गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

एका कलादिग्दर्शकाची अपूर्ण कलाकृती....!

 


नामवंत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचे ऐकुन धक्का बसला खरंतर कलाक्षेत्रात इतक्या अकस्मात अन् अनपेक्षित दु:खद घटना घडल्या आहेत त्यामुळे आता सहजासहजी धक्का बसत नाही परंतु कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची प्रतिभा अन् योगदान असामान्य होते. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नितीन देसाई यांनी कला क्षेत्रात एवढे उत्तुंग यश मिळवले चार वेळा नॅशनल ऍवॉर्डस्, फिल्म फेअर ऍवॉर्डस् हेच अधोरेखित करतात.
सगळ्या गोष्टी भव्य दिव्य करण्याची मानसिकता अन् हातखंडा देखील. त्यातूनच बॉलिवूडला टक्कर देणारी एन डी स्टुडिओची निर्मिती ही निश्चितच कौतुकास्पद व तितकीच अभिमानास्पद बाब. परंतू हेच भव्य स्वप्न त्यांच्या दुर्दैवी मृत्यूचे कारण व्हावे हे बोचणारे आहे.
खरंतर आर्थिक निर्णय, धाडस चुकू शकतात अन् प्रत्येक माणूस हा कायमच चुकांतूनच शिकत असतो मग आत्महत्ये सारखा एवढा टोकाचा निर्णय घेताना जास्तीत जास्त दुष्परिणाम काय होऊ शकतात याचा विचार केला गेला पाहिजे. फारफार तर स्टुडिओ जप्त झाला असता, अटक झाली असती, काही काळ तुरुंगात जावे लागले असते परंतु बदनामीच्या भीतीने सगळं संपवून टाकणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे. या देशातील उघड उघड नैतिकतेला तिलांजली देणारे निर्लज्ज राजकारणी व देशाला हजारो कोटीचा चुना लावून देशातून पळून गेलेले तथाकथित उद्योगपती यांच्या निगरगट्टपणाला देश सहन करतोयच की मग आपणच उभं केलेलं गेलं संपून अन् आलो रस्त्यावर तर फिनिक्स पक्ष्याप्रमाणे घेऊ ना राखेतून झेप...हाच विचार झाला पाहिजे. इतक्या पदाने, सत्तेने, संपत्तीने मोठ्या असणाऱ्या  लोकांशी असणारे संबंध असून उपयोग काय. बोलून मार्ग काढता आला असता नाहीतर पुन्हा शुन्यावर आलो असतो पण स्वत:च्या प्रतिमा व स्वाभिमान यात अडकून पडणे अन् स्वत:ला व्यक्त होण्यापासून रोखणे हे खऱ्याअर्थाने आत्मघातकी आहे. खरंतर समाजात योग्यवेळी अन् योग्य पद्धतीने व्यक्त होण्याचे संस्कार आपल्या शिक्षणपद्धतीचा भाग असला पाहिजे.
जिमनॅस्टिकमध्ये तुम्ही हवेत किती कोलांट्या उड्या घेतल्या यापेक्षा तुम्ही जमिनीवर उभं राहताना कसं संतुलन केलं याला सर्वात जास्त महत्त्व असते. तसेच खऱ्या आयुष्यात देखील तुमच्या उपलब्धी, कामगिरी यांच्या आलेखापेक्षा तुमचा विचार किती नैतिक अन् संतुलित आहे हेच अधोरेखित होते. तुम्ही मिळवलेले अत्युच्च यश देखील एका हतबलतेतून घेतलेला निर्णयामुळे मातीमोल होते.
नितीन देसाई यांच्या जाण्याने एक प्रतिभा व अनुभव संपन्न कलादिग्दर्शक हरपला तसेच नवी पिढी एका मार्गदर्शका पासून वंचित राहिली ही सर्वात मोठी सांस्कृतिक हानी आहे असे मला वाटते. कोणत्याही कलाकृतीचा फिनिशिंग टच त्या कलाकृतीला पूर्णत्व बहाल करतो परंतु नितीन देसाई ही कलाकृती अपुर्णच राहिली ही शोकांतिका.

बुधवार, १२ जुलै, २०२३

बाईपण भारी देवा...!

 

नुकताच 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट चक्क चित्रपटगृहात जाऊन पाहिला खरंतर पहिल्यांदाच स्त्री राज्यात असल्याचा भास झाला अन् कृष्णाला कसं वाटत असावं हे थोड्याफार प्रमाणात जाणवलं असो विनोदाचा भाग सोडला तर स्त्रीचं मन एकाच वेळी अनेक प्रकारच्या विचारांच्या हिंदोळ्यावर झुलत असतं याचा प्रत्यय आला.
खरंतर सगळ्या प्रकारच्या नात्यात कमी जास्त प्रमाणात बेबनाव असतोच त्याला पाठीला पाठ लावून आलेल्या बहिणी देखील अपवाद नाहीत. समज, गैरसमज याचं रुपांतर अढी, धुसफूस ते मत्सर अन् अगदी द्वेषापर्यंत जाऊन पोहोचते.
खरंतर मत्सराचं दुसरं नाव स्त्री आहे ( Jealousy thy name is woman ) अशी इंग्रजी मध्ये म्हण आहे पण भारतीय स्त्रियांची मानसिकता पाहता वरवर जरी तसंच वाटत असले तरी तिच्या मनाला अनेक पदर आहेत. तिच्या वर वेगवेगळ्या नात्यांची जन्मतःच आलेली अपेक्षांची ओझी अन् ती पुर्ण करुन आदर्शवत स्त्रीची प्रतिमा निर्माण करण्यासाठी व तशी ती सांभाळण्यासाठी ची तीची धडपड या सगळ्यातच तीचे कौतुक कमी अन् कुचंबणाच अधिक होते. हे सर्व करता करता कधी मासिक पाळी बंद व्हायची वेळ आली हे ध्यानातच येत नाही तरी अजून स्वतःसाठी काहीच जगलो नाही हे खरं दुखणं असतं. अशावेळी तिची स्वतंत्र व्यक्ती म्हणून होणाऱ्या घुसमटीला वाट मोकळी करून देण्यासाठी ती दुसऱ्या स्त्री कडेच अपेक्षेने पाहते. एका स्त्रीलाच दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजेल अशी तीची खात्री खरंतर भाबडी आशा असते परंतु फिरून अपेक्षाभंगाचच दुःख पदरी पडते यातूनच निर्माण झालेल्या मानसिकतेचा दुष्परिणाम हेवेदावे, टोमणे, कुचाळक्या, दिखावा, टाळणे यातून दिसू लागतो.
या चित्रपटातील बहिणी पुर्वग्रह दुषित भावनांचे ओझे घेऊन मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येतात अन् त्या प्रवासात ज्यांच्या बद्दल अनेक वर्षे गैरसमज करुन घेत अढी निर्माण झाली होती त्यांच्याच सानिध्यात नात्याच्या सुगंधाची अन् समाधानाची कस्तुरी त्यांना गवसते. सगळ्यांनाच अशी कस्तुरी गवसू शकते फक्त गरज असती ते मनमोकळे असण्याची व मनमोकळेपणाने जगण्याची.
संसारात अनेक भुमिका जगत यंत्रवत झालेलं आयुष्य झुगारूनच स्वतःच प्रजातंत्र निर्माण करता आलं पाहिजे तरच संसारात राहून देखील स्त्री स्वतःच स्वतंत्र व्यक्तीमत्व घडवू शकते.
या चित्रपटाने अजून एक गोष्ट सिद्ध केली ती म्हणजे तुमच्या कडे सामाजिक भान असणारी चांगली संहिता असेल तर कितीही मोबाईलमय जग झाले तरी लोकांना चित्रपटगृहात खेचून आणू शकतो.
स्वतःच्या मनावरचं समज-गैरसमजाचं ओझं पुढाकार घेऊन कमी केले अन् प्रत्येक स्पर्धा ही केवळ जिंकण्यासाठीच नसुन जगण्यातला खरा आनंद शोधण्यासाठी देखील असते हे समजले तर बाईपण भारीच असतं हे प्रत्येक स्त्रीला मनोमन पटेल यात शंकाच नाही.

