्थेच्या उडालेल्या बोजवाऱ्यात प्रतिबिंबीत होत राहील.