गुरुवार, २९ जून, २०२३

भेटींत तृष्णता मोठी...!



संतांच्या पालखी संगे

वारी चाले तो वारकरी


विठ्ठल अखंड विटेवरी उभा

असे चंद्रभागेच्या किनारी


वसते समाधानाचे बिंब वरी

तरी डोळ्यात दिसे ओढीचे प्रतिबिंबे खरी


डोईची तुळस अन् मंदिराचा कळस आतुर मिलनाच्या द्वारी

विठु माऊलीचा गजर असे प्रत्येकाच्या सुरी


दंग झाले वारकरी भेटी एकमेका उराउरी

भक्तिरसात नाहली सारी अलंकापुरी.

रविवार, २५ जून, २०२३

मनाचं माकड अन् अंतरंग भाकड....!



 डिजिटल मनी, डॉक्युमेंटेशन पासून ऑनलाइन लर्नींग पर्यंतच्या सरकारी धोरणामुळे जग इतकं जवळ आलं आहे की मोबाईल हेच आपल्यासाठी जग बनलं आहे अन् सोशल मीडिया हा जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. काय पाहयचं असू दे, शोधायचं असू दे किंवा व्यक्त व्हायचं असू दे बहुतांश वेळा मोबाईलच  हातात घेतला जातो. जरा रिकामा वेळ मिळाला की माणूस मोबाईलशी खेळू लागतो खरंतर गेमर अन् युट्युबर आदर्श असणाऱ्या सध्याच्या तरुणाईचं जरा उलटं झालंय मोबाईल मधून वेळ मिळाला की थोडं बाहेरच्या जगाकडे बघितलं जाते. वॉट्सअप किंवा फेसबुक वर बघणे, व्यक्त होणे किंवा शेअर करून स्वत:ची सामाजिक प्रतिमा संवर्धन करण्यासाठी आग्रही असणारे रील्स, शॉर्टस् किंवा युट्युब व्हिडिओ पाहताना मात्र सुरवातीला वेगवेगळ्या प्रकारचे येणारे व्हिडिओ नंतर आपापल्या आकर्षण, आवड ते फॅन्टॅसी पर्यंत एकसुरी होतात. वास्तविक जगापेक्षा आभासी जगात जास्तीच मोकळीक असल्याने अन् आपली ओळख लपवून आपल्यातल्या विकृतीला मोकाट सोडण्याची मुभा असल्याने त्यातच अधिक रमतात. वारंवार तेच ते पाहून कंटाळा आला की मग थोडंसं ज्ञानामृत , नैतिकतेच्या चार वळसे चाटवायचे नंतर पुन्हा आपल्या नादात राहायचं.

म्हाताऱ्या-कोताऱ्या पर्यंत मुरलेल्या या नादामुळे कुणी कुणाला उपदेश द्यायचा हा अनुत्तरित प्रश्न निर्माण झाला आहे.

आभासी जग अन् वास्तव जग यातील फरक करण्याची क्षमता कमी कमी होत चालली आहे त्यामुळे वास्तवातील प्रत्येक कृती ही आभासी जगात व्यक्त होण्यासाठी केली जात आहे मग वाढदिवसाची पार्टी असो की लग्न समारंभ किंवा विठ्ठलाची वारी प्रोफाइल, स्टोरी अन् स्टेटस अपडेटला खाद्य मिळाले पाहिजे. वास्तविक जीवनात हेच फोटो बघून कडक भावा म्हणणारा गरज पडली की तडक निघुन जातो. 

खरंतर मोबाईल मधलं आभासी सोशल लाईफ अन् वास्तवातील सामाजिक भान यातलं अंतर समजणं समाज हितासाठी अत्यावश्यक आहे. दुरचं पाहण्याच्या नादात जवळचं पाहायचं राहिलं म्हणण्या ऐवजी मोबाईल मधलं पाहण्याच्या नादात आजुबाजुचं पाहायचं राहिलं असं म्हणण्याची वेळ येण्या आधी सावध झाले पाहिजे. हीच वेळ आहे भावनांना आवरायची अन् स्वःताला सावरायची अन्यथा मोबाईल वर येणाऱ्या सततच्या माहितीच्या भडीमारामुळे मनाचं माकड होण्यापासून अन् सतत नावीण्याच्या व तथाकथित क्रिएटिव्ह कल्पनांच्या हव्यासापोटी अंतरंग मात्र भाकड होण्यापासून आपण रोखू शकणार नाही.

बुधवार, ३ मे, २०२३

व्यवस्थेचे बैल...!

 


गौतमीला नाचताना खरंतर अश्लील अन् उत्तान हावभाव करताना पाहून तुंबलेल्या शौकीन मंडळींची अवस्था जनावरा सारखी होती असं आत्तापर्यंतच्या कार्यक्रमात घातलेल्या धुडगूसावरून तरी निदर्शनास येतेय पण नुकताच तीच्या खास कार्यक्रमात शर्यतीत सुद्धा न बुजणारा न बावरणारा बावऱ्या नावाप्रमाणेच बावरला 'बावऱ्या' म्हणजे तोच तो बैल ज्याच्यापुढे गौतमी दोन तास नाचली नशिब त्या बैलाला बांधून ठेवले होते नाहीतर बैल काय काय करू शकतो हे गौतमीला चांगलंच परिचयाचं असेल असो आपले दादा म्हंटल्याप्रमाणे कुणी कुणापुढे नाचल्यानं आपल्या पोटात दुखायचं काय काम नाय तरी पण एक सामाजिक किडा म्हणून आपला एक प्रश्न पडतो दीवास्वप्न दाखवणाऱ्या नेत्यांपुढे गुबुगुबु करणारे नंदीबैल अन् बैलापुढे नाचणारी गौतमी पाटील यांच्यात सर्वाधिक विक्री मुल्य कुणाचं. नाचणारीला बैल काय अन् माणसं नावाची जनावरं काय दोन्ही सारखेच तीला सुपारी वाजली म्हणजे झालं पण राजरोसपणे नैतिकतेची सुपारी देणाऱ्या राजकीय व्यवस्थेसमोर लोटांगण घालणारे तथाकथित सुजाण नागरिक रोज उठून चा खेळ खंडोबा उघड्या डोळ्यांनी बघतायत अन् राजकीय व्यवस्थेने व कॉर्पोरेट मिडियाने जर नागरिकांचा बैल बनवला असेल तर मग एक बाई खऱ्याखुऱ्या बैला समोर नाचली म्हणुन बिघडलं कुठे.


मंगळवार, १८ एप्रिल, २०२३

महाराष्ट्राचे 'बेपर्वा' भुषण...!

 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्यात १२ श्रीसेवक उष्माघाताने मृत्यू पावले अन् या कार्यक्रमाला गालबोट लागले अशी बातमी पसरली खरंतर गालबोट लागलं असं म्हणणें साफ चुकीचे असुन कार्यक्रमाची भरदुपारची वेळ,४२° तापमान, सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत एवढा ६ ते ७ तासांचा उन्हाचा तडाखा तसेच २० ते २५ लाख लोकांसाठी लागणारी वैद्यकीय, आपत्कालीन व मंडप व्यवस्था या कशाचाही संवेदनशीलपणे विचार न करता सरकारी तिजोरीतून १४ कोटी रुपये खर्च करून केलेलं ढिसाळ नियोजन, सत्कारमुर्ती व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,मंत्री यांनी आपल्या सोयीनुसार अन् उपस्थित लोकांना गृहित धरत असंवेदनशीलपणे  निवडलेली वेळ अन् सगळ्यात महत्वाचे तारतम्याचा अभाव असणारे अंधभक्त या सर्वांनी घेतलेले ते बळी आहेत. हा उष्माघाताचा नव्हे तर आत्मघाताला प्रवृत्त करण्याचा गुन्हा आहे.

राजकीय व्यवस्थेला अनुयायांच्या संख्येत दिसणारा मतांचा आकडा ( दुर्दैवाने याला कुणीही अपवाद नाही ) अन् त्यासाठी सरकारी तिजोरीतून खर्च करत परस्पर फायदा करून घेण्यासाठीची हाव सामान्य माणसाच्या जीवावर बेतू शकते याची पर्वा आहे का?

तसेच स्वत:ला प्रबोधनकार, निरुपणकार, समाजसेवक समजणाऱ्या व्यक्तींना ज्या माणसांमुळे समाज घडतो त्या शेवटच्या एका घटकाला देखील माझ्यामुळे कसलाही त्रास होता कामा नये याची खरंच पर्वा आहे. का केवळ फॉलोअर, सबस्क्राईब,लाईक अन् शेअर करत घंटा बडवणाऱ्या संस्कृतीचे पाईक होण्यातच समाधान आहे. 

सरतेशेवटी परिस्थितीमुळे रंजलेल्या, गांजलेल्या तसेच हतबल झालेल्या सामान्य माणसाला आधाराची तसेच एका आशेच्या किरणाची गरज असते पण गरजवंताला अक्कल नसल्याने योग्य तो बोध अन् प्रेरणा न घेता पायावर लोटांगण घालत एखाद्या व्यक्तीला देवाऱ्ह्यात बसवून श्रीसेवक भक्तगण होण्यातच धन्यता अन् दर्शनाची ओढच अधिक असेल तर मग अशांना स्वत:ची तरी पर्वा असते का?

महाराष्ट्राला थोर संत, प्रबोधनकार, महापुरुषांची परंपरा लाभली आहे संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांपासून संत गाडगेबाबां पर्यंत तसेच शिवाजी महाराजांपासून बाबासाहेब आंबेडकरां पर्यंत अनेक भुषणावह व्यक्तींची मांदियाळी महाराष्ट्राने अनुभवलेली आहे परंतु ती कितपत रूजलेली आहे हा दुर्दैवी प्रश्न आहे.

२५ लाखांची पुरस्कार रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचं औदार्य औट घटकेचं ठरावं अन् त्याच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृत श्रीसेवकांसाठी ६० लाख रुपये द्यावे लागावे हे बेपर्वाई चेच लक्षण आहे.

अंधभक्तांच्या शक्तिप्रदर्शनाने मनोमन सुखावणारे , पुरस्कारचे सोपस्कार करत दिल्लीच्या हुजुरांना राजकीय वातावरण कसं आपल्या बाजूने आहे हे दाखवण्यासाठीची चमचेगिरी करणारे कुठल्याही घटनेच्या मुळाशी न जाता त्यात असलेल्या फायद्याची पर्वा अधिक करतात अशी आपमतलबी सोपस्कार अन् बेफिकीर वृत्ती असणारेच खऱ्या अर्थाने बेपर्वा भुषण आहेत ही महाराष्ट्राची सांस्कृतिक शोकांतिका आहे.


शुक्रवार, २४ मार्च, २०२३

विष्षय हाय का.....!





 शिवराय नुसता मिरवायचा नाय तर गिरवायचा विषय हाय, 

राजे पुन्हा जन्माला यायचा नाय तर तो विचार पुन्हा जन्माला घालण्याचा विषय हाय.

शिवजयंतीला नुसत्या घोषणा अन् जयजयकार करण्याचा नाय 

तर जय भवानी म्हंटल्यावर आपसूकच जय शिवाजीन उर भरण्याचा विषय हाय

शिवाजी हा केवळ मराठी अस्मितेचाच नाय तर स्वराज्य घडवायचा विषय हाय

म्हणुनच म्हणतो मित्रानो शिवाजी फक्त बोलण्याचाच नाय तर करून दाखवायचा विषय हाय

शिवराय नुसता मिरवायचा नाय तर गिरवायचा विषय हाय

विषय एकच रयतेचा राजा राजा शिवछत्रपती....

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

बिरूदावली, कर्तृत्व अन् मर्यादा...!

 

पुन्हा येरे माझ्या मागल्या... खरंच आपल्या लोकप्रतिनिधींकडून किमान लोककल्याणासाठी आवश्यक समाजकारणाची अपेक्षा ठेवायची का हा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय.

छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचे का स्वराज्यरक्षक म्हणायचे , छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राम्हण प्रतिपालक म्हणायचे का कुळवाडी भूषण म्हणायचे या प्रश्नावर जो अखिल राजकीय काथ्याकूट चालू केला आहे हे नेमके काय आहे एका बाजूला भाजपचे धार्मिक ध्रुवीकरण अन् दुसरीकडे धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे धार्मिक उदारीकरण दोन्हीही केवळ पक्षीय फायद्यासाठीचे राजकारणच. खरंतर या आधी सामान्य जनतेने याचा अर्थपुर्ण विचार केला असेल का अन् त्यानुसार त्यांची महापुरुषांकडे बघण्याचा दृष्टीकोन निर्माण झालेला असेल का या बाबत माझ्या मनात तरी शंका आहे. कोणती बिरुदावली वापरली म्हणजे कर्तृत्व संकुचित अथवा व्यापक होते यावर जो काही बौद्धिक वर्ग चालू झालेला आहे व त्यासाठी जे काय तर्कवितर्क लढवले जात आहेत ते दोन्ही बाजूंच्या समर्थकांना योग्य वाटत असणार यात शंका नाही परंतु भाषेचा अन् भाषेत वापरण्यात येणाऱ्या बिरुदावल्या यांचा अभ्यास मुळांत किती व्यापक आहे यासाठी जर संशोधन केले व मराठी भाषेची अवस्था काय आहे अन् ती सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी आवश्यक मराठी शाळांची व त्यातील मास्तरांच्या गुणवत्तेची  वस्तुस्थिती काय आहे याचा धांडोळा घेतला तर आपला पोकळ अभिमानच अधोरेखित होईल अन् हे सर्व हिंग्लिश मराठी बोलणाऱ्या अन्  वागणाऱ्या तरूणांच्या डोक्यावरून जाण्याचीच शक्यता अधिक. 

बिरुदावली व तिचा संकुचित अथवा व्यापकपणा समजण्यासाठी मुळात आवश्यक प्रगल्भता वाढविण्यासाठी हे सभागृहांचे सन्माननीय सदस्य कोणत्या ध्येयधोरणांसाठी आग्रही आहेत. एकीकडे यावर्षी आपण चीनच्या लोकसंख्येचा विक्रम मोडत १४० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचा देश  होणार आहोत अन् चीन लोकसंख्येच्या दृष्टीने आक्रसत जाणार आहे असं असूनदेखील लष्करी बजेट आपल्यापेक्षा तिप्पट असणाऱ्या चीनची अतिक्रमणाची भुक वाढत चालली आहे हे आपण गलवान, तवांगच्या निमित्ताने अनुभवतो आहोतच. तसेच पाकिस्तान सारखा टंचाई, महागाई व कर्जबाजारी असणारा देश असे आपली डोकेदुखी वाढवणारे शेजारी शत्रुराष्ट्रे असताना अशा परिस्थीतीत आपल्या देशातील बेरोजगार तरुणांसाठी , हवामान बदलामुळे शेती अन् पर्यायाने शेतकऱ्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांचा दुरदृष्टीने विचार करत ठोस उपाययोजना करणार आहोत का तसेच ह्या खऱ्या आव्हानांसाठी सन्माननीय सदस्य किती सभागृह डोक्यावर घेतात.

खरंतर कुणाला कोणती व किती बिरुदावल्या लावायच्या हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा तसेच बौद्धिक आकलनशक्तीचा भाग आहे एक बिरुदावली वापरा अथवा एकावेळी अनेक बिरुदावल्या वापरा कोणत्याही महापुरुषांचे कर्तृत्व हे केवळ बोलण्याने नव्हे तर कृतीने सिद्ध झाले आहे अन् ते कधीही कोणत्याही संज्ञेने संकुचित अथवा व्यापक ठरणार नाही. मग या महापुरुषांच्या कर्तृत्वाचा कित्ता आपले भाषांतज्ञ लोकप्रतिनिधी गिरवणार आहेत का हा खरा प्रश्न आहे. बिरुदावलीमुळे कर्तृत्वाच्या मर्यादा ठरत नाही तर कर्तृत्वामुळे बिरुदावलीच्या मर्यादा व्यापक होतात.


रविवार, १ जानेवारी, २०२३

झाकली मूठ सव्वा लाखाची....!

 

खरंतर सध्याच्या राजकीय घडामोडींवर काय बोलावे का केवळ ऐकावे, पहावे अन् सोडून द्यावे अशा द्विधा मनस्थितीत बहुतांश सुज्ञ नागरिक असावेत कारण डर्टी विद्याने जे बौद्धिक चाटण दिले आहे त्यानुसार हे जग फक्त तीन गोष्टींवरच चालते ते म्हणजे मनोरंजन, मनोरंजन आणि मनोरंजन.. म्हणजे एकुन काय तर प्रत्येक गोष्टीत स्वतःचं मनोरंजन करायचं अन् पुढल्या गोष्टी कडे वळायचं. हे सगळे जरी खरं मानलं तरी कुठल्याही अतिरेकाचा मग मनोरंजन असले तरी त्याचा देखील उबग येतो.

दिखाव्या पुरता असलेला लोकशाहीचा तमाशा व मिरवण्यापुरतीच असलेली संवैधानिक यंत्रणा मग तथाकथित लोकतांत्रिक पद्धतीने निवडून गेलेले लोकप्रतिनिधी सभागृहात जाऊन काय करतात याचं थेट प्रक्षेपणच उपलब्ध असते परंतु लोकांनाच लोकप्रतिनिधींकडून कोणत्या अपेक्षा आहेत अन् कोणत्या असाव्यात हेच माहित नसेल तर काय बोंबलायच...मग हिवाळी नंतर उन्हाळी असे अधिवेशन म्हणजे पुर्वीच्या दहावीच्या ऑक्टोबर-मार्चची वारी अन् त्या वारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची तुलना सध्याच्या लोकप्रतिनिधींच्या नितिमत्तेशी व्हावी. खोचक उपमा देत एकमेकांवर शाब्दिक कोट्या करणे एकमेकांना शालुतून जोडे मारणे नाहीतर नळावरच्या उणीधुणी काढणाऱ्या भांडणाची आठवण करून देणारे आरोप प्रत्यारोप किंवा चिखलफेक करणे हेच चित्र दिसत असते. मग विरोधी पक्षातील नेत्यांनी अमका घोटाळा झाला तमका घोटाळा झाला म्हणत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडायचे मग सत्ताधाऱ्यांनी तुमची अंडी पिल्ली सगळी माहितीयेत असा गर्भित इशारा द्यायचा मग परत तुम्ही गोविंदबागेत का भेटायला गेला होता हे आम्हाला माहीत आहे असा सुचक इशारा द्यायचा हा अन् असाच घटनाक्रम सतत चालू ठेवायचा अन् आपण कसे जनतेचे प्रश्न मार्गी लावले किंवा मांडले अशी वृत्त वाहिनीच्या दांडक्यासमोर तोंडपाटीलकी करायची.

मग आत्तापर्यंत कुठल्या घोटाळ्याचे काय झाले अन् काय सोक्षमोक्ष लावला याचं उत्तर कधीच मिळत नाही कारण आज सुपात असणारे उद्या जात्यात असतात म्हणून केवळ राजकीय सोपस्कार करत राहायचे अन् उत्तर न शोधण्याच्या मानसिकतेतून प्रश्न उपस्थित करत राहायचे हा एवढाच धंदा हो धंदाच करत आहेत.

किशोर कुमार चे एक गाणं आहे  'बंद मुठ्ठी लाख की खुली तो खाक की....' ते एकत्र असलं की किंमत असते या अनुषंगाने वापरलयं परंतू आपल्या कडे झाकली मूठ सव्वा लाखाची अशी म्हण आहे या दोन्ही गोष्टींचा वापर आपल्या लोकप्रतिनिधींकडून हमाम में सब नंगे यासाठी एकी दाखवत तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणत झाकली मूठ ठेवत याचा चपखल वापर केला जातो अन् एवढं उघड गुपित असुन सुद्धा जनता जनार्दन गांधारी प्रमाणे डोळ्यांवर पट्टी बांधून झाकली मूठ सव्वा लाखाची समजत राहण्यातच धन्यता मानते हे विशेष. असो सरत्या वर्षाच्या ओझरत्या आठवणींना उजाळा देत नव्या वर्षाच्या आशादायक व सकारात्मक बदलासाठी आपल्या सर्वांनाच सद्बुद्धी लाभो याच नविन वर्षाच्या शुभेच्छा!


शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

उलट प्रवास गोतास काळ...!

 

अती स्वार्थी, महत्त्वाकांक्षी अन् लालची लोक सोयिस्कर बोलतात सोयिस्कर भुमिका घेतात अन् आपल्याच बदलत्या भुमिकेसाठी तर्कवितर्क लावत या बोटावरची थुंकी त्या बोटावर करतात. अशी लोकं आपल्या तल्लख बुद्धीचा तसेच वक्तृत्व कलेचा वापर भ्रम निर्माण करण्यासाठी करतात अन् केवळ आशाळभूत तसेच मनोरंजन मानसिकतेचा तसेच अल्पमतीधारक वर्ग अशांच्या भुलथापांना बळी पडतो व यांना डोक्यावर घेऊन मिरवतो. सध्याचा काळ हा अशा सर्वपक्षीय गणंगांचा आहे. ज्या शिक्षण व्यवस्थेत प्रश्न पडत नाहीत अन् जीला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत किंबहुना मान्य नसतात तसेच जिथे वस्तूनिष्ठ तर्कसंगत वादविवाद होत नाहीत अशा व्यवस्थेतुन स्वतंत्र व प्रगल्भ विचारधारा निर्माण होणं दुरापास्त आहे. बाबासाहेबांनी शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दलीत वर्गाला दिला असे आपण समजत असलो तरी तो लोकशाहीच्या व्यापक हितासाठी समस्त जनांना लागू आहे. खरंतर बाल बुद्धिला नेमके समजण्यासाठी जरा जास्तच फोड करून सांगावे लागते हे कदाचित बाबासाहेबांकडुन राहुन गेलं असेल कारण शिका म्हणजे नेमकं काय शिकलं पाहिजे अन् त्यासाठी शैक्षणिक धोरण किती पारदर्शक अन् जबाबदार नागरिक घडवणारे असलं पाहिजे हे इथल्या शिक्षणसम्राट धुरिणांना व केवळ सत्तापदाचा टेंभा मिरवणाऱ्या शिक्षणमंत्र्यांना तसेच लांगुलचालना करिता खोगीरभरती केलेल्या एकांगी शिक्षणतज्ञांना कळणं अन् कळलं तरी वळणं हा खरंतर खोटा आशावाद ठरेल अशी वस्तुस्थिती आहे. मग अशा शिक्षण व्यवस्थेतूनच निर्माण झालेले लोकशाहीचे तथाकथित चार स्तंभ हे समानतेच्या तत्त्वाला हरताळ फासणारे असण्याचा धोका संभवतो मग अश्या असमान स्तंभावर अच्छादीत छत कोणाला आसरा देणार. मग वैचारिक गोंधळ उडालेल्यांना कशासाठी संघटित व्हायचं अन् कुणासाठी संघर्ष करायचा कसं समजणार.
ज्याप्रकारचा राजकीय व सामाजिक थिल्लरपणा राजरोसपणे सुरू आहे तो पाहता इथल्या लोकांच्या सहनशीलतेची विश्वविक्रमा साठी नोंद झाली पाहिजे कदाचित स्वमग्नेतेचा अतिरेकच यासाठी कारणीभूत असावा.
बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला हे राजकारणात असणाऱ्यांना अन् उठता बसता नाव घेणाऱ्यांना माहीत असणं स्वाभाविक हवे असो पण त्यांच्या बद्दल तांत्रिक माहिती असण्यापेक्षा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची व विचारधारेची दिशा माहिती असणे अधिक आवश्यक आहे किंबहुना सर्वच संत, महापुरुषांच्या बद्दल जो वाचाळपणा चालू आहे तो याच वरवरच्या उपऱ्या मानसिकतेतून निर्माण होतो आहे अन् यासाठीच तांत्रिक शिक्षणा ऐवजी नैतिक शिक्षण अधिक आवश्यक आहे. केवळ चांगले शैक्षणिक धोरण असणे पुरेसे नाही तर ते सर्वदूर पोहचणे आवश्यक आहे तरच सभ्य, सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाज निर्माण होईल अन् खऱ्या अर्थाने अंधारा कडून प्रकाशाकडे वाटचाल करू अन्यथा उलट प्रवास गोतास काळ ठरेल.

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

कुटायच भजन अन् डोक्याचं भजं....!

 

हल्ली ज्या काय राज्यीय, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय बातम्या सातत्याने आदळतायत त्या ऐकून, वाचुन, बघुन कोणता अन् कसला परिणाम होणार आहे याची जरा सुद्धा जाणीव लोकांना दुर्दैवाने होत नसावी म्हणूनच या गोष्टींचा अतिरेक बळावत चालला आहे.

सध्याच्या राजकीय घडामोडींवर नजर टाकली तर खरा पक्ष कुणाचा ते गद्दार व्हाया खोके यापासून न टळणारी ईडा पिडा तसेच गुजरातराज्यामध्येच जाणारे उद्योग अन् योगायोगाने तिथलेच असणारे पंतप्रधान तर दुसरीकडे एकेकाळी सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या अन् सध्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या कॉंग्रेसचे भारत जोडो आंदोलनाचे प्रतिनिधित्व करणारे युवराज भाजपाच्याच मार्गाने जात इतिहासातील मुडदे उकरत बसत नको ते खाद्य पुरवत असतील तर भरकटलेली अवस्थाच अधोरेखित होते अन् जोडण्या ऐवजी तोडण्याची शक्यता बळावते हे न‌ जाणवणे उपऱ्या विचारधारेचे  लक्षण आहे. केवळ इव्हेंट करण्याच्या कृतीला केवळ इव्हेंट करूनच प्रत्युत्तर देणार असाल तसेच मानसिक,आर्थिक अन् पर्यायाने शारीरिक समस्यांना कारणीभूत असणाऱ्या व आ वासून उभ्या राहिलेल्या वर्तमान परिस्थितीचा सारासार अन् सांगोपांग विचार करणार नसाल तर देश म्हणून आपणाला फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे अन् यासाठी कोणत्याही बाबा वेंगा किंवा नॉस्ट्रॅडॅमसची गरज नाही.

एकीकडे राजकीय पक्षांची धुळवड अन् दुसरीकडे फिल्म इंडस्ट्रीचे सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली चालू असलेले ऐतिहासिक गल्लेभरू बाजारीकरण अन् त्यातून निर्माण होणारे व केले जाणारे वाद पाहता कोणत्या वेडात हे सगळे धावतायत हेच कळेनासे झाले आहे. ज्या सुशासन अन् रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यक्तिगत आयुष्य न जगता आपले सर्वस्व अर्पण केले हे त्यांचं कर्तृत्व बोलण्या पलिकडे कृतीत उतरलं नाही हे जळजळीत वास्तव आहे. महापुरुषांचे केवळ वाचाळ प्रदर्शन करण्या पलीकडे आपली मजल जाऊ शकत नाही कारण कुठल्याही पक्षाला अन् नेतृत्वाला ती निखळ तळमळ नाही, आहे तो केवळ सोपस्कार.

आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियाचं अहंकारी अन् स्वमग्न नेतृत्व व त्यातून निर्माण झालेले रशिया-यूक्रेन युद्ध अन् या सर्वां भोवती फिरत राहणारं आंतरराष्ट्रीय राजकारण हे भविष्यातील महायुद्धाची नांदी आहे यातुन सावध होत आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता राखण्यासाठी दुरदृष्टीने पावलं उचलली पाहिजेत परंतु स्वत:चच घर सांभाळतानाच ससेहोलपट होत असेल तर जगाची उठाठेव कोण करणार अशी बहुतांश देशांची अवस्था झाली आहे. परंतू एकंदरीत स्वास्थ्य हे परस्परावलंबी असते हे लक्षात घेतलेच पाहिजे त्यासाठी कोणतेही संकट आपल्या उंबरठ्यापर्यंत येण्याची वाट बघण्याची आवश्यकता नाही. दुसरीकडे उद्योग क्षेत्रात विदेशी इलॉन मस्क, किंवा देशी अदानी अंबानी प्रवृत्ती सगळं गिळंकृत करण्यासाठी हपापलेली असणं अन् पैशाची ताकद वापरून नैसर्गिक चिव चिव बंद करण्याचा अट्टाहासचे ग्लोबलायझेशन सुसंस्कृतपणा च्या मुळाशी येणार आहे.

या अन् अशाच उबग आणणाऱ्या बातम्यांचा भडिमार म्हणजे तेच ते निरर्थक टाळ कुटायचं भजन झाले आहे अन् त्यामुळे अक्षरशः लोकांच्या डोक्याच भजं झालं आहे. खरंतर वेळ आली आहे की लोकांनी अशा चर्चेला अन् चर्चा करणाऱ्यांना नाकारण्याची कारण बाजाराचा नियम आहे जे विकतं ते चालतं म्हणून 'चलता है' ही वृत्ती सोडून जाणिवपूर्वक चांगल्या गोष्टीसाठी आग्रही रहाण्यातच शहाणपण आहे .

लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।।

ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।।

ज्याचे अंगी मोठेपणा । तया यातना कठीण ।।

तुका म्हणे जाण । व्हावे लहानाहूनि लहान ।।

हा नम्रपणाच माणसाला सुखी राहण्याचा गुरुमंत्र आहे. तो सर्वांना लाभो ही सदिच्छा...



शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

भारतीय नौदलाला त्रिवार वंदन...!

 





आज भारतीय नौदल आणखी समृद्ध करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आज देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत (INS Vikrant) भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे अन् नक्कीच भारताची सामरिक ताकद अनेक पटींनी वाढली आहे. एक भारतीय म्हणून मला सार्थ अभिमान आहेच पण एक महाराष्ट्रीयन म्हणून मला आज विशेष आनंद होत आहे कारण भारतीय नौदलाच्या ध्वजावर सेंट जॉर्ज क्रॉसचं चिन्ह होतं. हे हटवून आता झेंड्यावर नांगर असणारं भारतीय नौदलाचं चिन्ह आहे. त्यावर सत्यमेव जयते आणि श नो वरुण: हे ब्रीद लिहिलेलं आहे. याचा अर्थ 'जलदेवता वरुण आम्हांला आशीर्वाद देवो' असा आहे.
भारताचे पहिले आरमार उभारणाऱ्या शिवरायांच्या राजमुद्रेपासून नौदलाच्या नव्या झेंड्यासाठी प्रेरणा घेतली आहे तसेच हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे.
जय हिंद जय महाराष्ट्र


मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२

मनोरुग्णाची संवेदना अन् शहिदांना मानवंदना...!

 



     मालेगाव शहरात २००५ मधे उभारण्यात आलेलं शहीद स्मारक राजकीय मतभेदांमुळे  उद्घाटनापासुन वंचित होते तसेच अनेक वर्षे झाकलेल्या स्थितीत होते.

काल अचानक एका मनोरुग्णाने चबुतऱ्यावर चढत स्वत:च्या शर्टाने ते साफ करत कागदाच्या पूडीतून आणलेला फुलांचा हार त्याला घातला अन् एक अनोख्या प्रकारे त्याचे उद्घाटन झाले. पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे अन् यामागे काही दुसरा प्रकार आहे का याची चौकशी केली जातेय. 

असो एकंदरीतच या घटनेतील लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे तथाकथित सुशिक्षित अन् सुसंस्कृत समाजामध्ये तथाकथित आदर्शवाद दाखवण्याचा जो प्रयत्न म्हणून मग तो पुतळा असो की स्मारक असो त्याच्या उभारणीचा नेहमीच घाट घातला जातो पण त्यामध्ये वैचारिक प्रगल्भते पेक्षा सोपस्काराचा हेतू अधिक ठळक असतो. त्या पूतळ्यातील व्यक्तिच्या विचारांकडे अथवा स्मारकांतून मिळणाऱ्या कृतज्ञता तसेच प्रेरणादायी भावने कडे आपण किती संवेदनशीलपणे पाहतो किंवा किती संवेदनशील असतो हा खरा कळीचा प्रश्न आहे. निरोगी समाज म्हणून गृहित असलेली‌ संवेदनशीलता जर दिसत नसेल जाणवत नसेल अन् दुसरीकडे मात्र समाजाच्या दृष्टीने मानसिक संतुलन हरवलेला एखादा मनोरुग्ण ती संवेदनशीलता जोपासत असेल अन् आपल्या कृतीने ती दाखवत असेल तर नेमकं कुणाचं संतुलन बिघडलयं . 

खरंतर सगळ्यांनीच अंतर्मुख होऊन व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून, समाज म्हणून आपण कसे आहोत याचा विचार केला पाहिजे अन् आपापल्या भूमिका योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे तरच अपेक्षित दर्जेदार लोकशाहीसाठी आवश्यक लोकशाहीचा दर्जा उंचावेल अन् ही लोकशाही टिकावी अन् वृद्धिंगत व्हावी यासाठी बलीदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात शहिदांना खऱ्या अर्थाने मानवंदना ठरेल अन्यथा प्रतिकात्मकतेच्या मनोव्यापारासाठी प्रतीकांचा जो खेळ मांडला जातो त्याची अखेर मनोरुग्णाच्या संवेदनशिलतेनेच होईल.


Natural Introspection...!

 


Nature always inspire us to introspect...!

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

नवसाचं ओझं अन् देवाचा अवतार...!




    आज एक जण महादेवाच्या रूपात भेटला उत्सूकता म्हणुन त्याच्याशी बोललो तेव्हा त्यानी सांगितले तो एक बहुरूपी हाय पोलीस ठाण्यात नोंद हाय, भजन-किर्तन करतु , तबला वाजवतु अन् देवाचे फोटु बी विकतु... एवढे सगळे बायको, पाच मुलं यांचा संसार चालवण्यासाठी चालू आहे पण मी लोककलाकार असून मला सरकार कडून लोककलाकारांसाठी ची पैशाची मदत मिळत नाही त्यासाठी त्यावेळच्या भारताच्या अर्थमंत्र्यांना सुशिलकुमार शिंदे यांना भेटलो पण एवढा अर्थमंत्री असुन काय बी उपयोग झाला नाही ही त्याची खंत अजूनही ताजी आहे. तसं तर बायको, पोरं काय बी नसत तुमचं नाव सुद्धा नावालाच असतयं तुम्ही एकटं येताय अन् जाताय ही त्याची 'एकटा जीव सदाशिव' फिलॉसॉफी कदाचित स्वतःच स्वतःची समजूत काढत जगण्याचं बळ आणत असेल.

त्याला विचारलं पैश्यासाठी रोज अश्याच अवतारात रंगरंगोटी करून फिरता का तर म्हणाला नाय श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी करतो पण पैश्यासाठी नाय तर यातनं जमलेल्या पैशातला स्वत:ला एक रूपया सुद्धा घेत नाही तर गावातल्यांना देवाच्या नावानं जेवायला घालतो. मी विचारलं का तर म्हणाला पोरगं आजारी असताना नवस बोल्लो होतो. 

खरंतर आज पंचक्रोशीतील अनेक पालख्या पाचवडेश्वराच्या भेटीला येत होत्या माणसं देवाच्या नावानं चांगभलं करत ढोल ताशा वाजवत जात होते पण खरंतर या पालखी बाहेरच्या देवानं माझं लक्ष वेधून घेतले. देव देवळात नाही तर माणसात शोधावां असं संत गाडगेबाबा नेहमी सांगत असत खरंच देव माणसापेक्षा माणसाच्या दुःखात अधिक सामावलेला असतो . रोजच्या संघर्षासाठी देवाचे फोटो विकता विकता नवसाचं‌ ओझं वाहत प्रत्यक्षात त्याचा अवतार करून त्याच्या अवताराचीच वाट बघत असेल. 

कदाचित माणसाला माणसाच्यातल्या देवाचा साक्षात्कार होईल तेव्हा नवसाच्या ओझ्याची अन् देवाच्या अवताराची गरज भासणार नाही.


गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

उच्च कोटीची नैतिकता हाच स्त्री सन्मानाचा कणा...!


       महिला सबलीकरण, महिला आरक्षण, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री सन्मान या घोषणांचा अथवा धोरणांचा नुसता उदो उदो करून कसलाही पुरोगामी विचार अन् कृती अस्तित्वात येऊ शकत नाही त्यासाठी स्त्रियांविषयी आदर रक्तातच असावा लागतो. खरंतर केवळ महाराष्ट्रानेच नव्हे तर समस्त भारतीयांना आदर्श अन् प्रेरणादायी अशा महापुरुषाने आपल्या इथे जन्म घेतला याचा अभिमान असायलाच हवा अन् ते व्यक्तिमत्व म्हणजे एकमेवाद्वितिय छत्रपती शिवाजी महाराज.

त्यांच्या कारकिर्दीतील असंख्य उदाहरणे त्यांच्या उच्च कोटीच्या नैतिकतेची साक्ष देतात. उमरखिंडीत महाराजांच्या विरोधात लढलेली मोगली फौजेची रायबाघिणीचा पराभव होऊन देखील तिच्या हुद्द्या प्रमाणे तीचा मानसन्मान करत तीला परत पाठवले. दक्षिण दिग्विजय मोहिमेत कर्नाटकातील बेळवाडीची किल्लेदार सावित्रीबाई देसाई ही महाराजांच्या सैन्या विरोधात लढत होती तिच्या किल्ल्याला तब्बल महिनाभर महाराजांचा सरदार सकुजी गायकवाड याने वेढा दिला होता अन् अखेर तीचा पराभव झाला मात्र सकुजी गायकवाडाने उन्मत्त होऊन तिच्यावर बलात्कार केला अन् जेव्हा ही गोष्ट महाराजांना समजली तेव्हा त्यांनी सकुजी गायकवाडाचे डोळे काढून आयुष्यभरासाठी कोठडीत ठेवले. तसेच सावित्रीबाई देसाई यांची क्षमा मागून त्यांचा यथोचित सन्मान राखला. यादवाडला सावित्रीबाई देसाई यांच्या लहान बाळाला मांडीवर बसवून दुध पाजताना चे महाराजांचे शिल्प त्यांच्या सह्रदयतेचीच साक्ष देत आजही उपलब्ध आहे. एवढेच नव्हे तर आपल्यातील रांझ्याच्या पाटलाने पाटीलकीचा माज करत एका गरीब शेतकरी महिलेची अब्रु लुटली तेव्हा जराही विलंब न करता महाराजांनी त्याचे हातपाय तोडले. खरंतर आजच्या सारखी पी.आर.ओ. टीम ठेवून स्वतःच स्वतःची टिमकी वाजवण्याची त्या काळी प्रथा नसुन देखील एक मोगल इतिहासकार खाफीखान लिहतो ' जसा भाऊ बहिणीशी वागतो किंवा मुलगा आईशी वागतो तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे '. स्वकियांच्या बरोबरीने राजकीय विरोधकांच्या आई, बहिण, पत्नी, मुलगी अशा कोणत्याही स्त्रीचा महाराजांनी केवळ अन् केवळ सन्मानच केला.

महाराज केवळ सन्मान करुन थांबले नाहीत तर त्यांना बरोबरीचा दर्जा देत निर्णय प्रक्रियेत देखील सहभागी करून घेतले म्हणूनच त्यांच्या सूनांनी देखील हातात तलवार घेऊन मैदानं गाजवली हा इतिहास आहे.

कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेला जेव्हा सैनिकांनी शिवाजी महाराजांच्या समोर उभे केले तेव्हा तिच्याकडे पाहुन 'अशीच आमची आई सुंदर, रुपवती असती तर आम्ही देखील सुंदर झालो असतो ' असं म्हंटल्याची बखरी मध्ये नोंद आहे. त्या स्त्रीचा मातेसमान आदर करुन त्यांची सौंदर्याकडे देखील पाहण्याची असाधारण दृष्टी अन् वृत्तीच अधोरेखित होते.

वास्तविक अशाप्रकारचा नैतिक संस्कार घडविणारा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला नाही हे आपलं खरं दुर्दैव.

जिजाऊंनी केलेले ज्वाज्वल्य संस्कार हेच या नैतिकतेचे खरे गमक आहे तेव्हा एक स्त्रीच सुशासन निर्माण करणारा पुरुष निर्माण करु शकते अन् त्या पुरुषातील उच्च कोटीची नैतिकता हाच स्त्री सन्मानाचा कणा असतो.


बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२

स्त्री सन्मान.. बोलाची कढी आणि बोलाचा भात...!

 

     

    बिल्कीस बानो प्रकरणाविषयी माहिती असण्याची शक्यता तशी कमीच खरंतर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ह्या घटनेचा पुन्हा उल्लेख अपरिहार्य पणे करावा लागतो आहे. गोध्रा हत्याकांडाची प्रतिक्रिया म्हणून ११ जणांनी त्यावेळी १९ वर्षाची तसेच पाच महिन्यांच्या गरोदर असणाऱ्या बिल्कीस बानो वर सामुहिक बलात्कार केला. त्यासाठी या नराधमांना २००२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. १५ वर्षाची शिक्षा भोगल्या नंतर माफी साठी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली असता न्यायालयाने तो अधिकार घटना जिथं घडली तिथल्या सरकारने तो निर्णय घेण्याचे सुचवलं त्याप्रमाणे गुजरात सरकारने त्यांना तांत्रिक कायदेशीर तरतुदींचा वापर करून मुक्त केले. खरंतर तांत्रिक कायदेशीर तरतुदीं पेक्षा समाजाला कोणता संदेश दिला जातो याचा गांभीर्याने अन् संवेदनशीलपणे विचार झाला पाहिजे.

या नराधमांना स्वतःच्या कृत्याची किती उपरती झाली त्यांनाच ठाऊक पण त्यांना सोडलं इथपर्यंत ठीक पण काही महाभागांनी या लोकांचं मिठाई देऊन व हार घालून स्वागत केले. या कृतीतून सदसद्विवेकबुद्धीचा किती ऱ्हास झाला आहे हेच अधोरेखित होत आहे. बलात्कारासारख्या अतिशय गंभीर गुन्ह्याला धार्मिक अथवा बदल्याच्या भावनेतून पाहणं अन् त्याचा व्यक्तिगत तसेच सामाजिक पातळीवर सहज स्वीकार केला जातो हे पाहणे माझ्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कारित रक्ताला कदापीही सहन होणार नाही.

खरंतर नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वतंत्रता दिनी पंतप्रधानांनी भाषणात स्त्रियांचा सन्मान राखला पाहिजे असे आवाहन केले अन् त्यांच्याच गुजरातने त्याला हरताळ फासला आहे. जात, धर्म, पंथ निरपेक्ष स्त्रीचा सन्मान राखलाचं गेला पाहिजे तसं न होता केवळ बोलाची कढी आणि बोलाचा भात होताना दिसत आहे हे भारतीय संस्कृतीसाठी अत्यंत खेदाची अन् शरमेची बाब आहे.


बुधवार, १० ऑगस्ट, २०२२

भावनिक बाजारीकरण...!

    खरंतर जगात कुठेही गेलात तर आपल्याला कशाची ना कशाची कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रतिकं आढळतातच. प्रत्येक व्यक्तीला आपापले वैचारिक वेगळेपण मांडण्यात अधिक रस असतो अन् जेव्हा अनेक लोक एकत्र येतात तेव्हा आपापल्या समविचारी मंडळींना खरंतर सध्याच्या युती-आघाडी सरकार प्रमाणे किमान समान कार्यक्रमा सारखं एकत्र करून आपापली प्रतिकं मिरवण्यात अभिमान देखील वाटतो इथपर्यंत काहीच गैर नाही अन् तसा अधिकार संविधानानेच प्रत्येकाला दिला आहे. परंतू जेव्हां आमचाच विचार अधिक योग्य अन् तोच स्विकारला पाहिजे हा अट्टाहास येतो तेव्हां आपसूकच अभिमानाची जागा अहंकाराने घेतली जाते. 

सध्या ' हर घर तिरंगा ' ही संकल्पना केंद्र सरकारकडून शासकीय पातळीवर व्यापकपणे राबवली जातीय यात वरवर पाहता काही गैर नाही परंतू आपला राष्ट्रध्वज, आपला तिरंगा हे कशाचे द्योतक आहे तर जगात आपण भारतीय म्हणून एक आहोत अन् आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करणारे प्रतिक म्हणजे तिरंगा. लहानपणापासून १५ ऑगस्ट,२६ जानेवारी हे राष्ट्रीय सण साजरे करणे म्हणजे ध्वजवंदन, जिलेबी खाणं, देशभक्ती गीत लावणे आणि सार्वजनिक सुट्टी या स्वरूपात अनुभवत आलो आहोत अन् practice makes man perfect या धर्तीवर आपल्यात केवळ हे म्हणजेच राष्ट्रप्रेम हे अंगवळणी पडले आहे पण खऱ्या अर्थाने ते रुजलं गेले आहे का याचे आत्मपरीक्षण गरजेचे आहे. अन् सध्या असण्यापेक्षा दिसणं जास्त महत्त्वाचं झालं आहे. धंद्याच्या सुत्रा प्रमाणे ' जो दीखता है वो बिकता है ' मग अशा प्रकारे राष्ट्रभावना जागी (जागृत नव्हे) करण्यात रस असेल तर एक महान राष्ट्र म्हणून अन् त्यासाठी आवश्यक एक सक्षम, जागरूक नागरिक घडवण्यासाठी हर घर आरोग्य, हर घर मुल्य शिक्षण, हर घर संविधान यासाठी शासकीय पातळीवर व्यापकपणे व जोमाने काम होताना दिसत नाही. 

असं म्हणतात माणूस हा भावनेने विकला अन् विकत घेतला जावू शकतो मग अशा मार्गाने राष्ट्रभावनेला साद घालून महत्त्वाच्या मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होणार असेल तर देश सुजलाम सुफलाम होणार आहे का? अन् हर जूबाॅं केसरी म्हणत जिथं तिथं थूंकून देश घाण करणाऱ्यां व्यसन बहाद्दरांना तिरंग्यातील केशरी रंगाचे महत्त्व कळणार आहे का?

सद्ध्या समाजातील प्रेरणादायी व्याख्यान अथवा उपक्रमाचं बाजारपेठीय मुल्य पाहता केवळ अशी तात्पुरती उत्साह निर्मिती मुलभूत उर्मी निर्माण करु शकते का? जेव्हां अमृत महोत्सवा निमित्तानं हे होत असताना ७५ वर्षे होऊन देखील मुलभूत गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होणार असेल तर दुरदृष्टी तरी कुठून येणार.

भावनिक हिंदोळ्यावर झुलणाऱ्यांना झुलवत ठेवले की जमिनीवरील वास्तवापासून दूर ठेवणं सोपं जातं मुळातच स्वतःला अन् समाजाला प्रश्न न विचारण्याची मुलभूत शिक्षण व्यवस्था अशा भावनिक बाजारीकरणाला प्रोत्साहनच देणार हे कटू सत्य आहे.


" झंडे की तसबीर तो जहेन ओ दिल में छपी है।

अब देश की तकदीर बदलनाही मेरी हर आरजू की फितरत है। "